घरमनोरंजनअशोक खरा फिल्मी शौकीन

अशोक खरा फिल्मी शौकीन

Subscribe

आजचा तरुणवर्ग हा करिअरच्याबाबतीत जागरुक आहे. आरोग्य उत्तम तर करिअर उज्ज्वल होऊ शकते यावर त्यांचा विश्वास आहे. निर्णय घेण्याची क्षमता या युवकांमध्ये असली तरी चित्रपटातील कलाकारांचे अनुकरण करणे काही थांबलेले नाही. खान, कपूर, खन्ना यांची नावे ही तरुण मुलं जास्त घेताना दिसतात, पण अलिकडे या नामावलीमध्ये मराठी कलाकारांचीही नावे जोडली जात आहेत. फिटनेस असावा कोणासारखा तर अशोक शिंदे सारखा. ते खरेही आहे. तीस वर्षे चित्रपटसृष्टीमध्ये वाटचाल आहे. तरुण कलाकारांनी ज्या पद्धतीने मालिका, नाटक हाताळावे तसा तोही प्रवास करताना दिसतो. सातत्याने त्याला पहाणार्‍या प्रेक्षकवर्गाला त्याच्या व्यक्तीमत्त्वात फारसा बदल झालेला दिसलेला नाही. एकशे एकेचाळीस चित्रपट, एकशे पाच मालिकांची अशोकच्या नावे नोंद आहे म्हटल्यानंतर अशोक खरा फिल्मी शौकीन आहे याचा प्रत्यय येतो. नाटक, जाहिराती यांची गणती यात केलेली नाही. सध्या रॉकी, मेनका उर्वशी हे दोन चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत. त्यानिमित्ताने त्याच्याशी साधलेला सुसंवाद.....

दोन चित्रपट प्रदर्शित होण्याचा अनेकवेळा योग आला असेल ना?
गेल्या तीस वर्षांत एकशे एकशे चाळीस चित्रपट केलेले आहेत, त्यामुळे असा योग अनेकवेळा आला असला तरी त्यातल्या भूमिका या माझ्यासाठी वेगवेगळ्या राहिलेल्या आहेत. रॉकीमध्ये मी समजुतदार अशा मोठ्या भावाची व्यक्तीरेखा साकार केलेली आहे. समाजव्यवस्थेला बदलायचे असेल तर आपण स्वत:ला बदलायला हवे अशा विचारसरणीचा मी आहे, परंतु चित्रपटातला माझा लहान भाऊ मात्र थोडासा भीडस्त आहे. त्याच्या वागणुकीचा कुटुंबावर परिणाम होत आहे. अशी काहीशी ही कथा आहे. मेनका उर्वशी या चित्रपटासाठी मला मोठी भूमिका देऊ केली होती. पण ज्या दरम्यान या चित्रपटाचे चित्रिकरण होते, त्यावेळी दुहेरी, छत्रीवाली या मालिकांमध्ये मी अधिक गुंतलो होतो. महिन्यातले वीस-पंचवीस दिवस त्यांना दिल्याने अन्य काम स्वीकारणे अवघड जात होते. मेनका उर्वशीत मी पाहुणा कलाकार म्हणून काम केलेले आहे.

अभिनयाशिवाय अन्य गोष्टीत फारसा रमला नाहीस?
या बाबतीत मी अमिताभ बच्चन यांना आदर्श मानतो. प्रत्येक कलाकाराने स्वत:चा असा एक उद्देश ठेवायला हवा. तो बच्चन यांनी आजवर जपला. मधल्या काळामध्ये त्यांनी निर्मिती केली असली तरी अभिनयाला प्रथम प्राधान्य त्यांनी दिलेले आहे. भरपूर काही स्वीकारुन मूळ उद्देशावर काही परिणाम होण्यापेक्षा उद्देशाकडे लक्ष केंद्रीत करणे मला महत्त्वाचे वाटते. आता अनेक वर्षे चित्रपट केल्यानंतर आपणसुद्धा चित्रपट निर्मिती करायला हवी असे वाटायला लागलेले आहे. पण यातसुद्धा मी माझा जो मुख्य हेतु आहे तो ठेवणार आहे. निर्मितीशिवाय यात काही अन्य जबाबदारी न घेण्याचे मी ठरवलेले आहे. योग्य वेळ येईल त्यावेळी या नव्या माध्यमाला मी स्वीकारेन.

- Advertisement -

नाटक हे क्षेत्र तुमचा आत्मा आहे मग त्याकडे दुर्लक्ष का?
हे तुझे म्हणणे बरोबर आहे. पण पूर्वीसारखे नाटकात आता सातत्य काही राहिलेले नाही. शनिवार, रविवार, इतरवेळी दुपारी नाटकाचे प्रयोग होतात. त्याशिवाय त्यांचे दौरेही असतात. मालिका, चित्रपट स्वीकारल्याने आणि त्यांना वेळ देत असल्याने नाटकाला वेळ देणे अवघड जाते. त्यातूनही मधल्या काळामध्ये वेळ काढून तरुण तुर्क म्हातारे अर्क, प्रेम प्रेम असते अशी काहीशी नाटके मी केलेली आहेत. मी मालिका, चित्रपटामध्ये गुंतलो असलो तरी नाटक हा माझा प्रथम आत्मा आहे हे नाकारता येणार नाही.

तक्रार करावी अशी कोणती गोष्ट आहे का?
मी जे काही बोलणार आहे ती फक्त माझीच समस्या नाही तर संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीची आहे. एकाचवेळी अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा जो प्रयत्न असतो यावर एकत्र येऊन सामोपचाराने विचार करणे गरजेचे आहे असे मला वाटते. भोजपुरी, पंजाबी, दक्षिणेकडील भाषिक चित्रपट यांचा अभ्यास केला तर तिथल्या नागरिकांना स्वत:च्या मातृभाषेविषयी प्रचंड आदर असल्याचे दिसतेच. तिथले निर्माते सामुहिकपणे विचार करुन चित्रपट प्रदर्शित करित असतात. आपल्याकडे येणार्‍या चित्रपटांची संख्या मोठी आहे, ती नियंत्रणात आणली तर प्रश्न सुटेल असे वाटते. लालबागची राणी या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माते बोनी कपूर यांना घेऊन अनेक निर्मात्यांना संघटीत करण्याचा प्रयत्न केला होता, तो फारसा यशस्वी झाला नाही.

- Advertisement -

आरोग्याच्याबाबतीत तू भरपूरच जागृत दिसतोस?
या बाबतीतसुद्धा बच्चन साहेबांचेच नाव मी घेईन. वाढत्या वयाबरोबर कलाकारांनीसुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. मी ज्यावेळी चित्रपटात क्रियाशिल होतो, तेव्हापासून आजतागायत मी माझ्या आहारामध्ये फारसा बदल केलेला नाही. कितीही व्यस्त असो सकाळी पंचेचाळीस मिनिटे व्यायाम केलाच पाहिजे हा माझा निर्धार असतो. सातच्या आत जेवण हे ठरवलेले आहे. त्यामुळेच माझ्यात हा फिटनेस दिसतो. चित्रपटातील बरेचसे कलाकार असे पथ्य पाळताना दिसत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -