घरफिचर्समायमहानगर ब्लॉगMarathi Bhasha Din : 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी...,

Marathi Bhasha Din : ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…,

Subscribe

वर्षभरातून फक्त एकच दिवस म्हणजे २७ फेब्रुवारी रोजी "मराठी राजभाषा दिन" साजरा केला जातो. संपूर्ण जगात हा दिवस "जागतिक मराठी भाषा दिन" म्हणून साजरा करतात. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली हे तर आपणां सर्वांनाच ज्ञात आहे.

Marathi Bhasha Din :  सुप्रसिद्ध मराठी कवी सुरेश भट यांच्या या काव्यपंक्ती किती हृदयस्पर्शी आहेत. परंतु आज आपल्याला मराठी भाषा संवर्धनाची गरज भासू लागली आहे, हे देखील तितकेच हृदयद्रावक आहे. वर्षभरातून फक्त एकच दिवस म्हणजे २७ फेब्रुवारी रोजी “मराठी राजभाषा दिन” साजरा केला जातो. संपूर्ण जगात हा दिवस “जागतिक मराठी भाषा दिन” म्हणून साजरा करतात. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली हे तर आपणां सर्वांनाच ज्ञात आहे.

‘माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा,
हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यातील शिळा’

- Advertisement -

खरच दऱ्याखोऱ्यातील शिळा जागवण्याचे सामर्थ्य माझ्या मराठी भाषेत आहे. यापेक्षा आणखी अभिमानास्पद ते काय?, अनेक मराठी भाषिक मराठी भाषा दिवस साजरा करतात खरा, परंतु काही जणांनाच हे ठाऊक असेल की जगभरातील बऱ्याच भाषांचा उगम जसा संस्कृत भाषेतून झाला आहे. तशीच आपली मराठी भाषा देखील संस्कृत भाषेतूनच आली आहे. संपूर्ण महाराष्ट्राची मराठी ही एकच भाषा असली तरी मराठी भाषा दर बारा कोसावर बदलते. मराठी भाषा ही लवचिक आहे. थोड्याथोड्या फरकाने ती वेगळी भासते. आज मराठी भाषेमध्ये इंग्रजी आणि हिंदी भाषा ही मिश्रित झाली आहे. खेड्यात बोलली जाणारी मराठी अशुद्ध असली तरीही ती कुठेतरी आपली वाटतेच.

आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात इंग्रजी भाषेकडे आकर्षित होत आहे. त्यामुळेच उच्चशिक्षणासाठी हे लोक परदेशात जातात आणि त्या देशातील बोलीभाषेला आपली मातृभाषा समजून अगदी मायदेशी परतल्यावर ही तिचा सर्रास वापर करतात. कुठेतरी इंग्रजी भाषेचे वर्चस्व मराठी भाषेवर प्रस्थापित झालेले दिसून येते. त्यामुळेच आज समाजामध्ये मराठी भाषेला प्रतिष्ठित भाषेचा दर्जा अजूनही मिळालेला नाही.

- Advertisement -

आज आपण पाहतोय विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा जसे युपीएससी, एमपीएससी, नेट-सेट इत्यादी या सर्वांमध्ये मराठी भाषेचे अस्तित्व किती असते?, प्रादेशिक भाषांचा वापर अशा परिक्षांमध्ये केला जातो, का याचा देखील विचार होणे आवश्यक आहे. किंबहुना त्यांचा वापर करणे आवश्यक आहे. बरं यांसारख्या परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर मराठी भाषिकाला नोकरीची संधी कितपत उपलब्ध आहे?

‘मराठीचा वापर करा…, मराठीत बोला…, मराठीत लिहा…. अशा प्रकारची घोषणाबाजी करून मराठीचे संवर्धन होणार आहे का? (बरे यासाठी काढण्यात येणारे आदेश देखील बऱ्याच वेळा इंग्रजीमध्ये लिहिले जातात.) महाराष्ट्रातच मराठी परकी होते की काय, अशी परिस्थिती सध्या निर्माण होऊ लागली आहे.

आज मराठी माध्यमांच्या शाळांची देखील परवड होत असल्याचे दिसून येते आहे. तसेच पालक देखील मराठी माध्यमातून आपल्या पाल्याने शिक्षण घ्यावे, या बाबतीत उदासीन असल्याचे दिसून येते. मराठी शाळांमध्ये सुद्धा गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न झाले पाहिजेत. परंतु त्यासाठी पालकांची व समाजाची मानसिकता सुद्धा बदलणे आवश्यक आहे. ही गोष्ट नक्कीच स्वागतार्ह आहे की, आज महानगरपालिका देखील मराठी शाळेचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देत आहे. परंतु तरीही ही खेदाची गोष्ट आहे की, इंग्रजीप्रमाणे मराठी शाळांना दर्जा दिला जात नाही. शिवाजी जन्मावा मात्र तो शेजारच्या घरात अशीच परिस्थिती आज मराठी शाळांच्या बाबतीत दिसून येत आहे. मराठी शाळांचा शैक्षणिक दर्जा गुणवत्ता या विषयी लोकांच्या मनातील कमी होत असलेली विश्वासार्हता दूर करणे आवश्यक आहे. त्यासाठीच दर्जात्मक अभ्यास अध्यापनाची देखील आवश्यकता आहे. अशावेळी प्रश्न पडतो. मराठीचे वावडे नक्की आहे तरी कुणाला?, नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे मातृभाषेतून शिक्षणावर जनतेच्या पैशांची गुंतवणूक व्हायला हवी होती. मात्र तसे झाल्याचे दिसून येत नाहीय. हे करत असताना मराठी ही जगातील श्रेष्ठ भाषा आणि इंग्रजी निरुपयोगी भाषा आहे, अशी निरर्थक चर्चा मी करणार नाही. परंतु मराठी ही पोटाची भाषा झाली पाहिजे फक्त अस्मितेची भाषा राहून चालणार नाही. हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे व त्याची कार्यवाही सुरू ठेवली पाहिजे. ‘ऐकतो मराठी… बोलतो मराठी, असे म्हणत असताना फक्त बोलण्या पुरती जाणतो मराठी… न राहता ‘जगतो मराठी…’, अशी भावना प्रत्येकामध्ये रुजली पाहिजे.

आपण जर आपल्या मातृभाषेला नाकारून परकीय भाषांचा स्वीकार करू लागलो. तर आपल्यात एक प्रकारची पोकळी निर्माण होईल, जी आपलं जगणं पोखरत जाईल आणि म्हणूनच आपल्या ‘मातृभाषेला नाकारणं हे जणू घर असताना पाळणाघरात राहिला जाण्यासारखे होईल’. हे आपण प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे की जरी परदेशी भाषा शिकलो तरी मराठीचा विसर पडता कामा नये.

‘ने मजसी ने…परत मातृभूमीला…
सागरा प्राण तळमळला…

असे म्हणणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचा हा देश आहे. परदेशी जाऊनही आपली ही मायबोली…, मराठी भाषा आणि आपल्या देशावर एवढे प्रेम करणारे लोक आपल्या याच महाराष्ट्राने आपल्याला दिले आहेत. ‘ज्ञान म्हणजे इंग्रजी आणि इंग्रजी ध्यान म्हणजे ज्ञान’ परंतु आपण निर्माण केलेलं हे समीकरणच फोल आहे. हे ध्यानात घेणे आवश्यक आहे. कारण ‘कुठलीही भाषा ही संवाद साधण्याचे, विचार करू शकण्यासाठीचे महत्त्वाचे साधन आहे’. आपले विचार, मनातील भावना आपण जितक्या चांगल्या पद्धतीने मातृभाषेतून व्यक्त करू शकतो. तितक्‍या अन्य कोणत्याही भाषेतून नाही. मराठी भाषेचा जागर करून तिचे संवर्धन करून तिला पुन्हा एकदा समाजामध्ये प्रतिष्ठित भाषेचा दर्जा मिळवून देण्याची नैतिक जबाबदारी आता आपली आहे. म्हणूनच एवढेच सांगेन की…

‘मराठी अमुची मायबोली, मराठी आमची शान’
एक सुराने गाऊया, तिचे गुणगान’

मिनल सतीश सरकाळे – लेखिका जोगेश्वरीतील श्रमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -