घरफिचर्ससारांशपद्धतीत बदलाची गरज!

पद्धतीत बदलाची गरज!

Subscribe

एखाद्या कृतीचा जर हवा तसा परिणाम आपल्याला प्राप्त होत नसेल तर आतापर्यंत ज्या रितीने आपण ती कृती करीत आलो आहोत त्या पद्धतीमध्ये बदल केल्यानंतरच आपल्याला हवा तसा नेहमीपेक्षा वेगळा परिणाम हाती लागण्याची शक्यता असते. कृषी क्षेत्राबाबतही असेच झाले आहे. जर कित्येक गोष्टी करूनही येथील शेती व शेतकर्‍यांची मूळ हलाखीची परिस्थिती बदलत नसेल, त्यांच्या शेतमालाला भाव मिळत नसेल, तर आतापर्यंत ज्या दिशेने आपण काम करीत आलो त्या दिशेला तपासून घ्यायला हवे. काही आवश्यक बदल करायला हवेत. तरच वेगळा परिणाम आपल्या हाती लागेल यात तीळमात्र शंका नाही.

-अमोल पाटील

कृषिप्रधान देश म्हणून तुमच्या माझ्या या आपल्या भारत देशाची सबंध जगात ओळख आहे. कारण इथला शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. शेती आणि शेतकरी आपल्या देशाच्या अगदी प्रत्येक क्षेत्राशी प्रत्यक्ष तथा अप्रत्यक्ष संबंधित असणारे अविभाज्य घटक आहेत. त्यामुळे येथील अर्थकारण, राजकारण आणि समाजकारण शेती आणि शेतकरी या घटकांपासून विभक्तरित्या आपण विचारही करू शकत नाही. या देशाची समृद्धी इथल्या उज्जवल अशा शेतीपरंपरेच्या माध्यमातूनच आकाराला येऊ शकते, साकार होऊ शकते हे अगदी प्रत्येक अर्थतज्ज्ञ मान्य करू शकतील.

- Advertisement -

अगदी पूर्वापार आपल्या देशाचा विचार केला आणि तत्कालीन समृद्धीचा उहापोह केला तर आपल्या लक्षात येईल की येथील समृद्धीमागे येथील शेतकर्‍याची व शेतीची समृद्धी कारणीभूत होती. शेतकर्‍याचे मन, हृदय, त्यांची परोपकाराची भावना आणि ‘अन्नदान हे श्रेष्ठदान’ याचे त्यांच्या लेखी असलेले महत्त्व अशा कितीतरी बाबींवर इथला शेतकरी सतत अव्वलच राहिला आहे. म्हणूनच की काय त्याला बळीराजा, शेतकरी राजा, जगाचा पोशिंदा म्हणून आपण संबोधत आलो आहोत.

काळ पुढे पुढे जात राहिला आणि जसे वेगवेगळ्या क्षेत्रात अनेकानेक बदल झाले त्या बदलांचा त्या त्या क्षेत्रावर कधी चांगला तर कधी वाईट परिणाम होत गेला. याबाबत शेती क्षेत्रही अपवाद नाही. बेभरवशाचा पाऊस, अत्यंत महाग होत चाललेली लागवड, शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव, मुलांचे शिक्षण, नोकरी आणि लग्नाचे प्रश्न, कधी बोगस बियाणांमुळे दुबार तिबार कराव्या लागणार्‍या पेरण्या आणि दर दिवस वाढत चाललेल्या अर्थिक विषमतेच्या चक्रात सर्वाधिक होत चाललेली घुसमट असं सारं आजच्या संघर्षाशी दोन हात करीत लढणार्‍या शेतकर्‍यांची भीषण परिस्थिती आहे.

- Advertisement -

शेतकरी राजा कधीच कमजोर किंवा कमकुवत नव्हता आणि नसेल. जो सकल जगाच्या पोटासाठी अन्न पिकवतो, दिवसरात्र मातीत राबून एका दाण्याचे हजार दाणे करणारा हा किमयागार दातृत्वाचा उभ्या पृथ्वीतलावरील सर्वात मोठा आदर्श दाता आहे. त्याच्या दातृत्वाची आणि कष्टाची परतफेड करणे अशक्यच. त्याचे सारे कार्य आणि स्थान पाहून शेती आणि शेतकर्‍यांच्या विषयावर आता खरोखर चिंतन-विश्लेषण करून आज ज्या काही कारणांमुळे शेती व शेतकरी हा घटक दरदिवस अनेक अडचणींचा सामना करीत आहे त्या कारणांचा शोध घेऊन त्यास उपाय शोधून येथील शेती व शेतकरी घटकाला बळकटी देण्याचे काम प्राधान्याने करण्याची आज खरोखर गरज निर्माण झाली आहे.

जीवसृष्टीतील प्रत्येक घटकाला आपलं जीवन आपण आनंदाने, उत्साहाने जगावं असं मनोमन वाटत असतं. प्रत्येक जण याचसाठी धडपडत असतो. आपलं जीवन अधिकाधिक सुखी-समाधानी कसं होईल, आपलं कुटुंब आपल्याला स्थिरस्थावर कसं करता येईल यासाठीच तर प्रत्येकाची रोज धडपड सुरू असताना पाहायला मिळते. स्वतःच्या सुखासमाधानासाठी, आनंदासाठी मेहनत करणे व जीवनात काहीतरी करून दाखवण्याचे स्वप्न उरी बाळगून ते पूर्ण करण्यासाठी प्रचंड कष्ट करणे यात काहीही गैर नाही.

जसे हे स्वप्न पाहणे व ते सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करणे सगळेच करतात तसेच शेतकर्‍यांचेही असेल हे आपण कधीतरी समजून घेण्याची गरज आहे. शेतकर्‍यांनाही आपले एक चांगले आधुनिक सोयीसुविधांनी युक्त छोटेसेच का होईना पण हक्काचे घर असावे, आपल्याही मुलांना उच्चशिक्षित होता यावे, त्यांना चांगल्या नोकर्‍या मिळाव्या, त्यांचेही थाटामाटात लग्नसोहळे पार पडावे, आपली शेती अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञानाधिष्ठित व्हावी, आपण करीत असलेल्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा असे वाटणे सहाजिक आहे.

यातील प्रत्येक बाबीसाठी ते हकदार आहेत आणि त्यांना ते मिळाले पाहिजे असे समाजातील कुठल्याही संवेदनशील माणसाला वाटेल, पंरतु या किमान स्वप्नांतील कमाल बाबींवरही शेतकरी राजाला पाणी सोडावं लागतं हे वास्तव आहे. कधी आस्मानी तर कधी भ्रष्ट व्यवस्थेमुळे त्याला त्याच्या मेहनतीचं फळही चाखता येत नाही हे विदारक सत्य आहे. ही भीषण परिस्थिती बदलणे किंबहुना तिच्या बदलासाठी शक्य तितक्या लवकर पावलं पडणं काळाची गरज आहे.

आजही ग्रामीण भागात बहुतांश विशेषत: गरीब अल्पभूधारक शेतकरी पेरणीसाठी लागवड खर्चाकरिता आपला शेतमाल ज्या व्यापार्‍याकडे नेऊन विकत असतात त्याच व्यापार्‍याकडून आपला शेतमाल इतरत्र न विकता त्याच्याचकडे आणून विकू या अटींवर उधारीने उचल म्हणून पैसे घेऊन हा लागवडीचा खर्च कसाबसा भागवतात. त्यातही बोगस बियाणांमुळे जर पहिल्या वेळी केलेली पेरणी वाढली नाही आणि सबंध लागवडीचा खर्च वाया गेला तर दुबार पेरणी करताना हा गरीब शेतकरी पुरता खचतो.

अशा प्रकारे दुबार तिबार पेरण्या करून जेवढ्या पैशांचा शेतमाल त्याच्या पदरी पडतो कधी कधी त्याच्याहून अधिक त्याने त्या व्यापार्‍याकडून उचल म्हणून घेतलेली रक्कम असते. असे हे सारे दुष्टचक्र आहे. अशी जर परिस्थिती वारंवार निर्माण होत असेल तर कष्ट, मेहनत करूनही कधी अस्मानी संकटामुळे तर कधी भ्रष्ट व्यवस्थेमुळे त्याच्या पदरी निराशा पडत असेल तर शेती व शेतकरी हा घटक निराश होणार नाही हे कसं शक्य आहे. या सार्‍या चक्रव्युहातून आपल्या कृषिप्रधान देशाचा मूळ कणा असलेले हे कृषीक्षेत्र आणि हे क्षेत्र जो आपल्या खांद्यावर भक्कमपणे पेलून उभा आहे तो आपला बळीराजा अधिकाधिक समृद्ध कसा होईल या विचाराला आणि त्यातून निष्पन्न धोरणात्मक अंमलबजावणीला प्राथमिकता देण्याची गरज निर्माण झाली आहे.

शेतकर्‍याने शेतात पिकवलेला शेतमाल स्वस्त मात्र त्याच शेतमालावर प्रक्रिया केलेल्या आणि नव्याने बाजारात दाखल झालेल्या वस्तू मात्र मूळ शेतमालाच्या तुलनेने प्रचंड महाग अशी आजची परिस्थिती आहे. शेतकर्‍याने शेतमालच पिकवला नाही तर त्यावर प्रक्रिया करून नव्याने उत्पादन बाजारात आणणे जमेल का याचा विचार प्रकर्षाने करण्याची गरज आहे. उदाहरणार्थ शेतात पिकवलेले बटाटे स्वस्त पण याच बटाट्यांपासून बनवलेले पदार्थ या मूळ बटाट्यांच्या किमतीच्या तुलनेने कितीतरी महाग असतात. हे फक्त बटाट्याचे उदाहरण दिले आहे. असे जवळजवळ सर्वच शेतमालाबाबत घडताना दिसते.

यावर उपाय म्हणून एकतर त्यांच्या शेतमालाला लागवडीचा खर्च लक्षात घेऊन योग्य मोबदला मिळण्यासाठी योग्य भाव मिळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे. दुसर्‍या बाजूने जे शेतकरी किंवा विशेषत: तरुण युवा शेतकरी यांना त्यांच्या शेतमालावर अशा प्रकारे प्रक्रिया करून बाजाराभिमुख उत्पन्न थेट बाजारात आणण्यासाठीचे आवश्यक पाठबळ, प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, जेणेकरून शेतकरी एक आधुनिक व कुशल शेतकरी म्हणून पुढे येईल. शेतकरी आणि ग्राहकांमध्ये इतर कुणी मध्यस्थ न राहता शेतकरी थेट ग्राहकांशी जोडला जाईल. हे निश्चितच स्वागतार्ह व शेतकर्‍यांना सधन करणारा राजमार्ग असेल हे नक्की.

आज माहिती तंत्रज्ञानाने जवळजवळ सर्वच क्षेत्रात आपले अतुलनीय योगदान देत त्या त्या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात बदल घडवून आणताना आपण पाहतो. एखाद्या कृतीचा जर हवा तसा परिणाम आपल्याला प्राप्त होत नसेल, तर आतापर्यंत ज्या रितीने आपण ती कृती करीत आलो त्यामध्ये बदल केल्यानंतरच आपल्याला हवा तसा वेगळा परिणाम हाती लागण्याची शक्यता असते. कृषी क्षेत्राबाबतही काहीसे असेच झाले आहे. जर कित्येक गोष्टी करूनही येथील शेती व शेतकर्‍यांची मूळ हलाखीची परिस्थिती बदलत नसेल व त्यांच्या शेतमालाला भाव मिळत नसेल तर आतापर्यंत ज्या दिशेने आपण काम करीत आलो आहोत त्या दिशेला किंचित तपासून घेत त्यात काही आवश्यक बदल करीत गेलो तरच वेगळा परिणाम हाती लागेल यात तीळमात्र शंका नाही.

युगानयुगे सबंध जगाला पोसणार्‍या शेतकरी राजाला कर्जमाफीची डोळ्यांत तेल घालून वाट पाहावी लागते. ही त्याच्यापुढे आणून ठेवलेली व सदोष किंवा भ्रष्ट व्यवस्थेतून निर्माण झालेली अत्यंत घातक परिस्थिती आहे, जी मूलतः बदलली गेली पाहिजे. माहिती तंत्रज्ञानाच्या जगात शेतकर्‍यांना आपली शेती आधुनिक तंत्रज्ञानाच्या अभिमुख कशी करता येईल, ग्राहकांशी थेट संपर्क कसा साधता येऊ शकेल, अनेकानेक योजनांचा लाभ व त्यासंदर्भातील इत्थंभूत माहिती कशी मिळवता येईल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

कोरोना काळात टाळेबंदीत सबंध जग स्तब्ध झाले होते. ज्या काही बाबी सुरू होत्या त्यात शेती आणि या शेतकरी राजाचा अग्रगण्य उल्लेख करावा लागेल. तो कधीच थांबत नाही, थकत नाही व नाउमेद तर कधीच होत नाही. आस्मानी संकटामुळे व भ्रष्ट व्यवस्थेमुळे तो खचणार नाही याची काळजी घेणे एक संवेदनशील समाज म्हणून आपलीही तितकीच जबाबदारी आहे. हे जेव्हा घडेल त्या दिवशी उपलब्ध भयान परिस्थितीसमोर खचून जाऊन आत्महत्या करण्याचा विचार त्याच्या मनात येणार नाही. कारण तेव्हा त्याच्या पाठीशी सक्षम निर्दोष व्यवस्था व एक संवेदनशील समाज असेल जो त्याला परत उभं राहण्यासाठी बळ देईल.

गरज आहे ती अशी सक्षम निर्दोष यंत्रणा व शेतकर्‍यांप्रति त्यांच्या अव्याहत कष्टांप्रति संवेदनशीलपणे विचार करणार्‍या एका संवेदनशील समाजाची. तो लढतो, झगडतो व परत उभा राहतो. त्याची केवळ एकच माफक अपेक्षा असते की त्याच्या अहोरात्र कष्ट करून उगवलेल्या शेतमालाला रास्त भाव मिळावा. त्यातून मुलांना शिक्षण, नोकरीत हातभार लागावा, त्यांच्या लग्नाचे प्रश्न सुटावेत. यासाठी तशी सक्षम यंत्रणा तयार व्हावी. येथील शेतकरी राजा सधन झाला तर सबंध देश समद्ध व्हायला वेळ लागणार नाही. या कृषिप्रधान देशाच्या समृद्धीचा कणा असलेला बळीराजा ज्या दिवशी सुखासमाधानाने नांदेल तो दिवस देशासासाठीच्या सर्वांगीण व सर्वसमावेशक समृद्धीचा सुदिन असेल हे प्रांजळ सत्य आहे.

कृषिप्रधान या आपल्या देशात
जवा समृद्ध होईल शेतकरी
तवाच बघा कशी समृद्धी ही
आनंदात नांदेल घरोघरी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -