घरफिचर्ससारांशराष्ट्रनिर्मिती करणारा पेशा !

राष्ट्रनिर्मिती करणारा पेशा !

Subscribe

शिक्षक या नात्याने माझे राष्ट्रउभारणीत महत्वाचे योगदान असायला हवे याचे सतत भान शिक्षकाला ठेवावे लागते. शिक्षकी पेशा म्हणजे केवळ सरकारी नोकरी नाही. ते काम राष्ट्रनिर्मितीचे आहे. त्यामुळे जगातील कोणत्याही समाजसेवेपेक्षा या पेशातील प्रामाणिकपणाने केलेले काम ही राष्ट्राची सर्वोत्तम व उत्तम समाजसेवा आहे. त्यामुळे शिक्षक जे पेरतात ते भविष्यात उगवत असते. राष्ट्राला लागणारे उत्तम मनुष्यबळ हे शिक्षणातून पेरले जात असते. ते उत्तम दर्जाचे मनुष्यबळ हे राष्ट्राच्या विकासात महत्वाचे मानले जाते. त्यामुळे केवळ वर्गात मी शिकवितो आणि परीक्षा घेतो एवढेच महत्वाचे नाही, तर उद्याच्या भारताची निर्मिती या चार भिंतीच्या आत केलेल्या पेरणीतून होत असते, याची प्रखर जाणीव शिक्षकाला ठेवावी लागते.

आपली पंरपरा, संस्कृती ही कृतज्ञता व्यक्त करणारी आहे. ज्यांनी आपल्या समाज व राष्ट्र निर्मितीसाठी निरपेक्षतेने कार्यरत राहून, त्याग करत योगदान दिले त्यांच्याबददल आपण सतत ऋण मान्य केले आहे. शिक्षकी पेशा हा त्यापैकी एक आहे. ही काही सरकारी नोकरी नाही. शिक्षक हा भविष्याचा निर्माता आहे. वर्गाच्या चार भिंतीच्या आत केल्या जाणार्‍या पेरणीतून उद्याचा समाज व राष्ट्र उभे राहत असते. त्यामुळे त्याने केलेली पेरणी हेच राष्ट्राचे खरे भविष्य असते. स्वप्न महासत्तेचे असू दे नाही तर प्रगत राष्ट्राचे, ते पूर्ण करण्याचा मार्ग शिक्षकांच्या स्वप्नातूनच जातो. त्यामुळे शिक्षक अधिक समृध्द आणि अधिक ज्ञानसंपन्न असल्याशिवाय आपण प्रगती करू शकणार नाही. त्यामुळे शिक्षक दिनी त्यांचा सन्मान करण्याबरोबर त्यांच्या उन्नतीकरीता त्यांची सोबत करण्याची जबाबदारी समाज व राज्यकर्त्यांची आहे हेही लक्षात घ्यायला हवे. शिक्षकांना अपमानित करून आपण महान राष्ट्र होऊ शकणार नाही हे लक्षात घ्यायला हवे. त्याचवेळी समाजमनात असे बदल का होता आहेत याबद्दलही आत्मपरीक्षण करण्याची गरज अधोरेखित झाली आहे हेही लक्षात घ्यायला हवे.

शिक्षकी पेशात काम करणार्‍या प्रत्येकाची काही स्वप्न असतात. स्वतःच्या भौतिक सुविधांच्या प्रगतीपेक्षा त्याला राष्ट्र विकासाच्या वाटा खुणावत असतात. कलाम म्हणतात की, शिक्षकाला विद्यार्थीरूपी युवा शक्ती घडवायची आहे. तीच या पृथ्वीतलावरची मोठी संपत्ती आहे. शिक्षकीपेशात असलेल्या माणूस जितका श्रीमंत असतो तितका दुसरा कोणी श्रीमंत असण्याची शक्यता क्वचित असेल. प्रत्येक शिक्षकासाठी विद्यार्थी ही मोठी श्रीमंती आहे. विद्यार्थ्यांवर केले जाणारे संस्कार, त्यांच्या मस्तकात पेरली जाणारी स्वप्ने ही राष्ट्रसेवेइतकीच महत्वाची आहेत. नरेंद्र दत्त यांच्या आयुष्यात इंग्रजी विषय शिकविणारे प्राचार्य आले नसते, तर त्यांचा नरेंद्र दत्त ते विवेकानंद असा प्रवास सुरू झाला नसता. एक शिक्षक अनेकांचे आयुष्य समृध्द करीत असतो. त्या समृध्दतेचा प्रवास हा सर्वांसाठी महत्वाचा आहे. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी त्यांचे प्राथमिक शाळेतील शिक्षक अब्दुल करीम यांचे ऋण व्यक्त करताना अत्यंत प्रेरक भावना व्यक्त केल्या आहेत. त्या वाचल्या की या पेशाचे महत्व प्रतिबिंबीत झाल्याशिवाय राहात नाही. कलामानी देखील म्हटले आहे, की त्यांच्या आयुष्यात फादर रेक्टर कलाथिल नावांचे शिक्षक आले होते. दर सोमवारी ते आईन्स्टाईन, गौतमबुध्द, महात्मा गांधी, अब्राहम लिंकन यांचा जीवनप्रवास कथन करायचे. त्यातून जीवन घडविण्याचा प्रवास कथन करताना कोणते गुण जीवनात हवेत याची जाणीव व्हायची. त्यातून जीवनाची पाऊलवाट सुरू झाली. एक शिक्षक काय करतो तर विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवितो. विद्यार्थ्यांची जीवन घडविण्याकरीता त्याला विविध मार्गाने जावे लागते. तो मार्ग चालताना त्रास होईल, पण तो प्रवास अनुसरणे आवश्यक आहे, शिक्षकांना युवाशक्ती घडवायची आहे. ती युवा शक्तीच पृथ्वीतलावरची मोठी शक्ती आहे. ती शक्ती कोणत्या विचाराने घडविली जाते हे महत्वाचे आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयात शिक्षक विचाराची पेरणी कशी करतात त्यावर त्या शक्तीचे मार्गक्रमण करणे सुरू असते. युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती आणि त्यांची जडणघडण हीच राष्ट्रभक्ती आहे. त्यांच्या मनात होणारी पेरणीच उद्याचे राष्ट्र घडविणारे असते. खरेतर जीवनभर पुरते ते शिक्षण असते. त्यामुळे त्या शिक्षणातील पेरणी खूप महत्वाची आहे. कधीकाळी या देशाने उत्तम गुरूजी पाहिले आणि अनुभवले आहेत म्हणूनच अनेकांचे आयुष्य पुढे गेले आहे. आज दिसणारा भारत अनेकांच्या योगदानातून उभा आहे, मात्र त्याचवेळी त्यांना घडविणारा शिक्षकही तितकाच महत्वाचा आहे हे लक्षात घ्यायला हवे. एकूणच प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शिक्षकांचे योगदान महत्वपूर्ण असते.

- Advertisement -

शिक्षक या नात्याने माझे राष्ट्रउभारणीत महत्वाचे योगदान असायला हवे याचे सतत भान शिक्षकाला ठेवावे लागते. शिक्षकी पेशा म्हणजे केवळ सरकारी नोकरी नाही. ते काम राष्ट्रनिर्मितीचे आहे. त्यामुळे जगातील कोणत्याही समाजसेवेपेक्षा या पेशातील प्रामाणिकपणाने केलेले काम ही राष्ट्राची सर्वोत्तम व उत्तम समाजसेवा आहे. त्यामुळे शिक्षक जे पेरतात ते भविष्यात उगवत असते. राष्ट्राला लागणारे उत्तम मनुष्यबळ हे शिक्षणातून पेरले जात असते. ते उत्तम दर्जाचे मनुष्यबळ हे राष्ट्राच्या विकासात महत्वाचे मानले जाते. त्यामुळे केवळ वर्गात मी शिकवितो आणि परीक्षा घेतो एवढेच महत्वाचे नाही, तर उद्याच्या भारताची निर्मिती त्या चार भिंतीच्या आत केलेल्या पेरणीतून होत असते. कोठारी आयोगानेदेखील या चारभिंतीचे मोल नमूद केले आहे. त्या चार भिंतीच्या आत आपण जे पेरणार असतो ते उगवते. त्यामुळे राष्ट्रउभारणीच्या कामात शिक्षकांचे स्थान अनन्य साधारण आहे. शिक्षक म्हणून काम करताना हे काम राष्ट्र उभारणीचे मानले तर हे मनुष्यबळाचा विचार किती गांभीर्याने करण्याची गरज आहे हे सहजपणे लक्षात येईल. शिक्षकाला पेरणी करण्यासाठी लागणारे उत्तोमत्तोम विचारांचे बळ त्याला प्राप्त करावे लागेल. पुस्तक वाचन्याबरोबर समाज वाचावा लागेल. त्यातून उद्यासाठी प्रकाशाची पेरणी करत प्रकाशाचे दूत बनावे लागेल. त्यांच्या ज्ञानप्रकाशानेच उद्याचा अज्ञानाचा अंधकार नष्ट होणार आहे. त्यामुळे शिक्षक म्हणून स्वतःला सतत ज्ञानाची साधना करावी लागणार आहे.

शिक्षक जीवनभर विद्यार्थ्यांशी नाते जपून असतात. त्यांच्यावर प्रेमाचा आणि ज्ञानाचा सतत वर्षाव करत असतात. विद्यार्थी शाळेत येताना स्वतःचे घर, माणसं सोडून आलेले असतात. ते आईबाबांपासून दूर असतात. अनेकदा काही विद्यार्थी अनाथ असतात. काही आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करीत असतात अशा विद्यार्थ्यांना समजावून घेणे, त्याचेशी प्रेमाने वागणे हे शिक्षकाला करावेच लागते. शिकण्यासाठीचा पहिला धडा हा पुस्तक शिकविण्याचा नसून विद्यार्थ्यांवर प्रेम करणे, त्यांच्याशी नाते बांधण्याचा आहे. शिक्षक ती वाट सातत्याने चालत असतात. शिक्षणांच्या प्रक्रियेत कार्यरत असणार्‍याचा पहिला स्वभावधर्म प्रेम आणि जिव्हाळा हेच गुण आहेत. पूर्वी शिक्षकांना मास्तर असे म्हटले जायचे. यात मा + स्तर म्हणजे आईच्या स्तरावरून जाऊन विद्यार्थ्यांना समजावून घेतो तो शिक्षक असतो. त्या अर्थांने आईचा स्तराचा अर्थच प्रेम आणि जिव्हाळा सामावलेला असणे असाच होतो. त्यामुळे जेथे शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये जेथे प्रेम आणि जिव्हाळ्याचे नाते निर्माण करण्याचे काम शिक्षक करत असतो. शिक्षकी पेशाची जबाबदारी पेलताना शिक्षकांनाच अनेकदा बदलावे लागते. त्याला स्वतःला ही वाट कठीण वाटत असली तरी पेलावी लागते. शिक्षकाला माणूस म्हणून एका उंचीवर सतत उभे राहावे लागते. त्यामुळे इतर कोणी चुकला तर समाज मान्य करतो, मात्र शिक्षकांची थोडीशी चूकही समाजाला स्वीकारताना जड जात असते.

- Advertisement -

शिक्षकाला सतत सामाजिकदृष्ठ्या भान ठेऊन काम करावे लागते. जबाबदारीची जाणीव सतत ठेवावी लागते. त्यांच्या प्रामाणिकतेच्या वाटेवरच पेशाची उंची अवलबूंन असते. आज शिक्षकीपेशाबद्दल चांगले बोलले जाते तसे वाईट बोलणार्‍यांची संख्याही वाढत आहे. वर्तमानपत्रापासून तर विधिमंडळापर्यंत एक नकारात्मक भावनेचे दर्शनही घडते आहे. त्या भावना शंभर टक्के खर्‍या नसतीलही पण, तरीसुध्दा जे बोलले जाते आहे त्याबाबतीतदेखील विचार करण्याची गरज आहे. समाजात वाढत जाणार्‍या नकारात्मकतेच्या संदर्भाने आत्मपरीक्षणच करण्याची गरज अधोरेखित होऊ लागली आहे. ते आत्मपरीक्षणच शिक्षकीपेशाला योग्य उंचीवर घेऊन जाईल. ते प्रत्येक योग्य पाऊल या देशाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारे ठरेल यात शंका नाही. त्यामुळे या विचाराने आपला प्रवास सुरू ठेवला तर समृध्दतेची वाटचाल झाल्याशिवाय राहणार नाही. शिक्षकीपेशाची हरवलेली प्रतिष्ठा, सन्मान आणि प्रतिमा पुन्हा प्राप्त करता येईल. शिक्षक हा पुन्हा राष्ट्रनिर्माता ठरेल. ती प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त करता येईलही. प्रत्येक दिवशी अध्ययन अध्यापनात आंनदाने कार्यरत राहणे. प्रत्येक गोष्टीत आनंद मिळवत राहाणे. रोज नव्या ज्ञानाचा वाटा चालत राहणे, स्वतःच्या समृध्दतेसाठी सातत्याने प्रयत्न करत राहणे घडत गेले तर जीवनाची उंची गाठणे अशक्य नाही. त्यातून शिक्षकी पेशाची उंची गाठणेही शक्य आहे, मात्र त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करावी लागेल हे मात्र निश्चित.

संदीप वाकचौरे
(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -