घरमुंबईडॉ. पायल तडवी प्रकरणापूर्वी नायरमध्ये ४ विद्यार्थ्यांचे रॅगिंग

डॉ. पायल तडवी प्रकरणापूर्वी नायरमध्ये ४ विद्यार्थ्यांचे रॅगिंग

Subscribe

माहिती अधिकारातून धक्कादायक गौप्यस्फोट

डॉ.पायल तडवीच्या आत्महत्येनंतर वैद्यकीय महाविद्यालयात होणार्‍या रॅगिंगचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना नायर हॉस्पिटलमध्ये पायल तडवी प्रकरणाअगोदर ४ विद्यार्थ्यांचे रॅगिंग झाल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. या चारही प्रकरणात विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली असली तरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील रॅगिंग या समस्येवर तातडीने शस्त्रक्रिया करून ही व्याधी दूर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

नायर हॉस्पिटलच्या टोपीवाला महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेणारी स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. पायल तडवी हिने २२ मे रोजी रॅगिंग आणि जातीवाचक छळाला कंटाळून महाविद्यालयाच्या वसतीगृहाच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर हे प्रकरण राष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहचले होते. याप्रकरणात पोलिसांनी पायलचा मानसिक छळ तसेच तिला जातीवाचक शब्द वापरले म्हणून तीन महिला डॉक्टरांना अटक केली. पायलच्या प्रकरणानंतर वैद्यकीय महाविद्यलायाच्या वसतीगृहात अथवा हॉस्पिटलमध्ये होणार्‍या ज्युनिअर डॉक्टरच्या रॅगिंगचा मुद्दा चर्चेत आला. या प्रकरणानंतर आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी नायर हॉस्पिटलमध्ये मागील काळात झालेल्या रॅगिंगची आकडेवारी मागवली होती. त्यात धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे.

- Advertisement -

हॉस्पिटल प्रशासनाकडून आरटीआयमार्फत मिळालेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षात रॅगिंगच्या चार तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. २०१४ मध्ये बॅचलर ऑफ मेडिसिन,बॅचलर ऑफ सर्जरी या विभागातील दोन विद्यार्थ्यांनी एमबीबीएस दुसर्‍या वर्षातील विद्यार्थ्यांविरोधात हॉस्पिटल प्रशासन आणि रॅगिंग विरोधी समितीकडे तक्रारी केलेल्या होत्या. २०१५ मध्ये मायक्रोबायोलॉजीतील एक निवासी डॉक्टराने रॅगिंगविरोधात तक्रार दाखल केली होती. २०१८ मध्ये हॉस्पिटल प्रशासनाला आणखी एक रॅगिंगची तक्रार प्राप्त झाली होती. यासर्व तक्रारी टोल फ्री क्रमांकावरून करण्यात आलेल्या असल्याचे माहिती अधिकारात म्हटले आहे. या चारही प्रकरणाची मुंबई पोलीस दलात कुठेही नोंद नसल्याचे वास्तवदेखील समोर आलेले आहे.

नायर हॉस्पिटलच्या अहवालानुसार सन २०१३ पासून रॅगिंगविरोधी समितीच्या एकूण २१ बैठका पार पडल्या आहेत. एका प्रकरणात समितीने केवळ एका विद्यार्थ्याशी निव्वळ चर्चा केल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. तर रॅगिंग प्रकरणी समितीने आतापर्यंत दोन विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याचे समितीचे म्हणणे आहे. रॅगिंगच्या तक्रारी विरोधात रॅगिंग विरोधी समितीने गांभीर्याने चौकशी करून वेळीच कारवाई केली असती तर कदाचित डॉ.पायल तडवी यांचा नाहक बळी गेला नसता, असे आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -