घरफिचर्ससारांशया सम हा... अमीन सयानी

या सम हा… अमीन सयानी

Subscribe

बिनाका गीतमाला साकारताना सयानी लाखो श्रोत्यांसाठी केवळ निवेदक नव्हते, तर ते त्यांचे मित्र, सखा, फ्रेंड झाले. एक असा दोस्त जो श्रोत्यांना आवडणारी गाणी ऐकवतो, त्यांची पत्रे आत्मीयतेने, जिव्हाळ्याने वाचतो, त्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देतो, त्यांच्या अडीअडचणी व समस्यांवर व्यावहारिक उपाय सुचवतो आणि सोबतच श्रोत्यांच्या मनाला स्पर्शून जाणारे किस्से, गोष्टी, अनुभव सांगून त्यांचं रंजन करतो. हा कार्यक्रम सुरुवातीला ३० मिनिटांचा होता. नंतर तो एक तासाचा झाला. ‘नमस्ते बहनो और भाईयो, मै आपका दोस्त अमीन सयानी बोल रहा हूँ’ अशी मधुर साद घालून श्रोत्यांच्या हृदयात घर करणार्‍या अमीन सयानी नावाच्या आवाजाच्या जादूगाराला भावपूर्ण श्रद्धांजली!

-प्रवीण घोडेस्वार

क्रिकेटमध्ये डॉन लीरवारप यांचं, पार्श्वगायनात लतादीदींचं, सिनेअभिनयात दिलीप कुमार-अमिताभचं जे स्थान आहे तेच स्थान भारतीय रेडिओ निवेदनात अमीन सयानी यांचं आहे. ते भारतीय निवेदन विश्वातले ‘महानायक’च होते. आपल्या वैशिष्ठ्यपूर्ण निवेदन शैलीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार्‍या सयानींचा जन्म २१ डिसेंबर १९३२ रोजी दक्षिण मुंबईत झाला. त्यांचं कच्छी खोजा कुटुंब व्यापार-उद्योगात, समाजकारणात आणि राजकारणातही अग्रेसर होतं.

- Advertisement -

वडील जानू मोहम्मद सयानी डॉक्टर होते. आई कुलसुम गांधीजींची शिष्या. त्या नेहरू साक्षरता पुरस्कार मिळवणार्‍या पहिल्या भारतीय महिला होत. गांधीजींच्या सूचनेवरून त्यांनी १९४० मध्ये सुरू केलेलं ‘राहबर’ (म्हणजे रस्ता दाखवणारा/पथदर्शक) नावाचं त्रैभाषिक (हिंदी, गुजराती, उर्दू) पाक्षिक १९६० पर्यंत निघायचं. त्या सुमारास स्थापन झालेल्या ‘All India Women’s Conference’च्या कुलसुम कार्यकर्त्या होत्या. त्यांच्या कुटुंबात सरोजिनी नायडू, उषा मेहता, हंसा मेहता यांचा राबता असायचा.

काका त्यांना संस्कृत श्लोक, हिंदी गाणी शिकवत. शाळेच्या कार्यक्रमांमध्ये ते गाणं म्हणायचे. त्यांच्यावर सर्वाधिक प्रभाव वडील बंधू हमीदभाईंचा पडला. हमीदभाई पट्टीचे वक्ते, लेखक, स्काऊट मास्टर, उत्कृष्ट निवेदक, जादूगार असे हरहुन्नरी कलाकार होते. घरातच ते तालमी घ्यायचे. आठ-दहा वर्षांचा अमीन त्यांच्यासमोर जाऊन बसायचा. त्यांची रुची आणि कल ध्यानात घेऊन हमीदभाईंनी अमीन यांना शिकवलं. ते एकदा त्यांना आकाशवाणी केंद्रावर घेऊन गेले. इथं त्यांनी अमीन यांच्या आवाजात एक इंग्रजी कविता ध्वनिमुद्रित करून ऐकवली, पण त्यांना स्वत:चा आवाज आवडला नाही.

- Advertisement -

हमीदभाईने त्यांना आवाजावर मेहनत घ्यायला सांगितलं. ग्वाल्हेरची सिंदिया हायस्कूल, मुंबईची न्यू इरा शाळा आणि झेव्हियर्स कॉलेज येथे ते शिकले. बंगाली भाषा आणि रवींद्र संगीतही ते शिकले. पंजाबी, पारसी, संस्कृत, उर्दू भाषाही आत्मसात केल्या, मात्र दक्षिणात्य भाषा शकता न आल्याची त्यांना खंत वाटायची. त्यांचं कुटुंब स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालं होतं. आईचे वडील डॉ. रजबअली पटेल हे मौलाना आझाद आणि गांधीजींचे डॉक्टर होते. लहानपणी त्यांनी प्रभात फेर्‍यांमध्ये भाग घेतला. कदम कदम बढाये जा…, भारत का डंका आलम मे बजवाया वीर जवाहरने…, चरखा चला चला कर लेंगे स्वराज्य… ही गाणी म्हटली.

सिनेदिग्दर्शक विजय आनंद त्यांचे कॉलेज मित्र. ते हिंदी नाटकं करायचे. ते पाहून अमीन यांनी इंग्रजी, उर्दू नाटकं केली. त्यांनी उर्दू नाटकांचं दिग्दर्शनही केलं. मुंबईच्या भारती विद्याभवनात आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा पाहायला ते जायचे. त्यांना दामू केंकरे आणि विजया मेहतांची नाटकं खूप आवडायची. तेव्हा सआदत हसन मंटो, हरिवंशराय बच्चन, उपेंद्रनाथ अश्क, सुमित्रानंदन पंत, इस्मत चुगताई, महादेवी वर्मा, कृष्णचंद्र, अमृतलाल नागर, सुलतान पदमसी, अब्राहम अल्काझी अशी प्रतिभावंत माणसं रेडिओशी जोडलेली होती. ही परंपरा सुनील दत्त, पंडित नरेंद्र शर्मा, विनोद शर्मा, कमलेश्वर यांनी पुढे नेली. या माध्यमात काम करणं फार अभिमान, सन्मान, प्रतिष्ठा आणि गौरवाचं समजलं जायचं.

रेडिओवर हिंदी निवेदकाच्या स्वरचाचणीत सयानी चक्क अनुत्तीर्ण झाले होते. याचं कारण म्हणजे त्यांची वाचनाची शैली चांगली होती, पण हिंदी उच्चारणात गुजराती आणि इंग्रजी भाषांचा प्रभाव होता. त्याकाळचे विख्यात निवेदक आणि लेखक बालगोविंद श्रीवास्तव यांच्याशी त्यांची ओळख झाली. त्यांनी पहिल्यांदा सयानी यांना रेडिओवर काम करण्याबाबत विचारणा केली. तेव्हा रेडिओ सिलोनवर लोकप्रिय कार्यक्रम ‘फुलवारी’ प्रसारित व्हायचा.

यात गायकांना आमंत्रित केलं जायचं. या कार्यक्रमाचा नेहमीचा निवेदक अनुपस्थित राहिल्याने सयानींना संधी मिळाली. कार्यक्रम आधी ध्वनिमुद्रित न करता थेट प्रसारित होणार होता. काहीशा ताणातच त्यांनी निवेदन केलं. ते छान झालं. व्यावसायिक प्रसारणाचा त्यांचा पहिलाच कार्यक्रम होता. श्रीवास्तव यांच्या संकल्पनेतूनच ‘बिनाका गीतमाला’ हा पुढे प्रचंड लोकप्रिय ठरलेला कार्यक्रम सुरू झाला. याचा पहिला भाग ३ डिसेंबर १९५२ रोजी प्रसारित झाला.

सिबागायगी लिमिटेडच्या ‘बिनाका टूथपेस्ट’ची जाहिरात करण्यासाठी अर्ध्या तासाचा प्रायोजित कार्यक्रम करायचं ठरलं. याकरिता रेडिओ सिलोनला नवीन, ताजा, फ्रेश आवाज हवा होता. कार्यक्रमाचं लेखन, निवेदन, श्रोत्यांच्या पत्रांची निवड आणि त्यास प्रतिसाद अशी सादरीकरणाची सर्व जबाबदारी पार पाडू शकणारा युवक त्यांना हवा होता. यासाठी मानधन होतं फक्त २५ रुपये. म्हणून तत्कालीन नामांकित निवेदक तयार झाले नाहीत.

रेडिओसाठी हा एक अभिनव उपक्रम होता. स्वातंत्र्योत्तर भारतातला उत्साही युवक असलेल्या सयानींना ही संधी मिळाली नि त्यांनी इतिहास घडवला. बिनाका गीतमालाआधी सयानी इंग्रजी भाषेतले निवेदक होते. परिणामी हिंदीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी त्यांनी फार मेहनत घेतली. योग्य वेळी समर्पक शब्द सूचणं, निवेदनाचा मजकूर सोप्या, सहज आणि प्रवाही भाषेत लिहिणं, शब्दांचा उच्चार अचूक व स्पष्ट असणं, आवाजातले चढ-उतार, आवाजाची पट्टी यासाठी त्यांनी अपार कष्ट उचललेत.

गीतमालासोबतच त्यांनी सॅरिडॉन के साथी, जोहर के जवाब, मराठा दरबार अगरबत्ती, रिको घडी, एस. कुमार की फिल्मी मुलाकात व फिल्मी मुकदमा, बोर्नव्हीटा क्विझ कॉन्स्टेट, शालीमार सुपरलक जोडी, सितारोंकी पसंद, महकती बाते, कोलगेट संगीत सितारे, संगीत के सितारोंकी महफिल हे कार्यक्रम सादर केले. बिनाका लोकप्रियतेच्या शिखरावर असताना त्यांच्या कार्यालयात रमा नामक सुंदर मदतनीसाची नियुक्ती झाली.

रमा आणि अमीन १९५८ मध्ये परिणय सूत्रात बद्ध झाले. रमा ह्या काश्मिरी ब्राह्मण, पण लग्नानंतर त्यांनी ना आपलं नाव बदललं ना धर्म! त्यांच्या विवाहसोहळ्याला चित्रपटसृष्टीतले जवळपास सारे कलावंत हजर होते. त्यावेळी रमादेखील जोहर के जबाब, अफगाण स्नो के साथी हे कार्यक्रम सादर करायच्या. त्यांचं २००२ मध्ये निधन झालं.

गीतमाला साकारताना सयानी लाखो श्रोत्यांसाठी केवळ निवेदक नव्हते, तर ते त्यांचे मित्र, सखा, फ्रेंड झालेत. एक असा दोस्त जो श्रोत्यांना आवडणारी गाणी ऐकवतो, त्यांची पत्रे आत्मीयतेने, जिव्हाळ्याने वाचतो, त्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तर देतो, त्यांच्या अडीअडचणी व समस्यांवर व्यावहारिक उपाय सुचवतो आणि सोबतच श्रोत्यांच्या मनाला स्पर्शून जाणारे किस्से, गोष्टी, अनुभव सांगून त्यांचं रंजन करतो. हा कार्यक्रम सुरुवातीला ३० मिनिटांचा होता.

नंतर तो एक तासाचा झाला. सयानी हे भारतातले पहिले रेडिओ निवेदक आहेत की ज्यांचा हिंदी फिल्मी दुनियेतले बडे-बडे तारेदेखील आदर, सन्मान करायचे. हे भाग्य इतर कोणालाही लाभलेलं नाही. खूप कमी लोकांना माहीत आहे की अमिताभने रेडिओ उद्घोषक होण्यासाठी मुंबई आकाशवाणीवर स्वरचाचणी दिली होती. त्याआधी अमिताभला सयानींना भेटायचं होतं. अनेकदा प्रयत्न करूनही तेव्हा भेट झाली नाही. कारण त्यावेळी सयानी प्रचंड बिझी होते. एका आठवड्यात ते २० कार्यक्रम करायचे.

सयानींच्या मते निवेदन प्रभावी होण्यासाठी सात ‘स’ (एस) महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे निवेदकाचं बोलणं ‘सही’ म्हणजे अचूक असायला हवं, चुका नसाव्यात. निवेदकाच्या बोलण्यातून ‘सत्य’ प्रतीत व्हायला हवं. श्रोत्यांना बोलणं खोटं वाटता कामा नये. निवेदकाचं बोलणं ‘स्पष्ट’ असायला हवं. बोललेलं श्रोत्यांना समजायला हवं. निवेदकाने ‘सरल’ अर्थात सरळ शब्दांत भाषेत बोललं पाहिजे. निवेदनाची भाषा ‘सभ्य’ असावी. त्यात असभ्यपणा, अश्लीलता, उर्मटपणा नसावा. निवेदन ‘सुंदर’ असायला हवं. त्यात सौंदर्य असावं. निवेदन हे ‘स्वाभाविक’ असावं. त्यात कृत्रिमपणा नसावा. ते नैसर्गिक असावं. ही त्यांच्या यशाची सप्तसूत्रे असल्याचं त्यांनी सांगितलंय.

१९५६ ते १९७५ दरम्यानच्या बहुतेक चित्रपटांच्या जाहिराती सयानींनी केल्या. आकाशवाणीसाठी ‘एड्स’वर १३ भागांची मालिका सादर केली. दूरदर्शनवरच्या अनेक कार्यक्रमांचे संचालनही केलं. देश-विदेशात दोन हजार कार्यक्रमांचे निवेदन त्यांनी केलं. Radio and T.V. Advertising Practicenors Association या संस्थेचे ते उपाध्यक्ष व अध्यक्षही होते.

आकाशवाणी, दूरदर्शनमार्फत व्यावसायिक सेवा देण्याच्या कामाचा त्यांनी विस्तार केला. लोकसेवा संचार परिषदेचे आणि Advertising Standards of India (ASCI) या संस्थेचे संस्थापक सदस्य होते. मॉरीशस broadcasting corporationने आयोजित केलेल्या कार्यशाळेत सयानी तज्ज्ञ म्हणून निमंत्रित होते.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने आकाशवाणी व दूरदर्शनच्या विकासासाठी वेळोवेळी गठीत करण्यात आलेल्या समित्यांमध्येही त्यांनी योगदान दिलंय. माध्यमांवरील जाहिरातींवर निर्बंध असावेत का, यासाठीच्या समित्या तसेच आयोगांवर त्यांनी काम केलंय. Junior chamber of commerceच्या साहाय्याने त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले.

त्यांना RAPA’S Hamid Sayani Trophy, Indian Society of Advertisers चे सुवर्ण पदक, शतकातील सर्वश्रेष्ठ रेडिओ कार्यक्रम, दादासाहेब फाळके अ‍ॅकॅडमीचा पुरस्कार, रेडिओ मिर्ची सन्मान, रेडिओ लिव्हिंग लिजेंड पुरस्कार असे मान-सन्मान-पारितोषिक लाभले. बिनाकामुळे जगातल्या ५ सर्वोत्कृष्ट निवेदकांमध्ये त्यांची गणना व्हायची. सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलाय.

सयानी My Life Garland of Songs या शीर्षकाचं आत्मकथन लिहित होते. बिनाका गीतमाला- स्वातंत्र्योत्तर पहिल्या दशकांत जन्मलेल्या पिढीला मिळालेल्या संस्कारांपैकी एक संस्कार आणि बिनाका गीतमाला म्हणजेच अमीन सयानी हे मनामनात पक्क ठसलेलं समीकरण. बुधवार हा बिनाका गीतमालेचा वार. आधी सिलोन रेडिओ आणि त्यानंतर रेडिओ सिलोनला स्पर्धा वा उत्तर म्हणून आकाशवाणीनं सुरू केलेली विविध भारती या आवाजाच्या दुनियेवर निवेदनाच्या क्षेत्रात अमीनभाईंनी अक्षरशः राज्य केलं.

निवेदकांच्या नव्या पिढ्यांनी सयानींकडे एक ‘स्कूल’, एक परंपरा म्हणूनच पाहिलं, अशा शब्दांत ज्येष्ठ संगीत समीक्षक सुरेश चांदवणकर यांनी त्यांचा गौरव केलाय. ‘नमस्ते बहनो और भाईयो, मै आपका दोस्त अमीन सयानी बोल रहा हूँ’ अशी मधुर साद घालून श्रोत्यांच्या हृदयात घर करणार्‍या अमीन सयानी नावाच्या आवाजाच्या जादूगाराला भावपूर्ण श्रद्धांजली!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -