घरफिचर्ससोशल मीडिया आणि स्वस्त प्रेम!

सोशल मीडिया आणि स्वस्त प्रेम!

Subscribe

सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या बाबतीत माझं एक निरीक्षण आहे. याठिकाणी भेटलेले मित्र-मैत्रिणी, प्रियकर-प्रेयसी जरा फास्ट आहेत. म्हणजेच लवकरात लवकर जवळीकता वाढवणे, वेगवेगळे प्लॅन तयार करणे, आणि असं काही बोलणे जसं काही आपली फार पूर्वीपासून ओळख आहे. एक गोष्ट प्रामुख्याने पाहायला मिळते. ती अशी की सवांद व शब्दांची जागा वेगवेगळ्या स्माईलींनी (इमोजी) घेतली आहे. आपण एखादी गोष्ट बोलतो त्यावेळी त्या शब्दांवर आणि भाषेवर संस्कार होत असतात. एक प्रकारे ते संक्रमण असतं. पण आज या सर्वांची जागा दोन एमएमच्या स्माईलीने घेतली आहे.

14 फेब्रुवारी या दिवशी जगभरातील तरुण-तरुणींनी व्हॅलेंटाईन डे साजरा केला. त्या अगोदर सात दिवस वेगवेगळे डेज साजरे करण्यात आले. रोज डे, टेडी डे, चॉकलेट डे वगैरे… एकमेकांना भेटण्याचे प्लॅन, गिफ्ट कोणते द्यायचे यावर मित्र-मैत्रिणीची सल्लामसलत झाली… हे सर्व घडत होते. ते एका माध्यमाद्वारे ते म्हणजेच सोशल मीडिया… या आठवडाभरात तर लॅमोर आणि टिंडरसारख्या डेटिंग अ‍ॅपवर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. आपला जोडीदार शोधण्यासाठी प्रत्येकजण व्यस्त होता. बाकी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, मेसेंजर, इंस्टाग्राम, टेलिग्राम, हँगआउट हे तर युवकांचे पाठीराखे झाले आहेत.

पहिल्या भेटीत बोलताना संभाषण कसं करावं, सुरुवातीचा मेसेज कसा असावा, याविषयी युट्युबवर व्हिडिओ अपलोड करण्यात आले. त्याच प्रमाणात पाहण्यातसुद्धा आले. एकूणच काय तर प्रेम कसं करावं आणि आपला जोडीदार कसा निवडावा याविषयी सोशल मीडियाला ‘लव्ह गुरू’ मानणारी आजची तरुणाई आभासी जगात वावरत आहे हे जेवढं खरं…. अगदी तसंच मी प्रेम केलं पाहिजे, आपलं म्हणणारं कुणीतरी असावं .. अशा प्रेमवीरांची संख्यासुद्धा वाढत आहे हेही तितकंच खरं….

- Advertisement -

प्रेम आणि मैत्री जिथे असते तिथे भावना असतात. भावना तेव्हाच प्रकट होतात ज्यावेळी तुम्ही एकमेकांच्या सहवासात असता. वि.स.खांडेकर यांचे एक छान वाक्य आहे. ते म्हणतात, ‘सहवासाच्या वेलीवर फुललेलं सुंदर फूल म्हणजे मैत्री..’ आणि मला वाटतं त्यातूनच प्रेम निर्माण होत असतं. सांगण्याचं कारण हेच की आज प्रेमाची आणि मैत्रीची परिभाषा बदलली आहे. आजपासून वीस वर्षांपूर्वी आमच्याकडे मोजकेच मित्र होते, पण आज सोशल मीडियाद्वारे आम्ही हजारो मित्र जोडले आहेत. त्यांच्यासोबत तासन् तास बोलतो त्यांच्या आवडी-निवडी जाणून घेतो पण हे सर्व सोशल मीडियाच्या सहवासातच….
ज्यांना व्यक्त होता येत नव्हतं ते सोशल मीडियामुळे प्रेमाबद्दल बिनधास्त बोलतात. अठरा ते वीस वर्षांची मुलं आपल्या भावनांना वाट मोकळी करून देतायत. (यांना कोणतेही शिक्षक किंवा प्राध्यापक शिकवत नाहीत. कारण सोशल मीडिया हेच आता एक स्वतंत्र विद्यापीठ झालं आहे.) आवडणार्‍या व्यक्तीसाठी लिहिलेली कविता, शेर, चारोळी पाठवतात किंवा स्टेटस ठेवतात.

एकूणच काय तर ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ म्हणणारी आजची पिढी पाहायला मिळते. पण या सर्व गोष्टींचा पाठलाग करत असताना हीच तरुणाई खूप काही हरवून बसलेली आहे. आजपासून तीस वर्षांपूर्वीच्या प्रेमाबद्दल आमचे एक प्राध्यापक नेहमी सांगतात. त्यावेळचं प्रेम वेगळ्याच प्रकारचं होतं. आपली मैत्रीण किंवा प्रेयसी असेल तर आम्ही पत्र लिहीत असू. एक पत्र पोचण्यासाठी आठ ते दहा दिवस लागत… ते वाचण्यासाठी काही दिवस… त्याचं उत्तर येण्याची वाट पाहतच एक महिना निघून जात असे. आणि नंतर पुन्हा पत्रांची देवाणघेवाण… स्वतः लिहिलेल्या शब्दात वेगळी ताकत होती. त्यामध्ये निरागसता होती. ठरलेल्या ठिकाणी भेटीगाठीतून प्रेम कसं सहजपणे फुलायचं.., सहवास होता, ओढ होती. एक प्रकारचा त्यात जिवंतपणा होता. राग होता सोबतच आपलेपणाही… इतकं साधं आणि निरागस प्रेम सोशल मीडियाच्या पूर्वी पाहायला मिळायचं. हेच भाव व्यक्त करणारा उदय प्रताप सिंग यांचा एक शेर आहे.

- Advertisement -

सब फैसले होते नहीं सिक्का उछाल के
ये दिल का मामला है जरा देखभाल के
मोबाइलों के दौर के आशिक को क्या पता
रखते थे कैसे खत में कलेजा निकाल के…

अगदी याप्रमाणे आजची परिस्थिती पाहायला मिळत आहे. सोशल मीडियामुळे एखाद्या वस्तूप्रमाणे प्रेमही स्वस्त झाल्यासारखं वाटत आहे. अर्थात आजही प्रेम केलं जातं… पण ज्यावेळी आजच्या प्रेमाबद्दल आपण बोलतो त्यावेळी भावनाविहीन प्रेमाचा अंश त्यात दिसतो. मेसेजद्वारे व्यक्त झालेलं प्रेम पाहायला मिळतं… ज्यामध्ये फक्त टायपिंग दिसते. शब्दांचा ओलावा दिसत नाही. मित्र किंवा मैत्रिणीचा मोबाईल नंबर मिळाला की सगळं कसं सोप्पं होऊन जातं. तासनतास तिच्यासोबत चॅटिंग आवडीनिवडीच्या गप्पा हे सगळं आहे, पण सहवास मात्र नसतो… यातच चॅटींग करत असताना एखाद-दुसरे वेळी मेसेज वाचूनसुद्धा रिप्लाय मिळाला नाही तर भांडणं होतात. रुसवेफुगवे, ब्लॉक-अनब्लॉक, स्टेटस प्रायव्हसी, यातून मानसिक ताण तणाव वाढतो. Hii पासून झालेली सुरुवात गुडबाय आणि ब्रेकअपपर्यंत कधी पोहोचते हेसुद्धा कळत नाही.

एवढेच नाही तर इथे तुमचा सर्व डेटा सेव्ह होतो. तुम्ही पाठवलेले एकमेकांचे फोटो, मेसेज, व्हिडिओ, ग्राफिक्स सर्वकाही… आणि हा डेटा जर इतर कोणाच्या हातात पडला तर याचा गैरफायदा घेणारे लोक याठिकाणी कमी नाहीत. काही प्रकरणं तर अशी आहेत की, दोन ते तीन वर्षे सोबत राहतात आणि ज्यावेळी त्यांच्यात वाद होतो. त्यावेळी त्यांच्यामध्ये झालेल्या चॅटिंगचा, शेअर केलेल्या इतर गोष्टींचा ब्लॅकमेलिंगसाठी वापर करतात. असे गैरप्रकार इथे घडतात. माझ्यासोबत असे काही होणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घ्यायला हवी. आणि हे असे का होते याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे.

सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या बाबतीत माझं एक निरीक्षण आहे. याठिकाणी भेटलेले मित्र-मैत्रिणी, प्रियकर-प्रेयसी जरा फास्ट आहेत. म्हणजेच लवकरात लवकर जवळीकता वाढवणे, वेगवेगळे प्लॅन तयार करणे, आणि असं काही बोलणे जसं काही आपली फार पूर्वीपासून ओळख आहे. एक गोष्ट प्रामुख्याने पाहायला मिळते. ती अशी की सवांद व शब्दांची जागा वेगवेगळ्या स्माईलींनी (इमोजी) घेतली आहे. आपण एखादी गोष्ट बोलतो त्यावेळी त्या शब्दांवर आणि भाषेवर संस्कार होत असतात. एक प्रकारे ते संक्रमण असतं. पण आज या सर्वांची जागा दोन एमएमच्या स्माईलीने घेतली आहे. अर्थात हे परिवर्तन आहे. ते स्वीकारलं पाहिजे, पण आज कोणत्याही विषयावर छोट्याशा स्माईलीच्या आधारेच बोललं जातं. ही बदललेली परिभाषा वस्तुस्थितीला दूर ठेवत असते. स्माईली वापरणं एक दृश्य पर्याय असू शकतो. पण प्रेम व्यक्त करण्यासाठी पूरक बाब म्हणूनच त्याचा वापर होत आहे. प्रेमात सावरायला साथ द्यायला शब्द आणि संवाद महत्त्वाचा असतो. तिथे मेसेज किंवा स्माईली पुरेशी नसते. यावर मला उर्दूतले शायर मुनव्वर राणा यांचा एक शेर आठवतो ते म्हणतात…

बदले में एसएमएस के हमें फोन किया कर
दुनिया किसी गूंगे से कहानी नहीं सुनती..

इथे एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे प्रेमात, मैत्रीत आणि कुटुंबात संवाद झाला पाहिजे… फोन करून किंवा भेट घेऊन व्यक्त व्हावं… या बाबतीत सोशल मीडिया पर्याय म्हणून असावा…!

-धम्मपाल जाधव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -