घरठाणेदोन वर्ष जनसेवेची…ठाण्यात सचित्र प्रदर्शनातून उलगडणार विकास गाथा

दोन वर्ष जनसेवेची…ठाण्यात सचित्र प्रदर्शनातून उलगडणार विकास गाथा

Subscribe

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागीय माहिती कार्यालयातर्फे ठाणे येथे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून गेल्या दोन वर्षांत झालेल्या विकास विषयक कामांची सचित्र माहिती देणारे विभागीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ठाण्याची सांस्कृतिक परंपरा अशी ओळख जपणाऱ्या टाऊन हॉलमध्ये होणाऱ्या या प्रदर्शनाविषयी…

ठाण्याच्या मध्यवर्ती भागात असलेला आणि जवळपास ९४ वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या टाऊन हॉलचे नूतनीकरण झाले आहे. प्राचीन दगडी भिंतींना आधुनिकिकरणाची झालर चढवताना दगडी भिंती अधिक भक्कम झाल्या आहेत. या नूतनीकरण झालेल्या वास्तुचे उद्घाटन आणि गेल्या दोन वर्षात राज्य शासनाने केलेल्या विकास कामांची सचित्र माहिती देणारे प्रदर्शन असा दुग्धशर्करा योग महाराष्ट्रदिनी जुळून आला आहे. विशेष म्हणजे टाऊन हॉलच्या दगडी भिंतींप्रमाणेच भक्कम तटबंदी असलेल्या किल्ल्याच्या प्रतिकृतीच्या माध्यमातून हे सचित्र प्रदर्शन पहायला मिळणार आहे.

विद्यमान राज्य शासनाने आपली दोन वर्ष पुर्ण केली आहेत. या कालावधीत अनेक महत्वपूर्ण निर्णयांच्या माध्यमातून लोकोपयोगी कामे केली आहेत. राज्य शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती जनतेला व्हावी यासाठी सचित्र माहिती असलेले ‘दोन वर्ष जनसेवेची महाविकास आघाडीची’ या संकल्पनेवर आधारित विकास प्रदर्शन महाराष्ट्र दिनापासून ठाणे येथील टाऊन हॉलमध्ये आयोजित केले आहे. ५ मे पर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे.

- Advertisement -

विशेष प्रसिद्धी मोहिमेंतर्गत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने तयार केलेल्या या प्रदर्शनात शासनाच्या सर्व विभागांची कामगिरी एकत्रित बघता येणार आहे. कोरोना कालावधित आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन या विभागांसह उद्योग, गृह निर्माण, शालेय शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा या विभागांनी कोरोना उपचार आणि व्यवस्थापनात महत्वाची भूमीका पार पाडली आहे. सार्वजनिक बांधकाम, नगर विकास, वस्त्रोद्योग, महसूल, वन, उर्जा, कामगार, ग्रामविकास, मृद व जलसंधारण, जलसंपदा,गृह विभाग,माहिती तंत्रज्ञान, पर्यटन, पर्यावरण यासह इतर सर्व विभागांनी या दोन वर्षात घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची अद्यावत माहिती या चित्रप्रदर्शनातून प्रदर्शित करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या विविध विभागांच्या राज्यस्तरीय कामगिरीची माहिती देतानाच कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर या जिल्ह्यांमधील वैशिष्टयपूर्ण कामांची माहिती देणारे पॅनल देखील या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. याशिवाय एलईडी स्क्रिनच्या माध्यमातून विविध विभागांच्या योजनांची माहिती देणाऱ्या ध्वनीचित्रफिती देखील दाखविण्यात येणार आहेत.

- Advertisement -

किल्ल्याच्या तटबंदीप्रमाणे हुबेहुब उभारलेल्या या प्रदर्शनाच्या परिसरात शासनाचे महत्वपूर्ण उपक्रम व माहिती सुंदर रंगसंगती असलेल्या चित्रफलकांतून मांडण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांत शासनाने कोरोना सारख्या कठीण काळात केलेली कामगिरी, कृषी, आदिवासी विकास, शिवभोजन, महाआवास योजना, आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासह समाजातील सर्वच घटकांचा सर्वांगिण विकास याबाबत छायाचित्रांसमवेत मजकूर अशा आकर्षक पद्धतीने प्रदर्शनाची मांडणी केली जात आहे. त्या माध्यमातून नागरिकांनी शासकीय योजनांची माहिती जाणून घ्यावी. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी मा. महासंचालक तथा विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागीय उपसंचालक डॉ. गणेश मुळे आणि विभागातील अधिकारी- कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

१ ते ५ मे २०२२ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे. याठिकाणी नागरिकांसाठी सेल्फी पॉईंट देखील केला आहे. एकाच छताखाली राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजनांबाबत आणि निर्णयांबाबत माहिती देणारे हे प्रदर्शन नागरिकांसाठी विकास गाथा ठरणार आहे. त्याला जोड मिळाली आहे ती ऐतिहासिक अशा टाऊन हॉलची.

सांस्कृतिक वारशाला नवा साज

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या टेंभीनाका परिसरात टाऊनहॉलची इमारत असून १९२८ मध्ये त्याचे काम पूर्ण झाले. तेव्हा पासून हि वास्तू सामाजिक, सांस्कृतिक ठेवा बनली आहे. पुरातन वास्तुचे सौंर्य तसेच जतन करीत त्याला आधुनिकतेचा टच देण्यात आला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी त्याबाबत सातत्याने पाठपुरावा करीत नूतनीकरण करताना वास्तुचा हेरिटेज लुक कायम ठेवला आहे. जुन्या दगडी बांधकामाला साजेसं नव बांधकाम करताना जुना चेहरा हरवू नये यासाठी खास नेवासा येथून दगड मागविण्यात आले आणि त्याचे बांधकाम करण्यात आले. जुन्या इमारतीतील हॉल वातानुकुलीत करण्यात आला असून पुरातन काळातील झुंबर, दिवे देखील लावण्यात आले आहे. जेणे करून त्याचा हेरीटेज लूक कायम राहील. या परिसरात असलेल्या ॲम्फी थिएटरवर टेन्साईल फॅब्रीकचा वापर करून छत करण्यात आले आहे. त्यामुळे, ऊन, पावसात देखील येथे कार्यक्रम घेता येऊ शकतील. शहरातील सांस्कृतिक वारसा असलेल्या या शतकी वाटचाल करणाऱ्या इमारतीला नवा साज देण्यात आला आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे.

– अजय जाधव

(लेखक ठाणे जिल्हा माहिती अधिकारी आहेत.)

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -