घरफिचर्सभुलेश्वर मार्केट

भुलेश्वर मार्केट

Subscribe

भुलेश्वर मार्केट म्हणजे दक्षिण मुंबईतील एक पुरातन बाजार. खरे म्हणजे दक्षिण मुंबई हीच मूळची मुंबई. ती जेव्हा वसली तेव्हा त्या अनुषंगाने जे काही निर्माण झाले ते आता पुरातन ठरतेय. मग काळाच्या ओघात या पुरातन गोष्टींचे आधुनिकीकरण झाले तरीही त्यांना चिकटलेले पुरातन हा टॅग काही गेलेला नाही. भुलेश्वर मार्केटही त्याला अपवाद नाही. हा बाजार आता चांगलाच आधुनिक झाला आहे, जुन्या इमारती, काही जुन्या मंडई सोडल्या तर या बाजारात पुरातन असे काहीच उरलेले नाही, तरीही हा बाजार जुना अर्थात पुरातन बाजार म्हणून ओळखला जातो.

इंग्रजांनी मुंबई शहर वसवले त्याची रचना आज सारखीच आहे. म्हणजे श्रीमंत वस्ती, मध्यमवर्गीय वस्ती आणि गरिबांची वस्ती असे मुंबईचे आजच्या सारखेच वर्गीकरण करण्यात झाले होते. फक्त एकच फरक होता, त्यावेळी भारतीय श्रीमंतांनाही इंग्रजांच्या वस्तीत स्थान नव्हते. आता इंग्रजांची जागा काही भारतीय श्रीमंतांनी घेतली आहे इतकेच. तर तत्कालीन मध्यमवर्गीयांच्या वस्तीत गरज म्हणून जी मार्केट उभी राहिली त्यात भुलेश्वर मार्केट मुख्य होते. वास्तविक भुलेश्वरपासून क्रॉफर्ड मार्केट काही लांब नाही. पुन्हा क्रॉफर्ड मार्केटमध्ये सर्व काही मिळत होते, तरीही भुलेश्वर मार्केट विकसित झाले याची इतर करणे अनेक असली तरी मुख्य कारण हे मुंबईकरांचा आळशीपणा हेच होते. फार कष्ट होऊ नयेत घराच्या खालीच सर्व उपलब्ध व्हावे, या आळशीपणातून फेरीवाल्यांचा धंदा वधारला आणि त्याला अस्ताव्यस्त, अनधिकृत, बेकाल बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले.

त्यावेळी घराखालीच सर्व उपलब्ध होते म्हणून सुखावलेला तेथील रहिवाशी आज चालयलाही जागा मिळत नाही म्हणून दुःखी होतोय. भुलेश्वर आज त्या स्थितीत पोहचला आहे. येथील बहुसंख्य जुने निवासी आपली जागा विकून बोरीवली, भाईंदर, विरारला शिफ्ट झाले आहेत, त्यांच्या रूमचे गोदाम झाले आहे. तर अशीही एकूणच कर्मकहाणी असलेले भुलेश्वर मार्केट हे गरजेतून निर्माण झाले. या विभागाला येथील सुप्रसिद्ध भुलेश्वर मंदिरावरून नाव पडले आहे.

- Advertisement -

भुलेश्वर मंदिर हे त्यावेळी मुंबईतील खूप प्रसिद्ध मंदिर होते. अनेक मुंबईकर जेव्हा मुंबईतील देवदर्शनाला निघायचे तेव्हा प्रथम मुंबादेवी, मग भुलेश्वर असा त्यांचा प्रवास सुरु व्हायचा, मंदिरात नेहमी हणार्‍या गर्दीमुळे येथे पूजेचे साहित्य घेऊन विकणार्‍या फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले. मग मंदिरात येणारे, साड्या, बांगड्या आणि इतर आभूषणे खरेदी करतात म्हटल्यावर ते विकणार्‍याची गर्दी वाढली. त्यातून हा बाजार अस्तित्वात आला. त्याची नेमकी तारीख तशी कोणालाच सांगता येणार नाही. पण या भागात असलेली सरकारी मंडई ही 1927 साली अस्तित्वात आली. पण त्या अगोदर कितीतरी वर्षे भुलेश्वर हा बाजार जन्माला आला होता. या भागात मुंबादेवी, भुलेश्वर अशी प्रसिध्द मंदिरे असल्यामुळे येथे प्रथम फुलबाजाराला सुरुवात झाली. फुलांसाठी पूर्वी दक्षिण मुंबईतील लोक या बाजारात यायची. त्या काळात दादरचे फुलबाजार निर्माण झाले नव्हते. भुलेश्वर फुलबाजारातून संपूर्ण मुंबईत फुले जायची. भुलेश्वरचे ते फुलमार्केट आजही आहे. पण त्याच्या कितीतरी पटीने दादर फुलमार्केट मोठे झाले असल्यामुळे भुलेश्वर फुलमार्केट खूप लहान वाटते. पण आजही दक्षिण मुंबईतील हारफुले विकणारे या भुलेश्वर फुलमार्केटमधूनच फुले खरेदी करतात.

भुलेश्वर मार्केट प्रसिद्ध आहे ते महिलांचे कपडे, अलंकार आणि इतर फॅशन वस्तूंसाठी. भुलेश्वर मार्केटमध्ये सर्व प्रकारचे अलंकार अतिशय स्वस्त दरात उपलब्ध होतात. तसेच महिलांचे कपडेही स्वस्त दरात मिळतात. पुन्हा येथे व्हरायटी खूप जास्त असल्यामुळे महिलांना या बाजारात फिरण्याचा आणि खरेदीचा आनंदही मिळतो. या बाजारात खरेदी करताना फिक्स भाव असे काही नसते. दुकानदार जो भाव सांगेल त्यावर तुम्हाला भाव करता आला पाहिजे. तर तुम्हाला अतिशय कमी किमतीत येथे काहीही मिळू शकते. येथे दुकानेही आहेत. त्यात चांगल्या वस्तूही मिळतात पण रस्त्यावर दुकानासारखेच पण तेही कमी किमतीत मिळत असल्याने दुकानात खरेदीला कोण जाईल? तर भुलेश्वर हे मार्केट रस्त्यावरील मार्केट आहे, आणि रस्ते का माल सस्ते मैं, म्हणतात ना, त्यामुळेच येथे सर्व काही स्वस्त आहे.

- Advertisement -

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -