घरफिचर्ससारांशगावाकडील शिक्षणाचा वेग मंद!

गावाकडील शिक्षणाचा वेग मंद!

Subscribe

शिक्षण हा आजच्या युगातील प्रगतीसाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे. किंबहुना, शिक्षण या नावातच प्रगती सामावलेली आहे. स्वातंत्र्योत्तर कालावधीत ग्रामीण भागातील नागरिक तसेच शेतकरी यांच्यामध्ये शिक्षणाचा प्रसार होत आहे, पण हा शिक्षण प्रसार ज्या वेगाने होणे आवश्यक आहे, तसा होताना दिसत नाही. आजही ग्रामीण भागात अशिक्षितपणा मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. त्यामुळे त्याचा परिणाम शेती क्षेत्राच्या विकासावरही होत आहे.

– प्रा. डॉ. कृष्णा शहाणे

आज शासकीय पातळीवर शिक्षण प्रसारसाठी विविध उपाय राबवले जात असूनही ग्रामीण भागात फार मोठी लोकसंख्या अशिक्षित आहे. दोन पाच वर्षे शाळा शिकणे म्हणजे शिक्षण नव्हे तर आजच्या संगणक युगात किमान पदवीपर्यंत तरी शिक्षण घेणे आवश्यक आहे. आजही ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर अशिक्षित अथवा अर्धशिक्षित असल्याचे दिसून येते. त्याचा विपरीत परिणाम शेती क्षेत्राच्या विकासावर, उत्पादकतेवर होतो. असे म्हटले जाते की शिक्षणाने जीवनाकडे पाहण्याचा उत्तम दृष्टिकोन प्राप्त होतो. त्यासाठी शिक्षणाचे महत्त्व आधुनिक युगात अधोरेखित होते. शेतकरी हा घटक देशाच्या विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतो. परंतु शिक्षणाची चाके अद्यापही अनेक घरांपासून दूर अंतरावर असल्याचे दिसून येतात. यामुळे शेतीचा विकास मंद गतीने होते.

- Advertisement -

आजकालचे शालेय शिक्षण किंवा कोणत्याही तांत्रिक शिक्षणाची प्राप्ती न होता फक्त पदवीधर झालेला तरुण जेव्हा नोकरीसाठी बाजारात फिरतो तेव्हा त्याला नोकरी मिळत नाही. कारण शाळा महाविद्यालयीन शिक्षणाला तांत्रिक शिक्षणाची जोड मिळालेली नसते म्हणजेच आजच्या शिक्षणात त्वरित रोजगार प्राप्तीची फारशी क्षमता असल्याचे दिसत नाही. ग्रामीण भागात शाळा महाविद्यालयांची संख्या मर्यादित असल्याचे दिसून येते आणि अनेक गावांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयेदेखील नाहीत. तिथे वरिष्ठ महाविद्यालयांचा विचारही करता येत नाही. ज्ञान मंदिरांची संख्या कमी असल्यामुळे शिक्षणाच्या प्रसारात अडचणी येतात.

शिक्षणामध्ये रोजगार प्राप्तीची असणारी कमी क्षमता यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शिक्षणाविषयी असणारी आत्मीयता कमी होते. शिक्षणाने कुणाचे भले झाले…. तर आपले होणार आहे? ही भूमिका आजही ग्रामीण भागात आहे. ही भूमिका कमी होताना दिसत असली तरी पूर्णपणे नाहीशी झालेली नाही. तसेच शिक्षणावाचून कोणाचे काही अडत नाही असा समज काही प्रमाणावर असल्यामुळे त्याला विशेष असे महत्त्व दिले जात नाही. शेतीतील विविध कामांचे प्रशिक्षण बालकाला लहानपणापासून घरातूनच प्राप्त होते. पेरणीपासून उत्पादित वस्तू बाजारपेठेत विक्री करेपर्यंत विविध टप्प्यांवर आवश्यक असणारे ज्ञान हे कुटुंब आणि समाज घटकांकडून मिळते त्यामुळे शिक्षण प्राप्तीसाठी फारसे प्रयत्न केले जात नाही. काही बालकांना शाळेत शिक्षणासाठी पाठवले जाते, पण शेतीत कामगारांची उणीव निर्माण झाली तर घरातील शिक्षण घेणार्‍या किशोर किंवा तरुण वयातील मुलांना शाळेऐवजी शेतीमध्ये काम करण्यास सांगितले जाते, त्यामुळे शैक्षणिक गळतीमध्ये मोठ्या प्रमाणावर भर पडते.

- Advertisement -

शेतकर्‍यांना अल्पशिक्षित किंवा अशिक्षित पणामुळे बँकांकडून कर्ज घेताना अनेक अडचणी येतात. कर्ज नको पण अर्ज आवर असे म्हणण्याची वेळ येते. त्यामुळे शेतकरी बँकांकडे कर्ज मागायलासुद्धा जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी वळतो तो सावकारी कर्जाकडे. अशिक्षितपणामुळे सावकारी कर्जात शेतकरी पूर्णपणे उध्वस्त होऊन जातो. एकदा घेतलेले कर्ज कितीही पैसे भरले तरी त्याची परतफेड शेतकरी करू शकत नाही, अशी अवस्था सावकार करतो. याला कारणीभूत ठरतो तो सावकाराचा गैरकारभार आणि शेतकर्‍यांचा अल्पशिक्षित अथवा अशिक्षितपणा होय.

मोठ्या प्रमाणावरील अशिक्षितपणामुळे कृषी संशोधनाचा फायदा शेतकर्‍यांना होत नाही. कृषी विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेती संशोधन होत आहे, परंतु या गोष्टी शेतकर्‍यांपर्यंत पोहोचण्यातील अडथळा म्हणजे अशिक्षितपणा होय. त्यामुळे शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करताना अनेक अडचणी येतात. सुधारित बी-बियाणे आणि खते, अत्याधुनिक अवजारे यांचा वापर केला जात नाही. परंपरागत पद्धतीने शेती केली जाते. अशिक्षितपणामुळेच मान्सूनचा अंदाज करता येत नाही. पीक नियोजन करता येत नाही.

आगामी कालावधीत कोणत्या पिकाला कशी मागणी येईल याचे पूर्वानुमान काढता येत नाही. त्यामुळे कांद्यासारख्या पिकाच्या बाबतीत अचानक भाव गडगडणे किंवा अचानक भाव आकाशाला भिडणे या गोष्टी होताना दिसतात, यातून नुकसान होते. उत्पादित वस्तू किंवा शेतमाल कोणत्या वेळी कोणत्या बाजारपेठेत पाठवल्यास चांगला भाव मिळेल याचा याचा अंदाज शिक्षणाच्या अभावी करता येत नाही. म्हणजेच शेतकर्‍यांकडून बाजारपेठ संशोधन त्यामुळे फारसे होताना दिसत नाही. तसेच कुठलाही नवीन प्रयोग करण्याचे धाडस शेतकरी करत नाहीत.

शासकीय पातळीवर शेतकर्‍यांना शेती मशागती संदर्भात मार्गदर्शन केले जाते त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे ठरते. शिक्षणाअभावी त्याची अंमलबजावणी करण्यात अनेक अडचणी येतात. अनेक शेती, जमीनदारी, सावकारी व इतर कायद्यांची माहिती शिक्षणाअभावी होत नाही. त्यामुळे शेतकरी मागास अवस्थेत राहतो. थोडक्यात शिक्षणाच्या प्रसारामुळे शेतकरी शेतीत सुधारणा करून विकासाकडे वाटचाल करू शकतो. कारण शिक्षण हीच सर्व प्रकारच्या विकासाची गुरुकिल्ली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -