घरफिचर्ससारांशबाप्पा... सावर रे!

बाप्पा… सावर रे!

Subscribe

बाप्पा, माणसं एकत्र करण्यासाठी होणारा हा तुझा उत्सव आता पक्ष विस्तारीकरणासाठी होऊ लागलाय... गल्लीतले पोरं टपरीजवळ बसून आता राष्ट्रवादीचा बाप्पा, सेनेचा गणपती, मनसेचा राजा, बिजेपीचा बाप्पा असल्या बाता मारायला लागलेत राव. अरे, हेच बघ ना; डेकोरेशन अन् तुझ्या प्रतिमांपेक्षा हे शुभेच्छा फलकच किती वाढलेत ते. बाप्पा खरं सांगतो, जेव्हापासून हे असले ‘राजकारणी’ बॅनर्स अवाढव्य व्हायला लागलेत ना तेव्हापासून ‘गणपती बघायला चला’ म्हणत मागे लागणारे घरातले ‘मेंबरही’ कमी व्हायला लागलेत रे....!

– अमोल जगताप

बाप्पा… बाप्पा… अरे जरा समोर बघ, आज निवांत बोलायचं तुझ्याशी हे ठरवून सकाळीच आलोय. सायंकाळी तुझ्या आरतीसाठी होणारी भरमसाठ गर्दी अन् मध्यरात्रीपर्यंत मंडळाच्या कार्यकर्त्यांची तुझ्या आसपास बसून मोबाईलवर चालणारी ऑनलाईन ‘रम्मी’ यामुळे तुला शांतपणे असे एकांतात भेटताच आलं नसतं बघ.. म्हणून खास आलोय.. एकतर तू वर्षभराने येतोस आणि त्यात या दहा दिवसात कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नंबर न देताच जातोस.. ना तू कधी आम्हाला फेसबुकवर टॅग करतोस, ना कधी तुझा इंस्टावर एखादा रील शेअर करतोस.. अरे, इथे आमचे भावी नगरसेवक एक एक तास फेसबुक लाईव्ह करतात आणि तू मात्र शुल्लक पाच मिनिटही कधी फेसबूक लाईव्ह करत नाहीस.. देवा, धिस इस नॉट चांगलं बरका !! अरे समजा कधी गरज पडलीच तुझी तर कॉन्टॅक्ट तरी कसा करायचा बाबा आम्ही…? म्हणून… म्हणून आज या मंडळाच्या कार्यकर्त्यांचा डोळा चुकवून ती ताडपत्री वरती करून मी थेट तुझ्यासमोर येऊन उभा ठाकलोय…

- Advertisement -

बाप्पा, खरं सांगू… मजा नाही राहिली आता या उत्सवात… अरे थांब… थांब… न्यूज चॅनेलवरच्या पॅनलमधल्या लोकांसारखा व्हस्कन अंगावर येऊ नको लगेच… आधी माझं ऐकून घे तर पूर्ण.. हो, आणि नाहीच पटलं माझं तर नंतर भलेही दोन मुस्कटात मार.. अरे, माहितेय! माणसं एकत्र करण्यासाठी होणारा हा तुझा उत्सव आता पक्ष विस्तारीकरणासाठी होऊ लागलाय.. अरे हो हो…. लालबागचा राजा, मानाचा राजा याचबरोबर गल्लीतले पोरं टपरीजवळ बसून आता राष्ट्रवादीचा बाप्पा, सेनेचा गणपती, मनसेचा राजा, बिजेपीचा बाप्पा असल्या बाता मारायला लागलेत राव. अरे, हेच बघ ना; डेकोरेशन अन् तुझ्या प्रतिमांपेक्षा हे शुभेच्छा फलकच किती वाढलेत ते. तुझा फायदा घेऊन ‘मार्केट’मध्ये उतरणारे हे सर्वच आतापासूनच ‘राजकारण’ करताहेत, असं नाही का वाटत तुला? हो ना! अरे, मग बोल तसं… समोरच्याचं मन ओळखणं नाही जमत बाबा आता इथे कोणाला. बाप्पा खरं सांगतो, जेव्हापासून हे असले ‘राजकारणी’ बॅनर्स अवाढव्य व्हायला लागलेत ना तेव्हापासून ‘गणपती बघायला चला’ म्हणत मागे लागणारे घरातले ‘मेंबरही’ कमी व्हायला लागलेत रे….! तुझी मूर्ती पाच फूट अन् शेजारच्या बॅनरवरचे अण्णा, आप्पा, भाऊ, दादा दहा फूट असला सावळा गोंधळ होऊन चाललाय सगळा.. बाप्पा, तू फक्त लोकांचा विश्वास बघत असतो.. दिखावा, थाट अन् या दहा दिवसात तुझ्यावर केला गेलेला खर्च नाही हेही एकदा त्यांना समजेल अशा भाषेत सांगून टाक बाबा तूच! कारण इथे तुझ्यावर केलेल्या खर्चावरून तुझ्याप्रती असलेली भक्ती रिफ्लॅक्ट होते असा गैरसमज पसरला आहे बाप्पा..

अरे, खर्‍याची दुनिया नाही राहिलीय इथे.. मागे त्या पाटील काकांच्या फोर व्हिलरला एकाने मागून ठोकलं अन् वरून नुकसानभरपाईही पाटील काकांनाच द्यावी लागली म्हणे..! कुठल्यातरी टामटूम पक्ष्याचा कार्यकर्ता होता म्हणे तो येऊन धडकणारा! अरे तुला काय सांगू, दोन तीन फोन कॉलमध्ये आख्खा पक्ष जमा झाला त्याचा त्या अपघातस्थळी!

- Advertisement -

नाहीतर आम्ही.. बोंबलून बोंबलून घसा कोरडा झाला, पण मुंबई-कोकण-गोवा रस्ता वर्षानुवर्ष अजूनही तसाच चाळण झालेला आहे आणि त्यानंतर जाहीर झालेला समृद्धी महामार्ग एकदम टकाटक बनून लोकांच्या सेवेसाठी ( टोलसह) सुरूही झाला.. आम्ही नक्की वागायचं कसं काहीच कळत नाही रे. आता हेच बघ ना.. मतदान दिले एकाला आणि आता बघतो तर ते गेले दुसर्‍याला..! इकडे शेतकर्‍यांच्या मालाला भाव नाही म्हणून ओरडायचे फक्त.. दर सिझन.. प्रत्येक वेळी.. वर्षानुवर्ष… पण त्या अनुषंगाने वाटचाल मात्र शून्य!

आणि फक्त सरकार , विरोधी यांचे एकमेकांशी पटत नाही असेही नाही सध्या.. एका पक्षातल्या दोन नेत्यांचे, त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचे, घरच्यांचे अगदीच आता तर नवरा बायकोचेही पटत नाही बाबा… अरे, तुला म्हणून सांगतो; आज रवीचं लग्न होऊन बरोबर तीन महिने झालेत आणि फारकत घेऊन एक महिना.. नक्की चाललंय तरी काय? हे स्वतःच्या आयुष्याचेही ‘मलाइका’ करू पाहताय बाबा.. समथिंग गडबड आहे हे मात्र नक्की.. एक्झॅट काय केमिकल लोच्या होतोय तुला पक्के ठाऊक असणार.. तू बाबा फक्त असा गंमत बघत बसू नकोस.. डबल नसले किंवा ट्रिपलही नसले तरी तुझे ‘सिंगल इंजिन’ सर्व प्रश्न मार्गी लावू शकते हे पक्के ठाऊक आहे मला.. सो बाप्पा, युवर इंटरवेंशन इज मस्ट नीडेड नाऊ!

अजून एक गोष्ट तुला सांगतो कोणाला सांगू नकोस… मैत्रिणीसोबत गणपती बघायला चालले असं घरात सांगून मित्रासोबत ‘सिनेमॅक्स’ला पिक्चर पाहणार्‍या मुला-मुलींच्या संख्येत लाक्षनिक वाढ होतेय बाबा… पण दुसरीकडे सासू-सासरे, आई-वडील यांना जीव लावणार्‍यांमध्ये मात्र कमालीची घट होतेय… एकूणच त्यांचा फंडा क्लिअर आहे.. हम दो.. अन् हमारे एक किंवा दो.. बस्स.. बाकी मग अन्न नको, वस्त्र नको, निवारा नको.. हवा तो फक्त एक मोबाईल अन् अनलिमिटेड डाटा…

तिकडे पक्ष फुटला, पक्ष फुटला म्हणून चॅनेलवाले सदासर्वदा ओरडत असता सारखे.. पण त्या फुटलेल्या पक्षामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची घरं फुटली.. त्यांच्या घराघरात वादविवाद उदभवले ते मात्र कुणी दाखवेना बाबा.. ‘बापाचा हा गट.. पोराचा तो गट आणि घरात भलताच कट’ अशी काही क्रिटिकल सिट्युएशन होऊन गेलीय बघ..

बाप्पा, सायंकाळी हातात दंडुके घेऊन गर्दी सुरळीत करणारे ‘बगळे’ दिसत असतीलच ना तुलाही इथे… तेही काही नेहमी असंच प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडतात असंही नाही हं… मार्च एन्डींग सोडला तर कधी पावत्याही फाडत नाही… असेल नसेल ते सर्व काही जागेवरच मिटवतात, आता आता तर अगदीच वीस रूपये दिले तरीही त्यांचं ‘पोट’ भरतं. बाकी अधिकारी धुतल्या तांदळासारखे आहेत असेही नाही. वर्षानुवर्षे फक्त बोटावर मोजण्याइतकेच अधिकारी कर्मचारी चांगले असे का? हाही मोठा प्रश्न आहे देवा..‘एकमेका सहाय्य करू; सगळे होऊ श्रीमंत..’ अशा प्रकारचे अधिकारी आणि एजंटचे काम सुरू आहे बाप्पा! अरे, आतातर अगदी बोर्डात येणार्‍या पोरांसारखे दिवसाआड लाच घेताना सापडलेल्या अधिकार्‍यांचे फोटो पेपरात दिसताहेत.. न्यूजमध्ये फ्लॅश होताहेत.. पण एकंदरीत फरक काहीच पडत नाहीये समाजात.. ना ते अधिकारी टेन्शन घेताना दिसतात अन् ना त्यांना पोसणारे सरकार…! धाक हवा बाप्पा या सर्वांवर.. आमच्यावरही.. निदान तुझातरी…!!

ऐनिवे, जरा सतर्क राहात जा तुही येथे… हो.. हो.. तूही ! रात्रीही जरा सावधपणेच झोपत जा बाबा, समोरच्या गर्दीवरही जरा बारकाईने नजर असूदे, कारण तुला इथे थांबायचंय ‘अँट यूवर ओन रिस्क!’ आमच्यावर भरोसा ठेवू नकोस, आम्हाला मनाप्रमाणे भाडं देणारा भेटला की, आम्ही ‘कोणत्याही’ भाडेकरूला ठेवून घेतो. मग त्याने घरात बसून देशविरोधी कारवाया रचल्या तरीही बी डोन्ट केअर… पाच पन्नास रुपयांसाठी आम्ही त्याला जमेल तेवढी मदतही करतो… एका नावाने ‘डोमिसाईल सर्टिफिकेट’ तर दुसर्‍या नावाने ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ देऊन मोकळे होतो… आम्हाला जनाची.. मनाची… कसलीच काहीच वाटतं नाही. आणि बाप्पा, सावध रहा या चॅनलवाल्यांपासून.. चुकूनही तोंडाबाहेर एक शब्दही काढू नकोस. त्यांनी तुझ्या तोंडासमोर माईक धरून तपश्चर्या केली तरीही! नाहीतर तू चक्क चॅनेलवर लाईव्ह चर्चा करशील इथंवर हे सेटींग लावतील… अन् मधूनच वर तोंड करून म्हणतीलही,‘गणपती बाप्पा जी सिर्फ और सिर्फ हमारेही चॅनेल से बात कर रहे है.. आप कही जाईयेगा नही.. हम अभी लौटते हे ! छोटेसे ब्रेक के बाद..!!

(लेखक युवा साहित्यिक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -