घरफिचर्समानसिकतेतील फरक : रुग्णालयात जन्म झाल्यास चालतो, मृत्यू नाही

मानसिकतेतील फरक : रुग्णालयात जन्म झाल्यास चालतो, मृत्यू नाही

Subscribe

आयुष्यात खुप कष्ट करून डॉक्टर होणारी नवीन पिढी जर कोरोनाच्या संकट काळात खचत असेल आणि काही जणांनी आत्महत्या केल्या असतील तर ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे

कोरोनाच्या मार्‍यापुढे सगळी यंत्रणा हतबल झालेली असताना, जिथे सगळ्याच गोष्टींची कमतरता आहे, तिथे स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची आहूती देत डॉक्टर खिंड लढवत आहेत. खिंड कसली फाटलेले आभाळ आपल्या तोकड्या हातांनी झेलत आहेत. पण आयुष्यात खुप कष्ट करून डॉक्टर होणारी नवीन पिढी जर या अशा वातावरणात आणि अडचणीच्या काळात खचत असेल आणि काही जणांनी आत्महत्या केल्या असतील तर ही बाब पुन्हा गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

या सर्व बाबींच्या मुळाशी आहे माणसाचा मेंदू. आपण सगळे विचार करतो किंवा समजतो त्यापेक्षाही नक्कीच गुंतागुंतीचा आहे. भावना आणि विचार यांची टक्कर झाली तर भावनेला झुकते माप देतो तो मेंदू. गणिताची क्लिष्ट आकडेवारी लक्षात ठेवण्यापेक्षा त्या संदर्भातील गोष्टी लक्षात ठेवतो. आपल्याला न कळणार्‍या गोष्टी बेमालूमपणे आपल्याला कळूच देत नाही, म्हणजे आपल्याला हे माहिती नाहीये हेच आपल्याला कळू देत नाही असा आहे मेंदू.

- Advertisement -

विषय काय आणि हे काय मेंदूचं माहात्म्य लावलंय, असा विचार आता तुमच्या मनात आला असेलच. हे सगळे सांगायचे कारण, आपण कोरोनाविषयी ज्या चुकीच्या गोष्टी पाहतोय, ऐकतोय आणि शहानिशा न करता पुढे पाठवतो यामागे तुमची चूक नाही. अडचणीच्या आणि संकटाच्या काळात आपला मेंदू असेच काम करतो. कल्पना करा तुम्ही जंगलात गेला आहात आणि अचानक तुमच्या समोर वाघ आला. काय कराल? तो खरंच वाघ आहे का? त्याचा आवाज कसा आहे? अगदी सध्याच्या काळातील फेमस गोष्ट म्हणजे त्याच्यासोबत सेल्फी घेणार का? कुठून आलाय, कुठे चाललाय? वाघ आहे का वाघीण? त्याचे जेवण झाले असेल की नाही ? आणि असे बरेच वेगळे वेगळे विचार करणार आणि जीव गमावणार की तिथून धूम ठोकणार आणि आपला जीव वाचवणार? तुमची इच्छा असेल नसेल पण तुम्ही एकतर पळणार नाहीतर भीतीने पटकन बसणार. याला आम्ही मेंदूचा फाईट किंवा फ्लाईट रिस्पॉन्स म्हणतो.

आधुनिक युगाने आणलेल्या ताणामुळे आणि त्या ताणात प्रचंड भर घातलेल्या कोरोनामुळे आपल्यासमोर म्हणजे मेंदूमध्ये कायम या प्रकारच्या भितींचा काल्पनिक वाघ तयार करून ठेवलेला आहे. त्यामुळे आपल्याला वाटते की, आपण बरोबर विचार करतोय. पण ते बरोबर नसतात बरं का, हे जरी तुम्हांला पटले तरी खूप झाले. हेच तत्व टेलिव्हिजन मीडिया भरभरून वापरतो. बातम्या डोळे बंद करून ऐकल्या तरी ते घाबरवणारे आणि दुखी करणारे म्युझिक वापरतात आणि याच्या जोडीला तीच तीच भयानक चित्रं दाखवली की त्यांचे काम पूर्ण होते. कारण असे झाले की तुमचा मेंदू मनातल्या मनात छान भुकेला वाघोबा तयार करतो आणि तो मग तुम्हांला त्याच्या पुढच्या बातम्यांवरती सारासार विवेकबुद्धीने विचार करू देत नाही. हेच होते आहे आपल्या सगळ्यांचे या आधुनिक आणि धकाधकीच्या जीवनात. स्वतःकडून असलेल्या अवास्तव अपेक्षा,कमी काळात यशस्वी होण्याचा हव्यास, शारीरिक आणि मानसिक आरोग्याची होणारी प्रचंड हेळसांड, वाढणारी व्यसनाधीनता, पैशांच्या जीवावर सगळे मिळू शकते अशी चंगळवादी वृत्ती त्यातून पुरेशी झोप हा टाईमपास वाटावा इतका टोकाचा विचार. हे सगळे आपण करत आहोत तरी आपल्याला त्यात काही चुकीचे आहे आणि त्याचा पुनर्विचार करावा असा विचार आपला मेंदू करू देत नाहीये.

- Advertisement -

हा किंवा असा विचार व्हायला हवा, कधीतरी टार्गेट्स आणि डेडलाईन्स बाजूला ठेवून तटस्थपणे स्वतःच्या आयुष्याचा विचार व्हायला हवा. मग हा काल्पनिक आपण तयार केलेला वाघोबा शांत होईल आणि आपल्यालाही शांतपणे विचार करू देईल. लोकांना वाटते त्यांना आता सोशल मीडियामधून कोरोनाची औषधे माहीत झाली आहेत. ते स्वतःच स्वतःचा ईलाज करतात. डॉक्टर तरी यापेक्षा काय वेगळे करतात ? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. पण यातून उध्दवणारे गुंते आणि क्वचितप्रसंगी जाणारे जीव याचा हिशोब कोण ठेवणार? झालेले गुंते आणि वाया गेलेला वेळ कसा निस्तरायचा याच्या पोस्ट पाहिल्यात का हो कधी? हे सगळे थोर कर्म डॉक्टर मंडळी रोज नीट करत आहेत. बर्‍याच वेळा यशस्वी होतात. बर्‍याचवेळा अपयशी.काय, कुठे, कधी, कसे किती प्रमाणात, कशा बरोबर द्यायचे आणि गुंता झाला तर कसे निस्तरायचे हे खरे डॉक्टरकीचे शिक्षण असते. जिथे सामान्य लोकांची माहिती संपते तिथे डॉक्टरांचे क्षेत्र सुरू होते. दोन योग्य औषधांमधले कुठले औषध द्यायचे इथे त्यांच्या मेंदूचा कीस पडत असतो आणि यामध्ये डॉक्टरांनी केलेले सरासरी १२ वर्षांचे कष्ट त्यांना रोज मदत करत असतात. गैरसमज करून घेण्यापेक्षा शांतपणे आणि तटस्थपणे विचार करा.

जर हॉस्पिटलमध्ये जन्म झालेला तुम्हांला चालत असेल तर मृत्यू का नको? आजकालची हॉस्पिटलही रुग्णाचे त्रास कमी करण्याची ठिकाणे आहेत.जीवनाची गॅरंटी, वॉरंटी देण्याची नाही. जुन्याकाळी डॉक्टर खूप चांगले होते आताची खूप व्यावसायिक आहेत, हे लोकांचे नेहमीचे आणि अवघड जागेचे दुखणे झाले आहे. जुन्या काळी सांधे बदलले जायचे का हो ? हृदयाच्या झडपा बदलल्याचे कधी ऐकले होते? २० फ्रॅक्चर झालेला माणूस जगलेला पाहिला होता का? बाळंतपणाला पुनर्जन्म मानणारे आपण आज किती यशस्वी बाळंतपणे करतोय याचा विचार कधी केला? जिथे सरासरी ४० वर्षे भारतीय माणूस जगायचं तो आता ७० वर्षांपेक्षा जास्त जगतो ही जादू कशी झाली? डॉक्टर मंडळी तुम्हांला मुद्दामहून मारत असतील? याचे श्रेय द्या अगर नका देऊ, हे फक्त मी शास्रीय मुद्दे मांडतोय. एवढे आकडे आपला मेंदू लक्षात ठेवत नाही, पण तो गोष्टी छान लक्षात ठेवतो. पॉझिटिव्ह मेसेज पाठवा असे मेसेज येत आहेत आजकाल, मग आपण पाठवतो इतकी बरी झाली, इतक्यांनी लस घेतली, इतके घरी बरे झाले पण या सगळ्यांच्या मागे डॉक्टरांचे अदृश्य हात असतात बरं का.आपल्या सध्याच्या रूढ जीवनशैलींवरती निसर्गाने कोरोनारूपी मारलेली ही खणखणीत चपराक आहे. स्वतःला बदला लोकांनी सुद्धा आणि डॉक्टरांनी सुद्धा, कोरोनाने बर्‍याच लोकांना आतून बाहेरून बदलले आहे. चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणायलाच हवे, मेंदू हलका राहतो आपला. मेंदू चांगला तर शरीर आणि मन चांगले, आणि हे दोन्ही चांगले तर आपले आयुष्य चांगले.

 

 

 

 

-डॉ. मुक्तेश दौंड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -