घरताज्या घडामोडीआठवणीतले फेरीवाले

आठवणीतले फेरीवाले

Subscribe

"काका मला अंगठी"..."काका मला घड्याळ बनवून द्या"

त्याच्याभोवती जमलेली मुलं अशी काही काही फर्माईश करीत. त्याच्याकडे असलेल्या जाड लाकडी दांडीवर च्युईंग गमसारख्या गोळ्यातून तो थोडासा तुकडा ओढून काढे. त्यापासून कलात्मक पद्धतीने कधी अंगठी, कधी घड्याळ बनवून देई. मग मुले ऐटीत ती अंगठी चघळत चघळत इकडून तिकडे फिरत. खांद्यावर कावड घेऊन एक जण येत असे. एका बाजूला पत्र्याची ट्रंक, दुसर्‍या बाजूला थाळीमध्ये सुतरफेणीसारखा पदार्थ. छोट्या कागदाच्या तुकड्यावर तो खाऊ देत असे.

दुपारच्या वेळी हाक येई..”कल्है sss य.” मग बायका घरातील लहानमोठी पितळी पातेली घेऊन कल्हईवाल्याकडे जात. तोपर्यंत सावलीत एखाद्या कोपर्‍यात त्याने जागा बघून ठेवलेली असे. शेणामातीने लिंपलेल्या लहान भट्टीत तोवर कोळशांनी पेट घेतलेला असे. एका हाताने ब्लोअर फिरवत दुसर्‍या हाताने कोळशावर पातेले तापवत ठेवले जाई. ते चांगले तापले की त्यात नवसागराची पावडर टाकून कथीलाची तार फिरवली जाई आणि ताबडतोब कापडाच्या बोळ्याने कथील एकसारखा पसरवला जाई. या कामासाठी मोठे कसब लागे. रसरशीत तापलेल्या पातेल्यात हात घालून बोळा फिरवणे हे काम निश्चितच कौशल्याचे होते. कल्हई पूर्ण झाल्यावर ते पातेले पाण्यात बुडवल्यावर येणारा र्चर्रर्र असा आवाज अजूनही कानात घुमत आहे.

- Advertisement -

असे कितीतरी फेरीवाले आठवतात. आता ते फक्त आठवणीतच. दुपारच्या वेळी बोहारणी येत. जुने कपडे घेऊन त्या बदल्यात काचेच्या बरण्या, स्टीलची भांडी, प्लास्टिकच्या बादल्या वगैरे देत. ओसरीवर अशी एखादी बोहारीण आली की बायकांचा दुपारचा वेळ एकदम छान जाई. त्यांची ती व्यवहारातील घासाघीस, बोलाचाली बघण्यासारखी असे. ती बोहारीण सर्व कपड्यांचे बारकाईने निरीक्षण करीत असे. कुठले पातळ चांगले आहे, त्याला किती दंड घातले आहे यावर त्याची किंमत ठरे. पूर्वी पातळ फाटले की ते एकदम बाजूला टाकले जात नसे. ते शिवून वापरले जाई. त्यालाच दंड घालणे असे म्हणत.

असाच एक तेलीबाबा आमच्याकडे येत असे. त्याचे खरे नाव माहीतही नव्हते. सर्व जण त्याला तेलीबाबाच म्हणायचे. गुडघ्यापर्यंत धोतर, अंगात बंडी, डोक्यावर काळी टोपी, अंगाने स्थूल, अंतर्बाह्य तेलकट. डोक्यावरची टोपी काढून तो त्यात पैसे, हिशोबाची डायरी ठेवत असे. दोन हातात दोन किटल्या. मोठ्या किटलीत गोडेतेल आणि लहान किटलीत खोबरेल तेल. कधी एखाद्या खेड्यातील शेतकरी येई. घरीच बनवलेले साजूक तूप किंवा पांढर्‍या तलम कापडात गुंडाळून आणलेला खवा तो घेऊन येई. गावठी, गावरान पदार्थांची ओळख व्हायला सुरुवात झाली ती त्यांच्यापासूनच. पाटा वरवंटा गुळगुळीत झाला की तो पुन्हा छिन्नीने पहिल्यासारखा करणार्‍या वडारी बायका येत. “पाट्याला टाकी लावा ओ बाय..” अशी त्यांची हाक कानावर पडे. डोक्यावरच्या पाटीत सुया, बिब्बे, सागरगोटे घेऊन काही जणी येत. सकाळी एक पाववाला येई. त्याच्याकडच्या पाटीत पाव असे, पण अजून पाव, बिस्कीट वगैरे गोष्टींना फारशी प्रतिष्ठा प्राप्त झाली नव्हती. अगदी बेकरी प्रॉडक्ट आणायचेच असेल तर धामणकरांचा आदर्श ब्रेड होताच.

- Advertisement -

आता तर सगळ्याच वस्तू दारावर विकायला येतात. वॉशिंग पावडर असो की साबण तेही गल्लोगल्ली विकायला फेरीवाले जाऊ लागले. डोकेदुखीवरचा बाम घेऊन मध्यंतरी एक जण रिक्षात फिरत होता. परवा एका टेम्पोमध्ये एक जण खोबर्‍याच्या वाट्या विकायला घेऊन आला होता. भाजीपाला, कांदे, बटाटे तर कधीचेच दाराशी विकायला आले. डोक्यावर पाटी घेऊन मासळी विकणारे भय्ये मुंबईत जागोजागी दिसतात.

अ‍ॅल्युमिनियमच्या पातेल्यात इडली-डोसे घेऊन दाक्षिणात्य मंडळी दारोदार फिरू लागले. उसाचा रस काढण्याचे डिझेलवर चालणारे मशीन घेऊन ग्रामीण भागातील लोक गल्ल्यागल्ल्यांतून फिरू लागले. डमरूसारख्या लाकडी स्टँडवर थाळी ठेवून पाणीपुरी, चनाचाट सर्वत्र मिळू लागले. बिहारी युवक कापडांचे गठ्ठे घेऊन फिरू लागले. काश्मिरी तरुण गालीच्यांचे भारे खांद्यावर घेऊन येऊ लागले. पूर्वी अठरापगड जातीचे लोक दारोदार फिरत. आता अठरापगड राज्यांचे लोक फिरू लागले आणि एका अर्थाने सारा भारत एक झाला.

 – सुनील शिरवाडकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -