घरफिचर्सप्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे!

प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे!

Subscribe

विनोद शिरसाठ यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची घेतलेली विशेष मुलाखत या पुस्तकामध्ये संकलित करण्यात आली आहे.

अंधश्रद्धा निर्मूलनासंदर्भात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे हे प्रत्येकजण मान्य करेल. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये नेहमीच लोकांमध्ये वाद झाला आहे. ८ एप्रिल २०१३ रोजी पुणे येथील एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनच्या सभागृहामध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची मुलाखत विनोद शिरसाठ यांनी घेतली. ‘प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे’ या शीर्षकांतर्गत त्यांनी ही मुलाखत घेतली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना आणि नेहमीच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कार्यक्रमांमध्ये विविध स्तरांमधील लोकांकडून विचारले जाणारे निवडक २५ प्रश्न यावेळी विचारण्यात आले. या प्रश्नांची उत्तरे अतिशय थोडक्यात पण नेमकेपणाने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी दिली आहेत. त्यावेळी या मुलाखतीच्या हजारो डीव्हीडीच्या प्रती वितरित झाल्या होत्या. मात्र ती संपूर्ण मुलाखत पुस्तक स्वरुपात वाचकांसमोर साधना प्रकाशनने आणली आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हे नाव सर्वांनाच परिचित आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधन करण्यात येते. डॉ. दाभोलकरांचे अतिशय महत्त्वपूर्ण योगदान यामध्ये होते. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधिमंडळात मंजूर व्हावे, यासाठी दाभोलकर गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होते. यासंदर्भात सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजून सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम ते करीत होते. समाजातील अनेक भोंदू बाबांचे पितळ दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्रयोग उघडे केले होते.

- Advertisement -

अंनिसची आणि डॉक्टरांच्या भूमिकेची किमान ओळख व्हावी आणि ती भूमिका अधिक जाणून घेण्याची इच्छा उत्पन्न व्हावी या हेतूनेच ही मुलाखत घेण्यात आली होती. ही मुलाखत २०१३ मध्ये घेण्यात आली आणि त्यावर्षी ही मुलाखत प्रचंड गाजली होती. सामान्यातील सामान्य माणसांपर्यंत हे विचार पोहचवण्यासाठी या मुलाखतीचे संकलन पुस्तक स्वरुपातदेखील करण्यात आले आहे. डॉक्टरांनी ही मुलाखत भरगच्च सभागृहासमोर व्हावी या गोष्टीला पसंती दिली होती. कारण एकाच वेळी चारशे ते पाचशे लोकंसमोर आपला विचार जाईल हा यामागचा उपयुक्त हेतू होता. ही मुलाखत झाल्यानंतरच साधारण चार महिन्यांनी डॉक्टरांची हत्या करण्यात आली होती आणि अजूनही त्यांची हत्या कोणी केली हे स्पष्ट झालेले नाही.

- Advertisement -

या प्रश्नांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे काय? त्याचा आग्रह अंनिसकडून सातत्याने इतक्या मोठ्या प्रमाणात का केला जातो? अंधश्रद्धा निर्मूलनाची चतुःसूत्री कोणती आणि तिचं अंधश्रद्धा निर्मूलनामधील नेमकं योगदान काय आहे? श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये नेमका फरक कसा काय करता? भूत हा नेमका काय प्रकार असतो, भूत खरोखर असतं का या प्रश्नाने प्रत्येकाला नेहमीच त्रास दिला असतो, तर तुमची त्याबद्दलची भूमिका काय आहे? बुवाबाजीला अंनिसचा नेमका विरोध का आणि कशासाठी आहे? यासारख्या 25 प्रश्नांचा समावेश आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे डॉ. दाभोलकर यांनी अतिशय स्पष्ट आणि सामान्यातील सामान्य माणसाला समजतील आणि त्यांच्यापर्यंत नीट पोहचतील अशा स्वरुपात उदाहरणांसह दिली आहेत.

‘आज चुकीच्या विचारांनी लोकांच्या मनाची पकड घेतलीय म्हणून बुवाबाबा वाढतात. उद्या तर विवेकी विचारांनी लोकांच्या मनाची पकड घेतली, तर कदाचित ज्यांना पाच हजार वर्ष मिळाली, त्यांच्याविरुद्धची लढाई आम्ही पाचशे वर्षात जिंकू शकू’ अशा स्वरुपाचे परखड मतदेखील त्यांनी यावेळी मांडले होते. याशिवाय ‘हे सगळे बाबा जी समाजोपयोगी कामं करतात, त्याच्या हजार पटीने जास्त काम कुठल्याही राज्याचं शासन करतं. पण त्यावर तुम्ही काय म्हणता, काय उपकार करत आहेत का? आमच्याच पैशानं करतात मग बाबा कुणाच्या पैशानं करतात?’ असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले होते.
अंगात येणे ही संमोहन विद्या आणि जाणूनबुजून केलेली गोष्ट आहे असे परखड मत त्यांनी या मुलाखतीमध्ये मांडले होते. देव आहे का यावर त्यांनी दिलेले गाडगेबाबांचे उदाहरण एक वाचक म्हणून विचार करायला लावणारे आहे.

जो देव स्वतःच्या हाताने जेवू शकत नाही, त्याला आंघोळ घालायलादेखील माणसे लागतात तर तो देव माणसांची दुःख कशी काय तारणार? देव हा माणसात असतो. जो गरजवंताच्या उपयोगी पडतो, शिक्षण देतो त्याची साथ देतो तोच खरा देव. अर्थात प्रत्येकाला हे विचार पटणार नाहीत. आपल्या देशात देवाचे इतके अवडंबर केले जाते की, एखादा 10 दिवस उपाशी असेल तर त्याला खायला देणार नाहीत पण देवाला 4 किलो सोने चढवतील. देव मानावा किंवा मानू नये हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण तरीही अंधश्रद्धा असू नये हे या मुलाखतीतून क्षणोक्षणी जाणवते. प्रत्येकाने वाचावे आणि आपल्या संग्रहात जपून ठेवावे आणि त्यावर नेहमी चर्चा घडवून आणावी असे हे पुस्तक आहे. या मुलाखतीत विचारलेला प्रत्येक प्रश्न एक वाचक म्हणून आपल्याला विचार करायला भाग पाडतो हे नक्की.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -