घरफिचर्ससारांशबहुजन हिताय, बहुजन सुखाय : आकाशवाणी

बहुजन हिताय, बहुजन सुखाय : आकाशवाणी

Subscribe

दरवर्षी १३ फेब्रुवारीला ‘जागतिक रेडिओ दिवस’ साजरा होतो. काही दशकांपूर्वी रेडिओ हेच माहिती आणि मनोरंजनाचं महत्त्वाचं माध्यम होतं. रेडिओ आणि वर्तमानपत्र ह्या दोन माध्यमांनी अनेक वर्षे लोकांची माहिती नि मनोरंजनाची भूक भागवली. टीव्हीचं आगमन झाल्यावर रेडिओ काहीसा मागे पडला. खासगी एफएम वाहिन्या आल्यावर रेडिओची लोकप्रियता वाढली. सरकारने प्रत्येक जिल्ह्यात आकाशवाणी केंद्र सुरू केलं. काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता महाराष्ट्रात जवळपास सर्व जिल्ह्यांत आकाशवाणीची एफएम केंद्रे कार्यान्वित आहेत. अनेक शहरांमध्ये खासगी एफएम केंद्रेही आहेत.

-प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार

सहा-सात दशकांपूर्वीच्या काळात घरात रेडिओ असणं प्रतिष्ठेचं लक्षण होतं. हे वाचून आजच्या तरुणाईला आश्चर्य वाटेल. हिंदी-मराठी चित्रपट संगीत, मराठी भावसंगीत-लोकसंगीत-भक्ती संगीत आणि शास्त्रीय संगीतही रेडिओमुळेच घराघरात पोहचलं. इतकंच नाही तर टीव्हीचा विस्तार होण्यापूर्वी म्हणजे १९९०पर्यंत क्रिकेट सामन्यांचा आनंदही रेडिओवरच्या समालोचनातून चाहते घ्यायचे. २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट रोजी दिल्लीत होणार्‍या ध्वजारोहण कार्यक्रमाचे थेट प्रसारण लोकांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी आजही आकाशवाणी पार पाडते.

- Advertisement -

१९७० ते १९८० या दशकांत रेडिओचा मोठा बोलबाला होता. रेडिओच्या किमती लोकांना परवडणार्‍या झाल्याने घराघरात तो ऐकला जाऊ लागला. याचं कारण म्हणजे भल्यामोठ्या आकाराचे, जास्त जागा व्यापणारे, इलेक्ट्रिकवर चालणारे रेडिओऐवजी लहान आकाराचे व बॅटरीवर चालणारे रेडिओ उपलब्ध झाल्याने ते सर्वसामान्य जनता, कष्टकरी वर्ग, कनिष्ठ मध्यमवर्गीय समूहापर्यंत पोहचले. १९८० नंतर खिशात मावतील एवढ्या आकाराचे पॉकेट ट्रांझिस्टरसुद्धा सर्वसामान्यांना सहज उपलब्ध झाले. त्यामुळे झोपडीत राहणारा असो वा बंगल्यात, सर्वांना हे माध्यम सहजप्राप्य झालं.

कनिष्ठ वर्गात तर लग्नात सायकलीबरोबरच रेडिओसुद्धा हुंड्यात दिला जायचा. लोकं हुंड्यात मिळालेला रेडिओ सायकलीवर अडकवून रुबाबात फिरायचे, असं बुजुर्ग मंडळी सांगतात. आकाशवाणीवरून कार्यक्रम सादर करण्याची संधी तेव्हा सहजासहजी मिळत नव्हती. ज्यांना मिळायची त्यांचं लोकांना फार अप्रूप असायचं. शिवाय ज्यांची गाणी ध्वनिमुद्रित होऊन रेडिओवर ऐकवली जायची ते ‘रेडिओ स्टार’ व्हायचे.

- Advertisement -

रेडिओ ऐकण्याचा छंद लहानपणापासूनच मला जडला. पहाटेची भक्तिगीतं, सकाळी-दुपारी-रात्री ऐकवली जाणारी चित्रगीतं मी आवडीने ऐकायचो. रोज संध्याकाळी प्रसारित होणारा ‘युववाणी’ हा कार्यक्रमही मला आवडायचा. आमच्या गावात जळगाव आकाशवाणी, ऑल इंडिया रेडिओची उर्दू सर्व्हिस, भोपाळ-इंदूर, अहमदाबाद-भरूच केंद्रे ऐकू यायची.

शिवाय विविधभारती आणि श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचा विदेश विभागावरून प्रसारित होणार्‍या विविध कार्यक्रमांचाही आस्वाद घेता यायचा. तेव्हा इयत्ता १०वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम सकाळी व दुपारी प्रसारित व्हायचा. हेही कार्यक्रम मी आवडीने ऐकायचो. लहान मुलांसाठी मुंबई आकाशवाणीवरून ‘बालदरबार’ हा कार्यक्रम प्रसारित व्हायचा. इतर केंद्रे हा कार्यक्रम महिन्यातून एकदा सहक्षेपित करायचे. याच कार्यक्रमातून दिलीप प्रभावळकरांच्या ‘बोक्या सातबंडे’ या मालिकेचे काही भाग मी ऐकले.

रेडिओमुळेच सैगल, पंकज मलिक, सी. एच. आत्मा, तलत, हेमंतकुमार, मन्नादा, रफी, किशोर, मुकेश, नौशाद, सी. रामचंद्र, ओपी, एसडी, एलपी, आरडी यांची ओळख झाली, तर प्रल्हाद शिंदे, शाहीर साबळे, विठ्ठल उमप, सुलोचना चव्हाण, अरुण दाते, राम कदम, सुधीर फडके, यशवंत देव, पी. सावळाराम, वसंत प्रभू, श्रीनिवास खळे, मंगेश पाडगावकर, दादा कोंडके, दत्ता पाटील, हरेंद्र जाधव, रंजना शिंदे, सुमन कल्याणपूर हे मराठी कलावंतही परिचित झाले. इतकंच नाही तर बडे गुलाम अली खाँ, बेगम अख्तर, कुमार गंधर्व, अभिषेकीबुवा, पलुस्कर, गुलाम अली मेहंदी हसन, वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी यांसारख्या महान कलावंतांची थोरवी रेडिओमुळेच समजली.

प्रत्येक आकाशवाणी केंद्रावर तेव्हा श्रोत्यांच्या आवडीची मराठी-हिंदी गाणी ‘आपली आवड’/‘आपकी फर्माईश/पसंद’ कार्यक्रमातून वाजवली जायची. यासाठी श्रोते पत्र पाठवून पसंती कळवायचे. प्रेषकांची नावंही सांगितली जायची. विविध भारतीवर पत्र पाठवून मनपसंत गाणी ऐकण्याचा कार्यक्रम अलीकडेच बंद झाला. आता एसएमएस/ई-मेलने श्रोते आपली पसंती कळवतात. कनिष्ठ महाविद्यालयात असताना मी तीन-चार केंद्रांवरचा ‘आपली आवड’ कार्यक्रम ऐकायचो.

यात ऐकवली जाणारी मराठी युगल गीतं मी त्यांच्या तपशिलासह (चित्रपट, गायक, गीतकार, संगीतकार) नोंदवून ठेवली होती. पुढे यावर आधारलेला दीर्घ लेख एका दैनिकाच्या चित्रपटविषयक पुरवणीत प्रसिद्ध झाला. हा पानभर प्रसिद्ध होऊनही अर्धा लेख बाकी राहिला. याचा उत्तरार्ध प्रसिद्ध न झाल्याने मी फार हिरमुसलो होतो. या लेखाची कार्बन कॉपीदेखील हरवल्याने जरा जास्तच वाईट वाटलं.

बातम्या, श्रुतिका, लोकनाट्य, रूपक, मुलाखती असा श्रवणानंद रेडिओच्या माध्यमातून लहानपणी घेतला. शाळेतून घरी आल्यावर सगळ्यात आधी रेडिओचा कान पिळायचा माझा नित्यक्रम होता. आठवड्यातून एकदाच उशिरात उशिरा रात्री नऊपर्यंत रेडिओ ऐकण्याची घरी मुभा होती. एरवी आठ-साडेआठनंतर रेडिओ बंद करावा लागायचा. त्या काळातला रेडिओवरचा सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे दर बुधवारी श्रीलंका केंद्रावरून प्रसारित होणारा नव्या गाण्यांचा ‘बिनाका/सिबाका गीतमाला’. मी हा कार्यक्रम फार कान देऊन ऐकायचो. बुधवार लहानपणी माझ्यासाठी खास असायचा.

त्यावेळी रेडिओचं प्रसारण आजच्या इतकं सुस्पष्ट नव्हतं. वारा-पाऊस-विजा यामुळे खरखर आवाज यायचा. कधी कधी असं वातावरण नसतानाही आवाज व्यवस्थित येत नसल्याने रसभंग व्हायचा, पण इलाज नसायचा. गीतमाला प्रचंड लोकप्रिय असण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे निवेदक अमीन सायानींचा आवाज आणि शैली. अतिशय प्रभावी आणि जादुई शैलीत श्रोत्यांशी संवाद साधणारे निवेदनातले सुपरस्टार सायानी यांच्या आवाजावर भारतातलेच नव्हे तर हिंदी समजणारे जगभरातले तमाम श्रोते फिदा होते.

विविध भारतीवरून सायंकाळी प्रसारित होणारा लोकप्रिय कार्यक्रम ‘जयमाला’ अजूनही सुरू आहे. सैनिक बांधवांच्या पसंतीची गाणी यात ऐकवतात. रविवारी ‘विशेष जयमाला’ प्रसारित केला जायचा. चित्रपटसृष्टीतला एखादा कलावंत सैनिकांशी संवाद साधायचा. रात्री पावणेआठ ते आठदरम्यान याच केंद्रावरून प्रसारित होणारा मराठी गाण्यांचा ‘गीतगंगा’ कार्यक्रमही आवडायचा. शिवाय श्रीलंका केंद्रावरून मंगळवारी रात्री पावणेनऊला मराठी चित्रपटगीतं ऐकवली जायची.

सकाळी आठ ते नऊ यात ‘आपही के गीत’ हा श्रोत्यांच्या पत्राधारित नवीन हिंदी गाण्यांचा कार्यक्रमही श्रवणीय असायचा. त्याआधी सकाळी साडेसात ते आठदरम्यान ‘भूले बिसरे गीत’ मध्ये जुनी गाणी वाजवली जायची. कार्यक्रमाची सांगता सैगलच्या गाण्याने व्हायची. त्या काळात ‘रेडिओ सिलोन’ हे भारतात फार लोकप्रिय होतं. यामुळे तत्कालीन केंद्र सरकारने भारतातही रेडिओची मनोरंजन वाहिनी असावी असं ठरवलं. यातूनच सिलोनला पर्याय म्हणून ‘विविध भारती’ अस्तित्वात आली आणि कालांतराने ‘देश की सुरिली धडकन’ झाली.

आकाशवाणीत सेवा करण्याची खूप इच्छा होती. १९९३मध्ये तशी संधीही आली. सांगली केंद्रावर ‘उद्घोषक’ तर मुंबईवर ‘वृत्त निवेदक’ या पदासाठी परीक्षा दिली. लेखी परीक्षा व स्वर चाचणीत यशस्वी होऊनही निवड झाली नाही. काही वर्षांपूर्वी नाशिक आकाशवाणीने नैमित्तिक करारावर उद्घोषक निवडले. इथंही पुन्हा तेच. आकाशवाणीत विशिष्ट आडनावाच्या लोकांनाच संधी मिळते की काय!

आता टीव्ही, मोबाईलवरही रेडिओ ऐकता येतो. रेडिओचे उद्घोषक आरजे अर्थात ‘रेडिओ जॉकी’ झालेत. रेडिओवर बोलणं म्हणजे जोरजोरात बडबडणं असंही झालंय. खासगी एफएमवर तीच ती गाणी ऐकवली जातात. गाण्याचे कर्ते (गायक-गीतकार-संगीतकार) क्वचितच सांगितले जातात. दशकाभरापूर्वी सुरू झालेल्या ‘स्पेस रेडिओ’वर मराठी-हिंदी गाणी ऐकवली जायची. हा प्रयोग अल्पजीवी ठरला. याचवेळी श्रीलंका आकाशवाणीचा विदेश विभाग आणि हिंदी सेवा बंद पडली. मनोरंजन-माहिती-प्रबोधन-लोकशिक्षणाचा वसा घेतलेल्या आकाशवाणीने श्रोत्यांची अमूल्य सेवा केलीय.

आजही ही सेवा सुरूच आहे. मुंबईतल्या महाभयंकर पुराच्या वेळी रेडिओने फार मोलाची भूमिका पार पाडली. तसेच कोविड काळातही उल्लेखनीय कार्य केलं. श्राव्य माध्यमाचं अतिशय परिणामकारक नि प्रभावी साधन म्हणजे रेडिओ. अलीकडेच ‘रेडू’ नामक अतिशय चांगला मराठी चित्रपट आलाय. ‘रेडिओ’ नावाचं साधन कधीही कालबाह्य होणार नाही. अमीन सायानींच्या शब्दांत सांगायचं म्हणजे, बहनो और भाईयो, दोस्तो, रेडिओ सुनते रहिये…खुश रहो…मिलते है अगले हफ्ते…तब तक खुदा हाफिज!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -