घरफिचर्ससारांश‘अण्णा भाऊ साठे चित्रपट महोत्सव’...शोक्षितांच्या प्रश्नांचा सखोल वेध...

‘अण्णा भाऊ साठे चित्रपट महोत्सव’…शोक्षितांच्या प्रश्नांचा सखोल वेध…

Subscribe

दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णा भाऊ साठे यांनी ३५ कादंबर्‍या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्य, ११ पोवाडे, एक प्रवासवर्णन आणि शेकडो लावण्या, छकडी, गाणी तसेच त्यांच्या कादंबर्‍यांवर आठ चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिनिमित्त पुण्यात दरवर्षी चित्रपट महोत्सव भरवला जातो. यंदा हा महोत्सव ७ व ८ ऑक्टोबर रोजी होतोय. त्यानिमित्ताने घेतलेला हा मागोवा...

–आशिष निनगुरकर

पुण्यात गेल्या सहा वर्षांपासून होत असलेला ‘कॉम्रेड अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ ही एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक पर्वणी म्हणावी लागेल. २०१७ मध्ये या चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली. महाराष्ट्रात सांस्कृतिक जडणघडण करण्याचे काम अनेकांनी केले. त्यापैकी एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व म्हणजे अण्णा भाऊ साठे. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणार्‍या अण्णा भाऊंनी शोक्षितांच्या बाजूने सांस्कृतिक क्षेत्रात ठसा उमटवला. लोकनाट्य जनक, शाहीर, कलावंत-साहित्यिक, दिग्दर्शन अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करून शोषितांच्या प्रति आत्मीयता दाखवली.

- Advertisement -

साहित्यिक म्हणून अण्णा भाऊ साठे अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे होते. त्यांच्या समकालीन अवस्थेत संकुचित झालेल्या मराठी साहित्याला सर्वसमावेशक करण्याचे काम त्यांनी केले. शोषितांच्या जीवन संघर्षाला साहित्यात मानाचे स्थान देऊन साहित्याचे मापदंड बदलून मराठी साहित्य प्रभावी व समृद्ध केले. त्यांनी लिहिलेल्या अनेक कथा, कादंबर्‍यांतून वास्तववादी चित्रण आजही काळाशी सुसंगत वाटणारे व सामाजिक आशय असणारे आहे. अण्णा भाऊ चित्रपटसृष्टीत अग्रणी होते. १९४०च्या दशकात अण्णा भाऊंनी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान दिले आहे. अण्णा भाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हातात डफ घेऊन संयुक्त महाराष्ट्राची चळवळ शाहिरीच्या माध्यमातून जनमानसात पोहचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.

अशा थोर कलावंताच्या नावाने मीडिया सोल्युशन व अण्णा भाऊ साठे चित्रपट महोत्सव समिती यांच्या संयुक्त आयोजनातून व महाराष्ट्र शासनाच्या मदतीने हा चित्रपट महोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडतो. हा फेस्टिव्हल होण्यामागे संस्थापक-अध्यक्ष संदीप ससाणे यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. त्यांच्या कल्पक व धाडसी विचारांना या महोत्सवाच्या निमित्ताने एक वेगळे वलय निर्माण झाले आहे. त्यामुळे स्वतः दिग्दर्शक असलेले संदीप ससाणे उत्तम जाणकार असून त्यांनी या महोत्सवाची एक आगळीवेगळी मांडणी केली आहे. त्यामुळे हा सिनेमा महोत्सव इतर फिल्म फेस्टिव्हलपेक्षा वेगळा व मैलाचा ठरत आहे. हा महोत्सव म्हणूनच सर्वांना आपलासा वाटतो व भावतो.

- Advertisement -

महाराष्ट्रात व देशात जागोजागी अनेक चित्रपट महोत्सव भरतात, पण त्यांच्यात आणि अण्णा भाऊ साठे चित्रपट महोत्सवात सर्वात महत्त्वाचा असा फरक आहे. ग्लोबलायझेशननंतर भारतीय मनोरंजन उद्योगात प्रचंड तांत्रिक विकास झाला, परंतु आशय नष्ट झाला आहे. तो नष्ट झालेला आशय पुरविण्याचे काम या फेस्टिव्हलच्या माध्यमातून होताना दिसत आहे. देश-विदेशातून अनेक वेगवेगळ्या विषयांवरचे लघुपट व माहितीपट या महोत्सवात मोठ्या संख्येने दाखल होतात. बड्या प्रस्थापित चित्रपट महोत्सवांत मोजके अपवाद वगळता आता तशी विश्वासार्हता राहिलेली नाही. त्यामुळे नव्या कलाकार, दिग्दर्शकांसाठी हा महोत्सव एक नवी ऊर्जा देणारा ठरत आहे.

इतर प्रस्थापित महोत्सवांत केवळ चित्रपटांचे सादरीकरण होऊन त्यावरच चर्चा होते, परंतु या महोत्सवात सामाजिक, राजकीय विषयांवर चिंतन केले जाते व त्यावर उपलब्ध झालेल्या प्रश्नांना प्रखर अशी वाचा फोडून त्यावर उपाययोजना शोधण्याचे उत्तम असे काम करते. हे या महोत्सवाचे विशेष वैशिष्ठ्य म्हणावे लागेल. अतुल पेठे, राजकुमार तांगडे, सयाजी शिंदे, उमेश कुलकर्णी, ज्योती सुभाष, सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर, नागराज मंजुळे, मेघराज राजेभोसले, राज काझी, प्रतिमा, विनायक, उमेश कुलकर्णी, हेमांगी कवी, अंकुश मांडेकर व विनायक लष्कर अशा कितीतरी दिग्गजांनी या महोत्सवात याअगोदर हजेरी लावली आहे आणि यावेळीही अनेक मान्यवर कलावंत या महोत्सवाला आवर्जून उपस्थित असणार आहेत. त्यामुळे या महोत्सवाची एक वेगळी उंची नावाप्रमाणेच वाढली आहे. या महोत्सवात पूर्ण लांबीचेही चित्रपट आहेत. त्यामुळे आपण आता लघू म्हणत नाहीत. काही चित्रपट व माहितीपट एक ते दीड तासाचे आहेत.

यंदा या महोत्सवात एकूण ११० लघुपट व माहितीपट आले होते. त्यापैकी दर्जेदार असलेल्या ४० लघुपट व माहितीपटांचे स्क्रिनिंग या वर्षीच्या महोत्सवात होणार आहे आणि त्यावर विवेचनात्मक चिंतन होणार आहे. त्यापैकी दर्जेदार असलेल्या लघुपट व माहितीपट यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. तसेच कलाकार व तंत्रज्ञ यांना वैयक्तिक वेगवेगळी पारितोषिके दिली जाणार आहेत. या महोत्सवातून अण्णा भाऊंच्या सांस्कृतिक योगदानाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. चित्रपट ही सर्व कलांची जननी आहे, असे लेनिन यांनी म्हटले होते व या कलेचे समाज परिवर्तनातील महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित केले होते.

भारतासारख्या जातवर्गीय देशात चित्रपटांसारख्या सामान्य लोकांवर प्रभाव गाजविणार्‍या माध्यमाकडे परिवर्तनवाद्यांनी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन या महोत्सवाने चित्रपट साक्षरतेचा व त्याअनुषंगाने या कलेतील परिवर्तनवादी आशयाला जनतेसमोर आणण्याचे मोठे काम सुरू केले आहे. एखादा महोत्सव पुण्यासारख्या महानगरात भरविणे हे काम ध्येयवेड्या तरुणांशिवाय कोण करू शकतो? संदीप ससाणे यांनी प्रचंड कष्टातून हे अवघड काम साध्य केले आहे. त्यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच.

यंदा सहाव्या अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘रेखा’ दिग्दर्शक शेखर रणखांबे, हा चित्रपट दाखवून होणार आहे. त्यानंतर महोत्सवासाठी निवडलेल्या अनेक दर्जेदार लघुपट व माहितीपटांची विशेष पर्वणी असणार आहे. यातील स्क्रिनिंगसाठी निवडलेला प्रत्येक लघुपट व माहितीपट स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारा असून अनेक महोत्सवांमध्ये पुरस्कारप्राप्त आहे. पुण्यातील राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या स्क्रिनिंग थिएटरमध्ये येत्या ७ आणि ८ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट महोत्सव रंगणार आहे. यावेळी अनेक दिग्गज कलाकार व तंत्रज्ञांची विशेष उपस्थिती असणार आहे.

तुम्हाला देशातील प्रश्न व समस्या जाणून घ्यायच्या असतील तर या फेस्टिव्हलमधून त्याची उकल प्रकर्षाने होते. कारण या महोत्सवात निवडलेले लघुपट व माहितीपट आपले वास्तव प्रश्न अतिशय गंभीररीत्या मांडतात. जणू काही त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करतात. जख्खड झालेल्या मनाला विचाररूपी थप्पड मारण्याचे काम करतात. त्यामुळे पुण्यात दरवर्षी होत असलेला ‘अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ भविष्यकाळाची गरज असून नव्या हरहुन्नरी कलाकार व तंत्रज्ञ यांच्यासाठीचे एक हक्काचे व्यासपीठ आहे. दोन दिवसांचा हा चित्रपट महोत्सव रसिकांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. त्यामुळे या चित्रपट महोत्सवाला आभाळभर शुभेच्छा!

–(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -