घरमहाराष्ट्रनाशिकसर्कल, विकास सिनेमागृहांभोवती फिरणारे ‘सर्कल’ची वर्तुळे

सर्कल, विकास सिनेमागृहांभोवती फिरणारे ‘सर्कल’ची वर्तुळे

Subscribe

काळाच्या उदरात गडप झालेल्या व्यक्ती, संस्था, व्यवसाय यांचा सुंदर व परिणामकारक परिचय

नाशिकमधील ‘सर्कल’ व ‘विकास’ सिनेमागृह सर्व नाशिककरांना माहिती आहेत. सध्याच्या इंटरनेटच्या युगात शहरातील बरीचशी चित्रपटगृहे बंद झाली आहेत किंवा त्या मार्गावर आहेत. ‘सर्कल’ व ‘विकास’ त्याला अपवाद नाही. ‘सर्कल’ची वर्तुळे ही गोष्ट आहे एका उच्चशिक्षित, तत्त्वनिष्ठ व हरहुन्नरी वडिलांची त्यांच्या मुलीने सांगितलेली. ते वडील म्हणजे नाशिकमधील सुप्रसिद्घ ‘सर्कल’ सिनेमाचे मालक रावसाहेब ओक व त्यांची कन्या सुलक्षणा महाजन. लेखिका या स्वतः वास्तूरचनाकार आहेत. नगर नियोजन या विषयात त्यांनी मिशिगन विद्यापीठात संशोधन केले आहे. तसेच त्यांची शहरे व विकास यावर अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

‘सर्कल’ची वर्तुळे हे केवळ वैयक्तिक आठवणींचे पुस्तक न राहता त्याला काही सूत्र असावे अशी लेखिकेची अपेक्षा होती. शहरांचा इतिहास हा त्यातील माणसांचा, कुटुंबाचा, संस्थांचा, उद्यमशीलतेचा, राजकारणाचा इतिहास असतो. बदलत्या काळाला हे घटक किती प्रतिसाद देतात यावर त्या शहरांचा पुढील विकास अवलंबून असतो. हे पुस्तक शहरामधील मानवनिर्मित इकोसिस्टिम या संकल्पनेवर प्रकाश टाकते.

- Advertisement -

पुस्तकाचा आशय मनोगतात व्यक्त करताना लेखिका म्हणते, हे पुस्तक ‘सर्कल’ सिनेमागृहाच्या परिसरात, सिनेमा उद्योगाच्या आधारे निर्माण झालेल्या अनेक प्रकारच्या व्यावसायिक, सामाजिक, सांस्कृतिक वर्तुळांचे, बहुविध घटनांचे, लोकांचे, समाजांचे, अनुभवांचे वर्णन करणारे पुस्तक आहे. ‘सर्कल’ सिनेमाभोवती त्याच्या मालकाने, म्हणजेच माझ्या वडिलांनी त्यांच्या उद्यमशीलतेच्या जोरावर, त्यास कल्पकतेची जोड देत, व्यवहारी परंतु विश्वस्त भावनेने जी व्यावसायिक वर्तुळे निर्माण केली, त्याचा एकेकाळी नाशिक शहरावर फार सकारात्मक पगडा होता. या वर्तुळांनी अनेक गरजूंना आधार दिला. अनेक होतकरूंना स्वतःच्या पायावर उभे केले. अठरापगड जाती-धर्माच्या लोकांमध्ये जवळीक निर्माण केली आणि सामाजिक कार्य करणार्‍या कितीतरी लहान-मोठ्या संस्थांना मदतीचा आश्वस्त हात दिला. म्हणून या पुस्तकाचे नाव ‘सर्कल’ ची वर्तुळे.

एक माणूस किती प्रकारच्या भूमिका पार पाडून आपले व इतरांचे आयुष्य संपन्न करू शकतो याचे उदाहरण म्हणजे रावसाहेब ओक. गणित विषयात बीएस.सी. करून बंगलोरला इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमधील पदवी मिळवली. भारताच्या स्वातंत्र चळवळीत, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, साने गुरुजी यांच्या बरोबर सहभाग घेऊन ३ वर्षाचा कारावास भोगला. विचाराने समाजवादी रावसाहेब सर्कल सिनेमाचे मालक कसे झाले याचे कुतूहल आपल्याला पुस्तक वाचूनच उमजेल. सर्कसचे जसे एक वेगळे विश्व असते तसे सिनेमागृहाचे पण एक वेगळे विश्व असते. भरपूर जोखमी असतात. अनेक कारागिरांची मदत नेहमी घ्यावी लागते. छोटे छोटे व्यावसायिक, जाहिरातदार, पेंटर, सरकारी यंत्रणा, पोलीस, गुंड अशा अनेकांशी सिनेमागृहाच्या मालकाचा संबंध येतो. ही तारेवरची कसरत मालक कशी करतो यावर त्याचे यश अवलंबून असते. ही कसरत रावसाहेबांना खूप छान जमली व त्यांना अनेक ‘वर्तुळे’ वाढविता आली याचे ओघवते वर्णन पुस्तकात आहे.

- Advertisement -

रावसाहेबांनी निर्माण केलेल्या वर्तुळात शिक्षण संस्थांचे वर्तुळ ही महत्वाचे आहे. रचना ट्रस्टचे आदिवासी व महिलांच्या सबलीकरणासाठी उभे केलेले काम. तसेच महाराष्ट्र समाज सेवा संघाच्या माध्यमातून उभे केलेले रचना व नवरचना विद्यालय. माधवराव लिमये, शांताताई लिमये, कुसुमताई पटवर्धन, विठ्ठलराव पटवर्धन अशा अनेक धुरीणांचा वाटा ही कार्ये निर्माण करण्यात महत्वाचा होता. या आठवणी नेमक्या शब्दात लेखिकेने सांगितल्या आहेत.

लेखिकेच्या लहानपणीच्या सर्कल सिनेमा भोवतीच्या गमतीच्या व आनंददायी आठवणी खूपच मजेशीर आहेत. पुस्तकाची एक लय आहे ते वाचताना आपल्याला कुठेही कंटाळवाणे होत नाही. 1960 च्या सुमारास संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोर धरत होती तेव्हा राष्ट्र सेवा दलाचे ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हे कलापथक विशेष गाजत होते. लोकशाहीर लीलाधर हेगडे व कवी वसंत बापट यांचे मोठे योगदान त्यात होते. या कलापथकाच्या तालमी नाशिकला ‘सर्कल’ च्या आवारातच झाल्या. त्यातील सर्व कलाकार अनेक दिवस तेथेच मुक्काम ठोकून होते. त्यात नमन, भारुड, कविता, नृत्य यांची रेलचेल होती.
लेखिकेला या सर्वांचा मनमुराद आनंद घेता आला याच्या आठवणीपण या पुस्तकात आहेत.
आठवणी लिहताना लेखिकेने काळाच्या ओघात ढासळणारी नितीमुल्ये, जाती-धर्माच्या वाढणार्‍या दर्‍या, वाढते बाजारीकरण यावर सडेतोड भाष्य केले आहे.

राहुल देशपांडे यांनी रेखाटलेली रेखाचित्रे पुस्तक वाचनाचा आनंद वाढवतात व त्या काळचे चित्र डोळ्यापुढे उभे करतात. करुणा गोखले यांचे संपादन व राजहंस प्रकाशनाची अंतर्गत मांडणी पुस्तकाच्या मूल्यात भर घालणारी आहे.
काळाच्या उदरात गडप झालेल्या व्यक्ती, संस्था, व्यवसाय यांचा सुंदर व परिणामकारक परिचय आपल्याला या पुस्तकातून होतो. शहराच्या गतकाळाचे एक महत्वाचे पान आपल्यापुढे उलगडले जाते. सर्वानी हे पुस्तक जरूर वाचावे व संग्रही ठेवावे असे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -