घर फिचर्स सारांश आदिवासींच्या मरणासन्न यातना!

आदिवासींच्या मरणासन्न यातना!

Subscribe

आदिवासींच्या वस्तीत भटकून त्यांच्यात एकरूप होऊन जिवंतपणी मरणासन्न यातनांचे भोग, अन्नासाठी कैक दिवस भटकून उपाशी राहून आगडोंब काय असतो याचं विदारक चित्र बाबूलाल नाईक यांनी ‘मूठ मूठ माती’ या कादंबरीच्या माध्यमातून मांडले आहे. डोळ्यावर झापडं पांघरणार्‍या, राष्ट्रीय प्रेमाच्या गप्पा मारणार्‍या ढोंगी समाजाचे डोळे उघडले आहेत. या कादंबरीतून त्यांनी समाजाचं पोस्टमार्टम केलं आहे. बाबूलाल नाईक स्वत: त्याच जमातीतील शहादा नंदुरबारचे रहिवासी. केंद्र शासनाच्या नोकरीतून निवृत्त होऊन समाजसेवेच्या ध्येयाने झपाटलेले लेखक. त्यामुळेच त्यांनी आपल्या शब्दातून आदिवासींच्या यातना व्यक्त केल्या आहेत.

–प्रदीप जाधव

भारतीय स्वातंत्र्याच्या 77 वर्षांनंतर महासत्तेकडे वाटचाल करणार्‍या देशात ‘गरिबांचा भारत आणि श्रीमंतांचा इंडिया’ असं स्पष्ट चित्र दिसतं. एका बाजूला दररोज किमान काही लोक जेवतील इतकं उच्च दर्जाचं अन्न फेकलं जातं, तर दुसर्‍या बाजूला उकिरड्यावरचं अन्न खाण्यासाठी भूकेकंगालांची रांग लागते हे विदारक सत्य. विकासाच्या गप्पा मारून जगाला केवळ विकसित भूभाग दाखवून मिरवणार्‍या सुमारे 140 कोटी इतकी मनुष्य संपत्ती असलेल्या देशातील नागरिकांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या किमान प्राथमिक गरजा पूर्ण न करू शकलेला अर्धनग्न, कुपोषित, गरिबी, दारिद्य्र ही अवस्था. याचा अभिमान बाळगावा, गर्व करावा, की लाज वाटावी हा खरा प्रश्न आहे. भारतातील बहुतांश भाग विशेषतः महाराष्ट्रातील काही जिल्हे आजही अंधारातच आहेत. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून अगदी शंभर-सव्वाशे किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, तलासरी, पालघर, डहाणू या ग्रामीण भागाची दयनीय अवस्था आहे, तर चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार, धुळे या अतिदुर्गम भागातील परिस्थिती अत्यंत बिकट. जव्हार, मोखाडा, तलासरी, डहाणू, मेळघाट, धारणी, नंदुरबार, घाटली साकलोडर, दहेल, गमन आणि मांडवीसह इतर टेकड्यांचा भूभाग कुपोषण उपासमारीचा. महाराष्ट्रात डोंगराळ क्षेत्रात झोपडी झोपडीतून हाहा:कार माजलेला. उपासमार, रोगराई, आदिवासी लेकरांच्या किंकाळ्या राजधानीतील महालांपर्यंत पोहोचतच नाहीत. भूकबळी, कुपोषित, बालमृत्यूचे आकडे पाहिले की पोटात वीतभर खड्डा पडेल. सालाबाद्रमाणे घटना घडली की, आयोग नेमला जातो, त्यांचा अहवाल प्रसिद्ध होतो, आपल्याला धक्का बसतो त्यावेळेपर्यंत वेदना होतात, परंतु कोणत्याही उपाययोजनांनी हे प्रमाण कमी झाल्याचं दिसत नसून वाढतच आहे. दरवर्षी केंद्र आणि राज्याच्या अर्थसंकल्पात मोठी तरतूद करीत असले तरी विकास योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत.

- Advertisement -

देशभरातून आदिवासींच्या विकासाकरिता आदिवासींसह बिगरआदिवासी समाजसुधारकांनी खूप मोठं काम केलं आहे, परंतु त्याचाही विचार केला असता आदिवासींच्या जीवनमानात फारसा बदल झालेला नाही. दुर्गम भागातील दर्‍याखोर्‍या, डोंगरकपारीत आदिवासी कसे जीवन जगत असावेत हे त्यांनाच ठाऊक. राजकारण्यांच्या म्हणण्यानुसार आत्ताच्या आदिवासींमध्ये बदल झाला आहे, असं मान्य केलं तर ते किती हास्यास्पद आहे. समुद्रात एखादा हंडाभर पाणी ओतावं आणि पाण्याची पातली मोजावी इतकं. काही मूठभर लोकांनी पांढरपेशी वर्गात उडी मारली असली तरी ते आता आपल्या बांधवांकडे मागे वळून पाहत नाहीत, ही एक शोकांतिकाच आहे. आता तर देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपतीपदी एक आदिवासी महिला विराजमान आहेत. त्यामुळे आता किती दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मूळनिवासी म्हणून संबोधल्या जाणार्‍या या समाजाला आता वनवासी संबोधून त्यांची ओळख पुसण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. काही प्रगत पण निद्रिस्त असलेला समुदाय त्यांना याच्याशी काही सोयरसुतक नसल्याने कोणी काहीही हिणवलं तरी विरोधाचा सवालच नाही.

आदिवासींच्या व्यथा, वेदना, दुःख अनेकांनी आपल्या साहित्यातून मांडल्या आहेत. आदिवासींच्या वस्तीत भटकून त्यांच्यात एकरूप होऊन जिवंतपणी मरणासन्न यातनांचे भोग, अन्नासाठी कैक दिवस भटकून उपाशी राहून आगडोंब काय असतं याचं विदारक चित्र बाबूलाल नाईक यांनी ‘मूठ मूठ माती’ या कादंबरीच्या माध्यमातून डोळ्यावर झापडं पांघरणार्‍या राष्ट्रीय प्रेमाच्या गप्पा मारणार्‍या ढोंगी समाजाचे डोळे उघडले आहेत. कादंबरीतून त्यांनी समाजाचं पोस्टमार्टम केलं आहे. बाबूलाल नाईक स्वत: त्याच जमातीतील शहादा नंदुरबारचे रहिवासी. केंद्र शासनाच्या नोकरीतून निवृत्त होऊन समाजसेवेच्या ध्येयाने झपाटलेले लेखक. बाबूलाल नाईक यांनी 1989 साली धुळे, नंदुरबार ते गुजरात राज्यात होणार्‍या सरकारी स्वस्त धान्य तस्करीबाबत पत्रकारितेच्या माध्यमातून विधानसभेपर्यंत आवाज उठविला.1996 ते 1999 या 3 वर्षांच्या कालावधीत आदिवासी संशोधन व प्रशिक्षण मंडळ पुणे, या आदिवासी विकास मंत्रालयाच्या अधिकारात चाललेल्या संस्थेत राज्यस्तरीय सदस्यपदी काम केले आहे. 20 ऑक्टोबर 1999 ते 10 डिसेंबर 1999 च्या दरम्यान गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशातील अतिदुर्गम क्षेत्राचा दौरा करून त्या राज्यातील आदिवासी विकास योजनांची पाहणी, तपासणी, अभ्यास करून महाराष्ट्र शासनाला अहवाल पुरविला. कुपोषणा संदर्भात 2006 साली त्यांनी कुपोषण केवढे क्रौर्य हे पुस्तक लिहिले आहे. सातपुडा पर्वतातील रूढी, परंपरा, सण, उत्सव, खाद्य वस्तू आणि सरकारी स्वस्त धान्य गैरव्यवहारांचा अभ्यास करून ‘अश्रु सातपुड्याचे’ कादंबरी लिहिली. त्यानंतर आधार टेंभली आणि ‘शिबली’ या त्यांच्या कादंबर्‍या. त्यांच्या सर्व साहित्यातून आदिवासींचं सत्य चित्रण त्यांनी रेखाटलं आहे.

- Advertisement -

मूठ मूठ माती शीर्षकावरूनच आपल्याला या पुस्तकाचं स्वरूप सहज लक्षात येईल. मूठ मूठ माती हा शब्द मराठी भाषिकांना शिक्षित अथवा अशिक्षितांना परिचित आहे. सातपुडा विभागातील लोकांचं आयुष्य कधी थांबेल हे सांगता येत नाही. कुपोषित बालकं जन्मानंतर कुठल्याही क्षणी जगाचा निरोप घेतात. कारण जी माता जन्म देते तीच कुपोषितच असते. दिवसाआड मोहफुले, आमलीचा मोहोर आणायचा, मकईच्या पीठात कालवून दोन लाल मिरच्या खुडून मोहराची भाजी बनवून खायची. झाडवेलीचा पाला, फळे खाऊन कसेबसे दिवस ढकलायचे. त्यामुळे स्तनपानसुद्धा देऊ शकत नाही. केवळ झाडपाला हे पोषण आहार होत नाही. याची माहिती महाराष्ट्र आणि देशाला असूनसुद्धा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही खा आणि खाऊ द्या अशा प्रकारची यंत्रणा राबवली जाते. बाबूलाल नाईक यांचे वैशिष्ठ्य असं की त्यांनी प्रत्येक वस्तीत, पाड्यात, तांड्यावर स्वतः जाऊन संपूर्ण स्थितीचा आढावा घेऊन या कादंबरीत सगळे संदर्भ जसेच्या तसे दिले आहेत. हे पुस्तक म्हणजे आदिवासींच्या कुपोषणामुळे ओढवलेल्या मृत्यूचा सत्य जाहीरनामाच आहे.

सातपुड्याचे डोंगर म्हणजे शेकडो बालदेहानी फुगलेल्या मसणवटा, कोवळ्या मृतांना घट्ट मिठीत घेणारी माती. स्मशानातल्या छातीवर मातीचे ओझे घेऊन पडलेल्या कोवळ्या लेकरांच्या दुर्दशेचं चित्रण. फाटलेला संसार जन्मभर खांद्यावर लादून रानोमाळ भटकणार्‍या जीवांच्या व्यथा, ज्यांच्या कुशीत मेलेलं बाळ कायमचं विसावलेलं दृष्टीस पडतं आणि मायमावल्या झिपोट्या उपटत वेडावतात. महिन्याचे तीस दिवस सरतात न सरतात तोच कोठल्यातरी टेकडीआड बालकांचं मृत्यूचं थैमान चालूच. नर्मदा तापी खोर्‍यात वेदनांचे प्रवाहडोंगर, खडक, माती, अरण्ये आणि झोपड्या, सारेच उपासमार, कुपोषणाचे वाटेकरी. उपासमार आणि आरोग्य सेवेअभावी डागाळलेली ही सातपुडा शिखरं, डोंगरदर्‍या, नर्मदा खोर्‍यातली भयंकर परिस्थिती ‘मूठ मूठ माती कादंबरीत पानोपानी वाचायला मिळते. तान्हुल्यांच्या मरण वेदनांची सत्यता लेखक वाचकांना घडवतो. कादंबरीतील मुख्य घटना कधी अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट, धारणी तर कधी नंदुरबारच्या दहेल, बामणी, घाटली, साकलीउमरची. कोवळी शरीरे मातीत गाडायला देताना ती माता वेड्याप्रमाणे किंचाळते. झोपडी झोपडीत आकांत मांडलेला दिसतो, परंतु या हृदयद्रावक प्रसंगाचं सोयरसुतक कोणाला? ना सरकारला ना प्रशासनाला. बरीच दशके पडद्याआड गेलीत, मृतदेहासोबत मसणवटीत गाडलीत, पण त्या मातांच्या दुखण्यावर फुंकर घालण्यासाठी अजूनतरी कुणाला वेळ नाही.

शेगाचा प्रवास, मोखाचा मृतदेह, साखलीउमर अशा एकूण 3 भागात ही कादंबरी विभागली असून वाचकाला खिळवून ठेवते. वाचताना अंगावर शहारे येतात शेवटपर्यंत. वाचकांची ही अवस्था असेल, तर लेखकाच्या धैर्याला सलाम केला पाहिजे, लेखणीला दाद दिली पाहिजे. कारण लेखकाने प्रत्यक्ष घटना पाहून वर्णन केलं आहे. पहिल्या प्रकरणात शेगाचा प्रवास हृदय पिळवटून टाकणारा आहे. एखाद्या पाषाणहृदयी माणसालाही पान्हा फुटेल. शेगाचा राकेश आजारी असताना घरापासून धुळ्याच्या दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी पैसे नाहीत म्हणून कुणाच्याही हाता पाया पडून दवाखान्यापर्यंत पोहोचतो. दवाखान्यात राकेश दगावल्यानंतर दवाखान्यातून 175 किलोमीटरच्या प्रवासापैकी 90 किलोमीटर तो स्वत: मृतदेह खांद्यावर घेऊन धावतच सुटतो. कारण मागे कोणी पोलिसांचा ससेमिरा लागू नये म्हणून. काही टप्पे ट्रक बसमध्ये, काही नातेवाईकांच्या मदतीने घरापर्यंत केलेली पायपीट पाहून शासकीय यंत्रणा किती सडलेली आहे याची चीड येते. माणुसकीला काळीमा फासणारे सरकारी अधिकारी कसे वर्तन करतात याचे वर्णन या प्रकरणात त्यांनी मांडले आहे. मासे पाण्याबाहेर पडतात तेव्हा श्वास घ्यायला, प्राणवायू मिळवायला आकांत करतात. क्षणभर कोरड्या जमिनीवर तडफडतात आणि मरतात अगदी तशीच अवस्था सातपुड्यातल्या कोवळ्या जीवांची.

हा सगळा परिसर दर्‍याखोर्‍यांचा असल्याने जंगली प्राणी कधी झडप खालून जीव घेतील याचा भरवसा नाही. बिबट्याच्या सावटाखाली रोज जीव मुठीत घेऊन जगावं लागतं. इथला सगळा समाज शिक्षणापासून कोसो दूर असल्याने त्यांचा अंधश्रद्धेवर अढळ विश्वास आहे. कुणाला काहीही झालं तरी प्रथम भगताकडे नेलं जातं. तो सांगेल तसं केलं जातं. त्यांचा सटवी, टिटवी, बुवा, भगत यांच्यावर खूप विश्वास आहे. आधी भगत, बुवाबाजी करून जास्त झाल्यानंतर दवाखान्याकडे वळतात, त्यामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.

इथला समाज आपलाच आहे, याची जाणीव ना लोकप्रतिनिधींना, ना सरकारी बाबूंना. वृत्तपत्रं जेव्हा आवाज उठवतात, रकानेच्या रकाने भरून बातम्या येतात, सरकारच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालतात तेव्हा सरकारी यंत्रणा जागी होते. लाल दिव्यांच्या अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या महागड्या गाड्यांचे ताफे येतात, प्रशासनाला जाग आली असा आव आणला जातो. प्रशासनाची पावलं भिंगरीप्रमाणे वेगाने चौफेर धावू लागतात. उपाशी बालकांना पहायला गाड्यांचे ताफे रस्त्यांवर धावू लागतात. ऊठसूट धडगाव, तोरणमाळ, मोलमी, अक्कलकुवाच्या घनदाट अरण्यात सरकारी पाहुणे येऊ लागतात. सरकारी रुग्णालयांना तातडीने संदेश प्राप्त होतात. घरेदारे विसरून, भूक-तहान बाजूला सारून कर्मचारी पथके भटकतात. पाडे न पाडे, झोपडी न झोपडीतल्या चिमुकल्यांची मातांची आणि कुटुंब प्रमुखांची चौकशी करतात. गावकारभारी, कोतवाल, पोलीस पाटील, सरपंचाच्या गाठीभेटी घेत ‘कुणी आजारी आहे काय?’ औषधोपचार चालू आहे काय?’ जेवण झाले का? रोज कोणकोणते खाद्यपदार्थ जेवणात असतात. घरात किती माणसे, बालके आहेत अशी चौकशी सुरू होते. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गतच्या गाव-पाड्यांवर किती बालके उपासमारीत मेली, कितींवर उपचार झाला आणि जन्मली याची आकडेवारी तयार केली जाते असं लेखकाने लिहिलं आहे.

या परिसरात रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याकारणाने बरचसे लोक हे गुजरात आणि मध्य प्रदेशकडे स्थलांतर करतात, तर काही लोक हंगामी स्वरूपात रोजगार करण्यासाठी गुजरात आणि मध्य प्रदेशात जाऊन पुन्हा इथे वास्तव्याला येत असतात. दरवर्षी या विभागात 5 ते 6 हजार बालकांचा मृत्यू होत असूनसुद्धा आजही प्रभावी आरोग्य सुविधा राबवल्या जात नाहीत. एखाद्याला गावापासून शहरापर्यंत दवाखान्यात न्यायला वाहतुकीची साधनं नसतात. रुग्णाला बांबूच्या झोळीत घेऊन जावं लागतं. बर्‍याचदा हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत त्या रुग्णाचा मृत्यू होत असतो. गेल्या आठवड्यात ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवसात 18 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे पडसाद देशभर उमटले, परंतु इथे रोजच मृत्यूचं थैमान असूनसुद्धा कुणालाही कायमस्वरूपी दखल घ्यावीशी वाटत नाही.

कादंबरीकार बाबूलाल नाईक यांचं सर्व साहित्य लोकप्रिय ठरलं असून ‘मूठ मूठ माती’ ही कादंबरी मराठी साहित्यात मोलाची भर टाकणारी आहे. भाषा अत्यंत सहज सोपी आहे, वाचताना आपणच आपला जीव मुठीत घेऊन चाललो आहोत असा भास निर्माण होतो. मुखपृष्ठावरील चित्र आकर्षित करून घेतं. मलपृष्ठावरील डॉ. श्रीधर पवार यांच्या अभिप्रायाने पुस्तकाची उंची वाढली आहे.

- Advertisment -