घरफिचर्ससंपादकीय : हवेत घामाचे दाम !

संपादकीय : हवेत घामाचे दाम !

Subscribe

खरे तर ही बातमी कुठेच आली नाही. येणार तरी कशी? कारण म्हणावे असे बातमीमूल्य तिच्यात नाही. साधी आत्महत्येची तर केस घडली, तीही एका 17 वर्षांच्या मुलीची. जरा आतल्या बाजूला असलेल्या दोनएक हजार वस्तीच्या खेड्यातली. बारावीत एखादा विषय राहिला, मग केली असेल आत्महत्या, त्यात काय एवढे. अशा घटना तर घडतच असतात आजूबाजूला. कोणाची आणि किती दखल घ्यायची? असा प्रश्न पडू शकेल कदाचित. कारण एकाच कोनातून विचार करण्याची सवय झालेली असते आपल्याला. पण जरा गांभिर्याने, दुसर्‍या कोनातून बघितले, तर शेतकर्‍यांची विदारक स्थिती वीज चमकावी तशी आपल्याला झर्रकन कळून येईल आणि कदाचित आपल्यातील संवेदनशील जनांच्या काळजाचा ठोका चुकल्यावाचून राहणार नाही. नाशिकच्या द्राक्षपट्ट्यातील खेड्यात नुकतीच घडलेली ही घटना प्रातिनिधिक ठरावी अशी. सध्या पंचेचाळीशीत आलेल्या एका शेतकरी बापाने पाच सहा वर्षांपूर्वी आपल्या वाट्याला आलेल्या एका एकरात मोठ्या हिकमतीने द्राक्ष बाग लावली. अठरा विश्व द्रारिद्रयात जगलेल्या त्याच्या पुढच्या पिढीला त्यातून समृद्धीचे स्वप्न पडले. एक दोन हंगाम चांगले गेल्यावर थोडे कर्ज काढून त्याने पक्के घर बांधले. घर बांधून पूर्ण व्हायचे होते, तोच त्यावर्षी अवकाळी पाऊस आला आणि द्राक्षावर रोग पडला. परिणामी उत्पादन घटले.

द्राक्ष लागवडीचा खर्चही निघाला नाही. व्यापार्‍यांनी भाव पाडले. आडते, दलाल आणि व्यापारी व्यवस्थेला बळी पडलेल्या या द्राक्ष बागायतदार शेतकर्‍यावर शेवटी घर चालविण्यासाठी एका व्यापार्‍याकडे रोजंदारीवर नोकरी धरावी लागली. दोनतीनशे रुपये रोजावर तो तालुक्याला राबू लागला. दरम्यान त्याची लाडक्या लेकीने बापाच्या परिस्थितीला शरण न जाता, चिकाटीने विशेष श्रेणी मिळवून दहावी पास केली. डॉक्टर इंजिनियर होण्याचे तिचे स्वप्न होते. बाजारपेठेच्या ठिकाणी असलेल्या दूरच्या कॉलेजमध्ये रोज मोठ्या कष्टाने जाऊन तिने अकरावीला सायन्स चांगल्या मार्कांनी पूर्ण केले. पोर बारावीला गेल्यावर बापाने द्राक्षशेती आणि व्यापार्‍याच्या नोकरीसोबतच बटाईने भोपळ्याची शेती केली. आई आणि बाप असे दोन्ही मुलीसाठी राबू लागले. तीन-तीन कामांतून मिळणारे पैसे पोरीच्या शिक्षणाला उपयोगात येऊ लागले. पुढे बारावी झाल्यावर प्रश्न आला तो कुठे प्रवेश घ्यायचा हा. जेमतेम दहावीपर्यंत शिकलेल्या बापाने पोरीला घेऊन शहरातली झाडून सर्व कॉलेजे पालथी घातली. पॉलिटेक्निकला प्रवेश मिळणार होता, पण खर्चाचे काय? बाप कुठून आणणार पैसे? पोरी हळवी होती. बापाच्या परिस्थितीची जाण होती तिला. आई-बापाचे कष्ट तिने पाहिले होते. आता आपल्यामुळे आणखी बोजा बापावर नको म्हणून एक दिवस आई-बाप शेतावर गेल्यावर तिने गळफास घेतला आणि सर्वच विषय संपवून टाकला. पोरीला शिकवण्यासाठी जीवाचे रान करणार्‍या बापाची स्थिती काय वर्णावी? त्याच्या डोळ्यातील पाणी आता सरत नाही. एरवी कठोर वाटणारा हा बाप, मुलीच्या आठवणीने धाय मोकलून रडतो. पोरांसाठी मी आणखी कष्ट केले असते, प्रसंगी जमीन गहाण टाकली असती म्हणतो. पण आता वेळ निघून गेली. पोर सोडून गेली.

- Advertisement -

अशी दु:खद वेळ येणारा हा एकमेव बाप नाही. मागील दहा वर्षात म्हणजेच 2008पासून विविध कारणांमुळे राज्यात 24 हजारांहून अधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. पण या आत्महत्यांसोबतच शेतकर्‍यांच्या मुलांनी आणि मुलींनीही घरच्यांना भार नको म्हणून मृत्यूला कवटाळले. दोन वर्षांपूर्वी लग्नाचा खर्च बापाला नको म्हणून लातूरमध्ये एका शेतकर्‍याच्या मुलीने आत्महत्या केली. तर त्याच मराठवाड्यातील एका शेतकरी मुलीने नापिकी आणि कर्जबाजारीपणातून बाप आत्महत्येला कवटाळेल या भीतीने स्वत:च आयुष्ययात्रा संपविली. देशाचे भविष्य असलेली शेतकर्‍यांची ही तरुण पिढी जेमतेम विशीतच आत्महत्या करत आहे. आणि त्याचे कारण ठरत आहे पुन्हा राज्यातील शेती आणि शेतकर्‍यांचे प्रश्न. अनेक सरकारे आली आणि गेली, पण शेती हा विषय राजकारण करण्याचाच असतो यावर सर्वांचे एकमत असावे बहुतेक. म्हणूनच कधी कर्जमाफी द्या, तर कधी त्याच्यासमोर सन्मान योजनेच्या नावाखाली पाचएकशे रुपड्यांचे तुकडे टाका. मिळतात मतं मग. होतो आपला पक्ष व सरकार लोकप्रिय.

पण शेतकर्‍याचे मुलभूत प्रश्न कधी सुटणार, याकडे कोणीही फारसे गांभिर्याने बघत नाही. शेतीची मुख्य निविष्ठा म्हणजे पाणी, ते त्याला कसे उपलब्ध होईल? त्यानंतर त्याला चांगले तंत्रज्ञान सहज आणि सोपेपणाने कसे मिळेल? सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे व्यापार आणि दलालांच्या तावडीतून त्याची सुटका होऊन त्याच्या घामाचा खरा आणि चांगला दाम कधी मिळेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने 75 हजार कोटी रुपयांची तरतूद केवळ किसान सन्मान योजनेसाठी म्हणजेच शेतकर्‍यांना सहानुभूती म्हणून देण्यासाठी किंवा वाटण्यासाठी म्हणा हवे तर, केली आहे. एका अर्थाने वाटप केलेल्या या पैशांतून शेतकर्‍यांना समृद्धी मिळेल का? त्याचे प्रश्न कायमचे सुटणार आहेत का? आणि महत्त्वाचे म्हणजे या वाटलेल्या या पैशांतून पाण्यासारखी शाश्वत संपत्ती निर्माण होणार आहे का? तसे नसेल तर शेतकरी पुन्हा लाचार होईल आणि आत्महत्येचा मार्गाला कवटाळेल. दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी आता हयात असते, तर सरकारला जाब विचारून त्यांनी पुन्हा एकदा मागणी केली असती, ‘भीक नको, हवेत घामाचे दाम !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -