घरफिचर्ससारांशसईद कादरी : प्रेमवीरांचा आवाज

सईद कादरी : प्रेमवीरांचा आवाज

Subscribe

प्रत्येक गायकाचा आणि त्याच्या नायकाचा एक काळ असतो, सलमान खानला एसपी बाल सुब्रह्मण्यमचा आवाज असायचा तसंच इम्रान हाश्मीला केके, हिमेश रेशमिया आणि आतिफ असलमचा आवाज सूट व्हायचा. २००३ ते २०१३ या १० वर्षांच्या काळात इम्रान हाश्मीचे बहुतेक सिनेमे हिट झाले नाही तरी त्याची गाणी मात्र सुपरहिट व्हायची. इम्रान हाश्मीचे सिनेमे केवळ सीन्स आणि गाण्यांसाठी ऐकण्याचा तो काळ होता. केकेचा आवाज तरुणांच्या मनात घर करत होता आणि त्या आवाजाला ज्याच्या शब्दांनी साथ दिली तो गीतकार म्हणजे सईद कादरी.

–अनिकेत म्हस्के

मुंबईत रोज रेल्वेतून लाखो स्वप्नं उतरतात आणि त्या गर्दीत कायमची मिसळून जातात. काही लोकांची स्वप्नं पूर्ण होतात, काहींची स्वप्न बदलून जातात, तर काही विसरून.. ऐंशीच्या दशकात गीतकार बनण्याचं स्वप्न घेऊन जोधपूरवरून एक व्यक्ती मुंबईत आली. लिहिता येतं होतं, पण संधी मिळणं तितकं सोपं काम नव्हतं. संघर्ष केला, वेगवेगळ्या लोकांना भेटला, पण काम काही मिळत नव्हतं. महेश भट नावाची एक मोठी व्यक्ती त्याला भेटली, पण त्यांच्याकडेदेखील त्याच्यासाठी काही काम नव्हतं. महेश भटला मात्र त्याचं लिखाण आवडायचं आणि त्यांनी सांगितलं की, मी तुला नक्की चान्स देईल.

- Advertisement -

बघता बघता ७ वर्षे गेली, पण त्याला संधी मिळाली नाही, स्वप्न विसरून मुंबईला राम राम करून तो व्यक्ती पुन्हा जोधपूरला आला. पोटापाण्यासाठी एलआयसी एजंटची नोकरी करू लागला, ते करता करता आणखी १० वर्षे उलटून गेली. एक दिवस जोधपूरमध्ये शैलेश लोढाच्या पुस्तक प्रकाशनासाठी महेश भट जोधपूरला येणार होते, त्या व्यक्तीच्या लहान भावाला ही बातमी कळाली आणि त्याने सांगितलं की तू एकदा भेटून तर बघ…एलआयसी एजन्ट म्हणून काम करतानादेखील त्याने लिहिणं सोडलं नव्हतं, पण मुंबईला तो विसरला होता. म्हणून त्याने नकार कळवला, पण भावाने दुसर्‍या दिवशीदेखील हट्ट केल्याने शेवटी तो जोधपूरमधल्या त्या हॉटेलमध्ये गेला जिथं भट साहेब राहत होते.

भट साहेबांनी त्याला पाहताच ओळखलं आणि आपल्या सोबत रूममध्ये घेऊन गेले, विचारलं काही नवीन लिहिलंय का? त्याने आपल्या स्वतःच्या आयुष्यावर लिहिलेल्या दोन ओळी ऐकवल्या,‘आवारापन बंजारापन, एक हला है सीने में, हर दम हर पल बेचैनी है, कौन भला है सीने में’ या ओळी भट साहेबांनी ऐकल्या आणि म्हणाले की मला माझ्या मुलीच्या सिनेमासाठी गाणं मिळालं. पूजा भट त्यावेळी ‘जिस्म’ नावाच्या सिनेमाची निर्मिती करत होती आणि त्याच सिनेमात हे गाणं घेतलं, जे लोकांनादेखील आवडलं. तब्बल दीड दशकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर बॉलीवूडला मिळालेल्या त्या गीतकाराचं नाव होतं, सईद कादरी.

- Advertisement -

प्रत्येक गायकाचा आणि त्याच्या नायकाचा एक काळ असतो, सलमान खानला एसपी बाल सुब्रह्मण्यमचा आवाज असायचा तसंच इम्रान हाश्मीला केके, हिमेश रेशमिया आणि आतिफ असलमचा आवाज सूट व्हायचा. २००३ ते २०१३ या १० वर्षांच्या काळात इम्रान हाश्मीचे बहुतेक सिनेमे हिट झाले नाही तरी त्यांची गाणी मात्र सुपरहिट व्हायची. इम्रान हाश्मीचे सिनेमे केवळ सीन्स आणि गाण्यांसाठी ऐकण्याचा तो काळ होता, केकेचा आवाज तरुणांच्या मनात घर करत होता आणि त्या आवाजाला ज्याच्या शब्दांनी साथ दिली तो गीतकार म्हणजे सईद कादरी. ‘जिस्म’ सिनेमानंतर पुढच्याच वर्षी ‘मर्डर’ नावाच्या सिनेमात गाणी लिहिण्याची संधी सईद कादरीला मिळाली, या सिनेमात त्याने लिहिलेलं ‘भिगे होठ तेरे, प्यासा दिल मेरा’ नावाचं गाणं तर आजही आशिक लोकांचं अँथम आहे.

याच सिनेमात त्याने कहो ना कहो नावाचं गाणं लिहिलं तेदेखील गाजलं. ‘मर्डर’ सिनेमाचा अल्बम त्याकाळी बराच चालला होता. सईद कादरीच्या करियरला सुरुवात होऊन नुकतंच एक वर्ष झालं होत आणि त्याला त्यातच प्रचंड यश मिळालं. इम्रान हाश्मी त्याच्यासाठी लकी ठरला होता, इम्रान हाश्मीवर चित्रीत झालेली गाणी बघणारा आणि ऐकणारा एक प्रेक्षकवर्ग तयार होत होता, त्यातच ‘जहर’ नावाचा सिनेमा आला. या सिनेमात अगर तुम मिल जाओ, जमाना छोड देंगे हम आणि वो लम्हे वो बातें कोई ना जाने अशी दोन्ही गाणी कादरीने लिहिली, ज्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.

पुढे ‘नजर’ सिनेमातलं मोहब्बत जिंदगी है, नजर नजर ही गाणी लिहिली, ‘फरेब’ नावाचा एक सिनेमा केला. ज्यातलं ‘बरस जा ए बादल बरस जा’ हा आयटम नंबर चालला. २ वर्षेे इम्रान हाश्मीसोबत काम न केल्यानंतर शेवटी पुन्हा हिट होण्यासाठी म्हणा किंवा अजून काही म्हणा, कादरी यांनी इम्रान हाश्मीच्या ‘गँगस्टर’ सिनेमासाठी गाणी लिहिली. यातली २ गाणी खूप चालली आणि आजही ऐकली जातात, त्यातलं पहिलं म्हणजे ‘तू ही मेरी शब है’ आणि दुसरं म्हणजे ‘या अली मदद अली’ ही दोन्ही गाणी ऐकली नसेल असा कदाचितच एखादा तिशीतला तरुण तुम्हाला पहायला मिळेल.

हिंदी सिनेमात खूप कमी वेळा असं घडलंय की एखाद्या नायकासाठी त्याची सगळी सुपरहिट गाणी एकाच गीतकाराने लिहिली असावीत, इम्रान हाश्मीच्या करियरमध्ये हे काम सईद कादरीने केलेलं आहे. इम्रानची बहुतांशी सुपरहिट गाणी ही कादरीने लिहिलीत, महेश भटसोबत असलेल्या उत्तम केमिस्ट्रीमुळे इंडस्ट्रीत इतर कुणासोबत फार काम करण्याची कादरीवर कधी आली नाही, पण भट साहेब वगळतादेखील त्याने जेव्हा जेव्हा काम केलं, तेव्हा तेव्हा ते गाजलं. उदाहरणादाखल सांगायचं झाल्यास बर्फी सिनेमातलं ‘फिर ले आया दिल मजबूर, क्या की जै?’, ‘लुडो’ सिनेमातलं हरदम हमदम आणि ‘भूल भुलैय्या’ सिनेमातलं लबो को लबो पे सारखं गाणं आजही तितकंच ऐकलं जातं.

सईद कादरीची आजवरची कारकीर्द पाहिली तर त्याची बहुतांश गाणी ही प्रेमवीरांशी, विरहाशी संबंधित असलेली गाणी होती. त्याने वेगळा प्रयोग फार कधी केला नाही. जे त्याला जमतं तेच त्याने लिहिलं आणि त्यातून नाव कमावलं. त्याची भाषा पाहिली तर प्रेम या शब्दाला लावलेली विशेषण आणि उर्दू शब्दांचा प्रभाव यामुळे त्याची गाणी अधिक श्रवणीय बनतात. ‘द ट्रेन’ सिनेमातलं बितें लम्हे, जिंदगी ने जिंदगीभर गम दिए यांसारखी गाणी असो देत किंवा जन्नत, किस्मत कनेक्शन, राज २, मर्डर २, जन्नत २, मर्डर ३, आवारापन यांसारख्या सिनेमातली गाणी, या गाण्यांनी एका पिढीच्या मनावर राज्य केलंय. हमारी अधुरी कहाणी सिनेमातलं ‘ए हमनवा मुझे अपना बना लें’ हे गाणंदेखील लोकांना फार आवडलं होतं.

नुकताच रिलीज झालेल्या आणि नवीन रेकॉर्ड प्रस्थापित करणार्‍या ‘गदर २’ सिनेमातदेखील सईद कादरीने ३ गाणी लिहिली आहेत. विरह आणि प्रेम या दोन विषयांवर आपलं संपूर्ण करियर निर्माण करणार्‍या या गीतकाराकडून तशा तर अनेक अशा गोष्टी आहेत, ज्या शिकता येतील, पण जवळपास १७ वर्षे संघर्ष करून पहिली संधी मिळालेल्या या गीतकाराने आपल्या लेखणीतून प्रत्येक प्रेमवीराला आवाज दिला, जेव्हा जेव्हा कुणाचं तरी हृदय तुटतं, कुणाला कुणीतरी सोडून जातं किंवा कुणाला आपलं पाहिलं प्रेम आठवतं, तेव्हा तेव्हा त्या प्रत्येक भावनेला शब्द देण्याचं काम सईद कादरीने केलंय, म्हणून तो प्रेमवीरांचा आवाज ठरला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -