घरफिचर्ससारांशपितृपक्षातील कर्मकांडांची कर्मकहाणी!

पितृपक्षातील कर्मकांडांची कर्मकहाणी!

Subscribe

कालबाह्य रूढी-प्रथांचे कुटुंबाकुटुंबातून जेव्हा आचरण केले जाते तेव्हा, मनाला जे पटते ते आचरण्याचे धैर्य माणसं हरवून बसतात. अशा कालबाह्य प्रथा कुटुंबात पाळल्या जात असल्याने, कुटुंबाची एकूणच चिकित्सक वृत्ती मारली जाते. पुढील पिढीही हाच कित्ता गिरवते. आपण जे करतो ते कार्यकारणभावाशी सुसंगत नाही, असे जरी वाटत असले तरीही, लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, या भीतीने व दबावाखाली कुटुंबीयांना ते केल्याशिवाय गत्यंतर नसते. शिवाय पितृपक्षात पितरांना जेऊ घातले नाही तर कुटुंबात काही तरी अनिष्ट, वाईट घडेल, शाप लागेल अशी दैववादी भीती परंपरेच्या विचारसरणीतून मनाला सतत बेचैन करते, छळते.

शरीराशिवाय जीव, ही कल्पनाच असंभवनीय आहे. मृत्यूनंतर मागे काहीच उरत नाही. शरीर संपले की सर्वच संपलेले असते. म्हणजेच आत्मा नावाचे असे काहीही नसते. पण तरीही आत्मा असतो आणि तो कावळ्याचा रूपात येतो अशी परंपरेने चालत आलेली अंधश्रद्धा आपल्याकडे दृढ आहे. विज्ञानपूर्व काळात माणूस मेल्याचे दुःख व त्यातून पुनर्जन्माबद्दलचा कल्पनाविलास, हे त्या काळातील माणसाच्या बुद्धीच्या मर्यादेनुसार ठिक होते. ते आपण समजू शकतो. पण आजच्या शास्त्रीय निकषांवर हा कल्पनाविलास अजिबात टिकत नाही. हे मान्य करावे लागते.

तरीही आत्मा असतो आणि व्यक्ती मृत झाल्यानंतर तो कावळ्याच्या रूपाने येतो आणि पिंडाला शिवतो, असे मानले जाते. जोपर्यंत पिंडाला कावळा शिवत नाही, तोपर्यंत त्या कुटुंबावर नैराश्याचे आणि अपराधीपणाच्या भावनेचे ढग गर्दी करीत असतात. जमलेले आप्तस्वकिय चिंतेत असतात. एकदाचा कावळा पिंडाला शिवला की सर्वांना हायसं वाटतं. मानवी प्रगतीसाठी रूढी-प्रथांची तपासणी केली पाहिजे. मानवी संस्कृती विकसित करण्याची, सुधारण्याची वाट ही प्रत्येक घटनेची निर्भय चिकित्सा केल्याशिवाय पुढे जात नाही. असे केले की माणूस हळूहळू अज्ञानातून मुक्त होत जातो.

- Advertisement -

आत्म्याबद्दलच्या वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळ्या कल्पना आहेत. काही धर्मात असे मानले जाते की, आत्मा अमर असून, तो अविनाशी आहे. आपण कपडे बदलतो त्याप्रमाणे आत्मा जीर्ण शरीर सोडून देतो आणि नव्या शरीरात प्रवेश करतो. म्हणजे त्याचा पुनर्जन्म होतो. तर काही धर्मात असे मानले जाते की, आत्मा शरीरापेक्षा वेगळा असतो, पण तो पुनर्जन्म घेत नाही. मृत व्यक्तींच्या आत्म्याच्या पाप-पुण्याचा हिशोब लागत नाही तोपर्यंत ते सर्व आत्मे एका विशिष्ट ठिकाणी पडून राहतात.

हे मात्र खरे की, कोणत्याही धर्माला आत्म्याबद्दल प्रश्न विचारलेले चालत नाही. कारण असा प्रश्न धर्मवादाला जन्म घालतो. खरं तर कोणत्याही धर्माला विरोध नसून, त्या त्या धर्मातील कर्मकांडे, पुरोहितशाही आणि शोषणाला विरोध करायलाच हवा. पण तसा विरोध केला तर तो समजावून घेतला जात नाही. पितृपक्षात नैवद्याला किंवा दशक्रिया विधीत पिंडाला कावळा शिवला किंवा न शिवला याबाबत बोलले, चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला तरी तो धर्मावर हल्ला समजला जातो. त्यामुळे चिकित्सक वृत्ती थांबते. खरे तर आत्मा ही संकल्पनाच विविध अंधश्रद्धांचा आधार आहे. म्हणून या आत्म्याबाबतच्या बाबी जर तपासू दिल्या नाहीत तर आत्म्यासंबंधी असलेल्या अंधश्रद्धांचे उच्चाटन आपण करू शकणार नाही. कोणत्याही व्यक्तीच्या सर्वच इच्छा पूर्ण होत नसतात. आणि मृत्यू कधी येईल, हेही कुणाला माहीत नसते. म्हणजे व्यक्ती मृत पावली तर तिच्या अनेक इच्छा अपूर्ण राहण्याचीच शक्यता अधिक असते. पण तरीही अनेक इच्छा पूर्ण झालेल्या व्यक्तींच्या पिंडाला अनेक वेळा कावळा पटकन शिवत नाही आणि शक्यतो तरूणपणी निधन झालेल्या व्यक्तीच्या पिंडाला कावळा लगेच शिवतो, असेही पाहावयास मिळते.

- Advertisement -

इतर पक्ष्यांपेक्षा कावळा हा अधिक धीट आणि चाणाक्ष पक्षी आहे. शिवाय तो सर्वत्र आढळतो. स्मशानभूमी जवळ पिंडदान मोठ्या प्रमाणात केले जाते, त्या ठिकाणचे कावळे सरावलेले असतात. कारण त्यांना माहीत झालेले असते की, त्या ठिकाणी त्यांना हुसकावले जात नाही. तेथे कोणत्याही पिंडाला कावळे लवकर शिवतात. जर पोट भरलेले असेल तर कावळा तेथेही पिंडाला शिवण्याची शक्यता फार कमी असते. मात्र असा कार्यकारणभाव लक्षात घेण्याऐवजी या सर्व घटनांचा व्यक्तीच्या भावभावनांशी संबंध लावला जातो. बरं पिंडाला कावळा शिवण्याची ही प्रथा एकाच धर्मात पाहायला मिळते. हिंदू धर्माशिवाय इतर धर्मीयांमध्ये पिंडाला कावळा शिवण्याची प्रथा नाही. त्यांच्या आत्म्यांचे काय बरं होत असेल ? पण असे प्रश्न विचारायचे नसतात. कारण त्याने श्रद्धा, भावनांना ठेच पोहोचते किंवा असे प्रश्न विचारणारी व्यक्ती ही नास्तिक आणि धर्मद्रोही ठरवली जाते. कुटुंबात यापूर्वी मृत झालेल्या व्यक्तींच्या अतृप्त इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, दोष घालविण्यासाठी पितृपक्षात गोडधोडाचा नैवेद्य कावळ्याला देण्याची कालबाह्य प्रथा आपल्याकडे अजूनही मोठ्या प्रमाणात बहुतांशी कुटुंबात जोपासली जाते, पाळली जाते.

मानवी जीवनात व्यक्तीने कृतज्ञ असणे, इतरांनी केलेल्या सहकार्याबाबत सदैव कृतज्ञता व्यक्त करणे, हे उच्च दर्जाचे नैतिक मूल्य व भावना आहे. समाजात आनंद आणि स्नेहवर्धन होण्यासाठी ती जोपासली गेलीच पाहिजे. मात्र ती जोपासताना, तिच्यात विधायक, इष्ट, कालसुसंगत बदल करणेही आवश्यक आहे. वृद्धापकाळात जिवंत असताना, आपल्या पितरांची आपण प्रामाणिकपणे शक्य तेवढी सेवा केली, देखभाल केली तर त्यांच्या निधनानंतर अशी अनाठायी उठाठेव करण्याची गरज आणि इच्छा उरणार नाही. वृध्दाश्रमांची संख्याही कमी कमी होत जाईल.

पितृपंधरवाडा हा कालावधी आपल्याकडे अशुभ मानला जातो. ह्या कालावधीत नवीन खरेदी, नवीन घरात गृहप्रवेश करणे, विवाह जमवणे अशा अनेक महत्वाच्या, आवश्यक गोष्टी करण्याचे अनेक लोक टाळतात. विशेष म्हणजे शिक्षित मंडळी स्वतःच्या अशा अंधश्रद्धांचे विज्ञानाच्या आधारे लंगडे समर्थन करण्याचा प्रयत्न करताना आढळतात. राजकारणी मंडळीही अशा अंधश्रद्धांना जाणीवपूर्वक खतपाणी घालतात. जेव्हा सामुदायिक पातळीवर एखादी अंधश्रद्धा जतन केली जाते, जोपासली जाते तेव्हा तो समाज, त्यातील अनेक कुटुंबे विज्ञान युगात जगत असतानाही, सतत अंधश्रद्धांच्या गर्तेत गटांगळ्या खात जगत असतात. आर्थिक परिस्थिती खिळखिळी करून घेत असतात. ह्यात भले होते ते असे अवैज्ञानिक, कालबाह्य कुलाचार करायला सांगणार्‍यांचे आणि त्यासाठी लागणारे किराणा सामान, वस्तू , पदार्थ विकणार्‍यांचे!

अशा कालबाह्य रूढी-प्रथांचे कुटुंबाकुटुंबातून जेव्हा आचरण केले जाते तेव्हा, मनाला जे पटते ते आचरण्याचे धैर्य माणसं हरवून बसतात. अशा कालबाह्य प्रथा कुटुंबात पाळल्या जात असल्याने, कुटुंबाची एकूणच चिकित्सक वृत्ती मारली जाते. पुढील पिढीही हाच कित्ता गिरवते. आपण जे करतो ते कार्यकारणभावाशी सुसंगत नाही, असे जरी वाटत असले तरीही, लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, या भीतीने व दबावाखाली कुटुंबीयांना ते केल्याशिवाय गत्यंतर नसते. शिवाय पितृपक्षात पितरांना जेऊ घातले नाही तर कुटुंबात काही तरी अनिष्ट, वाईट घडेल, शाप लागेल अशी दैववादी भीती परंपरेच्या विचारसरणीतून मनाला सतत बेचैन करते, छळते.

पितृपक्ष हा कार्यकारणभावाशी फारकत घेतलेला कुलाचार आहे. पण असे बोलले तरीही कुटुंबाला, समाजाला ते रुचत नाही. उलट असे बोलणे हे भावना दुखाणारे, प्रक्षुब्ध करणारे ठरते, असा अनुभव आहे. स्वतःचे प्रश्न काय आहेत, याचे भान माणसाला त्याची सारासार बुद्धी देते. परिस्थितीच्या मर्यादेत प्रामाणिकपणे, धैर्याने, माणुसकीने स्वतःच्या प्रश्नांना सामोरे जाणे आणि त्यावर उत्तर शोधणे, यातच खरी माणूसपणाची कसोटी असते. व्यक्तीला हे सामर्थ्य देण्याचे सर्वात प्रभावी ऊर्जा केंद्र म्हणून कुटुंब महत्वाची भूमिका बजावते. म्हणून कुटुंबातील वातावरण योग्य सुसंस्काराच्या दिशेने बदलणे, ते सजग करणे, सक्रिय करणे आवश्यक आहे. पितृपक्षासह परंपरेनुसार कुटुंबात आचरले जाणारे सर्व कुलाचार विवेकाच्या कसोटीवर घासून, तपासून घेऊन मगच त्यांचे आचरण करणे, हाच कुटुंबातील या छोट्या-मोठ्या अंधश्रद्धा दूर करण्याचा, त्यांचे निर्मूलन करण्याचा प्रभावी मार्ग आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -