घरफिचर्समायमहानगर ब्लॉगविद्याधर गोखले : जणू एक इंद्रधनुष्य

विद्याधर गोखले : जणू एक इंद्रधनुष्य

Subscribe

अण्णा हे एक जणू इंद्रधनुष्य होतं... लोभस विविध रंगांनी नटलेलं, आकाशभर विस्तीर्ण व्याप्ती असलेलं! रिमझिम सरी आणि तळपतं ऊन यांच्या संगमावर उभारलेला जणू सप्तसोपान!

© प्रमोद वसंत बापट

२६ सप्टेंबरचा दिवस नुकताच गेला. विद्याधर गोखले यांचा तो स्मृतिदिवस.

- Advertisement -

मनात येत होतं आपण काहीतरी लिहूया एखादी आठवण नोंदवूया पण दुसऱ्या मनानं याला नकार दिला मनात आलं की हे वर्ष जन्मशताब्दीच आहे आणि स्मृतिदिन हा मृत्यूचीच परत आठवण करून देतो आणि मग सहवासात मिळालेल्या अपार सुखाचे क्षण थोडे मागे राहतात आणि केवळ वियोगाचे दुःख ठसठसत राहतं. अशी नकाराची कडी घातलेला तो दिवस तर अस्तंगत झाला. पण त्या दिवसावर तर अण्णांच्याच आठवणींचा उजेड होता. वाराही तोच होता आणि रंग, गंधही अण्णांच्या स्मृतींचाच होता.

पुढचा (२७) नवा दिवस तर उगवला परंतु कालच्या दिवसाचे तेच सर्व रंग, गंध, उजेड, वारा यांचे ठसे घेऊन. खरंतर काल थोडीशी वाट मिळाली होती आकाशवाणीच्या सौजन्याने ‘साहित्यिक विद्याधर गोखले’ या विषयावर एक लघू भाषण करण्याची संधी काल मिळाली. पण मनाला शांतवा काही मिळाला नसावा.

- Advertisement -

खरंतर बोलणं आणि लिहिणं या दोन्हीही व्यक्त होण्याच्या दोन तऱ्हा. पण कदाचित मोकळं होण्याची प्रतवारी कमी अधिक असावी. बोलण्यात मुक्त होण्याची अनावर उर्मी असावी तर लिहिण्यात मुरत मुरत जात साकारणारा उन्मेष असावा. संगती, संदर्भ यांना सुरगाठी सोडून सैल सोडत व्यक्त झालेली उत्कटता हेच भाषणाचे भूषण असावं तर सुविहित गोळीबंद मांडणी हे लेखनाचे लक्षण असावं. संथ पाण्याच्या काचेवर काठ चित्रित व्हावा तशा उत्कटतेनं अंतरीचं सारं सारं बोलण्यातून दिसत रहावं आणि लेखन मात्र घोडीवरती फलक असावा आणि दृश्यातून हवं तेवढं… जसं कलावंताने रेखाटत जावं तसं..

कधीतरी हे सारं तपासून पाहायला हवं. म्हणजे एकच वर्ण्य विषय वक्त्याच्या भाषणातून आणि त्याच्याच लेखनातून अभ्यासायला हवा. म्हणजे केवळ रूपबंधच नव्हे तर प्रत्यक्ष माध्यमातील बदल आशयावर किती आणि कसा परिणाम करतो हे बघणं रोचक होईल. असो..

कोणाच्याही जन्मशताब्दी वर्षकालात येणाऱ्या स्मृतिदिनाला काय करावे? काय बोलावे? काय सांगावे..मांडावे? हे मला नेहमीच कोड्यात टाकत असते. कारण जन्मशताब्दी साजरी केली जाते ती त्या व्यक्तीचं पूर्ण जीवन, पूर्ण जीवितकार्य पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी, त्याला उजाळा मिळावा यासाठी आणि ते तसे करताना दिनचक्रात येणारा स्मृतिदिन मात्र वियोगाचं सावट घेऊनच येतो. तो केवळ वियोग सांगतो, अखेरचे दिवस सांगतो, अखेर सांगतो, अगतिकता सांगतो… कधी त्या दिवंगताची तर कधी त्याच्या भोवताली असलेल्या आप्तजनांची. पण या साऱ्याची जन्मशताब्दी वर्षात समयोचितता काय? औचित्य काय? हे मात्र समजत नाही. म्हणून ते दिवसाचं पान कोरंच सुटावं असं वाटत राहतं.

त्यामुळे आकाशवाणीवर बोलूनही आज मला अण्णांवर चार शब्द लिहावेसे वाटत आहेत हे मात्र खरं. तेच आज लिहायला बसलो.

विद्याधर गोखल्यांना अनेकदा भेटण्याचं, त्यांच्याशी बोलण्याचं भाग्य मिळालेला मी. त्या भेटीत, संवादात त्यांना जवळचे, वडिलधारे अशाच रूपात अनुभवत राहिलो आणि म्हणूनच त्यांना ‘अण्णा’ अशी अगदी घरगुती हाक मारण्याचं भाग्यही मला जवळपास दशकभर लाभलं. त्यामुळे आत्ताही लिहिताना केवळ अण्णा वा गोखलेअण्णा असंच लिहिलं जाईल.

अण्णा हे एक जणू इंद्रधनुष्य होतं… लोभस विविध रंगांनी नटलेलं, आकाशभर विस्तीर्ण व्याप्ती असलेलं! रिमझिम सरी आणि तळपतं ऊन यांच्या संगमावर उभारलेला जणू सप्तसोपान!

अशा अण्णांविषयी रोज एक टिपण लिहावं असं मनात आहे.

हे काम सोपंही आणि कर्मकठीणसुद्धा. कोणतीही एक रंगधारा निवडावी आणि त्यासंबंधीचं स्मरण गुंफावं… पण आरंभ कुठून करावा.. हा पेच.

इथे अण्णांचेच शब्द आठवतात. ‘सुवर्णतुला’ या अण्णांच्या अगदी आरंभीच्या नाटकातला एक प्रसंग आठवला. देवर्षी नारद सत्यभामेच्या महाली आलेले आहेत आणि श्रीकृष्णावर रुष्ट झालेल्या सत्यभामेची समजूत काढताना थोर पुरुषांच्या मनाचा थांग लागणं कसं कठीण असतं हे सांगताहेत. तिथे देवर्षींच्या मुखी अण्णांनी एक दिंडी लिहिली आहे.

दिंडी म्हणजे कवितेचे वृत्त. संगीत नाटकात अशा अनेक पारंपरिक वृत्तांचा उपयोग केलेला असतो. त्याची एक पारंपरिक चालही आहे जी आपण हरिदासबुवांकडून कीर्तनात ऐकली असेल. पण रंगभूमीवरच्या अत्यंत प्रतिभावान अशा कलावंतांनी त्या दिंडीच्या पदांना वेगळ्या वेधक चालीही दिल्या आहेत. अण्णासाहेब किर्लोस्करांच्या काळात तर बाळकोबा नाटेकर, मोरोबा वाघोलीकर असे अत्यंत प्रतिभावान कलावंत भूमिका करीत असत आणि त्यांच्या प्रयोगाच्या आधी रंगमंदिराच्या बाहेर असे फलकही लागत की “आज बाळकोबा आणि मोरोबा नव्या चालीमध्ये साक्या (साकी हाही एक वृत्तबंध )आणि दिंडीची पदे गाणार आहेत”.

अशा दिंड्यांच्या वेगळ्या चालीची काही उदाहरणे अत्यंत लोकप्रिय आहेत. ‘ बहुत दिन नच भेटलो सुंदरीला’ ( सौभद्र), ‘जेथ मित्रा तत्त्वार्थ पहायाला’ ( मृच्छकटिक) किंवा आधुनिक काळातील ‘मत्स्यगंधा’ नाटकातील ‘नको विसरु संकेत मीलनाचा’.

नाट्याचार्य देवलांनी ‘ संगीत शारदा’ नाटकात कोदंडाच्या मुखात तत्कालीन ब्रिटिश राजवटीचा निषेध करणारं पद दिंडी वृत्तातच लिहिलं होतं. त्याचे शब्द होते “अन्यधर्मी भूपाल आर्यभूचा । आर्यधर्मा अनुकूल नसायाचा ॥”. असो…

बरंच विषयांतर झालं. अर्थात दिंडीच ती…. बारा गावांना वळसा घालूनच येणार. पण आता मात्र तिला विषयाच्या पंढरीला नेऊया.

तर गोखलेअण्णांनी देवर्षी नारदांच्या मुखात घातलेल्या दिंडीचे शब्द होते :
“गहन सागर जल विपुल संपदेला

न ये गणिता कधि अबल मानवाला l

तेवि पुरुषोत्तम पुण्य चरितलीला

सहज आकलिता न ये ती कुणाला ll”

देवर्षी नारदांनी वर्णिलेला पेच गोखलेअण्णांविषयी लिहितानाही नेहमी पडतो.
पण इथे ज्याचा पेच पडावा, त्यानेच तो शब्दांकित करावा असं काहीसं घडलं आहे. यातच तिसरं पद जोडलं जातंय. आजच्या संस्मरणाचा विषयही आत्ता हे लिहिता लिहिताच सुचला आहे.

देवर्षी नारद !
संगीत रंगभूमीचे प्रवर्तक अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा ‘सौभद्र’ नाटकातील नारद अजरामर आहे. तसाच आधुनिक संगीत रंगभूमीचा ज्यांनी पुनरुज्जीवन केलं त्या गोखले अण्णांनी आपल्या तीन संगीत नाटकात रंगविलेले देवर्षी नारद असेच वैशिष्ट्यपूर्ण झाले आहेत.

अगदी आरंभीचं ‘संगीत सुवर्णतुला’, त्या पाठोपाठ अत्यंत गाजलेलं ‘जय जय गौरीशंकर’ आणि ‘चमकला ध्रुवाचा तारा’ ही ती तीन संगीत नाटकं.

हिंदी चित्रपटसृष्टीत नारद रंगवताना हास्यरसाला अतिरेकी भरतं आलेलं दिसतं. पण संगीत रंगभूमीने अत्यंत भान ठेवत देवर्षी नारद रंगविलेले दिसतात. ते विश्वाचं मंगल करण्यासाठीच विश्वसंचार करताहेत. जणू तेच त्यांचं निहितकार्य आहे ह्याचं संगीत नाटककारांनी भान ठेवलेलं दिसतं.

संगीत रंगभूमीवरचे नारद कथानकाला गती देताना दिसतील, त्यात थोडी रोचकता आणताना दिसतील परंतु त्यांच्या वीणेला मांगल्याच्या ध्यासगुंजनाचं विस्मरण झालेलं नाही.

गोखलेअण्णांबरोबर त्यांच्या या तीन नारदांविषयी कधीतरी गप्पा झालेल्या आठवतात.

अण्णा म्हणाले होते, “अरे आधुनिक काळात नारदांचे संकीर्तन करण्याचा औचित्याधिकार हा माझाच आहे.”
मी काहीसे चमकूनच अण्णांकडे पाहत राहीलो होतो. कारण अण्णांचा अध्यात्म विषयातला अधिकार मी जाणून होतो. मला अण्णा त्याचसंदर्भात बोलत आहेत असं वाटलं. पण पुढे अण्णा म्हणाले, “कारण मी पत्रकार आहे!”

इथे मात्र मी अधिकच बुचकळ्यात पडलो नारद आणि अध्यात्मविचार ही संगती मला समजण्यासारखी होती. परंतु नारद आणि पत्रकारिता हे मात्र अनाकलनीयच होतं. ते मला अधिक समजून घ्यावसं वाटलं. अण्णांनाही कोणताही विषय पूर्ण करण्यास स्वारस्य असायचंच. मग अण्णांनी नारदस्मृति मधला एक श्लोक सांगितला. ते एकेक ओळ सांगत गेले आणि अर्थ विवरण करीत गेले. आणि त्याचा सामग्र्याने पत्रकारितेशी असलेला संबंध अण्णांनी अत्यंत सुबोध शब्दात मला समजावून सांगितला. हे सारं चकित करून टाकणारं होतं. देवर्षी नारदांनी मांडलेला विचार मोलाचा होताच होता पण अण्णांनी त्याला दिलेला वर्तमानाचा संदर्भ त्या विचाराला अधिक आशयसंपन्न करणारा होता.

त्या श्लोकाचे शब्द मी नंतर लिहून घेतले ते असे होते :
न सा सभा यत्र न संति वृद्धा :
वृद्धा न ते ये न वदन्ति धर्मम् l
ना सौ धर्मो यत्र न सत्यमस्ति
न तत्सत्यम् यच्छलेनानु विद्धम् ll
– नारदस्मृती अध्याय ३ / श्लोक १८
(अर्थ : ती सभा सभाच नाही ज्यांत वृद्ध नाहीत. ते वृद्ध वृद्धच नाहीत जे धर्म बोलत नाहीत. तो धर्म धर्मच नाही जो सत्य नाही. आणि ते सत्य सत्यच नाही जे छलकपटाने भरलेले आहे.)

विद्याधर गोखले अनेक वर्ष पत्रकारिता करीत होते आणि नेमक्या त्याच काळात संगीत नाटकही लिहीत होते. म्हणूनच अण्णा म्हणाले होते की देवर्षी नारद रंगविण्यातील माझ्या अधिकारात औचित्य आहे.

आपल्या जीवनातील कर्माला आपल्या प्राचीन ज्ञानभांडारातून मूल्यांचे कोंदण देणारी गोखलेअण्णांसारखी व्यक्तिमत्व त्या मूल्यविचाराची आणि त्याच्या प्रकाशात चालणाऱ्या जीवनाची जीवंत उदाहरणे असतात. म्हणूनच त्यांचं स्मरण अधेमधे करीत राहणं समाजहिताचं असतं.

परंपरेने पितरांचं अर्थात पूर्वजांचं, पूर्वसूरींचं असं स्मरण करण्याचा कालावधी आजपासूनच सुरू होत आहे. जन्मशताब्दीच्या काळातील या श्रद्धा पंधरवड्यात विद्याधर गोखले यांना हे स्मृतीतर्पण समर्पित…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -