घरफिचर्ससारांशआत्मकथनाचा जबराट प्रयोग ‘आत्मपॅम्फ्लेट’....

आत्मकथनाचा जबराट प्रयोग ‘आत्मपॅम्फ्लेट’….

Subscribe

नव्वदच्या दशकातील शाळकरी मुलं, त्यांच्या रोजच्या जगण्याशी जोडलेल्या छोट्या-मोठ्या गोष्टी यांचा संदर्भ घेत त्यांच्या दृष्टिकोनातून एक चांगला विषय नेहमीपेक्षा वेगळ्या चित्रपटीय शैलीत मांडण्याचा प्रयत्न लेखक परेश मोकाशी आणि दिग्दर्शक आशिष बेंडे यांनी ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपटातून केला आहे, म्हणूनच तो प्रचंड भावतो.

— आशिष निनगुरकर

सिनेसृष्टीला नेहमीच वेगळ्या धाटणीचे, विचारांचे चित्रपट देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अतिशय सरळ, साधा विषय अतिशय रंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडण्याचे कसब परेश मोकाशी यांच्याकडे आहे, म्हणूनच त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षक विशेष पसंती देतात. नुकताच प्रदर्शित झालेला ‘आत्मपॅम्फ्लेट’ हासुद्धा याच पठडीतील चित्रपट आहे. डार्क कॉमेडी असणार्‍या या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमात वास्तव चित्रणाबरोबर विचित्र निवेदन आणि अतिशयोक्ती विनोदाची फोडणी देण्यात आली आहे.

- Advertisement -

म्हणूनच ही नेहमीची शालेय प्रेमाची गोष्ट राहत नाही, तर त्यापलीकडे जाऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरची मोठी घटना होते. पुढे तर ती त्याही पलीकडे जाते. अशी खमंग फोडणी झी स्टुडिओजला नेहमीच आवडत आली आहे. गुलशन कुमार, टी. सिरीज फिल्म्स, कलर यल्लो प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओज प्रस्तुत, मयसभा करमणूक मंडळी निर्मित या चित्रपटाचे भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल. राय, कनुप्रिया ए. अय्यर मधुगंधा कुलकर्णी आणि झी स्टुडिओज निर्माते आहेत.

‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपटाच्या निमित्ताने प्रसिद्ध दिग्दर्शक परेश मोकाशी हे लेखकाच्या भूमिकेतून, तर आशिष बेंडे हे दिग्दर्शकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. यातून मांडलेली आत्मकथात्मक गोष्ट वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आली आहे. आपली प्रत्येकाची एक स्वतःची अशी गोष्ट असते. प्रत्येकाने जर स्वतःची आत्मकथा लिहायची ठरवली तर काय होईल? तुम्ही-आम्ही म्हणजे आपण सर्वसामान्य, अतिसामान्य, गर्दीतला कोणी एक, मेंढराच्या कळपातीलच आपण… तर आपण आपल्या आत्मकथनात काय लिहू? समाजात आपण स्वतः किती महत्त्वाचा ‘जीव’ आहोत? हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करू. कारण प्रत्येक माणूस स्वतःच्या गोष्टीचा हिरो असतो.

- Advertisement -

आपण कधी कुठे चुकलो, हरलो, अडखळलो उतरी तो प्रसंग लिहिताना किंवा त्याविषयी पुन्हा विचार करताना त्यात जर-तरची गोष्ट बांधून स्वतःला जिंकवतो. प्रत्यक्ष वर्तमानात जमलं नाही तरी अप्रत्यक्षपणे भूतकाळाचा विचार करून कल्पनेत आपण स्वतःला विजयी करतो. त्यामुळे ही आत्मकथा लिहिताना आपण नक्कीच खाडाखोड करू. आपली पहिली ओळ प्रामाणिक वास्तवदर्शी असेल, परंतु ती खोडून स्वतःला ‘ग्लोरीफाय’ करून ती ओळ चकचकीत करून लिहू. आपलं आयुष्य कितीही सरधोपट असलं तरी वास्तवाची वहिवाट बदलून आपण वेगळा मार्ग कसा निवडला याचे दाखले आपण आपल्या आत्मकथनात देऊ. सरधोपट आयुष्यातील प्रसंग मालिका लेखक परेश मोकाशी आणि दिग्दर्शक आशिष बेंडे यांनी ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या निमित्तानं सिनेमाच्या पडद्यावर मांडला आहे.

आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या प्रसंगांना, घटनांना पुन्हा जगायला मिळाल्यावर आपण तेव्हा सावधपणे जगू अशी आपली सर्वसामान्य विचारधारा असते. याच घटना आपल्याला चहूबाजूंनी ‘आत्मपॅम्फ्लेट’मध्ये जगता येतात. कथाकार आशिषनं नायकालादेखील आशिष बेंडे हेच नाव दिलंय. हा आशिष आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे आपण कथेशी, सिनेमाशी जोडले जातो. पटकथा, संवाद आणि कथा विवेचन करताना परेश मोकाशीनं लेखक म्हणून सर्व सूत्रे स्वतःच्या हाती घेतली आहेत. यातून तो असा आविष्कार घडवतो की प्रेक्षक स्वतःला त्या कथेत शोधू लागतो. परेशच्या लिखाणात कायम उपरोध दिसून येतो, पण त्या उपरोधात निरागसता असते. यापूर्वी ‘एलिझाबेथ एकादशी’ सिनेमात ती दिसली होती. तशीच आता ‘आत्मपॅम्फ्लेट’ मध्येही दिसते.

आशिषची (मानस तोंडवळकर, ओम बेंडखळे) सर्वसामान्य गोष्ट लेखक आपल्याला सांगू लागतो. शालेय जीवनात एकाच वर्गात असलेली मुलगी सृष्टी (खुशी हजारे, प्रांजली श्रीकांत) एके दिवशी काही कारणास्तव आशिषचा हात पकडते. बालवयातील तो स्पर्श आशिषला तिच्या प्रेमात पाडतो. त्यावेळी एका मुलीच्या प्रेमात बुडालेला आशिष थ्रीडी ते सर्व काही करतो, जे एकतर्फी प्रेम करणारे सगळेच करतात. यात तो नेमकं काय आणि का करतो हे उत्कृष्टपणे दाखवलं आहे. तसंच सिनेमात अनेक ठिकाणी सामाजिक व्यंग अधोरेखित करण्यात आली आहेत. सुरुवातीला नजरेला पुसट दिसणार्‍या गोष्टी सिनेमा जसजसा पुढे सरकतो तशी सिनेमातील ‘शिकवणी’ची ‘विधानं’ ठळक होत जातात.

आपण आपल्या जगाचे हिरो असतो. अगदी सुरुवातीपासून आपण स्वतः कसे हिरो आहोत हे सांगण्याच्या प्रयत्नात आशिषची कथा गुंफण्यात आली आहे. भारताच्या जडणघडणीत आपण कसं योगदान दिलं याची पुष्टी आशिष करीत असतो. ही सर्व पटकथेतील जुळवाजुळव अलीकडे प्रदर्शित झालेल्या आमिर खान अभिनित ‘लाल सिंग चड्डा’च्या प्लॉटची आठवण करून देतो. तसंच ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या गोष्टीत कुठेतरी मिलिंद बोकील यांची ‘शाळा’देखील डोकावते. सुजय डहाके दिग्दर्शित ‘शाळा’ सिनेमाच्या कथा, दिग्दर्शन : आशिष बेंडे दिग्दर्शकांच्या टीममध्ये आशिष बेंडेदेखील होता. लेखन परेश मोकाशी त्यामुळे तसं वाटत असावं. सिनेमाची मूळ कथा आशिषनं लिहिली असल्यामुळे त्याच्या लिखाणात एक प्रवाह दिसतो. तो प्रेक्षकांना गोंधळात पाडणार आहे.

‘खोपटात खोपट’ असं म्हणत कथानायक असलेल्या सिनेमातील शेवटाकडे येताना लेखक-दिग्दर्शकानं केलेला कल्पनाविलास अतिशयोक्तीपणाचा आहे. वास्तविक फार्स कथनाचं हसं करून टाकणारा आहे. हा टोकाचा कल्पनाविलास टाळता आला असता का? याचा विचार लेखक, दिग्दर्शकानं करायला हवा.

कलाकारांचे नवे चेहरे हे सिनेमाचं बलस्थान आहे. बालकलाकार आणि इतर कलाकारांची निवड कास्टिंग डिरेक्टर रोहन मापुस्कर यानं अचूक केली आहे. खासकरून ओम बेंडखळे, चेतन वाघ आणि भीमराव मुडे ही पात्रं लक्षात राहतात. ओमच्या चेहर्‍यावरील निरागसता आणि चेतनचा भाबडेपणा अधिक रंगत आणतो. दिग्दर्शक अशी ओळख असलेल्या भीमराव मुडेनं यावेळी अभिनेता म्हणून उत्तम काम केलंय. संकेत कानेटकरचं संगीत, सत्यजित श्रीरामचं छायांकन आणि फैजल-इम्रान यांच्या संकलनाची भट्टी चांगली जमून आली आहे. संकलनासाठी काहीसा अवघड असा हा पट असला तरी ते शिताफीनं करण्यात आलं आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट…. सिनेमाचा व्हॉइस ओव्हर अर्थात परेश मोकाशीनं त्याच्या आवाजात केलेलं कथन सिनेमाला एकसंध बांधून ठेवतं. काही ठिकाणी फापटपसारा झालेला जाणवतो, पण बाकी सर्व आलबेल आणि प्रयोगशील आहे. हा प्रयोग ‘आविष्कार’ घडवणारा आणि सिनेमाचा वेगळा अनुभव देणारा आहे.

याआधी बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धात्मक विभागात ‘आत्मपॅम्फ्लेट’चा वर्ल्ड प्रीमिअर झाला होता. त्याला प्रचंड प्रतिसाद लाभला होता, तर आशिया पॅसिफिक स्क्रिन अवॉर्ड्स ऑस्ट्रेलियामध्ये ७० देशांतील चित्रपटांमधून सर्वोत्कृष्ट युथ फिल्मचा पुरस्कार मिळवणार्‍या या चित्रपटाने अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावली आहे. या चित्रपटाची खासियत म्हणजे हा संपूर्ण चित्रपट परेश मोकाशी कथन करीत आहेत. मराठीत अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे. मुळात झी स्टुडिओज आणि परेश मोकाशी हे आता एक समीकरण झाले आहे. हे दोघे एकत्र येऊन प्रेक्षकांसाठी कायमच सर्वोत्कृष्ट कलाकृती सादर करतात. यापूर्वीही झी स्टुडिओज आणि परेश मोकाशी यांनी एलिझाबेथ एकादशी, चि. व चि. सौ. का. वाळवी असे जबरदस्त चित्रपट दिले. त्यामुळे हा चित्रपट वेगळा ठरतो व जबराट अनुभव देऊन जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -