घरफिचर्सअंधारावर उत्तर विज्ञानच!

अंधारावर उत्तर विज्ञानच!

Subscribe

सनातन परंपरेेने तयार झालेले मन जेव्हा टोकदार अवस्थेत जाते तेव्हा ते वास्तवाचे भानही विसरते. स्वतःचेच एक कल्पनाविश्व तयार करते. त्याला वास्तवाचा काडीचाही आधार नसतो. ही एक मनोरुग्ण अवस्थाच आहे. पण हा भ्रम सर्व कुटुंबच स्वीकारते तेव्हा या पारंपरिक मानसिकतेचं पर्यावसान काय भयंकर परिणामात होतं याचं बुराडीची घटना मुर्तीमंत उदाहरण आहे. अशा घटनांचे जर आपण विश्लेषण करू लागलो तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव हेच ठळक कारण दिसून येते.

दिल्लीजवळील बुराडीमधल्या सामूहिक आत्महत्येच्या घटनेने सध्या देशभर खळबळ माजली आहे. भाटीया कुटुंबातील तीन पिढ्यांच्या सदस्यांनी सामूहिकपणे आणि सारखेपणाने केलेल्या या आत्महत्येमागे तथाकथित आत्म्यावरील श्रद्धाच होती हे एव्हाना स्पष्ट झालंय. एक निनावी चिठ्ठी पोलिसांना मिळाली असून भाटीया कुटुंब मांत्रिकांच्या नियमित संपर्कात होते असेही कळते आहे. तो मांत्रिक कोण आणि त्याने नेमके काय सल्ले दिले हे शोधून काढल्यास अघोरी बुवाबाजीचा भयानक चेहराही जगासमोर येईल. एरव्ही अत्यंत नॉर्मल वाटणारं संपूर्ण कुटुंब या थराला जावून आत्महत्या करते हे अंधश्रद्धेचे अत्यंत विदारक रूप कुणालाही प्रचंड अस्वस्थ करणारे. या कथित मोक्षप्राप्तीच्या कार्यासाठी कुटुंबातील एक मुलगा भुवनेश तयार नव्हता त्याला जबरदस्तीने त्यात सहभागी करून घेण्यात आले असावे असा पोलिसांनी प्राथमिक तपासावरून काढलेला कयास आहे. हे वाचून ही अस्वस्थता अधिकच वाढते. म्हणजे ‘मोक्षप्राप्तीसाठी आत्म्याशी संवाद’ यावरचा विश्वास इतका ठाम होता, की घरातील एका सदस्याला त्यासाठी दबावाने तयार करण्यात आले. हे सारेच भयंकर आहे.

बहुदा आपल्या देशात असे प्रकरण पहिलेच असावे. एका बाजूला विज्ञानाची प्रचंड प्रगती, समाजमाध्यमांचा वापर करणारा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा देश आणि मानसिकता मात्र अजूनही मध्ययुगातील अशा विरोधाभासी जगात आपण वावरत आहोत. आत्म्यावरील श्रद्धेपोटी, मोक्षप्राप्तीसाठी जीव देण्याच्या घटनेवर देशभर टीका होते आहे. पण टीका करणार्‍या किती लोकांच्या गाडीला लिंबू-मिरची असते, किती लोकांनी आपल्या मुलांच्या जन्मकुंडल्या तयार करून ठेवल्यात, किती लोकांनी मांत्रिक-बुवा-बाबांचा आधार आपल्या जीवनात घेतलाय याचाही विचार आता झाला पाहिजे. यातील बहुतेक आत्महत्येपर्यंतचे टोक गाठणारही नाहीत; पण आत्मघाताकडे नेणार्‍या मार्गाचेच हे सगळे प्रवासी आहेत ही बाब आपण समजून घ्यायला हवी. सनातन परंपरेेने तयार झालेले मन जेव्हा टोकदार अवस्थेत जाते तेव्हा ते वास्तवाचे भानही विसरते. स्वतःचेच एक कल्पनाविश्व तयार करते. त्याला वास्तवाचा काडीचाही आधार नसतो. ही एक मनोरुग्ण अवस्थाच आहे. पण हा भ्रम सर्व कुटुंबच स्वीकारते तेव्हा या पारंपरिक मानसिकतेचं पर्यावसान काय भयंकर परिणामात होतं याचं बुराडीची घटना मुर्तीमंत उदाहरण आहे. अशा घटनांच्या कारणांचे जर आपण विश्लेषण करू लागलो तर ‘वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव’’हेच ठळक कारण दिसून येते.

