घरफिचर्सकोरोना, गणेशोत्सव आणि विटंबना 

कोरोना, गणेशोत्सव आणि विटंबना 

Subscribe

कोरोनाच्या महामारीत वर्षभरातील बहुतांश सण निरुत्साहात गेले, आता दसरा, दिवाळीही या अशाच वातावरणात जाणार का अशी भीती वाटत आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव गणेशोत्सव काल पार पडला. कोरोनाचे मळभ या उत्सवावर दाट दिसून आले, ज्या अनंतचतुर्दशीच्या दिवशी मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील रस्त्यांवर तुफान गर्दी पाहायला मिळते, ढोल, ताशे, गुलाल उधळत मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन मिरवणूका निघत असतात, त्या सर्व ठिकाणचे रस्ते काल निरव शांततेत होते. गणेशोस्तव सुरु झाल्यापासून असे बहुदा पहिलेच वर्ष असेल ज्यामध्ये हा उत्सव बंदिस्त स्वरूपात साजरा झाला असावा. असो. इथे कोरोनाचा आणखी एक वेगळा विषय मांडत आहे. हा कोरोना जसा अनेकांना भीतीदायक वाटत आहे, त्या भीतीचाच अनेकांनी धंदा सुरु केला आहे. खाजगी हॉस्पिटले, लॅब, गल्ली बोळातील फिजिशियन, अँब्युलन्सवाले, मेडिकलवाले, या सगळ्यांनी अक्षरशः लुटमार केली. या लुटीला प्रमाण नाही. दुसरीकडे इ पासच्या नावाखाली पोलिसांनी जी काही आर्थिक पिळवणूक केली त्याला पारावर उरला नाही. अशा या महामारीचा समाजातील विशिष्ट घटकाने यथेच्छ फायदा करून घेतला, असाच फायदा गणेशोत्सवातही काही जणांनी करून घेतला, तो प्रकार बघून अनेकांची माथी भडकू शकतात. 

पुणे शहरात लोकमान्य टिळकांनी प्रथम सार्वजनिक गणेशोस्तव सुरु केला. त्यामुळे पुण्याला या उत्सवात विशेष महत्व आहे, पण दुर्दैवाने याच पुण्यात कोरोनाच्या परिस्थितीचा गैरफायदा पुणे महापालिकेनेही घेतला. कोरोना म्हणून गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा न करण्याचे निर्देश सरकारने दिले होते. त्यामुळे घरगुती गणपतीसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही छोट्या गणेश मूर्ती पुजल्या. तसेच कोरोनाच्या भीतीने अनेकांनी कृत्रिम गणेश विसर्जन तलावातच मूर्ती विसर्जित केल्या. भयभीत अवस्थेतील या गणेश भक्तांकडून पुणे महापालिकेने या गणेश मूर्ती विविध ठिकाणी गणेश मूर्ती संकलन केंद्रे उभारून ताब्यात घेतल्या. गणेशोत्वाच्या सातव्या दिवशी पूणे महापालिकेकडे सुमारे २० हजार मूर्ती संकलित झाल्या होत्या, अनंतचतुर्दशी दिवशी तर महापालिकाकडे इतक्या मूर्ती संकलित झाल्या कि त्या ठेवायलाही गोडावून कमी पडले. या सर्व मूर्ती महापालिकेने स्प्लेंडिड व्हिजन या स्वयंसेवी संस्थेला रंगरंगोटी करून पुन्हा मूर्तीकारांना कमी पैशात विकण्याचे लेखी पत्र दिले. महापालिकेचे सह आयुक्त राजेश बनकर यांनी त्यांच्या सही, शिक्क्यासह हे पत्र या संस्थेला दिले, त्या आधारे या संस्थेने अनेक मूर्तिकारांना संपर्क करून त्यांच्यासमोर ऑफर ठेवल्या. हा धक्कादायक प्रकार अशाच एका मूर्तिकाराने हिंदू जनजागृती समितीला सांगितल्याने हा प्रकार उघडकीस आला. समितीने स्टिंग ऑपरेशन करून हा सर्व प्रकार पुराव्यानिशी समोर आणला. अशा प्रकारे पुणे महापालिकेने कोरोनाने भयभीत झालेल्या गणेशोत्सवाच्या वातावरणातही गणेश विसर्जनाच्या दिवशी गणेश मूर्तींचा धंदा केला.

- Advertisement -

पुणे महापालिकेने आणखी एक संतापजनक प्रकार केला. मूर्ती संकलित केल्या, त्यानंतर त्या दुर्गम भागातील एक विहिरीत अक्षरशः फेकून दिल्या. हा सर्व प्रकार भोवती कापड बांधून करण्यात आला, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. चार वर्षांपासून पुणे महापालिका कृत्रिम तलावात अमोनियम बायकार्बोनेट टाकून त्या रासायनिक पाण्यात गणेश मूर्ती विसर्जित करण्यास भाग पाडत आहे. त्यातही मूर्ती नीट विरघळत नसल्याने त्या परत काढून अन्यत्र नेण्यात येतात. मुळा-मुठा या शहरातून जाणार्‍या नद्यांना गणेशोत्सवातही पाणी न सोडणे, हे तर पुणे महापालिकेने अधिकृत धोरण आखले आहे कि काय, अशी शंका येते. या नद्यांना ९० क्युसेक पाणी सोडूनही पूर येत नसताना पालिका केवळ ४८ क्युसेकपर्यंत पाणी सोडते; जेणेकरून भाविकांनी अस्वच्छ नदीपात्राकडे वळूच नये. ५ वर्षांपूर्वी एक वृत्तपत्राच्या स्थानिक पुरवणीमध्ये पुणे महापालिकेने विसर्जन स्थळांवरून संकलित केलेल्या गणेशमूर्ती रात्रीच्या अंधारात कंटेनरद्वारे पुलावरून खाली नदीत फेकून देतानाची छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. भाविकांना ‘मूर्तीदान करा, आम्ही त्यांचे योग्य विसर्जन करू, असे आश्‍वासन देणारी पुणे महापालिका प्रत्यक्षात हे असे प्रकार करते.यंदा नाशिक महापालिकेने फिरते गणेश विसर्जन कुंड बनवले, त्यासाठी अक्षरशः कचरा संकलित करण्यासाठी वापर करण्यात येत असलेल्या कंटेनरचा उपयोग केला. हादेखील गैरप्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उघडकीस आणला. हे कचर्‍याचे कंटेनर धुवून स्वच्छ करण्याचेही सौजन्य महापालिकेने दाखवले नाही, असा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांनी केल्याने भाविक अधिकच संतप्त झाले. त्यावर सारवासारव करत महापौरांनी त्यात दिसणारी माती म्हणजे कचरा नव्हे, असे म्हटले. एकंदर या प्रकरणात महापौरांनी अधिक स्पष्टीकरणे देण्याऐवजी नेमकी चूक कुठे झाली आहे’, याचा शोध घेणे आणि असंख्य गणेशभक्तांची माफी मागून तत्परतेने दोषींवर कारवाई करण्याचे आदेश देणे अपेक्षित होते.

मागील दशकापासून गणेश विसर्जन हि धार्मिक प्रथा आहे कि वाद विवादासाठी निमित्त हेच कळत नाही. नदी, ओढे, विहिरी किंवा समुद्राच्या दिशेने गणेश भक्त गणेश मूर्ती विसर्जनासाठी घेऊन येतात तेव्हा समाजातील विशिष्ट घटक तथाकथित पर्यावरण प्रेमी जणू काही आता पाण्यात विष मिसळणार, पाणी इतके दूषित होणार कि पुढे पाण्याचा स्रोत नष्ट होणार, अशा बोंबा मारतात. त्यांच्या या दर वर्षीच्या  ‘शिमग्या’मुळे मागील दशकापासून गणेश विसर्जनाच्या धार्मिक कृतीमध्ये अनेक अनैसर्गिक, अधार्मिक  अशा पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात आल्या आहेत. ज्यामधून वरीलप्रमाणे पुणे आणि नाशिक महापालिकेने गणेश भक्तांच्या श्रद्धांचे भंजन केल्याचे उघडकीस आले.  दुर्दैवाने आता मूर्ती दान, मूर्ती संकलन, कृत्रिम विसर्जन हौद निर्मिती ही पैसा कमावण्याची माध्यमे बनली आहेत का, असे म्हणावे लागत आहे. मुंबईत कृत्रिम तलाव उभारण्याकरता कंत्राट मिळवण्यासाठी झुंबड उडते. हातात कंत्राटे आली कि धंदा आलाच, आता हि अशी कृत्रिम तलावे अवघ्या महाराष्ट्रात होऊ लागली आहेत. अगदी नदी, विहिरी शेजारीही बांधली जातात. म्हणजे गणेश भक्तांनी नदी जवळ जावे तिथे पाय धुवावेत आणि मूर्ती बाजूला कृत्रिम तलावात सोडावी असा हा हास्यास्पद प्रकार घडत आहे. तर काही पर्यावरण प्रेमी नदी, विहिरी, समुद्र किनारी अगदी दबा धरून बसतात, गणेश भक्त मूर्ती घेऊन येताच त्याचे असे काही ब्रेनवॉश करतात कि बिचारा आजवर पारंपरिक पद्धतीने केलेले गणेश विसर्जन घोर पाप होते, त्याचे पापक्षालन करायचे असेल तर गणेश मूर्ती विसर्जन न करता ती पर्यावरण प्रेमींना दिली पाहिजे, असा समज करून घेतो आणि ती मूर्ती खुशाल पर्यावरण प्रेमींना देऊन टाकतो. पुढे संकलित झालेल्या मूर्तींचे काय होते ते पुणे,

- Advertisement -

नाशिक महापालिकेने दाखवून दिलेच आहे. असे प्रकार आता उर्वरित महाराष्ट्रातही घडू लागले आहेत. काही ठिकाणी या गणेश मूर्ती बुलडोझरखाली नष्ट करणे, सुकलेल्या विहिरीत फेकून देणे, पुन्हा रात्री नदीत विसर्जित करणे, मूर्तींच्या विटा बनवणे, रस्त्यावर ठेवून त्यावर बुलडोझर फिरवून त्याचा रस्ता बनवणे, असेही धक्कादायक प्रकार या आधी उघडकीस आलेले आहेत. हा सर्व प्रकार गणेशभक्तांच्या धार्मिक भावनांशी खेळण्या सारखा आहे. भाविकांच्या अंतःकरणाला वेदना देणारा आहे. पर्यावरण रक्षण झालेच पाहिजे, त्यासाठी प्रयत्न नक्कीच झाले पाहिजेत, मात्र ते करत असताना भक्तांच्या श्रद्धांचे भंजन होत नाही ना, हेही पाहणे गरजेचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -