घरफिचर्ससारांशउद्योजक स्त्रियांच्या प्रेरणादायी यशोकथा

उद्योजक स्त्रियांच्या प्रेरणादायी यशोकथा

Subscribe

एखाद्या मुलीने/स्त्रीने घरात लक्ष केंद्रित करण्याऐवजी एखादा उद्योग-व्यवसाय सुरू केल्यास सुरुवातीला कुटुंबाकडून त्यांचं खच्चीकरण केलं जातं, असा समज आपल्याकडे प्रचलित आहे. ( आणि यात काही प्रमाणात तथ्य आहेच.) मात्र या पुस्तकातल्या बहुतांशी स्त्रियांना असा अनुभव आला नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सर्जनशील काम करू पाहणार्‍या मुलींना/स्त्रियांना त्यांच्या कुटुंबाचा पाठिंबा मिळतो. आई-वडील आपल्या लेकीला तिचं स्वप्न-आशा-आकांक्षा पूर्ण करायला सहाय्य करतात. नवरे त्यांच्या बायकोच्या कामाची दखल घेतात व धावपळीची दिनचर्या आनंदाने स्वीकारतात. सासू-सासरे देखील त्यांना आवश्यक ते पाठबळ देतात. हे या सत्यकथांमधून वाचकांना प्रत्ययास येतं.

–प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार

अविनाश किरपाल यांचं WOMENTREPRNEURS : Inspiring Stories of Success हे पुस्तक सेज या ख्यातनाम प्रकाशन संस्थेने २०१६ मध्ये प्रसिद्ध केलंय. या पुस्तकाला इंडिया international सेंटर, एशिया प्रोजेक्टच्या तत्कालीन अध्यक्षा कपिला वात्स्यायन यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. अविनाश किरपाल हे टाटा international लिमिटेडचे माजी उपाध्यक्ष आहेत. त्यांनी जगविख्यात ऑक्सफर्ड विद्यापीठातून १९६२ मध्ये पदवी मिळवली असून ते टाटा उद्योग समूहाच्या प्रशासकीय सेवेत सुमारे तीन दशके कार्यरत होते. इथं त्यांनी अनेकविध पदांची जबाबदारी सांभाळली. पुढे त्यांनी world federation of trading association चं महासचिव पदही भूषवलं. ते international management institute च्या programmes for development of small and medium sized enterprises या शिक्षणक्रमाचे 10 वर्षे सल्लागार होते. तसेच आयएमआयचे त्रैमासिक ‘इंटरफेस’चे ते संपादकही होते. त्यांनी जागतिक बँक, international finance corporation, united nations development programme, international trade centre आणि international labour organization अशा आंतरराष्ट्रीय संस्थांसाठीही काम केलंय. त्यांचं The SME and the Export Development Company हे पुस्तक जिनिव्हा इथल्या international trade centre ने प्रकाशित केलं आहे. त्यांनी अनेक व्यवस्थापनविषयक नियतकालिकांमध्ये लेखन केलंय.

- Advertisement -

या पुस्तकात भारतातल्या काही उद्योजक स्त्रियांच्या प्रेरणादायी कथा सांगितलेल्या आहेत. या उद्योजक स्त्रियांशी प्रत्यक्ष संवाद साधून मिळवलेल्या माहितीच्या आधारे लेखन करण्यात आलंय. एखादा उद्योग-व्यवसाय किंवा संस्था सुरू करण्यामागची प्रेरणा अलीकडे उपजीविकेच्या गरजेपेक्षाही सर्जनशील अभिव्यक्ती आणि व्यक्तिगत इच्छा-आंकाक्षा यातून प्राप्त होत असते, असं या यशोगाथा वाचल्यावर समजतं. भारतातल्या वेगवेगळ्या भौगोलिक परिसरातून आलेल्या नि भिन्न-भिन्न पार्श्वभूमीच्या 10 उद्योजक स्त्रियांच्या यशोकथा या पुस्तकात आहेत. शैलेजा दत्त, मेरी बरुआ, लक्ष्मी कृष्णन, सुधा शास्त्री, रितू प्रसाद, आयेशा ग्रेवाल, सलोनी मल्होत्रा, बीनलक्ष्मी नेप्रम, उर्वशी बुटालिया आणि मनिषा गुप्ता ह्या त्या उद्योजक स्त्रिया होत.

या पुस्तकातल्या उद्योजक स्त्रियांची पार्श्वभूमी (वय-शिक्षण-कुटुंब-सामाजिक दर्जा) वेगवेगळी आहे, मात्र स्वत:चा उद्योग करण्यासाठी प्रत्येकीला स्त्री म्हणून समाजात असलेला पूर्वग्रह, सामाजिक व सांस्कृतिक आव्हानांचा करावा लागलेला सामना हा त्यांच्यातला समान धागा आहे. यातल्या एकाही स्त्रीला बाई आहे म्हणून ती उद्योजक होऊ शकत नाही, असं कधीही वाटलं नाही! बहुतेकींनी स्त्री असणं उद्योजक होण्यासाठी लाभदायी ठरल्याचं नमूद केलंय. स्त्रियांनी उद्योजक होऊ नये असं वाटणार्‍या पुरुषांच्या जुनाट विचारसरणीवर यातल्या काहींनी कोरडेही ओढले आहेत. समाजासाठी उपकारक ठरतील असेच उद्योग या स्त्रियांनी सुरू केलेत. समाजातल्या स्त्रिया आणि इतर वंचित-उपेक्षित-अभावग्रस्त घटकांचं कल्याण होईल हाही त्यांचा एक उद्देश असल्याचं दिसतं. या सर्व स्त्रियांनी जोखीम घेण्याचं साहस आणि क्षमता दाखवली. अनेकींनी आपल्या जीवनभराची बचत एका स्टार्टअपसाठी वापरली. त्यांनी ही जोखीम अत्यंत विचारपूर्वक आणि व्यवस्थित अभ्यास करूनच घेतली असल्याचं सिद्ध झालं.

- Advertisement -

सामाजिक उद्योजकता अंमलात आणणार्‍या मनिषा गुप्ता, स्त्रीवादी प्रकाशन संस्थेची पायाभरणी करणार्‍या प्रकाशक उर्वशी बुटालिया, पती नसलेल्या बायकांसाठी स्वयंसेवी संस्था सुरू करणार्‍या ईशान्य-पूर्व भारतातल्या बिनलक्ष्मी नेप्रम, ग्रामीण भागात बिझनेस प्रोसेस आऊट सोअर्सिंग करणार्‍या सलोनी मल्होत्रा, सेंद्रिय शेतीवर आधारित ‘द आल्टीटयूड स्टोअर’ (टास) ही कंपनी उभारणार्‍या आएशा अग्रवाल, आदरातिथ्य व्यवस्थापन या क्षेत्रातल्या ‘स्पिरीट’ या उद्योगाच्या संस्थापक रितू प्रसाद, मानव संसाधन सल्ला आणि मार्गदर्शन देणार्‍या सुधा शास्त्री, महिला सबलीकरणासाठी स्वयंसेवी संस्था – the society for protection of women and children ‘स्पोवक’ स्थापन करणार्‍या लक्ष्मी कृष्णन, स्वमग्नताग्रस्त विकाराने पीडित असलेल्या बालकांसाठी अत्यंत मौलिक काम करणार्‍या मेरी बरुआ आणि अधिकारी/कर्मचारी शोध सेवा कंपनीच्या माध्यमातून प्रतिभावंतांचा शोध घेणार्‍या शैलजा दत्त या सर्व महिला उद्योजकांच्या कहाण्या प्रतिकूलतेवर मात करून यशस्वी कसं होता येतं, याचा प्रेरक वस्तुपाठ आहे, असं ठामपणे म्हणता येतं.

एखाद्या मुलीने/स्त्रीने घरात लक्ष केंद्रित करण्याऐवजी एखादा उद्योग-व्यवसाय सुरू केल्यास सुरुवातीला कुटुंबाकडून त्यांचं खच्चीकरण केलं जातं, असा समज आपल्याकडे प्रचलित आहे. (आणि यात काही प्रमाणात तथ्य आहेच.) मात्र या पुस्तकातल्या बहुतांशी स्त्रियांना असा अनुभव आला नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सर्जनशील काम करू पाहणार्‍या मुलींना/स्त्रियांना त्यांच्या कुटुंबाचा पाठिंबा मिळतो. आई-वडील आपल्या लेकीला तिचं स्वप्न-आशा-आकांक्षा पूर्ण करायला सहाय्य करतात. नवरे त्यांच्या बायकोच्या कामाची दखल घेतात व धावपळीची दिनचर्या आनंदाने स्वीकारतात. सासू-सासरे देखील त्यांना आवश्यक ते पाठबळ देतात. हे या सत्यकथांमधून वाचकांना प्रत्ययास येतं. यातला विवाह करण्याबाबतचा निर्णय घेण्याचा भाग विशेष आहे. यातल्या काहीच उद्योजक स्त्रियांनी लग्न केलं आहे आणि ते देखील उशिरा. बहुतांशी अविवाहित राहिल्या आहेत.

सातत्याने शिकत राहणे, व्यावसायिक तज्ज्ञ-प्रशिक्षक-मार्गदर्शक-अनुभवी व्यवसायिक-अभ्यासक यांच्याकडून गरज असेल तेव्हा न संकोचता सल्ला व मार्गदर्शन घेणं, नवीन आणि उपयुक्त माहिती मिळेल अशा चर्चासत्र-परिषद-व्याख्यान-प्रशिक्षण कार्यक्रमांना उपस्थित राहणे, स्वत:च्या कार्यक्षेत्राशी निगडित नियतकालिकं व पुस्तकं यांचं वाचन करणे इत्यादी वैशिष्ठ्ये या उद्योजक स्त्रियांची आढळून येतात. या उद्योजक स्त्रियांना जीवनात काय साध्य करायचं आहे, याची पूर्ण जाणीव होती, ही बाब उल्लेखनीय म्हटली पाहिजे. कारण आपल्या देशात मुलींनी कोणकोणत्या पर्यायांचा विचार केला पाहिजे हे सुचवण्याऐवजी त्यांच्यासाठी काय योग्य आहे हेच बिंबवण्यात येतं. परिणामी त्यांना आपलं उद्दिष्ट ठरवणं कठीण जातं. यातल्या बहुतेकींनी त्यांच्या आतल्या आवाजास आणि आंतरिक उर्मिस यथायोग्य प्रतिसाद दिला. हितचिंतकांच्या सल्लाही ऐकून घेतला, पण अंतिम निर्णय मात्र तर्कसंगत विचार करूनच स्वत:च स्वत: घेतला असल्याचं दिसून येतं.

या स्त्री उद्योजकांनी आपल्या यशाचं मापन करण्यासाठी निराळे निकष वापरले. बहुतेकींनी व्यवसायाचा आकार किंवा त्यातून मिळणारा नफा यांस फार महत्व दिलं नाही. ही गोष्ट लक्षणीय आहे. समाजाच्या हितासाठी त्यांच्या उद्योग-व्यवसायाचं योगदान आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम हे घटक त्यांच्यादृष्टीने महत्वपूर्ण होते. आपल्या उद्योग-व्यवसायाच्या मूलभूत ध्येय-धोरणाचा प्रामाणिकपणे पाठपुरावा करण्यास त्यांनी प्राधान्य दिलं. त्यांच्यात बदलत्या सामाजिक व सांस्कृतिक परिस्थितीचं अवलोकन करून त्यात संधी शोधण्याचं कसब होतं. म्हणून आपण कुठे आपला ठसा उमटवू शकतो हे त्यांना ज्ञात झालं. बहुतेकींनी मागणी आणि पुरवठा यातली तफावत समजून घेण्यासाठी संशोधनाची मदत घेतली. ज्या तरुण महत्वाकांक्षी स्त्री उद्योजकांना स्वत:चं करीयर आणि कौटुंबिक आयुष्य यात समन्वय नि समतोल साधायचा आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -