घरफिचर्ससारांशस्वप्नांच्या राखेतून चालणारा शिक्षक!

स्वप्नांच्या राखेतून चालणारा शिक्षक!

Subscribe

शिक्षक ही अशी व्यक्ती असते की, जी आपल्या विद्यार्थ्यांना जीवनात येणार्‍या कठीण प्रसंगांना धीटाईने सामोरे जाण्यासाठी संघर्ष करायला शिकवते, पण शिक्षक हासुद्धा एक माणूसच असतो, त्याच्या जीवनातही त्याला संघर्ष करावा लागत असतो. कितीही कठीण परिस्थिती आली तरी विद्यार्थ्यांना घडविणारा शिक्षकी पेशा आपण कधीही सोडायचा नाही, असा निर्धार केलेले रवींद्र चव्हाण यांनी आपल्या ‘संघर्ष’ या आत्मचरित्रात स्वत:च्या जीवनाची वाटचाल चित्रित केली आहे. आपण पाहिलेल्या स्वप्नांची राख झाली तरी त्यातून मार्गक्रमण करत राहण्याची प्रेरणा हे पुस्तक वाचताना मिळते.

-जयवंत राणे

जिथे स्वप्नांंची राख होते, खरी तिथूनच पुढे संघर्षाची सुरुवात होते, अशा मुखपृष्ठावरील जळजळीत ओळींनी सुरुवात होते रवींद्र शांताराम चव्हाण यांच्या ‘संघर्ष’ या आत्मचरित्राची. शिक्षक या व्यक्तिविषयी विद्यार्थ्यांसोबतच समाजाच्या मनातही खूप आदर असतो. शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना हात गाळून न बसता जीवनात येणार्‍या समस्यांना सामोरे जाण्यासाठी संघर्ष करायला शिकवत असतात.

- Advertisement -

अगदी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतही शिक्षकांची भूमिका आणि योगदान महत्त्वाचे ठरले आहे, पण शिक्षक हा एक माणूस असतो. त्याच्याही जीवनात अनेक समस्या येत असतात. जेव्हा अशा समस्या पावलोपावली येतात तेव्हा त्या केवळ पावलांना नाही, तर मनालाही टोचत राहतात. त्यातून ज्या भावना आणि वेदना निर्माण होतात त्या रवींद्र चव्हाण यांनी आपल्या शब्दांतून व्यक्त केल्या आहेत. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पाटपन्हाळे या गावी चव्हाण सरांचा १३ जुलै १९५१ साली जन्म झाला. गाव निसर्गरम्य होते, पण घरातील आर्थिक परिस्थिती कठीण होती.

तरीही अंगभूत हुशारीने सरांनी सातवीपर्यंतचे शिक्षण आपल्या गावी पूर्ण केले, पण पुढे पुन्हा आर्थिक अडचणीमुळे शिक्षण थांबवावे लागले. सर आणि त्यांची भावंडे यांनी शेतीवरील कामे केली तसेच गावाशेजारी धरण बांधण्याचे काम सुरू होते तिथेही काम केले. त्यानंतर त्यांचे भाऊ विनायक त्यांना पुढील शिक्षणासाठी मुंबईला घेऊन आले. एका गजबजलेल्या चाळीत त्यांचे पुढील जीवन सुरू झाले. तिथे त्यांनी रात्रशाळेत पुढील शिक्षण सुरू केले. दिवसा त्यांनी अगदी पोस्टमन म्हणून तसेच इतरही कामे केली. बालपणीचा काळ सुखाचा, असे म्हटले जाते, पण माझे बालपण हे काही सुखाचे नव्हते, असे चव्हाण सर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

महाविद्यालयीन शिक्षण झाल्यावर पुढे काय करावे याचा विचार सुरू झाला. अनेक अडचणींचा सामना करीत घेतलेले शिक्षण सरांना आठवत होते. त्यामुळे आपणही पुुढे शिक्षकच व्हावे आणि समाजासाठी चांगले नागरिक घडवावेत, तेच आपले समाजासाठी योग्य योगदान असेल असे सरांना वाटू लागल्यामुळे त्यांनी पुढे शिक्षक होण्याचे निश्चित केले. अशा मनस्थितीत असताना त्यांनी एका वर्तमानपत्रात लोणावळा येथील गुरुकुलमध्ये शिक्षक भरती असल्याची जाहिरात पाहिली. त्यानंतर सरांनी नोकरीसाठी अर्ज पाठवला. गुरुकुलचे संस्थापक ग. ल. चंदावरकर उर्फ दादा यांनी सरांना मुलाखतीला प्रार्थना समाजाच्या गिरगाव येथील कार्यालयात बोलावले. तिथे सरांची निवड झाली. त्यानंतर सर लोणावळ्याला गेले.

तिथे दादा आले होते. त्यांनी चव्हाण सरांचा माननीय वसुंधरा चंदावरकर, दीपक गंगोळी, कल्याणी गंगोळी यांच्याशी परिचय करून दिला. दादांनी सरांना कार्यालयात बोलावून गुरुकुल वसतिगृहामध्ये हाऊसकिपर म्हणजेच पर्यवेक्षक शिक्षक या पदाचे नियुक्तीपत्र दिले. तिथून सरांच्या गुरुकुलमधील कारकिर्दीला सुरुवात झाली. तिथे सीनियर असलेले म्हसकर भाऊ सर भेटले. चंद्रधर बटुकदयाल राय, अरण्य सर भेटले. सुरुवातीला सरांकडे लहान मुलांची जबाबदारी देण्यात आली. त्यांना सकाळी उठवणे, त्यांना सहा वाजता शारीरिक कवायतीसाठी मैदानात घेऊन जाणे, सकाळचा नाश्ता, अंघोळ, त्यानंतर प्रार्थना, जेवण.

त्यानंतर त्या मुलांना वसतिगृहातील आवारात असलेल्या शाळेत सोडणे, मुले संध्याकाळी शाळेतून आली की त्यांना खेळासाठी मैदानात नेणे, त्यानंतर संध्याकाळची प्रार्थना आणि त्यानंतर जेवण, अभ्यास आणि झोपी जाणे. वसतिगृहात असल्यामुळे मुलांना घरची खूप आठवण येत असे. अशा वेळी त्या मुलांना मानसिक आधार देणे, त्यांना हळूवारपणे समजावणे असे कामाचे स्वरूप होते. पुढे इयत्ता वाढत गेल्या, पण सर जोपर्यंत गुरुकुल वसतिगृहात होते तोपर्यंत त्यांचे असेच काम होते. जितक्या व्यक्ती तितके वेगळे स्वभाव असतात. त्यामुळे विविध प्रकारच्या मुलांना वेगवेगळ्या प्रकारे हाताळावे लागे. कधी प्रेमाने तर कधी दमाने, पण सगळ्याच्या मुळाशी विद्यार्थ्यांचे कल्याण हाच हेतू होता.

गुरुकुल वसतिगृहातील मुले, त्यांना भेटायला येणारे त्यांचे पालक, गुरुकुलमधील सरांचे सहकारी शिक्षक यांच्याविषयी विविध अनुभव सरांनी लिहिले आहेत. ते मुळातून वाचण्यासारखे आहेत. सरांना वाचनाची आवड असल्यामुळे अतिशय तरल भाषेत त्यांचे अनुभव बोलक्या शब्दांत उतरले आहेत. जवळच्या सहकार्‍यांचे आणि नातेवाईकांचे अचानक होणारे मृत्यू आणि त्यामुळे सरांना आलेले प्रचंड एकाकीपण याविषयी वाचताना आपलेही डोळे पाणावतात.

‘आईच्या मायेने मुले वळणावर येत नसतील तर बापाला कठोर व्हावे लागते. बाप वेळप्रसंगी शासनही करतो, पण बापालाही काळीज असते,’ असे अनेक विचार सरांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहेत. ते त्यांच्या आत्मानुभवातून आलेले आहेत. ते वाचताना आपणही थांबून विचार करायला लागतो. मुलांना घडवताना प्रथम शिस्त, मग मूल्यांचे घट्ट रोपण करून संस्कार आणि त्यानंतर सर्वांगीण शिक्षण या त्रिसूत्रीचा सर्जनशीलतेने वापर करावा लागतो, असे सर म्हणतात. भावी पालक आणि शिक्षकांना या पुस्तकातून बहुमूल्य मार्गदर्शन मिळते.

गुरुकुलमध्ये विद्यार्थी घडविण्याचे कार्य १५ वर्षे केल्यानंतर सरांना मुंबईची ओढ लागली. त्यामुळे सर मुंबईला आले, पण पुढे पुन्हा काय करायचे हा प्रश्न होता. त्यावेळी सुरुवातीचे काही दिवस चव्हाण सर आणि त्यांची पत्नी मयुराबाई कळवा येथे सरांच्या भाऊ-बहिणीच्या घरी राहिले. सरांनी गुरुकुल सोडले तरी गुरुकुलमधील विद्यार्थ्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते कायम राहिले. आज वयाची सत्तरी पार केल्यावरही तोच आपलेपणा तसाच टिकून आहे, याचा प्रत्यय त्यांच्या आत्मचरित्रातून पानोपानी येतो. मुंबईत दिवस फार कठीण होते. सरांच्या पत्नी मयुराबाई एका गॅस कार्यालयात कामाला लागल्या.

सरांचा मुलगा रोहन लहान होता. तो शाळेत जात होता. त्याचवेळी अचानक मयुराबाईंना कामावर येऊ नका म्हणून सांगितले गेले. त्यांनी खूप विनवणी केली, पण काही उपयोग झाला नाही. सरांना जोगेश्वरीतील मंचरजी नौरोजी बनाजी अंध उद्योग केंद्र या संस्थेत नोकरी मिळाली. मुले अंध असल्यामुळे त्यांची फार काळजी घ्यावी लागत असे. सरांच्या प्रेमळ वागणुकीमुळे त्या अंध मुलांना सरांचा लळा लागला. त्यांना उत्तम शिक्षण देऊन त्यांचे जीवन संस्कार आणि प्रेमाने प्रकाशित करण्याचे कार्य सरांनी १८ वर्षे केले. त्यानंतर सरांनी वरळी येथील थेल्मा जे. आर. डी. टाटा आनंद केंद्र या अनाथ मुलांच्या आश्रमामध्ये अधीक्षक म्हणून ४ वर्षे काम केले.

या आत्मचरित्रात चव्हाण सर यांचे सहकारी शिक्षक जयवंत माळवदकर, शाम सातदिवे यांनी सरांविषयी विविध आठवणी सांगून एक मित्र आणि मार्गदर्शक म्हणून त्यांच्या जीवनातील महत्त्व विशद केले आहे. महानगर दिवाणी आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश शिल्पा तोडकर, दै. आपलं महानगरचे पत्रकार जयवंत राणे तसेच नीता लाकूर, जगदिश भोई, नितांत राऊत, संजय भोई, राधिका पवार, अ‍ॅड. सुनील पाटील, मिलिंद कोठावदे या माजी विद्यार्थ्यांनी पुस्तकात आपले मनोगत व्यक्त करताना चव्हाण सरांनी आपल्या घडविले.

त्यामुळे आज आपण जीवनात यशस्वी झालो आहोत, समाजात आम्हाला मानाचे स्थान मिळाले आहे, अशी कृतज्ञता व्यक्त केली आहे. गुरुकुल विद्यालयाच्या अमृत महोत्सवाच्या नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात ‘संघर्ष’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या विक्रीतून जी रक्कम येईल ती अंध, अपंग आणि गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येईल, असे चव्हाण सरांनी जाहीर केले आहे. कल्पक मुखपृष्ठ आणि आकर्षक बांधणी असलेले हे पुस्तक एका शिक्षकाची संघर्षगाथा आहे.

-लेखकाचे नाव – रवींद्र चव्हाण
-प्रकाशक – सत्कार समिती
-मूल्य – १५० रुपये, पृष्ठे – ७५

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -