घरमहाराष्ट्रनाशिकशुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षणही बंद

शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षणही बंद

Subscribe

ऑनलाईन शिक्षणाची बंद कवाडे उघडा’ : पालकांची उपसंचालकांच्या साद

बागलाण तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेने मागील व चालू शैक्षणिक वर्षाचे शुल्क भरण्यासाठी सक्ती केली असून शुल्क न भरल्याने अनेक विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षातील ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवले गेले आहे. या पार्श्वभूमीवर पालकांनी एकत्र येत शुल्काअभावी बंद केलेले ऑनलाईन शिक्षण सुरू करावे, या मागणीसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी धाव घेत शिक्षण उपसंचालकांच्या दालनात ‘ऑनलाईन शिक्षणाची बंद कवाडे उघडा’ अशी आर्त साद घातली. या मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले.

निवेदनानुसार, शैक्षणिक वर्ष वाया न जाता बंद असलेेल्या ऑनलाईन शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल का, याकडे हजारो विद्यार्थ्यांच्या नजरा लागून आहे. चालू शैक्षणिक सत्रात पालकांच्या संमतीने पालक समितीची स्थापना करून शुल्क सवलतीचा अधिकार संबंधित समिती सदस्यांना देऊन त्यावर निर्णय घ्यावा अशी मागणी पालकांनी केली आहे. परंतु, स्थानिक प्रशासन पालकांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षदा दाखवत असल्याने शुल्क वसुलीसाठी अडचणी येत आहेत. गेल्या वर्षभरात शुल्क वसुलीचा प्रश्न कळीचा मुद्दा बनला आहे. याबाबत गटशिक्षणाधिकारी यांना वेळोवेळी पालक वर्गाकडून निवेदन सादर करून आपल्या उपस्थितीत पालक समितीची स्थापना करून यावर तोडगा काढावा अशी मागणी केली गेली. मात्र, संबंधित अधिकारी वर्गाकडून पालकांच्या या मागणीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले गेले, असा आरोप पालक वर्गाकडून करण्यात आला आहे.

- Advertisement -

वेळीच याकडे प्रशासन स्तरावरून लक्ष दिले गेले असते तर चालू शैक्षणिक सत्रात हा प्रश्नच उपस्थित झाला नसता. अधिकारी वर्गाच्या उदासीनतेमुळे पालक व संस्था प्रशासन यांच्यात दरवर्षी संघर्षाची ठिणगी पडत असून चालू वर्षीही हा वाद विकोपाला गेला आहे. बागलाण तालुक्यातील बागलाण एज्युकेशन सोसायटी संचलित इंग्लिश मीडियम या शाळेविषयीही पालकांच्या तक्रारी असून यासंदर्भात निवादनात नमूद केले गेले आहे. यासाठी सर्व पालकांनी एकत्रित येत शिक्षण उपसंचालक, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष यांना निवेदन सादर केले.

पालकांची कैफियत ऐकताच शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी संबंधित संस्थेच्या प्राचार्यांना दूरध्वनीवरून खडेबोल सुनावले. ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याच्या सूचनाही केल्या. मात्र, संबंधित शाळा प्रशासनाने डोळेझाक करत बंद असलेले ऑनलाईन शिक्षण आजही सुरू केले नव्हते. यामुळे शिक्षण उपसंचालकांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवली गेल्याचे दिसते.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -