घरफिचर्सरणजीतील नवा ट्रेंड नागपुरातही कायम राहणार?

रणजीतील नवा ट्रेंड नागपुरातही कायम राहणार?

Subscribe

रणजी स्पर्धेत अलीकडे नवा ट्रेंड दिसून येत आहे. गेल्या २ वर्षांत २ नवे विजेते ठरले. इंदूरच्या होळकर स्टेडीयमवर २ वर्षांपूर्वी गुजरातने मुंबईला नमवून रणजी करंडक पटकावला, तर गेल्यावर्षी नूतन वर्षादिनी विदर्भाने दिल्लीला हरवून प्रथमच रणजी करंडक हस्तगत केला. रविवारपासून नागपूरच्या व्ही.सी.ए स्टेडियमवर गतवेळचा विजेता यजमान विदर्भ संघ आणि सौराष्ट्र यांच्यात अंतिम झुंज रंगेल. गेल्यावर्षी रणजी, इराणी चषक पटकावून विदर्भ क्रिकेट असोसिएशनने हीरक महोत्सव दणक्यात साजरा केला. यंदाही रणजी करंडक आपल्याकडेच राखण्याचा विदर्भाचा प्रयत्न असेल.

फैझ फझलच्या वैदर्भीय संघात उमेश यादव, रजनीश गुरबानी, यश ठाकूर या तेज त्रिकुटासह आदित्य सरवटे, अक्षय वानखेडे या हरहुन्नरी गोलंदाजांप्रमाणे डावखुरा युवा फलंदाज अथर्व तायडे, यष्टीरक्षक अक्षय वाडकर या खेळाडूंचा समावेश आहे, परंतु विदर्भाची मदार असेल ती बुजुर्ग वसीम जाफरवर. ४० वर्षीय जाफरची जिद्द तसेच फिटनेस वाखाणण्याजोगाच. चाळीशी पार करणार्‍या सदाबहार वसीमची धावांची भूक दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यंदाच्या मोसमात वसीमने हजार धावांचा टप्पा पार करताना एक द्विशतक तसेच तीन शतके झळकावली. रणजी स्पर्धेच्या मोसमात १००० धावांचा टप्पा दोनदा पार करण्याची किमया त्याने केली आहे. नवोदित युवा खेळाडूंनी वसीमचा आदर्श ठेवल्यास त्यांचीही कारकिर्द बहरू शकेल. विदर्भातील खेळाडूंना वसीमच्या रूपाने रोल मॉडेल गवसला आहे.

- Advertisement -

चंदू पंडित यांचे मार्गदर्शन, वसीम जाफरचा अनुभव या विदर्भाच्या जमेच्या बाजू. या दोन माजी बुजुर्ग मुंबईकरांमुळे विदर्भाच्या जेतेपद आपल्याकडेच राखण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, परंतु चंदूसारख्या चलाख प्रशिक्षकाला सौराष्ट्राच्या आणि त्यातही खासकरून चेतेश्वर पुजारा, जयदेव उनाडकट यांच्या खेळाची निश्चितच माहिती आहे. त्यांचे कच्चे दुवे चंदूच्या चाणाक्ष नजरेतून सुटणे कठीणच आहे. अंतिम फेरीत सार्‍यांच्या नजरा असतील त्या चेतेश्वर पुजारावर. ऑस्ट्रेलियन दौर्‍यात सातत्यपूर्ण खेळ करणार्‍या पुजाराच्या समावेशामुळे सौराष्ट्राची फलंदाजी मजबूत झाली असून, त्याचे प्रत्यंतर रणजीच्या उपांत्यपूर्व, उपांत्य फेरीत आले. उपांत्यपूर्व फेरीत लखनौमध्ये यजमान उत्तर प्रदेशविरुध्द १७७ धावांच्या पिछाडीनंतर सौराष्ट्राने सामना फिरवला. चौथ्या डावात ३७२ धावांचे विक्रमी आव्हान सौराष्ट्राने पार केले ते चेतेश्वर पुजारा आणि शेल्डन जॅक्सनच्या नाबाद शतकी भागीदारीमुळे. त्याआधी १९ वर्षीय हार्विक देसाई-स्नेल पटेल या बिनीच्या जोडीने शतकी सलामी देत सौराष्ट्राच्या विजयाचा पाया रचला. त्यावर कळस चढवला तो पुजारा, जॅक्सन या जोडीने. या दोघांनी चिन्नास्वामी स्टेडियमवर द्विशतकी भागीदारी रचून यजमान कर्नाटकाचे २७९ धावांचे खडतर आव्हान परतवून लावले आणि त्यामुळे सौराष्ट्राने अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरी गाठण्याची ही त्यांची तिसरी खेप आहे. तिसर्‍या प्रयत्नात तरी जयदेव उनाडकट आणि त्याचे सहकारी, तसेच प्रशिक्षक सितांशु कोटक यांचे स्वप्न साकार होते का ते बघायचे. १९३६-३७ च्या मोसमात नवानगरने (यात सौराष्ट्राचा काही भाग होता) रणजी स्पर्धेत जेतेपद पटकावले होते ही बाबही येथे नमूद करायला हवी.

रणजीमध्ये डीआरएसचा वापर हवा !

कर्नाटक आणि सौराष्ट्र यांच्यातील उपांत्य फेरीच्या लढतीत पंचांचे बरेचसे निर्णय वादग्रस्त ठरले. चेतेश्वर पुजारासारख्या खंद्या फलंदाजाला एकदा नवे तर दोनदा पंचांच्या निर्णयामुळे जीवदान लाभले. यावरून मैदानात तसेच मैदानाबाहेरही वादंग माजले. रणजीसारख्या प्रतिष्ठित राष्ट्रीय स्पर्धेच्या बाद फेरीत तरी डीआरएस (डिसिजन रिव्युव्ह सिस्टम) पद्धतीचा अवलंब का करण्यात येत नाही, हे एक न उलगडणारे कोडे आहे. बीसीसीआयने निदान पुढच्या मोसमपासून तरी याबाबत पावले उचलायला हवीत, जेणेकरून चिन्नास्वामी स्टेडियमसारखे कटू प्रसंग टळतील.

- Advertisement -

-शरद कद्रेकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -