घरफिचर्सलोककलेच्या देखण्या रूपाचे शिल्पकार 

लोककलेच्या देखण्या रूपाचे शिल्पकार 

Subscribe
कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे (जन्म पसरणी-सातारा जिल्हा, ३ सप्टेंबर, १९२३; मृत्यू : मुंबई, २० मार्च, २०१५) हे एक मराठी लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत शाहीर म्हणून फार मोठे योगदान आहे.. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र राज्याभिमानगीत आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या प्रयोगांसाठी ते प्रामुख्याने ओळखले जात. मुक्त नाट्याचे ते आद्य प्रवर्तक समजले जातात. शाहीर साबळे हे कवी-गीतकार-संगीतकार, गायक, कुशल ढोलकी वादक, अभिनेते-दिग्दर्शक तसेच उत्तम व्यवस्थापक आणि संघटक होते. ‘महाराष्ट्राची लोकधारा’द्वारे त्यांनी मराठी लोकसंस्कृतीची ओळख आणि प्रसिद्धी केली. त्यांचे ’गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचवले.
सातारा जिल्ह्यातील पसरणी (तालुका वाई) या छोट्या खेड्यात कृष्णराव साबळे यांचा जन्म झाला. घरची स्थिती बेताची होती व एकत्र कुटुंब असल्याने त्यांचे शिक्षण व्हावे म्हणून त्यांना आईने अमळनेरला आजीकडे पाठविले. तिसर्‍या इयत्तेत असताना साबळे अमळनेरला गेले. तेथे गेल्यावर आपल्याला चांगला आवाज आहे, हे त्यांच्या ध्यानात आले. हिराबाई बडोदेकर यांनी तेथे साबळेे यांचे गाणे योगायोगाने ऐकले होते व त्यांच्या आवाजाचे कौतुक केले होते. परंतु त्यांची ही गाण्याची आवड आजीच्या कानावर पडल्यावर पुढे आणखी काही व्याप होऊ नये, म्हणून आजीने त्यांना पुन्हा पसरणीला आणून सोडले. त्यामुळे साबळे यांना सातवीची परीक्षाही देता आली नाही. शाहीर साबळे यांनी सामाजिक कार्यात बालपणीच सहभाग घेतला होता. अंमळनेरला असताना साबळे यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. पुढे मोठेपणीही चळवळीत त्यांना गुरुजींचा आशीर्वाद मिळाला. साने गुरुजींच्या अनेक सामाजिक कार्यात साबळ्यांचा सक्रिय सहभाग असे. पसरणी गावात भैरवनाथाच्या मंदिरात हरिजनांना प्रवेश देण्यासाठी गावातील तरुण मंडळींबरोबर त्यांनी पुढाकार घेतला. या वेळी साने गुरुजींबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील, सेनापती बापट व क्रांतिसिंह नाना पाटील या मंदिर प्रवेश प्रसंगी उपस्थित होते. साने गुरुजींच्या सहवासात आलेल्या साबळे यांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळाली. त्या प्रेरणेतून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतही भाग घेतला. पुढे तरुणपणी इ.स. १९४२ ची चलेजाव चळवळ, गोवा व हैद्राबाद मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा अनेक आंदोलनांसह दारुबंदीचा प्रचार, लोककलाकारांचा सांभाळ अशा सामाजिक कामांतही त्यांंनी स्वत:ला झोकून दिले होते. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांच्या प्रवेशासाठी साने गुरुजींनी केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या कलापथकाने दौरे केले. शिवसेनेच्या विस्ताराची पार्श्वभूमी तयार करण्यात त्यांचा स्वत:चा तसेच त्यांच्या ‘आंधळं दळतंय’ या प्रहसनाचा मोलाचा वाटा होता.

शाहीर साबळे ही संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्षीदार असलेली एक धडाडती ‘तोफ’ होती..शिक्षणाची आबाळ होत असताना, आईने साबळे यांना मुंबईला चुलत्याकडे गिरणीकाम शिकण्यासाठी पाठविले. तेथेही त्यांच्यातील कलाकार त्यांना स्वस्थ बसू देईना. लीलाबाई मांजरेकर यांच्या संगीत बारीवर जाऊन त्यांनी त्यांच्याकडून “हिरा हरपला‘ हे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावरील नाटक बसवून घेतले. पुतण्या तमाशाच्या बारीवर जातो, हे जेव्हा चुलत्यांच्या ध्यानात आले, तेव्हा त्यांनीही शाहिरांना पसरणीचा मार्ग दाखवला. पुन्हा एकदा पोटासाठी फिरणे सुरू झाले. लहान वयात लोककलांचा आणि लोकगीतांचा संस्कार शाहीर साबळे यांच्यावर झाला होता. मुंबईला आल्यावर या लोककलेचे नेटके रूप विशिष्ट संहितेसह समाजासमोर आणायचे, असा विचार शाहिरांनी केला आणि महाराष्ट्राची लोकधारा या लोककलेच्या देखण्या रूपाचा जन्म झाला. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अनेक ठिकाणी आणि मॉरिशसलादेखील मराठी माणसासमोर आपल्या महाराष्ट्राची परंपरा त्यांना दाखविता आली. या .अभंग, वाघ्या-मुरळी, शेतकरी नृत्य, लावणी, जोगवा, चिपळुणी, बाल्याचा नाच, भारूड, कोळीगीते अशा कलाप्रकारांतून मराठी संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडविणार्‍या ‘महाराष्ष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमाने त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. राजकीय-सामाजिक अपप्रवृत्तींवर प्रहार करण्यासाठी शाहिरी हे माध्यम निवडून त्यांनी ‘जागृती शाहीर मंडळ’ स्थापन केले. पुढे शाहिरी ही त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली. तब्बल १३ मुक्तनाट्यांच्या माध्यमातून शाहिरांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला. शाहिरीचे प्रशिक्षण देणार्‍या ‘शाहीर साबळे प्रतिष्ठान’च्या माध्यमातून ते अखेरपर्यंत कार्यरत होते. शाहीर साबळ्यांच्यानंतर त्यांच्या समृद्ध कलेचा वारसा त्यांचा मुलगा गीतकार-संगीतकार देवदत्त साबळे, मुलगी चारुशीला साबळे-वाच्छानी आणि नातू दिग्दर्शक केदार शिंदे यांच्याकडे आला. वसुंधरा आणि यशोधरा अशा शाहीर साबळे यांच्या आणखी दोन मुली. भानुमती हे शाहीर साबळे यांच्या पत्‍नीचे नाव. त्या कवयित्री होत्या. त्यांनी रचलेली गीते साबळे गात असत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -