घरफिचर्ससाधेसरळ देव!

साधेसरळ देव!

Subscribe

यशवंत देव गेल्याची बातमी कळली आणि तो एक काळ आणि त्या काळातली ती माणसं झराझरा नजरेसमोर तरळली. श्रीनिवास खळे, सुधीर फडके, सी. रामचंद्र, राम कदम, वसंत पवार, दत्ता डावजेकर, वसंत देसाई, एन. दत्ता, श्रीकांत ठाकरे अशा सगळ्याच संगीतकारांच्या कर्तृत्वाची आठवण झाली. एक संगीतकार म्हणून आणि एक माणूस म्हणूनही प्रत्येकाची शैली वेगळी, कलाकारी वेगळी आणि मुशाफिरीही वेगळी. यशवंत देव हे त्यातले तर वेगळेच मुशाफिर. ‘या जन्मावर आणि या जगण्यावर’ मनमुराद प्रेम करणारे, जगण्यावर असलेल्या प्रेमाचा मनमुराद आनंद घेणारे, अगदी शेवटच्या टोकापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंंत!

यशवंत देवांमधला संगीतकार हा वेगळ्या प्रकृतीचा, वेगळ्या स्वभावाचा आणि वेगळ्या बाजाचा संगीतकार होता. यामागचं तसंच वेगळं कारण होतं ते म्हणजे त्यांच्यातल्या संगीतकारात दडलेला तसाच सुप्त पण घनगंभीर, आशयघन कवी. संगीतकार प्रभाकर जोगांनी आतंर्देशीय पत्रावर स्वरलिपी लिहून जेव्हा त्यांना चाल पाठवली तेव्हा त्यांनी शब्द कोणते लिहिले तर ’स्वर आले दुरूनी, जुळल्या त्या सगळ्या आठवणी’…आणि त्यापुढे अंतर्‍यासाठी ओळ कोणती लिहिली तर ’निर्जीव उसासे वार्‍याचे, आकाशही थकल्या तार्‍यांचे’ अशी तरलतेने ओतप्रोत ओथंबलेली. यशवंत देव हे असे संगीतात दडलेले शब्द अचूक शोधणारे कवी होते. तसेच कवीने लिहिलेले शब्द कोणती नेमकी चाल मागताहेत याचा वेध घेणारे संगीतकारही होते.

- Advertisement -

संगीतातला कलाकार म्हणून त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीला अशी ही दुहेरी किंवा दुतर्फा किनार होती. त्यांच्यातल्या संगीतकाराला चाल कशी सुचते याबद्दलचं त्यांचं जे मत होतं ते त्यांनी कधीच बदललं नव्हतं. नवं तंत्र आलं, नवं तंत्रज्ञान आलं तरी त्यांचं ते मत कायम तेच राहिलं होतं. ते म्हणायचे, ‘कवीने कागदावर लिहिलेले शब्द स्वत:च चाल घेऊन आलेले असतात, संगीतकाराने फक्त ती चाल हेरायची असते!‘ यशवंत देवांचं गाण्याची चाल लावण्याबद्दलचं हे इतकं साधंसोपं गणित होतं. देवांच्या गाण्याच्या, गाण्यातल्या अंतर्‍याच्या चालीही म्हणूनच तितक्याच आणि तशाच साध्यासोप्या होत्या. ’तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे’ हेच गाणं घ्या. अतिशय साधीसोपी, सहजसुंदर, सरळरेषेतली चाल. तिला पुढे उगाचच कुठली तरी तिरकी, नागमोडी वळणं नाहीत.

’एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना’ किंवा ’शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे, तुझे रूप घेऊनी येती गंध धुंद वारे’ असा त्या गाण्यातला कोणताही अंतरा घ्या, देव संगीत करताना त्याची चाल वेगळ्याच ठिकाणी कधीच भरकटायची नाही. मुखडा आणि अंतरा एकमेकाला अगदी बिनचूक पुरक. देवांच्या गाण्याची हीच तर खासियत होती.

- Advertisement -

देवांचं आपल्या गाण्याबद्दलचं एक तत्व असायचं, तत्वज्ञान असायचं. देवांना त्यांच्या गाण्यातल्या एखाद्या शब्दामागचं एखाद्या सुरांचं प्रयोजन विचारलं तर ते त्याबद्दल ते छान स्पष्टीकरण द्यायचे. गाण्याबद्दलचं ते त्यांचं स्पष्टीकरण एखाद्या गाण्यासारखंच ऐकत राहावंसं वाटायचं. याचाच अर्थ, आलं गाणं म्हणून लावली चाल असा देवांच्या बाबतीत तो मामला नसायचा. त्यांच्या गाण्याच्या कार्यक्रमात ते स्वत:च जे निवेदन करत. त्यात हे जरा जास्तच समजून येत असे. अशा कार्यक्रमातलं त्यांचं गाण्याबद्दलचं निवेदन हे अत्यंत ओघवतं, प्रवाही असे. त्यात ते गाणं करणं आणि गाणं हे काय असतं हे जवळजवळ समजावूनच सांगत म्हणजे एकाअर्थी कार्यशाळाच घेत असत.

देवांच्या जाण्याने त्या काळातला, आमच्यासोबत असलेल्या जुन्याजाणत्यातला एक उरलासुरला शिलेदारही निघून गेला आहे. जुनं नावाचं सोनं स्वत:सोबत घेऊन!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -