घरफिचर्सनिर्माते, दिग्दर्शक बाबूराव पेंढारकर

निर्माते, दिग्दर्शक बाबूराव पेंढारकर

Subscribe

बाबूराव पेंढारकर हे मराठी चित्रपट-अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते होते. १९२० साली त्यांनी ‘सैरंध्री’ या मराठी चित्रपटाच्या लेखन-दिग्दर्शनाद्वारे चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. १९२० च्या दशकापासून १९६० च्या दशकापर्यंतच्या सुमारे ४५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पन्नासहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांचा जन्म २२ जून १८९६ रोजी कोल्हापूर या ठिकाणी झाला. बाबूराव पेंढारकरांचे बालपण हे कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या जमान्यात गेले. त्यांच्या राजाश्रयाखालील मंजीखाँ, अल्लादिया खाँ, बाबालाल रहमान, चित्रकार पेंटर बंधू, कृष्णराव मिस्त्री यांसारख्या कलावंतांमुळे कोल्हापूरला ‘कलापूर’ म्हणून महाराष्ट्र ओळखू लागला.

याच कोल्हापूरच्या मातीत बाबूरावांवर कलेचे नि रसिकतेचे संस्कार झाल्यामुळे त्यांच्यातला नट घडला. त्यातून त्यांच्या मातोश्रीने ध्येयवादाचे बालामृत पाजल्याने त्यांचे जीवन भलतीकडे न भरकटता अभिनयकलेचे उच्च शिखर गाठू शकले. कोल्हापूर सिनेटोन सोडून मा. विनायक यांच्याबरोबर चित्रसंस्था काढण्याच्या बेतात बाबूराव होते. चित्रीकरणपटू पांडुरंग नाईक मदतीला. प्रभावी बोलपट साकारण्यासाठी लेखक म्हणून अत्रे, फडके, खांडेकर, वरेरकर अशा साहित्यिकांचे सहाय्य घेण्याचे त्यांनी ठरवले. वरेरकरांच्या कथानकावर पूर्वी ‘विलासी ईश्वर’ चित्रपट काढला होता.

- Advertisement -

प्रभातचा व्यवस्थापक या नात्याने साहित्य संमेलनास आलेल्या कविमंडळींच्या काव्यवाचनाचे चित्रीकरण करण्याच्या निमित्ताने अत्रे यांची ओळख झाली होती. बोलपटासाठी एखादे कथानक देण्याची त्यांनी गळ घातली असता अत्रे म्हणाले, ‘मला चित्रपट तंत्र फारसं अवगत नाही. सध्या मी नाटक लिहितोय, तेव्हा खांडेकरांकडून प्रथम गोष्ट घ्या. मग दुसरी ‘फर्स्ट क्लास’ गोष्ट मी देईन.’ अत्रेंचा ‘फर्स्ट क्लास’ शब्द बाबूरावांच्या डोक्यात असा काही घुसला की तो कायमचा त्यांच्या ओठावर वसला. त्याप्रमाणे खांडेकर लिखित ‘छाया’ चित्रपट प्रथम निघाला. स्वत:ची संधी आपल्या साहित्यिक मित्राला बहाल करताना महामनी अत्रेंच्या माणुसकीचे दर्शन बाबूरावांना झाले.

‘हंस पिक्चर्स’चा त्यानंतर आलेला ‘ज्वाला’ चित्रपट न चालल्यामुळे संस्था डबघाईला आली. त्यामुळे निराश झालेले बाबूराव आपल्याबरोबर अत्रेंना घेऊन पुण्याहून कोल्हापूरला गेले. ‘आठवडाभरात नव्या चित्रपटाचा मुहूर्त न केल्यास संस्थेची पत राहणार नाही.’ हे बाबूरावांचे उद्गार ऐकून, ‘आठ दिवसांऐवजी तीन दिवसांतच पटकथा लिहून देतो.’ त्याप्रमाणे ‘बह्मचारी’ या विनोदी बोलपटाची कथा लिहून देऊन अत्रेंनी ‘हंस’ला जीवदान दिले.

- Advertisement -

‘अयोध्येचा राजा’ मधील ‘गंगानाथ महाराजाच्या’ भूमिकेने चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण केले. पण तशी भूमिका पुन्हा केली नाही. धर्मवीर, देवता, अर्धागी अमृत, पहिला पाळणा, भक्त दामाजी, जय मल्हार, मी दारू सोडली, पुनवेची रात, श्यामची आई, महात्मा फुले हे मराठी चित्रपट तर ‘डॉ. कोटनीस की अमर कहानी’ ‘नवरंग’ ‘दो आँखे बारह हाथ’ ‘आम्रपाली’ हे हिंदी चित्रपट बाबूरावांनी केले. अशा नानाविध भूमिका करून त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर आपला ठसा उमटवला. अशा या महान दिग्दर्शकाचे ९ नोव्हेंबर १९६७ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -