घरफिचर्ससंपादकीय : धन्यवाद राहुल!

संपादकीय : धन्यवाद राहुल!

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीनंतर मागील दोन दिवसांपासून एक संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. अर्थातच तो नेहमीप्रमाणे काँग्रेसची आणि त्यातही त्यांचे नेते राहुल गांधींची खिल्ली उडविणारा आहे. शपथविधी समारंभाला सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मनमोहन सिंह बसलेले असताना समोरून माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज येतात आणि सोनिया गांधींना नमस्कार करतात. ते छायाचित्र घेऊन त्याच्याखाली ओळी लिहिल्या आहेत, ‘धन्यवाद बहनजी, आपके बेटे की वजह से ही आज हमारी जीत हुई’. कुणा जल्पकानं (ट्रोल) घटकाभराच्या करमणुकीसाठी आणि राहुल गांधी व काँग्रेसची खिल्ली उडविण्यासाठी हा संदेश तयार केला असणार यात शंकाच नाही. एवढा मोठा विजय मिळविल्यानंतरही राहुल गांधी आणि काँग्रेसबद्दल कुठेतरी भाजपमध्ये किंवा त्यांच्या हितचिंतक वा समाजमाध्यमी भक्तांमध्ये सूक्ष्म असूया आणि द्वेष आहे हे नक्की. दुसरी बाब म्हणजे हा संदेश बरेच काही सांगणारा आहे. भाजपच्या भरघोस विजयाचे शिल्पकार खरे तर राहुल गांधीच आहे, ते किंवा काँग्रेस नसती तर कदाचित भाजपचा विजय सहज झाला नसता, हे वास्तव आहे. भाजपला ते मागील दहा वर्षांपासून माहीत आहे, किंबहुना तेच त्यांचे प्रचार प्रसार आणि प्रतिमानिर्मितीचे धोरण राहिलेले आहे. त्यातूनच जनसामान्यांच्या समाजमाध्यमांवर ‘पप्पू’ संकल्पनेचा जन्म जाणूनबुजून करण्यात आला आणि तो वाढविण्यातही आला. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानातील अतिरेक्यांच्या तळावर केलेला लक्ष्यभेदी हल्ला, त्यानंतर विमान कोसळून त्यांच्या ताब्यात सापडलेले वायूसेनेचे अधिकारी अभिनंदन यांच्या कामगिरीचा निवडणूक प्रचारासाठी केलेला खुबीने वापर, त्यातून जनतेच्या मनात वाढविलेला नवराष्ट्रवाद या कारणांमुळे भाजपला मतदारांनी भरभरून मते दिली, असे विश्लेषण करतानाच दुसरे सर्वात मोठे कारण काँग्रेस आणि राहुल गांधी हेही आहे. ते जर नसते, तर आज भाजपचा असा महाविजय झालाच नसता कदाचित, पण हे वास्तव आहे हे नक्की.

भारतीय जनता पार्टी आणि त्यांची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने २००४ च्या निवडणुकांत पराभव झाल्यानंतर पुढील लोकसभा निवडणुकीसाठी पद्धतशीरपणे प्रचारी रणनीति आखली होती. त्यात गोध्रा हत्याकांडानंतर झालेल्या दंगलींसाठी कारणीभूत ठरविल्या गेलेल्या गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गुजरात विकासाच्या ‘मॉडेल’चे तथाकथित प्रदर्शन मांडणे, प्रचार प्रसार करणे हा पायाभूत भाग होता. त्यातून नरेंद्र मोदी यांची प्रतिमा विकास पुरुष करणे अशी होती. नंतर समाजमाध्यमांपासून सर्वच ठिकाणी केलेल्या नियोजनबद्ध प्रचारातून ती तशी झालीही. नव्यानेच आलेल्या समाजमाध्यमांसारख्या जनसंपर्क आणि प्रचार प्रसार तंत्राचा पद्धतशीर आणि आक्रमक वापर त्यासाठी करण्यात आला. प्रचार प्रसार आणि प्रतिमानिर्मितीचे एक महत्त्वाचे तत्व असते, ते म्हणजे एखाद्याची मुळातच नसलेली प्रतिमा निर्मिती भव्य-दिव्यपणे सादर करायची असेल आणि सर्व प्रयत्न करूनही त्याची प्रतिमा हवी तशी साकारत नसेल, तर जो मुळात प्रभावी आहे त्या विरोधकाची प्रतिमा डागाळणे, त्याचे प्रतिमाभंजन करणे किंवा तेजोभंग करणे. नरेंद्र मोदींच्या बाबतीत त्यांच्या महागड्या आणि चतुर-धोरणी जनसंपर्क धुरिणांनी एकाचवेळी नरेंद्र मोदी यांची चांगली प्रतिमा निर्माण करणे आणि काँग्रेसचे नेते आणि राहुल गांधी यांची वाईट प्रतिमा तयार करणे, तशा अफवा सातत्याने पसरविणे हे काम केले. याचे कारण म्हणजे स्वच्छ प्रतिमेचे राहुल गांधी हे भविष्यातील संभाव्य बलाढ्य नेते होणार आहेत आणि त्यामुळे काँग्रेसला पुनरूज्जीवन मिळून ते सत्तेवर येऊ शकतात याची कल्पना भाजप आणि संघालाही आली होती. परिणामी त्यांनी ‘गोबेल्स प्रचारतंत्र’- एकच असत्य वारंवार सांगणे- वापरून राहुल गांधींचे प्रतिमाभंजन केले. हा जनसंपर्काचा प्रकार किती काळपर्यंत वापरावा, तर २०१४ मध्ये विजयी झाल्यानंतर आणि सत्तेवर आल्यानंतरही भाजपने काँग्रेस आणि राहुल गांधींना ‘टिकेचे लक्ष्य’ करणे सुरूच ठेवले. अगदी न्यूयॉर्कला टाईम्स स्केअरवर नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे भाषण केले, त्यातही काँग्रेसला लक्ष्य केलेले होते. दरम्यान, नोटबंदी आणि जीएसटीनंतर देशात जी स्थिती निर्माण झाली त्याबद्दल राहुल गांधी आणि काँग्रेसने मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली. नंतर त्यात राफेलहीची भर पडली. परिणामी यंदाच्या निवडणूक प्रचारात पुन्हा भाजपने आणि त्यांच्या समाजमाध्यमी चमूने राहुल गांधी, गांधी परिवार आणि काँग्रेस यांनाच लक्ष्य केले आणि या पद्धतशीर प्रचाराला कारणीभूत ठरला स्वत: काँग्रेस पक्ष.

- Advertisement -

राहुल गांधी किंवा गांधी परिवार हेच काँग्रेसचे नेतृत्व करू शकतात आणि इतरांमध्ये ती क्षमता नाही हे काँग्रेस पक्षाने पुन्हा सिद्ध केले. पक्षाची धुरा आणि लगाम गांधी कुटुंबाकडेच ठेवण्यात आला आणि पुन्हा भाजपला गांधी आणि काँग्रेसला लक्ष्य करण्याची आयती संधी मिळाली. मात्र, आता पुन्हा दुसर्‍यांना निवडून आल्यानंतर भाजपला ही प्रचारनीति बदलावी लागणार आहे. कारण मतदारांनी स्थिर सरकार असावे म्हणून त्यांना निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांना राहुल आणि काँग्रेस यांना लक्ष्य करून चालणार नाही. दुसर्‍या बाजूला भाजपचे प्रतिमाभंजनाचे प्रचारतंत्र उशिरा का होईना, काँग्रेस नेतृत्वाच्या लक्षात आले असावे. परिणामी त्यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर लगेचच आपल्या सर्व प्रवक्त्यांना- ज्यांच्याकडे पक्षाच्या प्रचार प्रसाराची अधिकृत जबाबदारी असते- चॅनल किंवा कुठल्याही चर्चेत सहभागी होण्याची किंवा काहीही वक्तव्य करण्याची मनाई केली. यामागे काँग्रेसमध्ये होणारे अंतर्गत बदलांचे कारण सांगितले जात असले, तरी दुसरा फायदा हा भाजपकडून किंवा विरोधकांकडून होणारा टिकेचा मारा कमी होण्यात होणार आहे. ‘अनुल्लेखाने मारणे’ या अर्थाचा एक शब्दप्रयोग आहे. समोरच्याची दखलच घेतली नाही, तर त्याचा प्रचार आणि प्रसार होत नाही. काँग्रेसने आता प्रवक्त्यांची बोलती बंद करून भाजपला अनुल्लेखाने मारण्याचे ठरविलेले दिसते. आक्रमणापेक्षा बचाव करणे आणि त्याहीपेक्षा आक्रमण होऊच नये याची काळजी घेणे हे कधी कधी शहाणपणाचे ठरते. समोर राहुल गांधी, काँग्रेस आणि प्रवक्ते नसतील तर पुढील महिनाभर भाजपला काँग्रेसवर टीका करता येणार नाही. त्याऐवजी त्यांना खर्‍या अर्थाने विकासाचे ठोस निर्णय घ्यावे लागणार आहेत. काँग्रेसच्या किंवा राहुल गांधींच्या टीकेआड त्यांना आता जास्त काळ लपता येणार नाही. किंबहुना असे करता येऊ नये, म्हणून आता काँग्रेस सज्ज झाली असून, राहुल गांधी यांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा आणि नंतर प्रवक्त्यांना बोलण्यास केलेली बंदी हे त्या दिशेने उचललेले पहिले पाऊल म्हणावे लागेल. त्या प्रगल्भतेसाठी आणि दूरदृष्टीसाठी काँग्रेस व राहुल गांधी यांचे कौतुक करावेच लागेल. पुढच्या वाटचालीत प्रकाशझोतात न येता जनतेचे काम केले तरच काँग्रेस पक्षात पुढील पाच वर्षांत सकारात्मक बदल होऊन कदाचित त्यांच्या आगामी सत्तेचा मार्ग सुकर होऊ शकतो. अन्यथा पुन्हा तीच चूक केली तर भाजप आणि त्यांचे समाजमाध्यमातील जल्पक पुन्हा म्हणतील,‘धन्यवाद राहुल’ !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -