घरमनोरंजनअतिशयोक्तीची गुंताडघाई ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई...!’

अतिशयोक्तीची गुंताडघाई ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई…!’

Subscribe

बबन प्रभू यांना मराठी फार्सचा शहेनशहा म्हणता येईल. त्यांनी सत्तरीत लिहिलेले दोन अजरामर फार्स ‘झोपी गेलेला जागा झाला’ आणि ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’, ही दोन्ही नाटकं फार्सच्या सर्व संकल्पना आणि नियमांनी इतकी चोख बांधलेली आहेत की आजही ती जशीच्या तशी सादर होऊ शकतात. मात्र आज, दिग्दर्शक संतोष पवार हे नाटक स्वतंत्रपणे आणि आपल्या शैलीत उभे करतात. म्हणजेच ‘दिनूच्या सासूबाई’चा जुना ढांचा विसरून आपण त्याच्याकडे स्वतंत्रपणे पहायला हवे.

संतोष पवार यांनी हा फार्स ‘ओव्हर द रूफ’, म्हणजे शक्यतेच्या परिसीमेवर नेला आहे. जिथून तो अनेकदा ती सीमा ओलांडतो देखील. फार्स म्हणून तेही आवश्यक असते. मात्र हा फार्स इथे संतोष पवारांच्या हातखंडा मुक्तनाट्याचे फ्युजन होऊन सादर होतो. याच मुक्त शैलीमध्ये ते दिनू साकारतात आणि आपल्या जागा निर्माण करून हमखास हशे आणि टाळ्या मिळवतात.

दिनूच्या या बंगल्याला विविध जागी जाणारे नऊ दरवाजे आहेत. प्रसाद वालावलकरांचा हा सेट दिसतोही देखणा आणि फार्सला आवश्यक लपाछपीसाठी पार्श्वभूमी बनतो. घरावर होणारा सासू हल्ला परतवण्यासाठी दिनू आणि त्याचा रिकामा डॉक्टर दोस्त (नाय) मिळून योजना बनवत आहेत. जिथे ही योजना बनते त्या घरात आणखी एक गुप्त प्रकरण शिजत आहे. दिनूचा मेहुणा रवी याचे लग्न हीराशी झाले आहे. त्यांना एक मुलही आहे. हे मूल बहिणीकडे ठेवून ती कामवाली बनून दिनूकडे राहत आहे. या उपकथानकातील बाळ हे फार्सच्या गोंधळात आणखी भर घालायच्या कामी येते. तिथेच दिनूची हिरॉईन बनायचे वेध लागलेली मेहुणी राहते. जिला ट्रेनिंग द्यायला मेनकादेवीची योजना डॉक्टर नाय करतो. या पार्श्वभूमीवर राधाबाई आणि त्यांचा पाळीव नवरा कन्हैया प्रवेशतात आणि एक चौरंगी सामना सुरू होतो. फार्स आणि मुक्तनाट्याचे हे फ्युजन मग अतिशयोक्तीचे इमले रचत जाते. विनय येडेकर, संतोष पवार, नयना आपटे आणि विलास देसाई हे भिन्न शैलीचे अभिनेते असल्याने बहुतेक संतोष पवारांनी हा फार्स काहीसा मुक्त शैलीत बांधला असावा. तो काही ठिकाणी मजेदार, रंगतदार होतो तर काही ठिकाणी थोडा कमी पडतो. या कमीचा बॅलन्स पवार-येडेकर-आपटे ही त्रयी आपल्या अनुभव, स्टाइल आणि एक्स्प्रेशन्सनी भरून काढते. एकंदर हा फार्स प्रेक्षणीय होतो.

- Advertisement -

संतोष पवार यांच्या मुक्तनाट्याची ओळख असलेल्या गोल-गोल फेर्‍या या नाटकात अनेकदा होतात. क्लायमॅक्समध्ये त्यांनी एक छोटा बदल केला आहे. जो नाटकामध्ये योग्यच वाटतो. शीर्षक संगीत आणि पार्श्वसंगीत चांगले झाले आहे. इतर तांत्रिक अंगे यथायोग्य. सहाय्यक कलाकारांत इरावती लागू यांची मेनकादेवी स्टाईलइज्ड आहे. ऋतुंधरा माने यांनी प्रीती मनापासून केली आहे. रोनक शिंदे यांचा रवी खूप एनर्जीटिक होतो. दीपश्री कवळे यांच्या वाट्याला आलेली घरातील कामवाली त्या विश्वसनीय साकारतात. दिनूचा मेहुणा रवी आणि त्याची कामवालीच्या रुपात असलेली पत्नी हीरा यांच्या गुपितापासून सुरू होणार्‍या या नाटकाची पार्श्वभूमी प्रेक्षकांना ज्यात कळते तो पहिला सीन एडिटिंगचा शिकार झाल्याने नाटकाच्या कनेक्टचा प्रॉब्लेम होतो. हीरा आणि रवी ही पात्र नाटकाच्या मध्यवर्ती संघर्षाशी म्हणजे दिनू-राधाबाई या संघर्षाशी थेट जोडलेली नाहीत. त्यांची समस्या स्वतंत्र राहते आणि ती सक्षमपणे उभी राहत नाहीत. त्यामुळे नाटकाची प्रकृती समजून घ्यायला दिनू आणि राधाबाई यांच्या प्रवेशाची वाट पहावी लागते. नाटकाचा इंट्रो सीन ठीक केल्यास नाट्यविषय प्रेक्षकांच्या लवकर ध्यानात येईल.


निर्मिती : वेद प्रॉडक्शन्स, श्री विश्वस्मै प्रॉडक्शन

- Advertisement -

लेखक : बबन प्रभू
दिग्दर्शक : संतोष पवार
नेपथ्य : प्रसाद वालावलकर
संगीत : साई पियुष/ डॉ. अभिनय देसाई
प्रकाश योजना : किशोर इंगळे
कलाकार : संतोष पवार, नयना आपटे, विनय येडेकर, विलास देसाई,
इरावती लागू, रोनक शिंदे, वैभवी देऊलकर, ऋतुंधरा माने, दीपश्री कवळे


-आभास आनंद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -