घरफिचर्ससारांशखान्देशातील जागतिक चित्रकार : केकी मूस

खान्देशातील जागतिक चित्रकार : केकी मूस

Subscribe

प्रतिभा ही वेडाची बहीण असते, हे प्रसिद्ध समीक्षक लोम्ब्रासो याचे वाक्य अनेकदा आपण ऐकले, वाचले असेल किंवा अनेकदा याचा संदर्भही दिला असेल. अनेक कलावंताच्या बाबतीत हे वाक्य तंतोतंत खरेही ठरलेले प्रसंगी आपण पाहतो. अशीच या वाक्याची प्रचिती मला चाळीसगावातील केकी मूस यांच्या कलादालनास भेट देऊन आणि त्यांचे जीवनचरित्र ऐकून आली. या कलावंताची अविचल कलानिष्ठा, चित्रप्रेम, त्यांनी साकारलेले कलाविश्व आणि हो त्यांची अद्भुत जीवन, प्रेमकहाणी पाहिली की याची साक्ष पटते. नियतीने पदरात टाकलेल्या दाहक विरहाचे रूपांतर आपल्या कुंचल्याने, कॅमेर्‍याने प्रकाशाच्या बेटात आणि नक्षत्रांच्या आकाशात निर्माण करणारा हा प्रतिभावंत अवलिया!

-डॉ. अशोक लिंबेकर

केकी मूस हे नाव अनेक वर्षांपासून ऐकलेले, पण त्यांची कलानिर्मिती पाहण्याचा योग आला नव्हता. अलीकडेच तो आला आणि या अवलियाची अद्भुत कहाणी आणि त्याची तितकीच अद्भुत निर्मिती याची देही याची डोळा पाहिली. तीनशेहून अधिक आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळवणारा हा चित्रकार या गावात ५० वर्षे रेल्वे स्टेशनच्या समोर राहत होता. त्याने हे गाव जागतिक नकाशावर झळकवले हे मात्र येथील रहिवाशांना अजूनही माहीत नाही. हा अनुभवही आपल्या कलाविषयक सार्वत्रिक अनास्थेची प्रचिती देणाराच. हा चित्रकार मुळातच प्रसिद्धीपासून अलिप्त राहिलेला.

- Advertisement -

कलंदर वृत्तीचा आणि एकांतात रमणारा. आपली कला ही विकावू अथवा प्रसिद्धीसाठी नाही ही वृत्ती बाळगून त्याने निष्ठेने कलेची उपासना केली. चित्र, शिल्प, छायाचित्र, काष्ठशिल्प, संगीत यांसारख्या अनेक कलांना त्याने आपले जीवन मानले. भारतीय भाषांबरोबरच अनेक जागतिक भाषांचे ज्ञान त्याने संपादन केले. एवढेच नाही तर अव्वल दर्जाची सर्व सुखांनी युक्त अशी व्यापार-उदिमाची संधी नाकारून त्यासाठी कौटुंबिक विरोध पत्करून याने चित्रकलेलाच जीवन ध्येय मानले.

आईच्या आग्रहास्तव हा महानगरातील सर्व सुखे नाकारून आईवडिलांच्या गावी येऊन राहिला. त्यामुळेच या अवलियाची जीवन कहाणी म्हणजे अपूर्व अशा त्यागाची, निष्ठेची गाथाच जणू! ज्ञानदेवांनी एके ठिकाणी म्हटले होते, अलौकिक न व्हावे लोकांप्रति! पण या अवलियाने मात्र लौकिकाकडे पाठ फिरवली. त्याने असे जिणे पत्करले की ज्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. ४८ वर्षे स्वतःला अलग ठेवणे, आपल्या प्रेयसीची अखेरच्या श्वासापर्यंत पाच दशके तशीच उत्सुकतेने वाट पाहणे हे सामान्य माणसाच्या शक्यतेच्या पलीकडेच.

- Advertisement -

मुंबईत जन्मलेल्या आणि आपल्या श्रीमंत मामाच्या मलबार हिलमधील घराचा वारसा विसरून ते चाळीसगावसारख्या गावात तीस-चाळीसच्या दशकात येऊन स्थिरावले. या गावातील चार-पाच हजार चौरस फुटाच्या वडिलोपार्जित जागेतून त्याने अवघ्या विश्वाचे डोळे दिपतील अशी देदीप्यमान छायाचित्रांची निर्मिती केली. आपली स्वत:ची एक फोटो चित्रशैली निर्माण करून तिची अवघ्या जगाला देण देणारा हा मनस्वी कलावंत महाराष्ट्रात होऊन गेला यावर विश्वास तरी बसतो का? पण हो! हे खरे आहे. असा थोर, अवलिया कलावंत म्हणजेच चित्रकार केकी मूस!

केकी मूस यांचे खरे नाव के. कैखुसरू माणिकजी मूस. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९१२ साली मुंबईमध्ये मलबार हिल येथे एका पारशी कुटुंबात झाला. वास्तविक त्यांच्या वडिलांचा जामोद येथील रेल्वे स्टेशनवर सोडा विक्रीचा व्यवसाय होता. नंतर ते चाळीसगाव येथे येऊन स्थिरावले. त्यांची आई लाडाने त्यांना केकी म्हणायची, तर कलाविश्वात ते बाबूजी या नावाने परिचित होते. मुंबई येथील व्ही. टी. स्टेशनचे बांधकाम ज्यांनी केले असे प्रसिद्ध बिल्डर आर. सी. कॉन्ट्रॅक्टर हे त्यांचे मामा. त्यामुळे बालपण ते कॉलेज शिक्षणापर्यंतचा त्यांचा काळ मामाकडे मुंबईलाच गेला. विल्सन कॉलेज येथे त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि नंतर अनेक देशांच्या सांस्कृतिक अभ्यासासाठी परदेशात भ्रमंतीही केली.

भारतात परतल्यानंतर त्यांनी आपल्या आईकडे चाळीसगाव येथे राहण्याचा निर्णय घेतला. हा प्रसंग त्यांच्या जीवनातील टर्निंग पॉईंट ठरला. इथेच खर्‍या अर्थाने त्यांच्या कलाप्रवासाला सुरुवात झाली. विल्सन कॉलेजमधील त्यांची मैत्रीण निलोफर मोदी त्यांच्या आयुष्यातील अत्यंत हळवे वळण. चाळीसगावला येताना निलोफरने त्यांना त्यांच्यासोबत येण्याचे वचन दिले. अगदी तुझ्या मागून पंजाब मेलने येतेच, असे तिचे आश्वासन घेऊन केकीने चाळीसगावकडे प्रयाण केले, परंतु दुर्दैवाने त्यांची आणि निलोफरची ही भेट शेवटचीच ठरली. कारण घरातल्या विरोधामुळे म्हणा अगर अन्य कारणामुळे निलोफर कधीच त्यांच्या मागून आली नाही.

केकीने त्या दिवशी निलोफरच्या स्वागताची तयारी केली, पण निलोफर आली नाही. इथून पुढे दररोज अगदी अखेरच्या क्षणापर्यंत केकी दररोज रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान येणार्‍या पंजाब मेलकडे डोळे लावून आणि आपल्या घरातील दिवे उजळून तिची वाट पाहत बसायचे. पंजाब मेल गेल्यावरच ते रात्रीचे जेवण करीत आणि नंतर डोळ्यांतील आसवांबरोबरच सुरू होई तो सतारीच्या विरही स्वरांचा गहिरा माहोल. हे प्रेम केकी अखेरच्या क्षणापर्यंत विसरले नाहीत. त्यांच्यासाठी काळ जणू गोठलेलाच. हा विरह, व्यथा, वंचना त्यांनी आपल्या निर्मितीत विसर्जित केली आणि चित्रकलेलाच आपला श्वास आणि ध्यास मानले.

सतत निर्मितीत व्यस्त राहून त्यांनी आपले लौकिक जगणे नाकारले. जगरहाटी विसरून त्यांनी स्वत:ला त्या चतुर्मित अवकाशात बंदिस्त केले. सुरुवातीचे वर्ष-दीड वर्ष त्यांनी काही मित्रांबरोबर परिसरातील निसर्गरम्य स्थळांना भेटी देऊन तेथील सौंदर्य कॅमेर्‍यात कैद केले, परंतु पुढची ५० वर्षे काही अपवाद वगळता त्यांनी स्वत:ला आपल्या घरात क्वारंटाइन केले होते. अहोरात्र कलेची साधना करून हजारो कलाकृतींची निर्मिती त्यांनी केली. शिल्प, चित्र, छायाचित्र, काष्ठशिल्प यांसारख्या कला प्रकारात त्यांनी जागतिक दर्जाची कलानिर्मिती केली. हे पाहून आपण चकित होतो, भारावून जातो.

आपली कला विकावू नाही. या कलाकृती म्हणजे माझी अपत्येच आहेत, ती कुणी विकतात का? ही त्यांची आपल्या कलेप्रति असलेली सच्ची निष्ठा होती. एक सच्चा कलावंत, कलानिष्ठ, एकनिष्ठ प्रियकर याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे केकींचे जीवनचरित्र होय. निलोफरचे पुढे काय झाले अथवा केकीने ५० वर्षे स्वत:ला आत्मकैद का करून घेतले? या गूढगम्य रहस्यांची उकल त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाल्यावरच होईल. त्यांच्या आयुष्यातील अनेक अज्ञात दालने यातून प्रकाशित होतील. हे कलादालन पाहणे म्हणजे दिव्यत्वाची प्रचितीच होती. या कलादालनात खरोखरंच मी आधुनिक भारतीय संस्कृतीचे प्रतीकात्मक रूप पाहत, अनुभवत होतो.

किती चित्रे म्हणून सांगू! सर्वच अद्भुत. प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट अशीच. काश्मिरातील हिवाळी सकाळ असो की शेक्सपियरची झोपडी, बुद्धांचा ध्यानमग्न चेहरा असो की शिव पार्वतीचे ऐक्य सर्वच प्रतीकात्मक. ही चित्रे काही बोलत, सांगत होती. त्या चित्राच्या गहन अर्थापर्यंत जाणे म्हणजे केकीच्या अंतरंगात प्रवेश करणे. या हृदयीचे त्या हृदयी गेल्याशिवाय ही अनुभूती येत नाही. वरवर पाहून ही चित्रे कळत नाहीत. म्हणूनच ही चित्रे खर्‍या अर्थाने नुसता पाहण्याचा विषय नाही, तर तो अनुभवण्याचा विषय आहे असेच मला वाटले.

(क्रमश:)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -