घरफिचर्सहिजाब..मासिह..आणि काही प्रश्न

हिजाब..मासिह..आणि काही प्रश्न

Subscribe

प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या मुलीने खतिजाने नकाब/बुरखा घालवण्यावरून समाजमाध्यमांमध्ये बरीच उलटसुलट चर्चा झाली. खतिजाने ‘राईट टु चॉईस’ म्हणत तिच्यासाठी हा विषय फार मोठा नसल्याचं स्पष्ट केलं. तिच्यासाठी तो नसेलही. कुणी काय घालावं अगर घालू नये याबाबत कुणीही कुणावर जबरदस्ती करू नये हे मान्यच. तरीही प्रश्न पडतो की जगभरात बुरखा/हिजाब यांच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी संघर्ष सुरू असताना आपण तीच गोष्ट करण्यास कशाच्या आधारे तयार होतो? माझा हा प्रश्न अत्यंत जेन्युईन आहे. मला खरोखरच हे समजून घ्यायचं आहे की अशा कुठल्या मुद्द्यांच्या आधारे आपण अशा प्रथांचा स्विकार करतो. आपलं माणूसपण कोंडलं जातं, व्यक्ती म्हणून आपल्या स्वातंत्र्याचं हनन होतं अशा प्रथांचा स्विकार करण्यामागची मानसिकता नेमकी काय असते? नकळत्या वयात लादलेल्या प्रथा, परंपरा अगर कर्मकांडांचा स्विकार जेव्हा कळत्या वयात लादल्यावरही मान्य केला जातो किंवा कळत्या वयात ती स्वखुशीनेच पाळायला सुरूवात होते. तेव्हा ते कुठले मुद्दे असतात ज्यांच्या उत्तरांत त्यांना या प्रथांचे पाईक होण्याची गरज भासते?

आपली धर्मसंस्कृती किंवा पारलौकिक जीवनाचे आकर्षण हे जर या मागचे कारण धरलं तरी अस्तित्वात नसलेल्या, कुणीही न पाहिलेल्या जीवनाचं आपल्याला इतकं आकर्षण का वाटतं? आपण मानत असलेल्या धर्मातील प्रथा सुरु होण्यामागील विचार कालांतरानं बदलत असेल किंवा संपुष्टात येत असेल किंवा त्यात सुधारणा होत असेल असा प्रश्न पडत नाही का? एखादी कृती, एखादी परंपरा, एखादी प्रथा सुरू होते तेव्हा त्यावेळी घडलेल्या घटनांचा, परिस्थितीचा त्याला आधार असणार आणि त्यात कालांतराने फरक झाला असणार असा विचार का येत नाही. मला हे सगळे मुद्दे मनापासून समजून घ्यायचे आहेत.

साधारण पंधरा वर्षापूर्वी पत्रकार मुक्ता चैतन्य यांचा एक लेख वाचनात आला होता. त्यांनी नाशिकमधील मुस्लिम मुलींशी संवाद साधून त्या बुरखा का घालतात किंवा बुरख्याकडे कशा पाहतात अशा स्वरुपाचा एक लेख लिहीला होता. त्यावेळी त्या मुलींनी दिलेल्या उत्तरातील एक भाग आजही आठवतोय. त्या म्हणाल्या होत्या की, बुरखा म्हणजे काही आडकाठी नाही. बुरखा घातल्यानं आम्ही मागास विचारांच्या होत नाहीत. मुली आजकाल तोंडाला स्कार्फ बांधून प्रदूषणपासून बचाव करतातच ना. हे तितकंच साधं आहे. आम्ही फक्त तोंड नव्हे तर संपूर्ण शरिराला स्कार्फ बांधतो असं समजा. पंधरा वर्षापूर्वी मला हे उत्तर पटलं होतं. शरिराचा स्कार्फ ही कल्पना आवडली होती. बुरखा घालणं म्हणजे मागास विचार हे काही अद्वैत नाही हेही पटलं होतं. पण अर्थात पंधरा वर्षापूर्वी. आज विचार करताना असं वाटतं की जर आपले विचार आधुनिक अधिक चांगला शब्द सुधारित झालेले असतील तर आपल्याला आपल्या प्रथांचा फोलपणा जाणवत कसा नाही? वर्षानुवर्ष एखाद्या प्रकारचा पेहराव करत असू तर तो अचानक सुटणार नाहीच. तो सुटावा अशी जबरदस्ती करणं तर त्याहून चूक मात्र आपल्याला आपल्या प्रथेतील फोलपणा पटलाय ही जाणिव तर महत्त्वाची आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे, ज्या घरांतील मुलींना शिक्षण घेण्यासाठी, घराबाहेर पडून काम करण्यासाठी बुरखा घालणं बंधनकारक केलेलं असतं त्या मुलींनी जरूर ते घालवं याच मताची मी आहे. जर विशिष्ट पद्धतीच्या पेहारावामुळे त्यांच्या आत्मविश्वासाच्या जागा फुलणार असतील तर त्या त्यांनी निश्चितच कमावल्या पाहिजेत असंच मला वाटतं. हा विचार सोयीचा असेलही कदाचित पण तोे सोयीपुरता मर्यादित नाही. एकुणच मी अशी गोंधळलेली आहे आणि या गोंधळात मला मासिह अलिन्जाद जवळची वाटू लागते. त्याआधी मासिह कोण आहे हे सांगायला हवं.

मासिह बेचाळीस वर्षांची इराणी मुक्त पत्रकार आहे. तिच्या पुढाकारातून महिलांनी पडद्याआड लपवलेल्या, गुप्तपणे चोरलेल्या स्वातंत्र्याची एक चळवळ उभी झाली आहे. फेसबुकसारख्या समाजमाध्यमाच्या मदतीनं इराणमध्ये हिजाबच्या सक्तीविरूद्ध महिला उभ्या राहिल्या. ‘माय स्टिलथी फ्रीडम’ असं या फेसबुक पेजचं नाव. या फेसुबक पेजच्या माध्यमातून इराणमधल्या स्त्रियांनी आपल्या हिजाबच्या सक्तीचा विरोध दर्शवण्यासाठी स्वतःचे हिजाबविरहित फोटो टाकले आहेत. इराणमध्ये वयाच्या सातव्या वर्षी मुलींवर हिजाबची सक्ती होते. मासिह व तिच्या या चळवळीतील पाठिराख्यांनी हिजाबच्या या ‘सक्ती’ला विरोध केला आहे. ज्यांना हिजाब घालायचा नाही त्यांना ते न घालण्याची मुभा असावी आणि त्यांच्या या निर्णयाचा आदर व्हावा हा या मागचा हेतू.

- Advertisement -

मासिहनं स्वत: वयाची तिशी गाठेपर्यंत हिजाब घातलेला होता मात्र तिच्या कुरळ्या केसांना तिला हिजाबखाली ठेवणं हीच मोठी शिक्षा वाटायची. तिला तिच्या पत्रकारितेमुळे इराण शासनाने हुसकावून लावले. देश सोडून ती लंडनला गेली तेव्हा तिनं हळूहळू हिजाबच्या सवयीचा त्याग केला. तिनं स्वत:चा मोकळ्या केसांनी रस्त्यावरून धावतानाचा एक फोटो फेसबुकवर टाकला व त्याखाली लिहिलं होतं, ‘मी जेव्हा अशी मुक्तपणे धावते आणि माझे केस वार्‍यारोबर डोलू लागतात तेव्हा तेव्हा मला आठवतं की मी अशा एका देशातून आले आहे जिथं तीस एक वर्ष माझे केस शासनदरबारी बंदीवान होते. इस्लामिक रिपब्लिकमध्ये सत्तेत असणार्‍यांनी स्त्रियांवर केसांच्या माध्यमातून बंदी घातली. आता इराणमधील रस्ते माझी आठवण करत असतील. त्या रस्त्यांना माझ आनंदी अस्तित्त्व, माझं भरभर चालणं, माझं नाचणं, माझं हसणं सारं काही चुकल्या चुकल्यासारखं वाटत असेल. त्यांना माझी आठवण येत असेल याची मला खात्री आहे.’ या फोटोनंतर तिनं इराणी स्त्रियांना प्रश्न केला होता की, त्यांनी कधी स्वातंत्र्याची चोरी केली आहे का? आणि त्याच्या उत्तर स्वरूपात इराणी स्त्रियांची ही चळवळच उभी राहिली.

मासिहनं तिच्या आत्मचरित्रात-द विंड इन माय हेअर: माय फाईट फॉर फ्रीडम इन मॉडर्न ईराणमध्ये लिहीलंय की, ‘या कॅम्पेनमुळे हिजाबची सक्ती करणारा कायदा तातडीने बदलेल अशी भाबडी अपेक्षा नव्हतीच. पण यातून तिला सांस्कृतिक उलथापालथ अपेक्षित होती. महिलांपुढे नाकारण्याच्या, पुढे जाण्याच्या अनेकानेक संधी आहेत याची जाणिव त्यांना करून द्यायची होती आणि तसं घडलं ही..पुढे आलेल्या स्त्रियांना स्त्रीवाद कळत नाही, त्यांना राजकारणाशीही देणंघेणं नाही, त्या कार्यकर्त्या नाहीत. या सगळ्या सर्वमान्य स्त्रियांनी हिजाबची सक्ती आणि त्याबरोबर येणार्‍या बंधंनाचा अनुभव घेतला. सर्वसामन्य स्त्रिया पुढे आल्या इतकंच नव्हे तर या इराणी स्त्रिया आपल्या कथा-कहाण्या-फोटो टाकण्याची जोखीम घेऊन रसत्यावर मार खायला किंवा तुरूंगातही जायला तयार झाल्या. कित्येकीना असा क्रुर अनुभव आला पण त्यांनी माघार घेतली नाही. हे किती महत्त्वाचं आहे. ’

डाव्या विचारसरणींच्या लोकांनी तिला असंही विचारलं की, इराणमध्ये पायाभूत सुविधांचे इतके महत्त्वाचे प्रश्न असताना मासिहन हिजाबचा हा छोटा मुद्दा इतका का उचलून धरला आहे? मात्र तिला हा हिजाबचा मुद्दा लहान वाटत नाही. ती म्हणते,‘ दमणशाहीचे हे एक दृश्य स्वरूप आहे आणि वयाच्या सातव्या वर्षीच हे दमन स्त्रियांवर लादलं जातं ती गोष्ट लहान कशी असेल. पायाभूत सुविधांचे प्रश्न आहेतच. त्या सोडविल्याच पाहिजेत पण महिलांच्या सामाजिक स्वातंत्र्याची किंमत चुकवून नव्हे. महिलांचे व्यक्ती स्वातंत्र्य कुठल्याच राज्यकर्त्यांच्या अजेंडावर का नाही?’ तिचा हा प्रश्नदेखील तितकाच महत्त्वाचा आहे.

इराणमध्ये हिजाबची ‘सक्ती’ आहे. त्यामुळे मासिह तिथं सक्ती हटविण्यासाठी उभी राहिली आहे. भारतात अशी सक्ती नाही. तटस्थपणे पाहिल्यास मासिहचा लढा अद्याप ही पहिल्याच पायरीवर-सक्तीवर अडकलाय. तिने हिजाबच्या पुढे प्रश्नचिन्ह उभा केलेला नाही. तरीही ती जवळची वाटते कारण तिचा विचार. स्त्रीच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा तिनं धरलेला आग्रह.. पुरुषसत्ताकतेतून आलेल्या सक्तीचा विरोध करण्याची तडफ आणि त्यासाठी निर्भयपणे उभं राहण्याची तिची वृत्ती. या कारणांनी ती मला अधिक जवळची वाटते आणि म्हणूनच ती त्यापुढे जाऊन मला असा विचार करायला उद्युक्त करते की, जिथं सक्ती नाही तिथं ‘स्वखुशी’ने स्त्रिया दमनाचा मार्ग का स्विकारतात? माझी इच्छा, माझी आवड म्हणत पितृसत्तेचं ओझं वाहण्यास त्या का तयार होतात? त्यांच्याभोवती ती कोणती झापडं असतात, त्यांच्याकडे ते कोणते मुद्दे असतात जे त्यांना इतक्या टोकाचं मान्य असतं की त्यातून त्या कशाचं वहन करतात याची जाणिवच नसते? मला हे खरंच समजून घ्यायचं आहे…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -