घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग 'स्कॅम 2003- दी तेलगी स्टोरी' : चर्चा वेबसीरिज अन् पुस्तकाचीही!

‘स्कॅम 2003- दी तेलगी स्टोरी’ : चर्चा वेबसीरिज अन् पुस्तकाचीही!

Subscribe

गजानन महतपुरकर

सध्या स्कॅम 2003- दी तेलगी स्टोरी या बेवसीरिजची मनोरंजन क्षेत्रात चर्चा आहे. ही वेबसीरिज हिट तर झालीच आहे, पण बरेच रेकॉर्ड पण नोंदवत आहे. बनावट मुद्रांक शुल्क घोटाळा करणाऱ्या अब्दुल करीम तेलगीची ही गोष्ट आहे. हा घोटाळा 30 हजार कोटी रुपयांचा होता. नामवंत पत्रकार संजय सिंह यांनी लिहिलेल्या तेलगी स्कॅम –रिपोर्टरची डायरी या पुस्तकावर ही वेबसीरिज आधारित आहे. या पुस्तकाची अपडेटेड आवृत्तीही प्रकाशित झालीय. यात तेलगीशी संबंधित अनेक संदर्भ आले आहेत. या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक संजय सिंह यांच्याशी केलेली चर्चा आणि ही अनोखी मुलाखत तुम्हा सर्व वाचकांसाठी –

- Advertisement -

तेलगी घोटाळ्यासंदर्भात गुगल केलं तर सर्वकाही मिळतं. अशावेळी या पुस्तकाचं महत्त्व काय आहे?

धन्यवाद गजानन जी, एक उदाहरण देतो, आज एव्हरेस्टवर अनेकजण जातात पण इतिहासात नोंद पहिल्यांदा तो पादाक्रांत करणाऱ्याची होते. हाच उपलब्ध माहिती आणि माझ्या पुस्तकातल्या कंटेट यातला महत्त्वाचा फरक आहे. मला क्रिकेट आवडतं म्हणून मी तुम्हाला क्रिकेटच्या भाषेत सांगतो. टीव्ही स्क्रीनवर दिसणारा सामना बघून समालोचन करणारे बरेच असतात. पण मी तर प्रत्यक्षात मैदानात खेळत होतो. हे माझं अनुभव कथन आहे. म्हणूनच ते दैनंदिनीच्या माध्यमातून करण्यात आलंय. 25 वर्षांच्या पत्रकारितेच्या कारकीर्दीत अनेक बातम्या आल्या आणि गेल्या. अनेक गोष्टींचा मी पर्दाफाश केला. पण तेलगी घोटाळ्यासारखं काहीच नव्हतं. यात रोमांच होता. साम, दाम, दंड, भेद अशा अनेक गोष्टींचा सामना मी केलाय. राजकारणी आणि पोलीस या दोघांना थेट भिडण्याचे अनेक प्रसंग आले. प्रलोभन आणि धमक्याही मिळाल्या. महाराष्ट्राच्या माजी उपमुख्यमंत्र्याने तर भर पत्रकार परिषदेत चप्पल दाखवली. तरीही मी डगमगलो नाही. भूतासारखा या बातमीच्या मागे लागलो. पत्रकारितेच्या मूल्यांवर बातमीचा मागोवा घेतला. यावरच हे पुस्तक आहे. 2003 ते 2023 मधली पत्रकारिता यात खूप अंतर आहे.

- Advertisement -

वेबसीरिज कशी मिळाली?

‘स्कॅम 1992 – दी हर्षद मेहता स्टोरी’ या वेबसीरिजला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सोनी लिवचे प्रतिनिधी मला भेटायला आले. त्यानंतर अधिकृतरित्या ॲप्लॉज इंटरटेन्मेटतर्फे सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी माझ्या पुस्तकावर स्कॅम 2003ची घोषणा करण्यात आली. हंसल मेहता या वेबसीरिजचे शो-रनर असतील. पटकथा लिहिणाऱ्यांसोबत बसून कथानकाची मांडणी करण्यात आली. पटकथा, दिग्दर्शन आणि अभिनय सर्वकाही अप्रतिम झालंय. गगन देव रियारने तेलगीला जीवंत केला. मी गगनदेवला म्हटलंही की, तू ज्या पद्धतीनं तेलगीचं पात्र केलंयस, ते कुणीच करू शकत नाही.

पुस्तकाची नवीन आवृत्ती तीन भाषांमध्ये आहे?

होय. मला हे गर्वाने सांगावसं वाटतंय की, इंग्रजीतून हिंदीत भाषांतरापेक्षा हिंदीतून इंग्रजीत भाषांतरीत होणाऱ्या पुस्तकांची संख्या कमी आहे. हार्पर- कॉलिन्सनं माझं पुस्तक हिंदी आणि इंग्रजीत छापलं आहे. मराठीत ते मेहता पब्लिशिंग हाऊसने छापलं आहे. या घोटाळ्याचं केंद्र महाराष्ट्रात होतं. सहाजिकच या पुस्तकाच्या मराठी वाचकांची संख्या नक्कीच जास्त आहे. वेबसीरिजचा फायदा पुस्तकाला मिळाला. देशभरातल्या सर्व एअरपोर्टवर हे पुस्तक पाहताना खूप आनंद होतोय.

नव्या अपडेटेड आवृत्तीत नवीन काय आहे?

या पुस्तकातल्या घटनांचं दोन भागांत वर्गीकरण करता येईल, एक भाग 2004पर्यंत आणि दुसरा, या नव्या अपडेटेड आवृत्तीत आलाय तो 2021पर्यंतचा आहे. वेबसीरिजच यामागच्या निर्मितीची प्रेरणा आहे. हार्पर कॉलिन्सच्या सचिन शर्मा यांनी आग्रह केला की, मी नवीन सर्वसमावेशक पुस्तक लिहावं. ते बरोबरही होतं. पहिलं पुस्तक 2004मध्ये आलं होतं. त्यानंतर 2017पर्यंत मी पत्रकार म्हणून तेलगी मुद्रांक शुल्क घोटाळ्याचा मागोवा घेतला होता. त्या सर्व घटना आल्या नसत्या तर सर्वकाही अर्धवट झालं असतं. हे सोप्प काम नव्हतं; या कालावधीत खूप काही घडून गेलं होतं. नव्यानं दस्तावेजाची पडताळणी करण्यात आली. घटनाक्रमांची मांडणी करण्यात आली. नवीन आणि उत्कंठावर्धक माहिती आली. सर्व काही इथं सांगू शकत नाही. तुम्ही ते पुस्तकातच वाचू शकता.

आता वेबसीरिज आलीय. त्यामुळं पुस्तकाच्या वाचक संख्येवर परिणाम होईल, असं आपल्याला वाटत नाही का?

वेबसीरिज आणि पुस्तकं एकमेकांना पूरक आहेत. ते एकमेकांशी स्पर्धा करत नाहीत. वेबसीरिजचा असा एक प्रेक्षकवर्ग आहे. पुस्तकाचा वाचकवर्ग वेगळा असतो. वेबसीरिजची मांडणी दृश्यात्मक असते तर, पुस्तकात घटनांचा सखोल आलेख असतो. वेबसीरिज पत्रकाराच्या नजरेतून घडणारं कथानक आहे. तर पुस्तक पत्रकाराचा स्वानुभव आहे, जो रोज घडणाऱ्या घडामोडींवर गोषवारा असतो. हे बिर्याणी आणि चिकन करी राइस खाण्यासारखं आहे. या दोन्ही पदार्थांमध्ये मसाले समसमान असतात. पण बुफेच्या वेळी बिर्याणी आणि चिकन करी राइस दोन्ही घेतलं जातं. पुस्तकात असं बरच काही आहे जे वेबसीरिजमध्ये आलेलं नाही. नोव्हेंबरमध्ये वेबसीरिजच्या दुसऱ्या भागात माझं पात्र पण आहे, जे गोदान कुमार नावाचा अभिनेता करतोय.

कसा प्रतिसाद मिळतोय? प्रेक्षक किंवा समीक्षकांना तुमच्यापर्यत कसं पोचता येऊ शकतं?

वेबसीरिज आणि पुस्तक या दोघांना चांगला प्रतिसाद मिळाला. गुगलवर संजय सिंह आणि तेलगी स्कॅम असं सर्च केलं जातंय. समीक्षक आणि प्रतिक्रियांचं स्वागत आहे. एखाद्या लेखकाला हेच हवं असतं. ज्या वाचक आणि प्रेक्षकांना आपल्या प्रतिक्रिया द्यायच्या असतील, ते सोशल मीडिया अकाऊंटवरुन आम्हाला टॅग करू शकतात.

@sanjayreporting @HarperCollinsIN #scam2003book #Scam2003 #Scam2003OnSonyLIV #TelgiBook #तेलगी #TelgiReporterDiary #HansalMehta #MehtaPublishing @ApplauseSocial @SonyLIV @sonylivindia

हे सर्व टॅग वापरू शकतात. प्रत्येकाला प्रतिक्रिया देण्याचा माझा प्रयत्न आहे. सध्या ओटीटीमुळं गुन्हेगारी क्षेत्राचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना चांगले दिवस आलेत. माझ्या तीन पुस्तकांवर वेबसीरिज येणारेय. 2024मध्ये त्या रीलिज होतील.

वेबसीरिजच्या लेखकाविषयी माहिती –

संजय सिंह शोध पत्रकारीता करतात. आपल्या 25 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी झी न्यूज, एनडीटीव्ही, टाइम्स नाऊ, आयबीएन, न्यूज एक्स यासारख्या वृत्तवाहिन्यामध्ये वरिष्ठ पदांवर काम केलंय. तेलगी मुद्रांक घोटाळ्यासहित अनेक महत्त्वाच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश त्यांनी केला आहे. स्कॅम 2003 – द देलगी स्टोरी ही वेबसीरिज त्यांच्या पुस्तकावर बनली आहे, जी सोनी लिववर प्रसारित होत आहे. ॲप्लॉज एंटरटेन्मेटनं या वेबसीरिजची निर्मिती केली असून हंसल मेहता यांनी त्याचं दिग्दर्शन केलंय. सीआययू – क्रिमिनल्स इन यूनिफॉर्म, एक थी शीना बोरा आणि रंगा बिल्ला – नेशन एमबुश्ड या त्यांच्या पुस्तकांवर पण नवीन वेबसीरिज तयार होत आहेत. या सर्व 2024 दरम्यान प्रसारित होतील. संजय सिंह यांनी मुंबई विद्यापीठातून पीएचडी केलीय. शिवाय ते कायदा स्नातक आहेत. शैक्षणिक क्षेत्रातही ते महत्वाचं योगदान देत असतात.

(लेखक  हे पश्चिम रेल्वेचे निवृत्त जनसंपर्क अधिकारी आहेत)

- Advertisment -