घर फिचर्स सारांश थ्रिलर ड्रामा- मुंबईकर

थ्रिलर ड्रामा- मुंबईकर

Subscribe

जिओ सिनेमावर ओटीटी ऑफर ‘मुंबईकर एक कहानी’ मने जिंकण्यासाठी सज्ज आहे. मुंबईकर हा एक थ्रिलर ड्रामा आहे, जो आपल्या कथेतून मुंबई शहराचे अनेक रंग प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. निर्मात्या ज्योती देशपांडे आणि रिया शिबू निर्मित आणि संतोष सिवन दिग्दर्शित मुंबईकर या चित्रपटात विक्रांत मेस्सी, विजय सेतुपती, हृधू आरोन, रणवीर शौरी, तान्या माणिकतला आणि संजय मिश्रा यांसारखे दिग्गज कलाकार आहेत.

– आशिष निनगुरकर

बर्‍याच सिनेरसिकांना ९६, सुपर डिलक्स अशा सिनेमांमुळे विजय सेतुपती ठाऊक आहे. दाक्षिणात्य सिनेमांची जाण असणारे विजय सेतुपतीला त्याच्या अभिनयामुळे ओळखतात. मास्टर या तमिळ ब्लॉकबस्टर सिनेमामुळे सर्वसामान्य प्रेक्षकदेखील विजयला ओळखू लागले. विजयने आजवर ५० पेक्षा जास्त तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यातील बरेचसे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाले. ‘साये रा नरसिंहा रेड्डी’ या मल्टीस्टार तेलुगु चित्रपटामध्ये ‘मेगास्टार चिरंजीवी’ सोबत काम करून विजयने तेलुगु चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केले. ‘मारकोनि मठाई’ या चित्रपटाद्वारे विजयने मल्याळम सिनेसृष्टीमध्ये प्रवेश केला.

- Advertisement -

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा विजय सेतुपती याने ‘मुंबईकर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. संतोष सिवन दिग्दर्शित या चित्रपटात विक्रांत मॅसी, संजय मिश्रा आणि रणवीर शौरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट लोकेश कनागराजच्या ‘मानानगरम’ या चित्रपटाचा रिमेक आहे.‘मुंबईकर’ हा चित्रपट नुकताच जिओ सिनेमावर प्रदर्शित झाला आहे. मुंबईत राहणार्‍या लोकांना मुंबईकर म्हणतात. अनेकांसाठी हे शहर पैसे कमवण्याचे साधन असले, तरी मुंबई येथे येणार्‍या प्रत्येकाला अशा पद्धतीने दत्तक घेते की तेही या शहराच्या रंगात रंगून जातात आणि ते मुंबईकर कधी होतात ते कळतही नाही. अशाच एका मुंबईकराची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संतोष सिवन यांनी केला आहे.

‘मुंबईकर’ या चित्रपटाची कथा ही पाच पूर्णपणे भिन्न पात्रांची आहे, जी एका मनोरंजक वळणावर एकमेकांना भिडतात. यापैकी एक म्हणजे मुंबईचा डॉन प्रबलकांत पाटील (रणवीर शौरी) उर्फ पीकेपी, आणि दुसरा डॉन बनण्याचे स्वप्न घेऊन तिरुनेलवेलीहून मुंबईत आलेला मन्नू (विजय सेतुपती) आपल्या मुलाच्या दम्याचा उपचार करण्यासाठी कुटुंबासह मुंबईत आलेला ड्रायव्हर (संजय मिश्रा), प्रेमाखातर नोकरीचे स्वप्न पाहणारा यूपीचा तरुण (विक्रांत मेस्सी) आणि आपल्या काकाप्रमाणे पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणारा मुलगा (विक्रांत मेस्सी) विक्रांत मेस्सी) ज्याचे आपल्या रागावर नियंत्रण नाही. डॉन बनण्यासाठी मुंबईत आलेला मन्न राहुल झुनझुनवाला समजून पीकेपीच्या मुलाचे अपहरण करतो. या अपहरणानंतर काय नाट्य घडते आणि अपहरण झालेले मूल त्याच्या डॉन वडिलांकडे जाऊ शकेल का, या संपूर्ण प्रवासात ही पाच पात्रे एकमेकांना कशी भिडतील, हे तुम्हाला मुंबईकरांना जिओ सिनेमावर पहावे लागेल.

- Advertisement -

हा चित्रपट साऊथच्या ‘मनग्राम’ चित्रपटाचा रिमेक आहे. संतोष सिवनने हा सस्पेन्स थ्रिलर पुन्हा एकदा आपल्या थरारक शैलीत प्रेक्षकांसमोर मांडला आहे. हा चित्रपट पाहताना अनेकवेळा आपण हसल्याशिवाय राहू शकत नाही. संतोष सिवन यांनी ही कथा अतिशय मनोरंजक पद्धतीने पुढे नेली आहे. ओटीटी साठी मुंबईकर हा एक परिपूर्ण चित्रपट आहे, पण दिग्दर्शकाची मुंबईची दृष्टी कोणत्याही मुंबईकराच्या दृष्टीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. ही कथा अनेक ठिकाणी कंटाळवाणी होऊ लागते.

विजय सेतुपती ते विक्रांत मेस्सी, रणवीर शौरी असे अनेक कलाकार या चित्रपटात आहेत. आपल्या अप्रतिम अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या विक्रांत मेस्सीची व्यक्तिरेखा आवश्यकतेपेक्षा जोरात आहे, त्याच्या रागाशी संबंध जोडणे खूप कठीण आहे. भ्रष्ट पोलीस अधिकार्‍याची भूमिका साकारणार्‍या सचिन खेडेकरने त्याची व्यक्तिरेखा अतिशय उत्तमपणे साकारली आहे. रणवीर शौरी आणि विजय सेतुपती या दोघांचा अभिनय तुम्हाला हा चित्रपट पाहण्याचे एक मोठे कारण देतो. एडिटिंग टेबलवरील या चित्रपटावर आणखी काही मेहनत करता आली असती. चित्रपटाचे पार्श्वसंगीत प्रभावी आहे. या चित्रपटातून सिनेमॅटोग्राफरला मुंबई अधिक चांगल्या प्रकारे प्रेक्षकांसमोर मांडता आली असती, पण तसे झाले नाही. चांगल्या कथेसाठी हा चित्रपट पाहता येईल. विजय सेतुपती यांच्या मेहनती अभिनयासाठी हा चित्रपट जरूर पहा.

या चित्रपटातून आगळ्यावेगळ्या मुंबईचे दर्शन कलात्मक दृष्टिकोनातून मांडण्याचा अनोखा प्रयत्न करण्यात आला आहे. टपोरी भाषा ही ठरलेली मुंबईची एकमेव भाषा सिनेमातून दाखवली जाते, तीच सर्रास या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. बोलीभाषा हीच दाखवलेली असल्याने ती टिपिटल वाटत जाते. ‘मुंबईकर’ चित्रपटात दाखवण्यात आलेली पात्रे आपल्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करतात, पण जसजसा सिनेमा पुढे जातो, तसा तो संथ होत जातो. या संथ गोष्टींमुळे सिनेमाची एकूणच परिभाषा बदलत जाते आणि दिग्दर्शकाला नेमके काय मांडायचे आहे हेच राहून जाते. त्यातूनही साऊथ सुपरस्टार विजयचा पहिला चित्रपट म्हणून याची नोंद घ्यावीशी वाटते. या सिनेमाचे छायाचित्रण छान आहे.

‘जिओ स्टुडिओ’ वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट कलात्मकरित्या मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. असाच काहीसा हा ‘मुंबईकर’ चित्रपटाचा विषय आहे. तो तितक्या ताकदीने पोहचला नसला तरी दिग्दर्शकाला काय मांडायचे आहे हे बारकाईने विचार केला तर लक्षात आहे. प्रत्येक जण जीवाची मुंबई करण्यासाठी एकदातरी मुंबईत येतो आणि मुंबईला आपलेसे करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकाचे या मुंबईविषयी असणारी मते वेगवेगळी आहेत. प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे आहेत. चित्रपटातून काही कल्पनिक संदर्भ मनोरंजनाच्या दृष्टीने दिलेले आहेत. ते आपण एकदा पहावेत आणि सोडून द्यावेत असेच आहेत.

हा चित्रपट मुंबईत राहणार्‍या एका मुंबईकराच्या कथेपेक्षा मुंबईबाहेर राहणार्‍या लोकांच्या या शहराकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक मांडणारा वाटतो. जिओ सिनेमावर प्रदर्शित झालेल्या ‘कच्चे लिंबू’ या चित्रपटाने मुंबईकरांच्या भावना प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर मांडल्या आहेत, तसाच हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयाला भिडण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे मुंबईबद्दल जाणून घेण्यासाठी चित्रपट पहायचा असेल, तर कच्चे लिंबू पहा आणि शीर्षकाकडे दुर्लक्ष करून चित्रपट पहा, तर या चित्रपटाची मजा घेता येईल.

- Advertisment -