- Advertisement -

अश्मयुगातील मानवाकडे निसर्गात घडणार्‍या घटनांचे कोणतेही शास्त्रीय उत्तर उपलब्ध नव्हते. वादळे होतात, विजा कडाडतात, वणवे पेटतात, सुर्य-चंद्रग्रहणे होतात, हे निसर्गातील अविष्कार समजून घेण्यासाठी त्याने जरूर प्रयत्न केले असतील. पण त्या काळाच्या, ज्ञानाच्या मर्यादेतच त्याला ही उत्तरे शोधावी लागली. आणि त्याने या घटनांना ‘चमत्कार’ म्हटले. त्यातील दुष्प्रभावातून वाचण्यासाठी विविध कर्मकांडे शोधली त्याला ‘यातू क्रिया’ म्हटले जाते. आजही लाखो वर्षांपूर्वी अविकसित मानवाने शोधून काढलेल्या ‘यातू क्रिया’ मानवी जीवनाचा भाग आहेत. विविध कर्मकांडाच्या रूपाने त्या समाजाच्या संस्कृतीचा भाग म्हणून मानव मिरवत असतो. अशा परंपरेत माणूस चिकित्सक वृत्तीचा घडावा अशी अपेक्षा फोलच ठरणार! स्वातंत्र्यानंतर आपणच आपल्या देशाचे संविधान तयार केले. त्यात नंतर आपल्या कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. ‘It is a duty of every Indian citizen to promote scientific temperament, spirit of inquiry and humanism.’ या तत्वाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आपण आपल्या शिक्षणाच्या गाभाघटकात ‘वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती’ हे सुत्र स्विकारले.

मुल्यशिक्षणातही त्याचा समावेश केला. पण तरीही आपण वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या आधारे आपल्या जीवनाचे निर्णय घेणारा समाज निर्माण करू शकलो नाही हे आजच्या वातावरणावरून कोणालाही मान्य होईल. हे आपल्या शिक्षणव्यवस्थेचेच अपयश नाही का? विज्ञानाची पुस्तके आनंदाने वाचणारी मुलं आपल्यापैकी किती लोकांनी पाहिलीत? शाळेत भूगोल शिकवणारे शिक्षक आपल्या मुलीच्या कुंडलीत ज्योतिषाने सांगितलेला मंगळदोष ठामपणे नाकारत असतील का? या देशात वैज्ञानिक अग्णिबाण तयार करतात आणि त्याची एक प्रतिकृती बालाजीला अर्पण करून आशीर्वाद घेतला जातो. त्यावेळीच आपण ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’या मुल्याशी फारकत घेतलेली असते. वैज्ञानिक दृष्टिकोन हे एक मूलभूत तत्त्वज्ञान आहे, जे मानवाच्या विकासाची पूर्वअट म्हणावी इतके महत्त्वाचे आहे. हे माणसाला चिकित्सा करायला शिकवते, प्रश्न विचारण्याची ताकद देते आणि शंका उपस्थित करण्याचा अधिकार देते. प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण असते हे मानवी बुद्धीला कळू शकते. सर्वच कारणे आज विज्ञानाला माहिती नाहीत; पण ती कशी माहीत होतील हा मार्ग वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच जातो. आजतरी सर्वात विश्वसनीय ठरलेले हेच तत्वज्ञान आहे हा या विचाराचा मूलभूत अर्थ आहे. बुराडीसारख्या घटना जर यापुढे घडायच्या नसतील तर आपल्याला हा वैज्ञानिक दृष्टिकोन या मुल्याला आपल्या जीवनाचा भाग बनवणे आवश्यक आहे. जीवनात संसाधनांचा, तंत्रज्ञानाचा वापर करणे म्हणजे विज्ञानाची सृष्टी घेणे, खरा प्रश्न विज्ञानाची दृष्टी घेण्याचा आहे.

- Advertisement -

याची चर्चा केली, की म्हटले जाते ‘अध्यात्माचं काय? धर्माचं स्थान काय?’ आता यावर सविस्तर चर्चा करता येवू शकते. पण एक बाब लक्षात घेतली पाहिजे, की अध्यात्म तुम्हाला मानसिक समाधान देत असेल तर त्यात कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. तो उपासना स्वातंत्र्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेनेच आपल्याला दिलाय. पण हेच अध्यात्म निरर्थक शोषण करणारी कर्मकांडे, अघोरी उपचार, बुवाबाजीचा प्रसार आणि शेवटी बुराडीसारखा आत्मघात करण्यास कारणीभूत ठरत असेल तर त्याची चिकित्सा करायला हवी. तो चिकित्सेचा अधिकारही मान्य करायला हवा. तेव्हाच आपण खर्‍या अर्थाने विकसित समाज म्हणून पुढे येवू शकू.

शिवाय, हा विचार काही नवा नाही. आपल्याकडे हा विचार मांडणारी संत आणि समाजसुधारकांची फार मोठी परंपरा आहे. त्यांचाच हा विचार आहे. किमान महाराष्ट्रात तर ती फार मोठी आणि प्रभावी असलेली परंपरा आहे. त्याचा पाईक बनलो तर मोक्ष, आत्मा, चमत्कार, पुर्नजन्म, भूत-भानामती, करणी, जादुटोणा या निरर्थक कल्पनांना आपण नकार देऊ. चिकित्सेचा आग्रह धरणारा व मानवतेचा स्वीकार करणार्‍या विचाराचा अंगिकार करतो. ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ गेली तीस वर्ष याच दृष्टिकोनाच्या प्रचार-प्रसारासाठी कार्यरत आहे. समितीचे संस्थापक शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृती दिवस हा ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस’’म्हणून साजरा करण्याचे ‘ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क’ने जाहीर केले आहे. यातूनच वैज्ञानिक दृष्टिकोनाची आवश्यकता अधोरेखित होते. स्वतःला, कुटुंबाला आणि समाजाला बुराडीसारख्या दुर्घटनेपासून वाचवण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन हाच खरा मार्ग आहे!


– लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -