घरफिचर्ससारांशवटवाघळांची गणना आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

वटवाघळांची गणना आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

Subscribe

पक्षी आणि प्राणी गणना ही परिसंस्थेच्या सुरक्षिततेच्या आणि पर्यायाने मानवाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे या अगणित संख्येने येणार्‍या वटवाघळांची गणना करण्यासाठी नवीन दृष्टिकोन आवश्यक होता. यावर संशोधकांनी एक नवी पद्धत शोधून काढली आहे. वटवाघळांचे छोट्या व्हिडीओ कॅमेर्‍याने चित्रीकरण केले आणि नंतर त्यांची गणना करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित केली. मोठ्या संख्येने फिरणार्‍या आणि स्थलांतर करणार्‍या प्राण्यांची गणना करण्यासाठी हे तंत्र स्वस्त, जलद आणि पुनरावृत्ती करण्याजोगे आहे.

–सुजाता बाबर

झांबियातील कासांका नॅशनल पार्कला ‘बॅट सीझन’मध्ये भेट देणारे पर्यटक मान्य करतील की संध्याकाळी स्ट्रॉ-कलर्ड फ्रूट बॅट म्हणजेच इडोलोन हेल्व्हम जातीच्या असंख्य वटवाघळांचा त्यांच्या रात्रीच्या वस्तीच्या जागेवरून उदय होणे हे वन्यजीव जगतातील एक मोठे जागतिक आश्चर्य आहे. ही वटवाघळे दरवर्षी ऑक्टोबरच्या आसपास कासांका येथे येतात. नोव्हेंबरमध्ये त्यांची संख्या सर्वोच्च असते आणि जानेवारीमध्ये ते पुन्हा परत जातात. हा अनुभव एकदम चित्तथरारक आणि भारावून टाकणारा असतो. त्याच्या धक्क्यातून बाहेर पडले की मोठा प्रश्न मनात निर्माण होतो, बापरे! ही किती वटवाघळं आहेत? बरीच वटवाघळं इतक्या वेगाने उडतात की त्यांना मोजणे अशक्य असते. डोळ्यांना दिसणार्‍या संख्येच्या अंदाजानुसार १० लाख ते १ कोटीपर्यंत ही संख्या असावी. यावरूनच ही मोजणी किती कठीण आहे हे लक्षात येते.

- Advertisement -

पक्षी आणि प्राणी गणना ही परिसंस्थेच्या सुरक्षिततेच्या आणि पर्यायाने मानवाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे या अगणित संख्येने येणार्‍या वटवाघळांची गणना करण्यासाठी नवीन दृष्टिकोन आवश्यक होता. यावर संशोधकांनी एक नवी पद्धत शोधून काढली आहे. वटवाघळांचे छोट्या व्हिडीओ कॅमेर्‍याने चित्रीकरण केले आणि नंतर त्यांची गणना करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित केली. मोठ्या संख्येने फिरणार्‍या आणि स्थलांतर करणार्‍या प्राण्यांची गणना करण्यासाठी हे तंत्र स्वस्त, जलद आणि पुनरावृत्ती करण्याजोगे आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये पाच दिवस कासांका येथील वटवाघळांच्या कॉलनीमध्ये सरासरी ८,५७,२३३ वटवाघळे असावीत असा अंदाज केला होता. ही जगातील वटवाघळांच्या सर्वात मोठ्या वसाहतींपैकी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आफ्रिकेतील एक मोठी वसाहत आहे.ही गणना का महत्त्वाची असते?

या प्रजातीवरील भूतकाळातील संशोधनावरून दिसून आले आहे की वटवाघळांनी परिसंस्थेला पुरवलेल्या सेवा अतुलनीय आहेत. ते दररोज रात्री ७५ किमी आणि त्याहून अधिक अंतरावर बिया पसरवतात आणि हे आफ्रिकन हत्तीपेक्षा तीन पट जास्त अंतर आहे. मोठ्या वसाहती अधिक बिया पसरवतात आणि अशा प्रकारे परिसंस्थेमध्ये अधिक मौल्यवान असतात. दुर्दैवाने काही ठिकाणी वटवाघळांच्या संख्येत घट दिसून येत आहे. माणसांमुळे होणार्‍या त्रासामुळे वाटवाघळांच्या कॉलनीमध्ये फरक पडला आहे आणि त्यामुळे प्रमाणित गणना महत्त्वपूर्ण आहे. शिवाय संख्येच्या पातळीत घट होण्यासाठी संवर्धन व्यवस्थापन आवश्यक आहे.

- Advertisement -

कासांका वसाहती मोजणे हे आणखी एका कारणासाठी महत्त्वाचे आहे. आफ्रिकन स्ट्रॉ-कलर्ड फ्रूट बॅट ही खंडातील एकमेव लांब पल्ल्याची स्थलांतरित प्रजाती आहे. अद्याप या स्थलांतर मार्गांचे तपशील माहीत नाहीत, परंतु प्रत्येक वर्षी त्यांना तात्पुरत्या वसाहतींमध्ये एकत्रित होताना आपण पाहतो. जसे की कासांकात एक तात्पुरती वसाहत असते आणि नंतर ते अज्ञात भागांकडे जाताना दिसतात. या तात्पुरत्या वसाहतींमध्ये थांबण्याचा कालावधी स्थानिक अन्न उपलब्धतेवर अवलंबून असतो. मोठ्या वसाहती अन्न उपलब्धतेशी त्यांची वेळ उत्तम रीतीने जुळवून घेतात. त्यामुळे मोठ्या वसाहती एक निरोगी, अधिक अन्न-समृद्ध लँडस्केप दर्शवतात आणि स्थलांतराचे सामूहिक वर्तन राखण्यासाठीदेखील महत्त्वाच्या असतात.

वटवाघळांचा मागोवा घेण्यासाठी आणि त्यांच्या स्थलांतराचे मार्ग समजून घेण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान अद्याप विकसित केले जात आहे. केवळ काही वटवाघळांचा अभ्यास केला गेला आहे. तरीही परिणाम धक्कादायक होते. वटवाघळांनी संपूर्ण खंडात अनेक ठिकाणी उड्डाण केले, ज्यात दक्षिण सुदानचाही समावेश आहे. असे दिसून आले आहे की इतर अनेक वसाहतींमधील वटवाघळे वर्षाच्या कमी कालावधीसाठी कासांका येथे भेटतात आणि तेही या प्रदेशातील मुबलक फळांचा फायदा घेण्यासाठी. नवीन मोजणी पद्धतीसाठी वटवाघळांचा उदय प्रमाणित पद्धतीने चित्रीत करण्याचा, प्रत्येक व्हिडीओमध्ये वटवाघळांची मोजणी करण्याचा आणि नंतर एकूण संख्या शोधण्याचा निर्णय घेतला. कॉलनीच्या सर्व बाजूंनी डेटा गोळा करणे ही मुख्य गोष्ट होती.

म्हणून वटवाघळांच्या जंगलाला नऊ गो-प्रो कॅमेर्‍यांनी वेढले ज्यांचे लक्ष्य सरळ वरच्या दिशेने होते. हे छोटे ‘हेल्मेट कॅमेरे’ बरेचदा काही विशिष्ट खेळांचे चित्रीकरण करण्यासाठी वापरले जातात. ते संध्याकाळच्या सौम्य आकाशामध्ये उडणार्‍या काळ्या वटवाघळांचे रेकॉर्डिंग करण्यासाठीदेखील योग्य होते. शास्त्रज्ञ आणि रेंजर्सची टीम वटवाघळं उडायला सुरुवात करण्यापूर्वी कॅमेरे सुरू करण्यासाठी पार्कभोवती धावत सुटली. आश्चर्यचकित करणार्‍या वटवाघळांच्या विस्मयकारक थव्याला पाहण्यासाठी थोडी विश्रांती घेतली. नंतर अंधार पडल्यावर कॅमेरे परत आणले. यासाठी वटवाघळांच्या सोबतीने जंगलात राहणार्‍या पाणघोडे आणि मगरींना चकमा देत दलदलीचे जंगल पार केले. हे फुटेज डाऊनलोड करून पुन्हा दुसर्‍या दिवशी चित्रीकरण सुरू केले. अशाप्रकारे पाच दिवसांच्या चित्रीकरणाचे सुमारे ४५ तासांचे फुटेज मिळाले, पण तरीही प्रत्यक्षात वटवाघळे मोजायची होतीच.

या व्हिडीओमधील वटवाघळांची मॅन्युअली मोजणी करणे वास्तववादी नव्हते. ही संख्या खूपच मोठी होती. त्याऐवजी संशोधकांच्या टीमने संध्याकाळच्या आकाशात वटवाघळांना ओळखण्यासाठी, त्यांचा एका फ्रेमपासून फ्रेमपर्यंत मागोवा घेण्यासाठी आणि जेव्हा जेव्हा ते मध्य रेषा ओलांडतात तेव्हा त्यांची गणना करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यक्रम विकसित केला. कृत्रिम बुद्धिमत्तेला एका मिनिटाच्या व्हिडीओवर प्रक्रिया करण्यासाठी सव्वा मिनिटे लागतात. याचा अर्थ ४० तासांचे फुटेज संगणकावर चालण्यासाठी ५० तास लागतात. एका व्हिडीओ फ्रेममध्ये सर्व वटवाघळांची मोजणी करण्यासाठी एखाद्या माणसाला दोन मिनिटे लागली, तर ते काम पूर्ण होण्यासाठी १३ वर्षांपेक्षा जास्त वेळ लागेल.

काही लहान क्लिप मॅन्युअली मोजून कृत्रिम बुद्धिमत्ता पद्धतीची अचूकता तपासली आणि या पद्धतीमध्ये ९५ टक्के मोजणी पूर्ण होत होती. त्यानंतर कॅमेर्‍यासमोरून एकूण कॉलनीचा कोणता भाग उडत होता हे शोधण्यासाठी त्रिकोणमितीचा वापर केला आणि एकूण कॉलनीचा आकार वाढवला. एका दिवसात सर्वाधिक ९,८७,११४ वटवाघळे होती. पाच दिवसांच्या मोजणीदरम्यान कॉलनीच्या सर्वोच्च काळाला पकडले असे समजले, तर आपण असे म्हणू शकतो की नोव्हेंबरच्या पीक सीझनमध्ये कासांकामध्ये सुमारे एक दशलक्ष वटवाघळे आली होती.

टेक्सासमध्ये वटवाघळांच्या गुहा अधिक प्रमाणात आहेत, परंतु त्या खूपच लहान आहेत. स्ट्रॉ-कलर्ड फ्रूट वटवाघळांची कासांका वसाहत जगातील सर्वात मोठी (वजनानुसार) वसाहत आहे. स्वस्त गो-प्रो कॅमेर्‍यांचा वापर आणि नाविन्यपूर्ण स्वयंचलित विश्लेषणांमुळे या आणि प्राण्यांच्या इतर वसाहतींची सलग वर्षभर मोजणी करण्यासाठी एक सोपी पद्धत प्रस्थापित होत आहे. संशोधकांना आशा आहे की यामुळे संवर्धनाच्या प्रयत्नांची माहिती देण्यासाठी संख्येतील बदल ओळखता येतील.

हे महत्त्वाचे आहेत कारण कासांका वसाहतीचे संरक्षण केल्याने संपूर्ण उपखंडातील वटवाघळांचे संरक्षण होते. कासांका नॅशनल पार्कमध्ये कृषी विकासाचे अतिक्रमण होत आहे आणि परिसरात विंड फार्मची योजना आहे. याचा येथे एकत्रित होणार्‍या वटवाघळांच्या संख्येवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. जिथे प्रजाती परिसंस्थेला सेवा पुरवत असतील तिथे हे परिणाम रोखण्यासाठी निरीक्षण करणे महत्त्वाचे ठरेल. आफ्रिकेतील ‘गुप्त माळी’ म्हणून वटवाघळे आपली सेवा सुरू ठेवत पुढील अनेक वर्षे कासांकाच्या संध्याकाळचे आकाश अंधारून टाकतील अशी आशा करुया.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -