चड्डी बनियान स्टाईल!

चड्डी बनियान गँग ही 90 च्या दशकात भारताच्या कानाकोपर्‍यात फेमस झालेली एक गँग होती, जिच्याबद्दल ऐकून एक पिढी मोठी झाली आहे. चड्डी बनियान घालून, तोंडावर रुमाल गुंडाळत आणि अंगाला माती किंवा तेल लावलेले हे दरोडेखोर चोरीची एक विशेष पद्धत फॉलो करायचे. अतिशय निर्घृणपणे चोरीत अडथळा ठरणार्‍या लोकांची हथोडे किंवा कुर्‍हाडीने ते हत्या करायचे आणि नंतर घर अस्ताव्यस्त करून पसार व्हायचे. ‘दिल्ली क्राईम -2’ या वेबसिरीजची कथा याच टोळीवर आधारलेली आहे, फक्त ही कथा वर्तमानात घडते.

ANIKET MASKE_

भारतात सिनेमा किंवा वेबसिरीजच्या सिक्वल्सकडून ते उत्तम असतील अशी अपेक्षा ठेवणं, प्रेक्षकांनी कधीचंच सोडलंय. उत्तम सिनेमांचे निराश करणारे अनेक सिक्वल्स आपण पाहिलेत आणि त्याची आता आपल्याला सवयदेखील पडलीये. 10 पैकी एखादा सिक्वल सोडला तर बाकी सर्व भ्रमनिरासच करतात, नेटफ्लिक्सदेखील याला अपवाद नाहीत. 2019 साली नेटफ्लिक्सने ‘दिल्ली क्राईम’ नावाची एक सिरीज प्रदर्शित केली होती, ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. प्रतिष्ठेचा मानला जाणारा एमी अ‍ॅवॉर्ड मिळाल्यानंतर जेव्हा निर्मात्यांनी दिल्ली क्राईमचा दुसरा सिझन जाहीर केला, तेव्हा या भागाकडून अपेक्षादेखील वाढल्या. दिल्लीतील निर्भया केसवर आधारित कथा या वेबसिरीजच्या पहिल्या भागात दाखविण्यात आली होती आणि त्या कथेचा शेवटदेखील पहिल्याच सीझनमध्ये करण्यात आला होता. पहिली कथा संपवल्यावर आता सिक्वलमध्ये पूर्णतः नवीन कथा असेल, हे निर्मात्यांनी आधीच स्पष्ट केल्याने या सीझनचा पहिल्या सीझनच्या कथेशी थेट संबंध नव्हता, केवळ पात्रं जुनी आणि कथा नवीन असं या सीरिजच्या दुसर्‍या भागाचं स्वरूप आहे.
निर्भया केसशी कुठलाही संबंध नसलेली एक नवीन केस चड्डी बनियान गँग यावेळी डीसीपी वर्तिका चतुर्वेदी आणि त्यांच्या टीमसमोर आहे. फक्त हा सिझन बघताना सिक्वल म्हणून न पाहता नवीन विषय म्हणून पाहावा लागेल, जर भूतकाळातील काही संदर्भ आपल्याला या भागात पाहायला मिळतील, अशी काही अपेक्षा जर तुम्ही ठेवली तर मात्र तुमचा भ्रमनिरास होईल. कारण पात्र वगळता इतर कुठलाही भूतकालीन संदर्भ या भागात दाखविण्यात आलेला नाही. तरीही ‘दिल्ली क्राईम 2’ ही त्या 10 पैकी एक सिरीज नक्कीच बनते, जी सिक्वल म्हणून यशस्वी आहे आणि प्रेक्षकांच्या तिच्याकडून असलेल्या अपेक्षा बर्‍यापैकी पूर्ण करेल. दिल्ली क्राईम केवळ एक सामान्य क्राईम थ्रिलर नाहीये, ती एकाच वेळी गुन्हेगारी जमातींप्रति असलेल्या समाजाच्या सद्य:कालीन दृष्टिकोनासोबतच, दिल्ली पोलिसांची कार्यपद्धती या दोन्ही मुद्यांना प्रभावी पद्धतीने न्याय देते. रिची मेहताच्या जागी दिग्दर्शकाची भूमिका मिळालेला तनुज चोप्रा, पहिल्या भागात गवसलेला सूर कुठेच हरवू नदेता आणि सादरीकरणाचा साधेपणा जपत सीरिजला पूर्ण करतो.

चड्डी बनियान गँग ही 90 च्या दशकात भारताच्या कानाकोपर्‍यात फेमस झालेली एक गँग होती, जिच्याबद्दल ऐकून एक पिढी मोठी झाली आहे. चड्डी बनियान घालून, तोंडावर रुमाल गुंडाळत आणि अंगाला माती किंवा तेल लावलेले हे दरोडेखोर चोरीची एक विशेष पद्धत फॉलो करायचे. अतिशय निर्घृणपणे चोरीत अडथळा ठरणार्‍या लोकांची हथोडे किंवा कुर्‍हाडीने ते हत्या करायचे आणि नंतर घर अस्ताव्यस्त करून पसार व्हायचे. दिल्ली क्राईम 2 ची कथा याच टोळीवर आधारलेली आहे, फक्त ही कथा वर्तमानात घडते. एका सकाळी डीसीपी वर्तिका चतुर्वेदीला फोन येतो आणि एका हत्याकांडाबद्दल माहिती दिली जाते, सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर ही दरोड्याची घटना आहे आणि यात चोरी करणारे चड्डी बनियान गँगप्रमाणे काम करताय हे तिला कळत. तपास सुरू होतो आणि दरम्यानच्या काळात दिल्लीतील धनाढ्य परिसरात एकटे राहणार्‍या वयस्क लोकांना टार्गेट करत या घटना वाढायला लागतात. चड्डी बनियान गँगचे गुन्हेगार एका विशिष्ट समूहाचे होते, म्हणून संशयाची सुई दिल्लीत राहणार्‍या त्या लोकांवर येऊन थांबते आणि गुन्हेगारीचा इतिहास असलेल्या अनेकांना पोलीस ताब्यात घेतात. पुढे काय होतं? यासाठी सिरीज पाहावी लागेल. ज्या लोकांच्या घरी पोलीस धाडी टाकतात आणि ज्यांचा उल्लेख सिरीजमध्ये डिनोटिफाइड ट्राइब्स असा करण्यात आलाय, ते लोक आहे तरी कोण? 1871 साली ब्रिटिशांनी काही जातींचा उल्लेख क्रिमिनल ट्राइब्स असा केला, हे तेच लोक आहेत ज्यांना पोलीस संशयित म्हणून चौकशीसाठी बोलावतात.

स्वातंत्र्यांनंतर भले या लोकांचा गुन्हेगार जाती असा उल्लेख काढला गेला, पण गुन्हेगार म्हणून मिळालेली ओळख संपली नाही, हाच धागा पकडत समाजाचा आणि काही पोलिसांचा या समुदायातील लोकांबद्दल असलेला दृष्टिकोन या सीरिजच्या माध्यमातून दाखवण्यात आलाय. आजही भारताच्या विविध भागात या जातींबद्दल असणारा समज बदललेला नाही, गावात कुठेही चोरी झाली तरी गावाबाहेर असलेल्या पारध्याच्या झोपडीचं दार ठोठावण्याची मानसिकता अजूनही अस्तित्वात आहे. सिरीजमधला एक संवाद या परिस्थितीवर अतिशय चपखल असं भाष्य करतो, जेव्हा पोलीस इन्स्पेक्टर भूपिंदर संशयित आरोपींना पुन्हा त्यांच्या घरी सोडायला जातो, तेव्हा त्यातील एक जण म्हणतो आजसे पहिले पुलिस की गाडी हमे सिर्फ उठाने के लिये आती थी, आज पहिली बार छोडने आई है। सिरीजचं संपूर्ण सार या एकाच वाक्यात मिळाल्याचा फील मला तेव्हा आला होता.

दिल्ली क्राईमच्या पहिल्या सिझनमध्ये डीसीपी वर्तिका चतुर्वेदीच्या वैयक्तिक आयुष्यात घडणार्‍या गोष्टी दाखविल्या होत्या, पण या सीझनमध्ये वर्तिकाच्या पात्राऐवजी सहायक पात्रांवर अधिकचा फोकस करण्यात आलाय. वर्तिकाच्या टीमचा भाग असलेले इन्स्पेक्टर भूपिंदर (राजेश तेलंग) आणि निधी सिंग (रसिका दुग्गल) यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडणार्‍या गोष्टींना या भागात फुटेज मिळालं आहे. भूपीचे स्वतःच्या मुलीसोबत असणारे संबंध आणि निधीच्या वैवाहिक जीवनात येणार्‍या अडचणी पोलिसांचं वैयक्तिक जीवन दाखविण्यात यशस्वी ठरतात. मागच्या भागाप्रमाणे इथं पोलिसांचं आयुष्य पुन्हा एकदा अधोरेखित केलंय, छोट्याशा गोष्टींसाठी ़फंड मिळावा म्हणून सिनियर्सकडे विनंती करणारी वर्तिका एका पोलीस व्यवस्थेचं प्रतिनिधित्व करते, तर दुसरीकडे मर्सिडीज असणारा तरी पेन्शनसाठी रडणारा रिटायर्ड इन्स्पेक्टर एका वेगळ्या पोलिसांच प्रतिनिधित्व करतो.

शेफाली शाहने आयपीएसची ट्रेनिंग घेतलीये काय, असा प्रश्न पडेल अशी काहीशी ती या सिरीजमध्ये दिसते. कारण सिनियर्स सोबत बोलणं असो किंवा मीडिया आणि सहकारी यांसोबत तिचा अभिनय कुठेच कृत्रिम वाटत नाही. सहायक पात्रं या सिरीजचा यूएसपी आहे, राजेश तेलंग, रसिका दुग्गल, आदिल हुसेन, अनुराग अरोरा या सर्वांचा अभिनय तर उत्तम आहेच, पण सरप्राईज पॅकेज ठरते ती या सिरीजमध्ये नकारात्मक भूमिकेत असणारी तिलोतिमा शोम… याआधी मी तिलोतीमाला सर नावाच्या एका सिनेमात पाहिलं होतं, पण या सिरीजमध्ये तिचं काम अत्यंत प्रभावी आहे. काही दृश्यात ती शेफाली शाहवरदेखील भारी पडताना दिसते. सिनेमॅटोग्राफी याहीवेळा उत्कृष्ट आहे, डेव्हिड बोलेनचा कॅमेरा दिल्लीतील गल्ल्यापासून हायक्लास सोसायटीपर्यंत प्रत्येक गोष्ट योग्य टिपतो. एडिटिंगदेखील उत्तम आहे म्हणून पाच भागांची ही मालिका कुठे रटाळ झालेली दिसत नाही. कथा अनेक लेखकांनी एकत्र येऊन लिहिलीये आणि तिचा शेवटदेखील परिपूर्ण केलाय. एकाचवेळी एकच गुन्हा, व्हिक्टिम, पोलीस आणि गुन्हेगाराच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळतो, यात या सीरिजच्या निर्मात्यांचं यश आहे. म्हणून एकदा तरी ही सिरीज नक्की पाहावी.

अनिकेत म्हस्के