Eco friendly bappa Competition
घर फिचर्स सारांश गणेशोत्सवाचे बदलते स्वरूप

गणेशोत्सवाचे बदलते स्वरूप

Subscribe

अवघ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे ती म्हणजे लाडक्या गणरायाच्या आगमनाची. काही दिवसांमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया!’चा नाद आता दुमदुमू लागेल. गेल्या काही वर्षांत गणेशोत्सवाचे स्वरूप अगदीच बदलून गेले आहे. हे बदलते स्वरूप बघता लोकमान्य टिळकांनी दिलेला हा वारसा आपण प्रामाणिकपणे जोपासत आहोत का, असा प्रश्न पडतो.

–मानसी सावर्डेकर 

गणेश जन्माची आख्यायिका अशी सांगितली जाते की, पार्वती देवीला स्नानासाठी जायचे होते, पण आसपास लक्ष ठेवण्याकरिता कोणीच नव्हते. तेव्हा पार्वती देवीने आपल्या अंगावरील मळाने एक मूर्ती बनवली आणि ती जिवंत केली. या मूर्तीला पहारेकरी नेमलं आणि सांगितलं की, कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नकोस. असे सांगून पार्वतीमाता स्नानासाठी आत गेली. भगवान शंकर काही वेळाने तिथे आले आणि ते आत जाऊ लागले. तोच त्या पहारेकर्‍याने त्यांना अडवले. त्यावर भगवान शंकर संतप्त झाले आणि त्यांनी त्या पहारेकर्‍याचं शिर धडावेगळं केलं. पार्वतीदेवी जेव्हा स्नान करून बाहेर आली, तेव्हा त्यांनी हा प्रकार पाहिला आणि त्या संतापल्या.

- Advertisement -

ते धडावेगळं शिर पाहून तिने पूर्ण ब्रम्हांड हादरवून सोडलं. सर्व देव अगदी ब्रम्हदेवापासून सगळे देव पार्वतीची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात, पण पार्वती कोणाचं काहीही ऐकून घेत नाही. तेव्हा शंकर देव आपल्या गणाला आदेश देतात की, पृथ्वीतलावर जाऊन सर्वात आधी जो प्राणी दिसेल त्याचं शिर कापून घेऊन ये. गण बाहेर पडल्यावर सर्वात आधी त्याला हत्ती दिसला. तो त्याचं शिर घेऊन आला. भगवान शंकरांनी ते शिर पुतळ्याला लावले आणि त्या मूर्तीला जिवंत केले. हा पार्वतीचा मानस पुत्र गज (हत्ती) आनन (मुख) म्हणजेच गजानन होय. शंकर देवाने त्याला गणाचा ईश म्हणेज देव म्हणून गणेश नाव ठेवलं. हा दिवस चतुर्थीचा होता. त्यामुळे चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणून महत्त्व आहे.

हिंदू धर्मात भगवान श्री गणेशाला प्रथम पूजेचा मान आहे. कोणतंही कार्य असल्यावर सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते. कारण गणपती विघ्नहर्ता आहे. गणपतीची अनेक नावं आहेत. त्यापैकीच हे एक नाव विघ्नहर्ता अर्थात संकटांचं हरण करणारा असं आहे. म्हणून प्रत्येक शुभ कार्याच्या वेळी सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते. तसंच गणेशोत्सवाचा पहिला दिवस असतो गणेश चतुर्थीचा. या दिवशीच प्रारंभ होतो गणेशोत्सवाला. गणेशाच्या आगमनाने सगळीकडेच भक्तीमय वातावरण दिसून येते.

- Advertisement -

आकर्षक सजावट आरास केलेल्या ठिकाणी गणेशमूर्तीला स्थान दिले जाते. लोक दररोज सकाळ-संध्याकाळ गणेशाची आनंदाने आरती होते. हा सण लहानपणापासून थोरांपर्यंत या सर्वांना खूप आवडतो. गणेशाला गोड गोड नैवेद्य दाखवला जातो. त्यात मुख्य पदार्थ असतो तो म्हणजे गणेशाला आवडता मोदक. असा हा सण किमान दीड ते कमाल २१ दिवसांपर्यंत साजरा केला जातो. गणेशोत्सव घरी तसेच सार्वजनिक ठिकाणी आनंदाने साजरा केला जातो.

गणपतीला सर्वात प्रिय असणारा नैवेद्य म्हणजे मोदक. गणपतीला ११ किंवा २१ मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. हे मोदक नारळाचं सारण आणि तांदळाच्या उकडीने तयार केले जातात किंवा तळणीचे ही मोदक केले जातात. आजकाल तर मोदकांमध्ये अनेक व्हरायटी उपलब्ध आहेत. गणेश चतुर्थीच्या प्रचलित आख्यायिकेप्रमाणे एकदा गणपती चतुर्थीला आवडते मोदक खाऊन आपल्या आवडत्या वाहनावरून उंदराच्या पाठीवरून जात होता.

तेव्हा वाटेत साप पाहून उंदीर घाबरला आणि भीतीने थरथरू लागला. यामुळे गणपती उंदरावरून खाली पडला. त्याच्या पोटातून मोदक बाहेर आले. गणपतीने सारे मोदक पुन्हा पोटात टाकले आणि पोटावर साप बांधला. हे दृश्य पाहून चंद्र हसला. हे पाहून गणपतीने चंद्राला शाप दिला की, चतुर्थीला कोणीही तुझे दर्शन घेणार नाही. जो तुला बघेल त्याच्यावर चोरीचा आळ येईल. अशी आख्यायिका प्रचलित आहे. त्यामुळे आजही लोकं चतुर्थीला चंद्राकडे पाहात नाहीत.

गणपतीची पूजा करताना नेहमी दुर्वांची जुडी वाहिली जाते. कारण बाप्पाला दुर्वा फारच प्रिय आहेत आणि त्यामुळे गणपती प्रसन्न होतो. गणपतीला नेहमी २१ दुर्वांची जुडी प्रामुख्याने वाहिली जाते. गणपतीच्या डोक्यावर दुर्वा वाहिल्या जातात त्यामागेही एक आख्यायिका आहे. अनलासूर नावाच्या एका असुराने स्वर्ग आणि पृथ्वीवर उच्छाद मांडला होता. त्याच्यापासून सुटका व्हावी म्हणून गणेशाला गार्‍हाणे घालण्यात आले.

गणपतीने त्या अनलासूराला गिळले आणि सर्वांचा त्रास संपला, पण त्या राक्षसाला गिळल्यामुळे गणपतीच्या पोटात प्रचंड आग सुरू झाली. काही केल्या ती थांबेना. यावर कश्यप ऋृषींनी बाप्पाला दुर्वांचा रस प्यावयास दिला. तो प्राशन केल्यावर गणपतीच्या पोटातील आग थांबली आणि तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडत्या झाल्या. तेव्हापासून गणपती पूजेत दुर्वा आवर्जून वाहिल्या जातात.

दुर्वांप्रमाणेच गणपतीला प्रिय आहे ते जास्वंदाचं लाल फूल. कारण गणपतीचा वर्ण शेंदरी किंवा लाल आहे. त्यामुळे गणपती पूजेत जास्वंदाच्या लाल फुलाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे गणपतीला जास्वंदीच्या फुलांचा हार प्रामुख्याने वाहिला जातो.
अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन तलाव, नदी किंवा समुद्रात केले जाते.

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत सारे जण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात. अनेक सार्वजनिक मंडळे या काळात सामाजिक, ऐतिहासिक, तसेच पौराणिक सुंदर देखावे या काळात करतात. भारतात वेगवेगळे स्पर्धांचे आयोजन सार्वजनिक मंडळे करतात. यामुळे सर्वत्र आनंदी उत्साही वातावरण दिसून येते.

सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथम सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली. यानिमित्ताने सर्व लोक एकत्र येतील व विचारांची देवाणघेवाण होईल, हा उद्देश टिळकांचा होता. स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू केलेल्या या उत्सवाचे स्वरूप आता विस्तारले आहे.

लोकमान्य टिळकांनी स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार व स्वराज्य या ‘चतुःसूत्री’ कार्यक्रमाचा या उत्सवाच्या माध्यमातून पुरस्कार केला,पण टिळकांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सव सार्वजनिक केला, तो उद्देश आता राहिला नाही.

जसा जातीजातीतील वैरभाव विसरून समस्त हिंदूंनी हिंदू म्हणून एकत्र यावे याकरिता त्यांना गणेशोत्सव हवा होता, त्याप्रमाणे देशाच्या एकात्मतेवर आघात करणार्‍यांवर प्रतिहल्ला करावा यासाठीही त्यांना गणेशोत्सव हवा होता.

आज जे घडते आहे, ते असह्य होत आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव संस्कृती जपणारा आणि देशाचे सामाजिक ऐक्य, गौरव वाढवणारा असावा याची काळजी आपण घेतली पाहिजे. आज सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये किती मंडळे पर्यावरणाचा विचार करून इको फ्रेंडली मूर्ती बनवणे हे आपले प्रथम कर्तव्य मानतात? पूर्वी शाडूच्या मातीपासून गणपतीच्या मूर्ती बनवल्या जात असत, पण आजच्या काळात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवल्या जातात, पण या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्यामुळे पाणी प्रदूषित होते.

त्यामुळे आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला पाहिजे. आपण सगळ्यांनी प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक उत्सव साजरे केले पाहिजेत. गणपती विसर्जनात म्हणेजच मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा उपयोग करायाला हवा. समाजाला चांगला मार्ग दाखवण्याचे काम गणेश मित्र मंडळांनी करायाला हवे. यासाठी प्रत्येक माणसाने ठरवावे की आपण उत्सव साजरे करत आहोत त्याने पर्यावरणाला काहीही हानी होता काम नये व त्यासाठी प्रत्येकाने झटायला हवे व याने गणेश उत्सवाचे महत्व नक्कीच वाढेल.

दरवर्षी गणेश उत्सव आला की सगळीकडे गणेश स्पर्धांविषयी फक्त जाहिराती दिसू लागतात. या स्पर्धा कशासाठी हा एक मोठाच प्रश्न मला पडतो. इथे निकष गणपतीच्या प्रसिद्धीवरती ठरवले जातात. हा नवसाचा गणपती, हा अमुक गणपती, तो तमुक गणपती, ही विशेषणे कोणी निर्माण केली? गणपती हे विघ्नहर्ता, बुद्धिदेवता आहे. तो काय एका गल्लीतल्या भक्तांना पावणारा आणि दुसर्‍या गल्लीतल्या भक्तांना पावणार नाही, असे होऊ शकते का? लोकमान्य टिळकांनी दिलेला हा वारसा प्राणपणाने जपण्याची गरज आहे. या उत्सवामागचे हेतू बदलले असले तरी उत्सवाचे स्वरूप प्रबोधनात्मकच असावे असे वाटते. याचा विचार करायची तसदी आम्ही कधीच घेत नाही.

उत्सवातून प्रबोधनाचा वारसा कसा हद्दपार होत चालला आहे यावर आपसूकच बोट ठेवतो. आगमन व विसर्जन मिरवणुकीच्या वेळेला ढोल-ताशांचा आवाज प्रचंड असतो. त्यामुळे लहान मुले व आजारी माणसांना त्रास होतो. त्याला प्रतिबंध घालणयासाठी आपण पुढाकार घेणे आवश्यक आहे. तसेच पाद्यपूजन सोन्या-चांदीची पावले, कलाकारांची गर्दी… अशा झगमगाटात उत्सव हरवत चालला आहे. रात्री मंडपामध्ये कार्यकर्ते जमले तरी त्यातले दोन कामात आणि बाकीचे फ्री वायफायमध्ये हरवलेले असतात. आता समाज प्रबोधनाच्या देखाव्यांमधून दिले जाणारे संदेश ऐकण्यासाठी लोकांकडे वेळ नाही, पण उत्सवातून सुरू असलेल्या दिखाव्यांमधून सेल्फी किंवा फोटो काढण्यासाठी मात्र मोठ्या प्रमाणात ऊर्जा खर्ची पडताना दिसते.

हे चित्र बदलण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे गंभीरपणे विचार करण्याची वेळ अन्यथा गणेशोत्सवातील समाज प्रबोधन हे लवकरच इतिहासजमा झाल्याचे चित्र सर्वांना पहायला मिळेल. चित्र फारसे आशादायी नसले तरी तो विघ्नहर्ता या समस्येतून मार्ग काढण्यासाठी मार्ग दाखवेल, अशी आशा या उत्सवातील सच्चा कार्यकर्त्याला वाटतेय. लोकमान्य टिळक यांना अपेक्षित असलेला गणपती उत्सव आणि सध्या सुरू असलेला उत्सव यात खूपच तफावत दिसून येते. सध्या मात्र गणेशोत्सवाचे बदलते स्वरूप पाहता टिळकांना अपेक्षित होता असा उत्सव आपण साजरा करत आहोत का, हाच मोठा प्रश्न आहे. सध्याच्या कालमानानुसार सार्वजनिक गणेशोत्सवाला नवे वळण लावणे सामाजिक हिताच्या व प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक आहे. हेच तुझ्याकडे मागणे आहे

गणराया!
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

–( लेखिका सामाजिक विषयांच्या अभ्यासक आहेत)

- Advertisment -