घरफिचर्सदडपशाहीविरोधातील जनआंदोलन

दडपशाहीविरोधातील जनआंदोलन

Subscribe

‘चले जाव’ चळवळ दडपण्याचा इंग्रजांनी प्रयत्न केला. यावेळी इंग्रजांच्या भूमिकेमुळे हजारोंहून अधिक जणांना प्राणांना मुकावे लागले. अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला. प्रमुख नेत्यांच्या अटकेनंतर आंदोलन स्थगित होईल या ब्रिटिशांच्या भूमिकेला जनतेने एकत्र येत सुरुंग लावला होता.

१७५७ ते १८५६ या कालावधीत इंग्रजांनी जवळपास संपूर्ण भारतावर कब्जा केला. तेव्हापासून देशात इंग्रजांच्या जुलमी राजवटीला सुरुवात झाली. इंग्रजांच्या राजवटीत येथील सैनिकांनासुद्धा पिळवणुकीला सामोरे जावे लागत होते. इ.स. १८५७ मध्ये देशात इंग्रजांच्या जुलमी राजवटीला आव्हान देण्यात आले आणि येथूनच भारताच्या स्वातंत्र्यासाठीचा लढा उभा राहिला. भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी देशभर राष्ट्राभिमान निर्माण होण्यासाठी तसेच इंग्रजांविरुद्ध लढ्यासाठी देशातील नागरिकांना स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या काळात विविध संघटना, पक्ष स्थापन झाले. सर्वांचे ध्येय एकच होते. ते म्हणजे देशाचे स्वातंत्र्य. भारतीयांच्या लढ्याला यश येऊन १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला. या काळात देशात विविध घटना घडल्या. स्वातंत्र्यासाठी विविध संग्राम, उठाव, चळवळींचे आयोजन करण्यात आले. या स्वातंत्र्य लढ्यातील असाच एक महत्त्वाचा दिवस म्हणजे ९ ऑगस्ट. या दिवसाचे देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच दिवशी काँग्रेसतर्फे इंग्रजांना ‘चले जाव’ चा इशारा देण्यात आला. ‘करेंगे या मरेंगे’ अशी भूमिका घेत ‘इंग्रजांनो देश सोडा’ चा नारा देण्यात आला. जुलै १९४२ मध्येच इंग्रजांना छोडो भारतचा इशारा देण्यासंदर्भातला प्रस्ताव काँग्रेसचे त्यावेळचे अध्यक्ष मौलाना आझाद यांनी मांडला होता. या प्रस्तावात भारताच्या स्वातंत्र्यात जगाचेही हित सामावले असल्याचे म्हटले होते. यामध्ये विविध महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले होते. देशातील ब्रिटिश राजवट कायमची संपुष्टात येण्याच्या प्रमुख मागणीसह हुकूमशाही, लष्करशाही, साम्राज्यशाहीच्या उच्चाटनासाठी भारताला स्वातंत्र्य मिळणे आवश्यक असल्याचे काँग्रेसच्या प्रस्तावात म्हटले होते. त्यानंतर ७ ऑगस्ट १९४२ रोजी तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष मौलाना आझाद यांनी मुंबईत काँग्रेसच्या महासमितीच्या बोलावलेल्या अधिवेशनात सदर प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला. महासभेनेसुद्धा प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला. यावेळी महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली इंग्रज सरकारविरुद्ध अहिंसक जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार महासमितीने व्यक्त केला. अशाप्रकारे ‘चले जाव’ आंदोलनाचे सर्व अधिकार महात्मा गांधीजींकडे सुपूर्द करण्यात आले. या ठरावाची कुणकूण ब्रिटिशांना लागली. यापूर्वी शांततेच्या मार्गाने चालू असलेला लढा हिंसक वळण घेण्याची धास्ती ब्रिटिशांना लागली. त्यामुळेच ८ ऑगस्ट १९४२ रोजी पहाटेच महात्मा गांधी, मौलाना आझाद, सरदार पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांना ब्रिटिशांनी अटक करत अज्ञातस्थळी रवाना केले. त्यावेळी गोवालिया टँक मैदान परिसरात काँग्रेसचे अधिवेशन सुरू होते. त्या अधिवेशनातच ‘चले जाव’ आंदोलनातील प्रमुख नेत्यांना ब्रिटिशांनी अटक केल्याची माहिती काँग्रेसच्या सदस्यांना कळली. प्रमुख नेत्यांना अटक करत ‘चले जाव’ आंदोलन दडपण्याचा इंग्रजांनी प्रयत्न केला. प्रमुख नेत्यांच्या अटकेची माहिती सर्वत्र पसरताच इंग्रजांच्या दडपशाहीविरोधात देशभर जनआंदोलन उभे राहण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला देशातील मुंबई, पुणे, अहमदाबाद या प्रमुख शहरांमध्ये सुरू झालेले हे आंदोलन हळुहळू देशभर पसरले. काँग्रेसच्या या चळवळीत देशातील समाजवाद्यांनीही उडी घेतली. इंग्रजांविरुद्धचे ‘चले जाव’ आंदोलन अधिक प्रखर झाले. या आंदोलनात रेल्वेस्थानक परिसर, टपाल कार्यालये आदी सरकारी सेवांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली. महाराष्ट्र आणि बंगालमध्ये प्रतिसरकारांची स्थापना करत ब्रिटिश राजवटीला आव्हान देण्यात आले. ‘चले जाव’ चळवळ दडपण्याचा इंग्रजांनी प्रयत्न केला. यावेळी इंग्रजांच्या भूमिकेमुळे हजारोंहून अधिक जणांना प्राणांना मुकावे लागले. अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला. प्रमुख नेत्यांच्या अटकेनंतर आंदोलन स्थगित होईल या ब्रिटिशांच्या भूमिकेला जनतेने एकत्र येत सुरुंग लावला होता. आज या आंदोलनाकडे पाहण्याचा द़ृष्टीकोन बदलत चालला आहे. ज्यांनी देश स्वातंत्र्यासाठी जीवाची बाजी लावली, त्या नेत्यांवर नको नको ते आरोप करत सत्ताधारी आणि त्यांचे समर्थक देशाचा अवमान करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -