घरफिचर्सआहारसेवन उदर भरण नसून यज्ञकर्म

आहारसेवन उदर भरण नसून यज्ञकर्म

Subscribe

आयुर्वेदाने आहाराला शरीराचा उपस्तंभ म्हणजे आधार मानले आहे. म्हणूनच आहारसेवन म्हणजे उदर भरण नसून ते एक यज्ञकर्म आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. षड्रसयुक्त आहार योग्य प्रमाणात सेवन करावा. कडकडून भूक लागल्यावरच जेवावे, कारण भूक लागली नसताना वा अवेळी भोजन करणे रोगाला कारणीभूत ठरते. एकदा खाल्ल्यावर तीन तासांच्या आत खाऊ नये. तसेच सहा तासांपेक्षा जास्त काळ उपाशी राहू नये. टी.व्ही. पहात, वर्तमानपत्र वाचत, गप्पा मारत जेवण्याची संकल्पना ही पूर्णत: चुकीची आहे. अन्न हे पूर्णब्रह्म हे लक्षात ठेवूनच भोजन करावे.

मागील लेखात आपण नस्य उपक्रमापर्यंतची दिनचर्या पाहिली. यानंतरची दिनचर्या आपण या लेखात पाहू. नस्यकर्मानंतर कोमट पाणी किंवा त्रिफळा काढ्यासारख्या औषधी काढ्यांच्या गुळण्या कराव्यात. यामुळे तोंडातील कफाचा चिकटा नाहीसा होऊन तोंडाला चव येते. पर्यायाने तोंडाचे आरोग्य चांगले राहते. यानंतरचा दिनचर्येतील उपक्रम म्हणजे ‘धूमपान’. वेखंड,अगरु, देवदार, मोहरी अशा कफनाशक औषधांची धुरी देणे यास ‘धूमपान’ म्हणतात. धूमपान व धूम्रपान यातील हा महत्वाचा फरक लक्षात घेणे आवश्यक आहे. धूमपान करताना नाकाने किंवा तोंडाने धूर ओढावा, परंतू धूर बाहेर सोडताना मात्र तोंडानेच सोडावा. नस्यकर्मानंतर धूमपान केल्याने उर्वरित कफाचा नाश होतो. विधिवत धूमपानाने घसा व त्यावरील भागात होणारे वात – कफात्मक आजार होत नाही.

यानंतरचा दिनचर्येतील उपक्रम म्हणजे अभ्यंग, अभ्यंग हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते दिवाळीतील अभ्यंग स्नान! परंतु आयुर्वेदाने मात्र अभ्यंगस्नानापुरता अभ्यंग न करता तो रोज करण्यास सांगितले आहे. नित्य तेलाचा अभ्यंग केल्याने शरीराचे रसरक्तसंवहन सुधारून शरीराचे श्रम सहन करण्याची क्षमता वाढते. नियमित तेलाच्या अभ्यंगाने त्वचा मृदू व सतेज होते. विशेषत: डोके, कान व पाय या ठिकाणी तेल अवश्य जिरवावे. डोक्याला तेल जिरवल्याने दृष्टी चांगली होते. केसांंचे पोषण होते. कानात रोज तेल घातल्याने कानाच्या तक्रारी उद्भवत नाहीत. रोज पायाला तेल चोळल्याने पाय फुटणे, पाय आखडणे या तक्रारी दूर होतात. डोळ्यांचा थकवा नाहीसा होऊन चांगली झोप लागते. निद्रानाशाची तक्रार असणार्‍यांसाठी हा उत्तम उपाय आहे. खरोखरच रोज अभ्यंग करणे हा निस्तेज व रुक्ष त्वचा, अकाली गळणारे व पिकणारे केस यावर रामबाण उपाय आहे. म्हणूनच दिवसभरातील थोडासा वेळ अभ्यंगासाठी राखून ठेवणे आवश्यक आहे.

- Advertisement -

अभ्यंगानंतर व्यायाम करावा. व्यायाम म्हणजे शरीराला स्थैर्य व दृढता मिळवून देणारी, शरीराचे बल वाढविणारी, शरीराची योग्य प्रकारे केलेली हालचाल. आमची रोजची धावपळ म्हणजे व्यायामच असतो असे बर्‍याच जणांचे म्हणणे असते. परंतु लोकल वा बस पकडण्यासाठी केलेली धावाधाव म्हणजे व्यायाम नव्हे. शरीराचे बल वाढविण्यासाठी रोज अर्धशक्ती म्हणजेच कपाळ, काख इ. ठिकाणी घाम येईपर्यंत व्यायाम करावा. अधिक व्यायाम केल्याने थकवा येऊन गळून गेल्यासारखे वाटते. म्हणूनच प्रमाणात व्यायाम करावा. योग्य प्रकारे केलेल्या व्यायामाने शरीराची श्रम सहन करण्याची क्षमता वाढून पचनशक्ती सुधारते.

व्यायामाने शरीराला आलेल्या घामाचा चिकटपणा व दुर्गंध नाहीसा करण्यासाठी उद्वर्तन म्हणजेच अंगाला उटणे लावावे. अंगाला सुगंधी व औषधी द्रव्यांचे उटणे लावल्याने त्वचा मृदू, सतेज व नितळ होते. सर्व अवयवांना बळकटी मिळून मेदोवृद्धी कमी होते. उटणे लावल्यानंतर स्नान करावे. स्नानामुळे घाम व मळ नाहीसा होऊन शरीर स्वच्छ होते. मन प्रसन्न व ताजेतवाने होते. त्रतुनुसार स्नानासाठी गरम किंवा गार पाण्याचा वापर करावा. परंतु अतिशय गरम पाण्याने डोक्यावरुन आंघोळ करु नये. त्यामुळे केस व डोळे यांची शक्ती क्षीण होते. स्नान केल्यानंतर वस्त्राने अंग स्वच्छ पुसावे.

- Advertisement -

स्नानानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. त्रतुनुसार वापरलेली, हालचालींना सुटसुटीत, शरीराला व मनाला आल्हाददायी स्वच्छ वस्त्रे त्वचेचे आरोग्य राखण्यास व व्यक्तिमत्व खुलविण्यास मदत करतात. वरील सर्व दिनचर्येतील उपक्रमांबरोबरच आयुर्वेदाने शरीराचे आरोग्य टिकवण्यासाठी मल बाहेर टाकणार्‍या नाक, डोळे, कान, गुदभाग, योनिमार्ग यांची स्वच्छता राखण्यास सांगितले आहे.

आयुर्वेदाने आहाराला शरीराचा उपस्तंभ म्हणजे आधार मानले आहे. म्हणूनच आहारसेवन म्हणजे उदर भरण नसून ते एक यज्ञकर्म आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. षड्रसयुक्त आहार योग्य प्रमाणात सेवन करावा. कडकडून भूक लागल्यावरच जेवावे, कारण भूक लागली नसताना वा अवेळी भोजन करणे रोगाला कारणीभूत ठरते. एकदा खाल्ल्यावर तीन तासांच्या आत खाऊ नये. तसेच सहा तासांपेक्षा जास्त काळ उपाशी राहू नये. टी.व्ही. पहात, वर्तमानपत्र वाचत, गप्पा मारत जेवण्याची संकल्पना ही पूर्णत: चुकीची आहे. अन्न हे पूर्णब्रह्म हे लक्षात ठेवूनच भोजन करावे. भोजनानंतर अन्न पचनास सुकरता यावी यासाठी आयुर्वेदीय ग्रंथात कापूर, जायफळ, कंकोळ युक्त त्रयोदशगुणी विड्याचे वर्णन आढळते. सध्या मोठ्या प्रमाणावर आढळणारे पान खाणे म्हणजे तांबुलसेवन नव्हे. दिवसभर सदाचाराने नोकरी किंवा व्यवसाय करावा.

दिनचर्येनंतर आता वळूया रात्रिचर्येकडे. रात्रिचर्येत प्रामुख्याने रात्रीचे भोजन व निद्रा या दोन कर्मांचा समावेश होतो. रात्रीचे भोजन हे रात्री ८.३० ते ९.०० च्या दरम्यान करावे. हे भोजन दिवसाच्या भोजनापेक्षा कमी व पचायला हलके असावे. रात्रीच्या भोजनानंतर शतपावली करून एक तासाने झोपण्यास जावे. रात्री उशिरापर्यंत टी.व्ही बघत किंवा कॉम्प्युटरवर काम करत जागू नये. पुरेशी झोप मिळाल्यावर दुसर्‍या दिवशी प्रसन्न वाटते. सर्व ज्ञानेंद्रिये व शरीर आपली कार्ये करण्यास सक्षम बनतात.

आयुर्वेदाने सांगितलेले दिनचर्येच्या व रात्रिचर्येच्या वेळापत्रकातील प्रत्येक कर्म हे वात, पित्त व कफ या तीन दोषांचा विचार करुन सांगितले आहेत. उदाहरणार्थ दिवसाच्या सुरुवातीच्या भागात कफ दोषाचे प्राधान्य असल्याने कफ – शमनासाठी दंतधावन, जिव्हानिर्लेखन तर दिवसाच्या मधल्या भागात पित्त दोष प्रबळ असल्याने यथायोग्य आहार सेवन करण्यास सांगितले आहे. दिनचर्येतील काही कर्मे विशिष्ट प्रकृतीच्या व्यक्तींसाठी काळजीपूर्वक अंगीकारावी लागतात. म्हणून आयुर्वेदिक वैद्यांचे मार्गदर्शन घेऊन दिनचर्या निश्चित करावी.

आजच्या गतिमान युगात या सगळ्या गोष्टी जमणार कशा ? असा सगळ्यांपुढील एक प्रश्न असतो. परंतु वेळेचे योग्य नियोजन केल्यास यातील बहुतांशी उपक्रम आपल्या जीवनशैलीचा एक भाग होऊ शकतात. दोष – विचार करुन आयुर्वेदाने आखून दिलेली ही दिनचर्या व रात्रिचर्या जास्तीत जास्त आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. यापुढील लेखात आपण स्वास्थ्यरक्षक अशा उर्वरित मार्गदर्शक उपक्रमांची माहिती घेऊ.

वैद्य स. प्र. सरदेशमुख
ए. व्ही. पी., पीएच्. डी. (आयुर्वेद)
संचालक, इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, वाघोली, पुणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -