घरफिचर्सलोकहितवादी उद्योजक

लोकहितवादी उद्योजक

Subscribe

सर दोराबजी जमशेटजी टाटा : (२७ ऑगस्ट १८५९–३ जून १९३२). जमशेटजींचे ज्येष्ठ पुत्र. जन्म मुंबईस. वयाच्या सोळाव्या वर्षीच ते यूरोपात शिक्षणासाठी गेले. १८७६ मध्ये स्वदेशी परतल्यावर मुंबईच्या सेंट झेवियर महाविद्यालयातून ते बी.ए. झाले (१८८२). लहानपणापासून त्यांचा खेळाकडे, विशेषतः क्रिकेटकडे, विशेष ओढा होता. मर्दानी खेळांच्या आवडीमुळे मुंबईत अनेक व्यायामसंस्था सुरू करण्यात त्यांचा वाटा होता. वडिलांच्या कापसाच्या धंद्याचा विस्तार करून त्यांनी त्याच्या शाखा जगातील प्रमुख शहरांतून उघडल्या. टाटा लोखंड व पोलाद कारखाना, जमशेटपूर बंगलोरची भारतीय विज्ञान संस्था व लोणावळा येथील टाटा इलेक्ट्रिक कंपनीज या कंपन्यांच्या उभारणींमध्ये दोराबजींचा पुढाकार होता.

स्त्रीशिक्षणार्थही त्यांनी आर्थिक साहाय्य केले. १९१० साली त्यांना ब्रिटिश सरकारकडून ‘सर’ हा किताब मिळाला. १९१५ मध्ये भारतीय औद्योगिक परिषदेचे ते अध्यक्ष, तर १९१८ मध्ये नेमलेल्या भारतीय औद्योगिक आयोगाचे ते एक सभासद होते. दोराबजींनी भारताचे औद्योगिकीकरण साधण्याच्या दृष्टीने वडिलांनी सुचविलेल्या अनेक योजनांना मूर्त रूप दिले, त्याचबरोबर समाजसेवेचेही व्रत अखंडपणे चालविले. मेहेरबाई ह्या आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी तिच्या स्मरणार्थ लेडी टाटा मेमोरियल ट्रस्ट स्थापन केला (१९३२). त्याचा उद्देश रक्तार्बुदविषयक रोगासंबंधी अधिक संशोधन व साहाय्य करणे हा होता. शिक्षणाविषयी दोराबजींचा उदार दृष्टिकोन होता आणि अभियांत्रिकी व वैद्यकीय संशोधन यांमध्ये तर यांना अधिक रस होता. १९२० मध्ये त्यांनी केंब्रिज विद्यापीठास अभियांत्रिकी विभागातील प्रयोगशाळांच्या साधनसामग्रीसाठी २०,००० पौंडांची देणगी दिली. आयुष्याच्या अखेरीस दोराबजींनी आपली सारी संपत्ती आपल्या नावाने उभारलेल्या न्यासास सार्वजनिक कार्यार्थ दिली. १९४५ मध्ये सर दोराबजी टाटा ट्रस्टजवळ सु. २० लक्ष पौंड रक्कम होती तीपैकी सु. आठ लक्ष पौंड रक्कम विविध दानकार्ये व टाटा मेमोरियल (कॅन्सर) हॉस्पिटल, टाटा समाजविज्ञान संस्था, टाटा मौलिक संशोधन संस्था इत्यादींसाठी खर्च करण्यात आली. एप्रिल १९३२ मध्ये दोराबजी धंद्यानिमित्त यूरोपला गेले. किसिंगन (प. जर्मनी) येथे त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव अवशेष इंग्लंडला नेण्यात येऊन ब्रुकबुड येथील पारशी कबरस्तानात आपल्या दिवंगत पत्नीशेजारी त्यांचे दफन करण्यात आले.

- Advertisement -

सर दोराबजी टाटा ट्रस्टचे कार्य : नैसर्गिक आपत्ती व अरिष्टे यांपासून संरक्षण, ज्ञानाच्या सर्व शाखांतील, विशेषतः वैद्यकीय व औद्योगिक-विज्ञानविषयक शाखांतील संशोधनास साहाय्य आणि शिक्षणसंस्थांना मदत व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या, असे या न्यासाचे प्रधान हेतू आहेत. न्यासाचे साहाय्य जात, धर्म, पंथ, प्रांतनिरपेक्ष असे असते. हा न्यास सर्व टाटा न्यासांमध्ये मोठा असून, राष्ट्रीय महत्त्वाच्या नव्या संस्थांची स्थापना करणे व काही एक काळानंतर त्या संस्था राष्ट्राला अर्पण करणे, हे पहिल्यापासून चालत आलेले तत्त्व ह्या न्यासानेही पाळले आहे. स्थापनेपासून आतापर्यंत या नासाने सु. ६·२८ कोटी रुपयांचा विनियोग केला आहे. या न्यासाने खालील संस्था उभारल्या : (१) टाटा मेमोरियल सेंटर : यामध्ये ‘टाटा मेमोरियल हॉस्पिटल’ व ‘भारतीय कर्करोग संशोधन केंद्र’ या दोन संस्था येतात. कर्करोगावरील संशोधन आणि उपचार यांसाठी १९४१ मध्ये ३० लक्ष रु. खर्चून मुंबई येथे हॉस्पिटल उभारण्यात आले. १९५७ मध्ये हे हॉस्पिटल राष्ट्राला अर्पण करण्यात आले असले, तरी त्याच्या व्यवस्थापनामध्ये या न्यासाचे सहकार्य असते. (२) टाटा सामाजिक विज्ञान संस्था : (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस) : सामाजिक कार्यकर्त्यांना प्रगत प्रशिक्षण देणारी भारतातील एक प्रवर्तक संस्था. कामगार कल्याण व औद्योगिक संबंध, आदिवासी कल्याण आणि नागरी समूह विकास यांसारख्या सामाजिक विज्ञानांतर्गत उपशाखांचे शिक्षण देत असतानाच, विद्यार्थ्यांना संस्थेने चालविलेल्या ग्रामीण व नागरी कल्याणकेंद्रांमध्ये क्षेत्राभ्यास करण्याची संधी मिळते. (३) अणुकेंद्रीय विज्ञान व गणित यांच्या प्रगत अभ्यासाचे व मौलिक संशोधनाचे राष्ट्रीय केंद्र म्हणून ही संस्था ओळखली जाऊ लागली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -