घरफिचर्ससारांश‘पुस्तके आणि साहित्य’

‘पुस्तके आणि साहित्य’

Subscribe

जे खरोखरंच गंभीरपणे लेखन करतात त्यांच्या पुस्तकांचं काय? विषयाची निवड करणं.. संशोधन करणं.. सखोल अभ्यास.. भाषेचा काटेकोरपणा..नंतरचे संपादकीय संस्कार अशा पद्धतीने आलेलं असतं ते खरं साहित्य, पण होतं काय, लायब्ररीत काऊंटरवर ही पुस्तकं फारशी दिसतच नाहीत. हेमंतरावांनी (किंवा माझ्यासारख्यांनी पण) लिहिलेली पुस्तके जागा अडवून बसतात. त्यात कुणी आपल्या आजारपणाविषयी लिहिलेली पुस्तके असतात.. कुणाची प्रवास वर्णनं असतात.

–सुनील शिरवाडकर

हेमंतरावांना.. म्हणजेच आप्पांना वाचनाची आवड लहानपणापासूनच, पण कॉलेज सुटलं आणि मग वाचनही सुटलं. आता ते सत्तरीत होते. पुन्हा एकदा त्यांनी लायब्ररी लावली.. आणि पुस्तके वाचायला सुरुवात केली.
त्यांच्या एक लक्षात आलं.. अलीकडे चरित्र.. किंवा आत्मकथन करणारी पुस्तके जास्त दिसतात. ती वाचताना त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली. आपणही पुस्तक लिहिलं तर? म्हणजे थेट आपण नाही लिहायचं.. आपण लिहून घ्यायचं. आपल्याकडे खूप काही सांगण्यासारखे आहे.
त्यांनी बायकोला हा विचार सांगितला. तिनं तर वेड्यातच काढलं,पण मग त्यांनीच तिला समजावून सांगितलं.
‘अगं बघ..फार काही लागणार नाही..साठ सत्तर हजार फारतर..पण मिळणारी प्रसिद्धी मोठी आहे..लेखकाची बायको म्हणवुन घ्यायला तुला नाही आवडणार का?’
कसं तरी तिला समजावून सांगितलं. मग प्रथम त्यांनी त्यांच्या एका मित्राशी संपर्क साधला. तो थोडाफार लेखक होता. वर्तमानपत्रातून कॉलम वगैरे लिहायचा. त्याला लिहायला राजी केलं. किती द्यायचे.. कसे द्यायचे ते ठरलं. मग त्यांच्या बैठका सुरू झाल्या.
कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरची पदवी घेतल्यानंतर अप्पांनी दोन वर्षे एक जॉब केला. मग एम.आय.डी.सी.त एक छोटं युनिट सुरू केलं. आज आता सत्तरीत असताना तो उद्योग बहरलेला होता. त्यांची दोन्ही मुलं त्यांच्या कारखान्याचं कामकाज बघत होती. हा उद्योग आपण कसा सुरू केला.. कशा कशा अडचणी आल्या.. कसा स्ट्रगल केला.. हे सगळं लिहुन झालं.. म्हणजे सांगून झालं. मग मध्यंतरी झालेलं मोठं आजारपण.. मुलांची शिक्षणं. लग्न..हे झालं.
करता करता चांगला दीडशे पानांचा ऐवज तयार झाला. मग जुने अल्बम बाहेर काढले. पुस्तकात किती फोटो घ्यायचे.. कोणते घ्यायचे यावर बरीच चर्चा झाली. ते फोटो साध्या कागदावर छापायचे की आर्ट पेपरवर यावरही बराच खल झाला.
हे सगळं शब्दबद्ध करणारा जो त्यांचा मित्र होता.. त्याच्या ओळखीने शहरातल्या एका थोड्याफार प्रसिद्ध लेखकाची प्रस्तावना पण मिळाली. आता प्रश्न होता तो प्रकाशकाचा.
एका नामांकित प्रकाशन संस्थेकडे हेमंतराव गेले. बरोबर तो शब्दांकन करणारा मित्र होताच. सगळं स्क्रिप्ट त्यांनी प्रकाशकाला दाखवलं. त्यांनी आठवडाभराने या असं सांगितलं.
आठ दिवसांनी प्रकाशकाकडून होकार आला. एक हजार प्रतींसाठी अमुकतमुक खर्च येईल.. त्यात मुखपृष्ठ..आतील कलर फोटोग्राफ्स हे सगळं आलं. सगळे पैसे आधीच द्यावे लागतील. पैसे जमा केल्यानंतर दोन महिन्यांनी प्रती मिळतील वगैरे वगैरे.
तसं अ‍ॅग्रीमेंट झालं. दोन महिने झाले.. आणि एका शुभदिवसी पाच प्रती.. आणि पेढ्याचा बॉक्स घेऊन प्रकाशक स्वतः घरी आले. हेमंतरावांनी आपले पुस्तक घेतले. आपलं पुस्तक.. पहिलं पुस्तक..त्यावर लेखक म्हणून आपलं नाव..रंगीत मुखपृष्ठ..आतील गुळगुळीत पानं..त्याचा तो कोरेपणाचा वास..मागील पानावर.. म्हणजे मलपृष्ठावर त्यांचा फोटो.. अगदी मस्त..हसरा..झब्बा घातलेला. हा फोटो त्यांनी खास स्टुडिओत जाऊन काढून आणला होता.
पुस्तक..त्यासोबत एक बुके.. आणि पेढ्याचा बॉक्स.. प्रकाशकाने हेमंतरावांच्या हातात दिला. पुस्तक समोर पोटाशी धरून.. वेगवेगळ्या प्रकारचे फोटोही काढून झाले. वर्षभर घेतलेली मेहनत फळाला आली होती.
चार दिवसांनी रिक्षातून पुस्तकांचे गठ्ठे घरी आले. ते गठ्ठे पाहून हेमंतरावांना वाटून गेलं..बाप रे.. या एवढ्या पुस्तकांचं आपण आता करायचं तरी काय?
मग घरात चर्चा झाली. आपण जर एक प्रकाशन समारंभ केला तर? छोटा हॉल घ्यायचा..अमुक इतक्या माणसांना बोलवायचं…असं केलं तर किती खर्च येईल? मुख्य म्हणजे त्या कार्यक्रमात किती प्रती विकल्या जातील? काही प्रती सन्मानपूर्वक भेट द्याव्या लागतील..कोणाकोणाला द्याव्या लागतील? प्रकाशन समारंभाला आलेल्यांना चहा.. कॉफी..काय द्यावं लागेल..त्याचा खर्च किती?
सगळा आढावा घेऊन कार्यक्रम ठरला. पुण्यात असलेल्या एका प्रख्यात लेखकाच्या हातून प्रकाशन करण्याचं ठरलं. फोनवरून त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांचा जाण्यायेण्याचा खर्च द्यायचा ठरलं.. हॉटेलमध्ये त्यांच्यासाठी रूम बुक केली. whatsup.. Facebook वर आता जाहिरात सुरू झाली. पुस्तकाची मुळ किंमत इतकी इतकी..प्रकाशनपूर्व सवलत अमुक टक्के…असं सगळं ठरलं.
काही विशेष, खास व्यक्तींना फोन करून आमंत्रण दिले. दहामधल्या पाच जणांनी काही ना काही कारणं सांगितली. माझा दुसरीकडे प्रोग्राम आहे.. घरी पाहुणे येणार आहेत.. मी त्या दिवशी बाहेरगावी आहे वगैरे वगैरे.
जो हॉल बुक केला होता तो दोनशे लोकांसाठीचा होता. हेमंतरावांना जरा टेन्शनच आलं. आपण मारे खूप जणांना आमंत्रण केलंय..पण जर लोकं आले नाहीत तर? रिकाम्या खुर्च्या पुढे प्रकाशन करायचं का? पण आता माघार घेणं शक्य नव्हतं. शो मस्ट गो ऑन…
आणि एकदाचा प्रकाशन समारंभ झाला. बर्‍यापैकी लोक आले. भाषणं बिषणं झाली. प्रत्येक वक्त्याने हेमंतरावांचं भरभरून कौतुक केलं. दोन तीनशे पुस्तकेही विकली गेली. सगळं कसं ठरविल्याप्रमाणे पार पडलं. आयुष्यातली एक ख्वाईश पुरी झाली. चार लोकांमध्ये लेखक म्हणून नाव मिळालं.
आता उरलेल्या प्रतींचं काय? घरात पन्नास प्रती ठेवल्या. काही प्रती लायब्ररींमध्ये सप्रेम भेट दिल्या. काही प्रती पुस्तकांच्या दुकानांत.. प्रदर्शनात ठेवल्या.
आपल्या फावल्या वेळाचं काय करायचा..आपला पैसा कसा खर्च करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. हेमंतरावांनी पैसा खर्च केला..प्रकाशकाला सगळा पैसा नफ्यासकट आधीच मिळून गेला.. ज्यांना इच्छा झाली त्यांनी पुस्तक खरेदी केलं..यात कोणीही कोणाला दुखावलं नाही.. हेमंतरावांना पण नाव मिळालं.. कौतुक झालं.
पण जे खरोखरच गंभीरपणे लेखन करतात त्यांच्या पुस्तकांचं काय? विषयाची निवड करणं.. संशोधन करणं.. सखोल अभ्यास.. भाषेचा काटेकोरपणा..नंतरचे संपादकीय संस्कार अशा पद्धतीने आलेलं असतं ते खरं साहित्य, पण होतं काय.. लायब्ररीत काऊंटरवर ही पुस्तकं फारशी दिसतच नाहीत. हेमंतरावांनी..(किंवा माझ्यासारख्यांनी पण)लिहिलेली पुस्तके जागा अडवून बसतात. त्यात कुणी आपल्या आजारपणाविषयी लिहिलेली पुस्तके असतात..कुणाची प्रवास वर्णनं असतात.
नव्याने वाचन सुरू करणार्‍या वाचकांच्या हातात पडतात ती अशी सुमार पुस्तकेच. खरं साहित्य हेच असतं असाही समज त्यामुळे पसरत चालला आहे आणि यावर आपण काहीच करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. यावर उपाय काय?

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -