घरमनोरंजन‘ती अ‍ॅण्ड ती’ खाल्ली माती

‘ती अ‍ॅण्ड ती’ खाल्ली माती

Subscribe

काही वर्षांपूर्वीचे चित्रपट पाहिल्यानंतर आता जे चित्रपट प्रदर्शित होतात, त्यांचा दर्जा हा पूर्णपणे बदललेला आहे. एकाच आठवड्यात दोन ते तीन चित्रपट प्रदर्शित होतात म्हटल्यानंतर चोखंदळ किंवा सजग प्रेक्षकाला आजच्या या धावपळीत सर्वच चित्रपट पाहता येतील असे नाही. मग त्यातून तो स्वत: निरीक्षण करून चित्रपटातले कलाकार, तंत्रज्ञ यांचा अंदाज घेऊन कोणता चित्रपट पहायचा हे ठरवत असतो. ‘ती अ‍ॅण्ड ती’ हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. मृणाल कुलकर्णी हिने या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. शिवाय पुष्कर जोग, प्रार्थना बेहेरे, सोनाली कुलकर्णी यांनी यात मुख्य भूमिका निभावलेली आहे. प्रार्थना, सोनालीचे चित्रपट येतच असतात. अधूनमधून पुष्कर दिसत असतो, त्यामुळे यापूर्वी दोन चित्रपट दिलेल्या मृणालवर लक्ष केंद्रित होते. तिच्यासाठी हा चित्रपट पहावा असे वाटणे सहाजिकच आहे, पण चित्रपटाची कथा, त्याचे सादरीकरण या सार्‍या गोष्टी लक्षात घेता ‘ती अ‍ॅण्ड ती ’खाल्ली माती असेच म्हणावेसे वाटते.

चित्रपट चांग़ला- वाईट ठरवणे हे चित्रपट पाहिल्यानंतर कळायला लागते, पण प्रथम चित्रपट पाहण्यासाठी जी मानसिक तयारी करावी लागते, ती केल्या जाणार्‍या जाहिरातीवर, त्यात वाचायला मिळणार्‍या कलाकार, तंत्रज्ञांची नावे यावर अवलंबून असते. चोखंदळ प्रेक्षक हा थोडा त्याही पुढे जाऊन विचार करणारा असतो. दिग्दर्शक, कलाकार यांचे योगदानसुद्धा त्याला यासाठी महत्त्वाचे वाटत असते. ‘ती अ‍ॅण्ड ती’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मृणाल कुलकर्णीने केलेले आहे. यापूर्वी ‘रमा माधव’ आणि ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या चित्रपटांचे दिग्दर्शन तिने केले होते. फार मोठा साहित्यीक वारसा तिच्या मागे आहे जो तिने प्रत्यक्ष वागणुकीतून तसेच मालिकेतील, चित्रपटातील भूमिकेतून जपला. त्यामुळे मृणाल एक स्वतंत्र विचारसरणीची अभिनेत्री, दिग्दर्शिका आहे याचा प्रत्यय यतो, पण प्रेक्षकांनी बांधलेला अंदाज या चित्रपटाच्या बाबतीत मात्र फोल ठरणार आहे. हिंदी चित्रपटामध्ये घासूनपुसून गुळगुळीत झालेली कथा मुलगा विराजस कुलकर्णी याच्याकडून लिहून घेतलेली आहे. पटकथा, संवादही त्यानेच लिहिलेले आहेत. प्रमोशनासाठी खाल्ली माती हे गीत वापरले गेलेले आहे. शिवाय चित्रपटात होणारे विनोद यांच्यामागे खाल्ली माती हा रेकॉर्डेड शब्द अनेकवेळा वापरला गेलेला आहे. तो शब्द संपूर्ण चित्रपटासाठीसुद्धा सार्थकी ठरल्याचे वाटायला लागते.

अनय हा या चित्रपटाचा मुख्य नायक आहे. सई ही त्याची पत्नी आहे. हनिमूनसाठी लंडनला ते निघालेले आहेत, पण प्रत्यक्ष जीवनात मात्र मनाने ते फारसे जवळ आलेले नाहीत. वरवरची आत्मियता ते दाखवित असतात. अशा स्थितीत प्रिया या अनयच्या बालपणीच्या मैत्रिणीची भेट इथे होते. आता ती फारच स्वच्छंदी जीवन जगत आहे. शालेय शिक्षण घेत असताना अनय तिच्या प्रेमात पडलेला असतो. लव अ‍ॅट फस्ट साईट म्हणावे तसा तो पुन्हा ती आपल्या जीवनात यावी यासाठी तिचा पाठपुरावा करत असतो. कथा लेखकाप्रमाणे आपले लग्न झालेले नाही हे प्रियाला दाखवायचे असते तर पत्नी सईला अंधारात ठेवून पहिले प्रेम परत मिळवायचे असते. या सार्‍या गोष्टी करायच्या म्हणजे प्रियकराला भरपूर उचापती, धावपळी कराव्या लागतात. जे हिंदी चित्रपटात अनेकवेळा पहायला मिळते तेच अनय या नायकाने केलेले आहे. त्याच्या या धावपळीच्या निमित्ताने जिथे चित्रीकरण करणे शक्य आहे असे लंडन यात दाखवलेले आहे. शेवट काय तर फस्ट लव पेक्षा विवाहबद्ध झालेली बायको बरी असा काहीसा संदेश या चित्रपटाच्या माध्यमातून दिलेला आहे. चित्रपट पहायचा झाला तर सध्या लंडनची काय स्थिती आहे याचा अंदाज आपल्याला थोडाफार घेता येईल. कलाकारांच्या अभिनयाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करू नका, माती खाल्ल्याचा भास होईल.

- Advertisement -

पुष्कर जोग याने यात अनयची मुख्य व्यक्तीरेखा साकार केलेली आहे. तोच या चित्रपटाचा निर्माताही आहे. तो उत्तम नर्तक आहे. भूमिका थोडीशी स्वच्छंदी स्वभावी असली तरी यात भावना आहे, नातेसंबंध आहेत जे भूमिकेतून, अभिनयातून व्यक्त करायचे असतात. पुष्करला ते फारसे प्रभावीपणे दाखवता आलेले नाही. संवाद साधणारा नट म्हणून तो जास्त लक्षात राहतो. सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहेरे यांनी यापूर्वीच्या चित्रपटातून आपली अभिनय गुणवत्ता दाखवलेली आहे, पण अगदी दखल घ्यावी असा प्रयत्न मात्र ती अ‍ॅण्ड ती या चित्रपटाच्या बाबतीत झालेला नाही. दोष कलाकारांना द्यायचा की दिग्दर्शकाला असा प्रश्न उद्भवतो, पण कलाकारांच्या अभिनयाचा आवाका आणि कथेची गरज यांचा बारकाईने विचार करून हा चित्रपट हाताळायला हवा होता. हिंदी चित्रपटाचे तंतोतंत अनुकरण टाळायला हवे होते, असे मात्र वाटते. साई-पियूष यांनी कथेला साजेल असे संगीत दिलेले आहे.

-(नंदकुमार पाटील)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -