घरफिचर्सपक्षांतर्गत बांडगुळांची खरी किंमत

पक्षांतर्गत बांडगुळांची खरी किंमत

Subscribe

कमलनाथ यांच्यावरही असेच आरोप झाले होते आणि राजकीय पाठराखणीमुळे त्यांच्यावर खटला भरला जाऊ शकला नाही, असाही आरोप आहे. त्या आरोपाला आता ताज्या निकालाने पुष्टी मिळाली आहे. कारण विविध चौकशी आयोगात सज्जनकुमार, जगदीश टायटलर, हरेकृष्णलाल भगत यांच्या समवेतच कमलनाथ यांचेही नाव घेतले गेलेले होते. काहीजणांच्या साक्षी झालेल्या होत्या. पण त्यांच्यावर थेट खटला भरला गेला नाही किंवा आरोपपत्र दाखल झालेले नव्हते. ज्यांना आता न्याय मिळाला आहे, त्यांनी कमलनाथ यांनाही राजकीय पाठराखणीमुळे निसटता आल्याचा दावा चालविला आहे.

अखेर सज्जनकुमार यांनीच पक्षाचा राजीनामा दिला. आपल्यामुळे पक्ष अडचणीत येतोय, असे त्यांना वाटले. पण, पक्षाध्यक्ष राहुल गांधींना वाटलेले नव्हते. सोमवारी सकाळ उजाडली तेव्हा सर्वच वाहिन्यांवर तीन राज्यातील काँग्रेस विजयाचा सोहळा चालू होता. कारण तिन्ही राज्यात दीर्घ काळानंतर काँग्रेसचे मुख्यमंत्री शपथ घेणार होते आणि त्यासाठी तिन्ही राज्यांच्या राजधानीत लगबग चालली होती. पहिला शपथविधी राजस्थानची राजधानी जयपूर येथे व्हायचा मुहूर्त येऊन ठेपला असताना अकस्मात ब्रेकिंग न्युज आली. काँग्रेसचे दिल्लीतील ज्येष्ठ नेते व माजी खासदार सज्जनकुमार यांना हायकोर्टाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे एकूणच माध्यमांचा सूर बदलून गेला.

कारण राजस्थानच्या पाठोपाठ मध्य प्रदेश राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून कमलनाथ यांचा शपथविधी दुपारी होणार असताना त्यांच्याकडेही समान संशयाने बघितले जाऊ लागले. सज्जनकुमार यांच्यावर १९८४ च्या इंदिरा हत्येनंतरच्या दंगलीचा आरोप होता आणि त्यांनी कारस्थान करून जमावाकरवी पाच शीखांच्या कुटुंबाची हत्या केल्याचा गुन्हा खरा ठरला होता. त्यामुळेच त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली होती आणि काहीसे तसेच त्या दंगलीविषयीचे आरोप कमलनाथ यांच्यावरही झालेले आहेत. सज्जनकुमार यांना दीर्घकाळ राजकीय संरक्षण मिळाले, म्हणून शिक्षा होऊ शकली नाही किंवा ते न्यायापासून बचावले, असे ताज्या निकालात म्हटलेले आहे. कारण खालच्या कोर्टाने त्यांच्यासोबत आरोपी असलेल्यांना दोषी मानले तरी सज्जन यांची निर्दोष म्हणून मुक्तता केलेली होती. त्याच निकालाला आव्हान देणार्‍या याचिकेवर हायकोर्टाचा निकाल आलेला आहे.

- Advertisement -

त्यात सज्जनकुमार यांना दोषी मानण्यात आले असून, अन्य आरोपींच्या शिक्षेतही वाढ करण्यात आली आहे. यात कमलनाथ कुठे येतात?कमलनाथ यांच्यावरही असेच आरोप झाले होते आणि राजकीय पाठराखणीमुळे त्यांच्यावर खटला भरला जाऊ शकला नाही, असाही आरोप आहे. त्या आरोपाला आता ताज्या निकालाने पुष्टी मिळाली आहे. कारण विविध चौकशी आयोगात सज्जनकुमार, जगदीश टायटलर, हरेकृष्णलाल भगत यांच्या समवेतच कमलनाथ यांचेही नाव घेतले गेलेले होते. काहीजणांच्या साक्षी झालेल्या होत्या. पण त्यांच्यावर थेट खटला भरला गेला नाही किंवा आरोपपत्र दाखल झालेले नव्हते. ज्यांना आता न्याय मिळाला आहे, त्यांनी कमलनाथ यांनाही राजकीय पाठराखणीमुळे निसटता आल्याचा दावा चालविला आहे. त्यामुळेच ऐन शपथविधीच्या मुहूर्तावर त्यांच्या सत्ताग्रहणालाच ग्रहण लागले. ताबडतोब विरोधी भाजपाने त्यांचा राजीनामा मागितला आहे. तर, काँग्रेसला त्याविषयी खुलासा देताना नाकी दम आला आहे. मात्र, यातून आता १९८४ च्या दंगलीतील अनेक अशा आरोप व संशयांची भुते फ़ेर धरून नाचू लागतील, यात शंका नाही. त्यावरून प्रचंड राजकारण खेळले जाईल आणि दरम्यान अन्य राजकीय वादाचे विषय काही काळ मागे ढकलले जातील. एक गोष्ट मात्र निश्चित आहे. १९८४ च्या दिल्लीतील शिखांच्या कत्तलीचा विषय दीर्घकाळ दडपला गेला होता आणि त्यात पुढाकार घेणार्‍या अनेक काँग्रेस नेत्यांना वाचवताना पक्षाला खूप मोठे राजकीय नुकसान सोसावे लागलेले आहे.

नरेंद्र मोदींना गुजरातविषयी जाब विचारणार्‍यांना नेहमी शीख कत्तलीचे खुलासे देताना दमछाक झालेली आहे. मात्र, डझनभर चौकशी आयोग नेमूनही कुणाही मोठ्या काँग्रेसी नेत्याला कधी झळ पोहोचली नव्हती. मागल्याच लोकसभेत सज्जनकुमार व टायटलर यांना उमेदवारी देण्यावरून खूप वादळ उठले होते आणि अखेरीस त्यांच्या उमेदवार्‍या मागे घेऊनच काँग्रेसला त्यातून माघार घ्यावी लागली होती. वास्तविक अशा नेत्यांना खड्यासारखे बाजूला ठेवून हा विषय झाकता आला असता. पण तीन दशके उलटून गेली तरी या नेत्यांना पाठीशी घालण्याचे काँग्रेसने थांबवलेले नाही. म्हणूनच आता अशा आरोप व खटल्यांची भुते अधूनमधून नको त्यावेळी बाटलीतून बाहेर येत असतात.

- Advertisement -

पूर्वीच काँग्रेसने या नेत्यांना चार हात दूर केले असते तर विजयाच्या सोहळ्याला तरी गालबोट लागले नसते. राहुल गांधींनी पक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तीन राज्यातील विजय काँग्रेससाठी अपूर्व सोहळा होता. पण, त्याच मुहूर्तावर असा निकाल आल्याने त्या शपथविधीला झाकोळून टाकले गेले. ज्या तीन मुख्यमंत्र्यांनी शपथविधीनंतर रुबाबात काही विधाने व घोषणा केल्या असत्या, त्यांना फ़क्त सोपस्कार उरकून कामाला लागणे भाग झाले. टाकाऊ झालेल्या टायटलर वा सज्जनकुमार सारख्या नेत्यांना पाठीशी घालण्याचे पक्षीय धोरण अनाकलनीय आहे. शेवटी कुठल्याही पक्षाचे नेते वा कार्यकर्ते पक्षाची प्रतिष्ठा व विश्वासार्हता वाढवण्यासाठी़ झटत असतात व राबलेही पाहिजेत. त्यात असा कोणी पक्षाची प्रतिष्ठा मातीमोल करणारा असेल तर त्याला खड्यासारखे बाजूला करायला पाहिजे.

कारण तो पक्षाचेच नुकसान करीत नाही, तर इतर प्रामाणिक मेहनती कार्यकर्त्यांनी मिळवलेल्या विश्वास व विजयाला धुळीस मिळवत असतो. अशी माणसे नेता नसतात, तर बांडगुळे असतात आणि ज्या पक्षाला ती बांडगुळे उखडून फ़ेकून देता येत नाही, त्याला राजकीय गदारोळात सावरून उभे राहणे अशक्य असते. सज्जनकुमार यांना इतके दिवस पाठीशी घालण्याची चूक झाली नसती तर आज त्यांच्यावर लागलेला कलंक कमलनाथ या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्याच्या वस्त्राला लागला नसता. अजूनही वेळ गेलेली नाही. असे जे कोणी काँग्रेसमध्ये असतील त्यांना राहुलनी निष्ठूरपणे बाजूला करायला हवे आहे. अन्यथा प्रतिकुल परिस्थितीतून हा शतायुषी पक्ष बाहेर काढणे अधिकाधिक अवघड होत जाईल. कारण त्यांच्या विरोधकांना अशी संधी हवी असते आणि त्यांनी तिचा लाभ उठवण्यावर आक्षेप घेता येत नसतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -