घरफिचर्सबेभरवशाच्या तीन म्हशी!

बेभरवशाच्या तीन म्हशी!

Subscribe

महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या थराला पोहोचलं आहे, याची प्रचिती देश आणि विदेशातील महाराष्ट्रीय जनतेने शनिवारी पहाटे अनुभवली. बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांकडे बोट दाखवण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या राजकारणाने केव्हाच गमावला आहे, हे या घडामोडींकडे पाहता लक्षात येईल. आता जेव्हा अशा नीच राजकारणासाठी कोणी महाराष्ट्राकडे बोट दाखवलं तर कोणी लाज वाटून घेण्याचं कारण नाही. हे राज्य पुरोगामी म्हणून नावारूपाला आणण्यासाठी अनेक मान्यवरांनी प्रचंड मेहनत घेतली. असंख्य वर्षांची पराकाष्ठा यामागे होती. काल मध्यरात्री तिला खुलेआम काळीमा फासण्यात आला. भरवशाच्या म्हशीला…ही म्हण राज्यात प्रचलित आहे. या राजकारणातील भरवशाच्या तीन म्हशींनी महाराष्ट्राच्या राजकारणाला कलंकित केलं आहे. या तीन म्हशी म्हणजे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार होत. या तिघांनी ज्या पध्दतीने राजकारणाचा खेळखंडोबा केला तो पाहता मान खाली घालण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. महाराष्ट्रातील राजकारणाच्या चढ-उताराचा हा निचत्तम बिंदू म्हणता येईल. शुचिर्भूततेचा टेंभा मिरवणार्‍या भाजपने हे सारं घडवलं आणि त्याचे म्होरके अर्थातच देवेंद्र फडणवीस होते. २४ ऑक्टोबर या दिवशी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्याला आज महिना होत असतानाही राज्यात सरकार स्थापलं गेलं नाही. सरकार स्थापन न व्हायला जी काही कारणं आहेत, ती जगाने पाहिली. यंत्रणेला सत्तेच्या दावणीला बांधण्याचा आजवरचा अलिखित प्रघात काल मोडीत निघाला. त्याला राजभवनातून थेट राजमान्यता मिळाली. अगदी राष्ट्रपतींचे प्रतिनिधी असलेले राज्यपालच हा प्रघात मोडीत काढण्यात सहभागी असतील, तर न्याय कोणी कोणाकडे मागायचा हा प्रश्नच आहे. महाराष्ट्राला मिळालेले कोश्यारी हे राज्यपालच याला सर्वार्थाने जबाबदार आहेत, हे उघड आहे. संघाचे प्रचारक म्हणून या राज्यपालांची देशभर ओळख आहे. कोणी कोणाचा प्रचारक असायला हरकत नाही. पण हा प्रचार त्या त्या संस्थेपुरता मर्यादित असावा. तो देश संविधानाच्या त्रिमूर्तीखाली येणार असेल, तर ते अधिक गंभीर आहे. यामुळे खरं तर कोश्यारी यांच्यावर कडक कारवाई करून राष्ट्रपतींनी त्यांची तात्काळ हकालपट्टी करायला हवी. सत्ता स्थापनेच्या या रडगाण्यात राज्यपाल म्हणून कोश्यारी यांनी काढलेल्या पाळवाटेने महामहीम या पादनामाची प्रतिष्ठा पुरती रसातळाला घालवलीच. पण राज्यपाल नावालाही या कोश्यारींनी धुळीस मिळवलं. राज्यपाल आपल्या पदाचा आसरा इतक्या खालचं राजकारण करण्यासाठी घेतात याचं आश्चर्य वाटत आहे. आजवर गोवा, कर्नाटक, जम्मू आणि काश्मिरातील घटनांची चर्चा व्हायची. ही तिन्ही राज्ये संख्येने कमी आणि विशेष चर्चेची नव्हती. त्या मानाने महाराष्ट्राचा पूर्वइतिहास खूपच वरचा. महाराष्ट्र हे या राज्यांसाठी आजवर आदर्शवत मानलं जायचं. या तिन्ही राज्यांच्या सत्ता स्थापनेवेळच्या घटना कमी पडतील, अशी राजकीय अवस्था विद्यमान राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्राची करून ठेवली आहे. राज्यपालांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसावा असं संविधान सांगत असलं तरी अशी वर्तवणूक नसलेले आज किती राज्यपाल भारतात आहेत, हे कोणीही ठामपणे सांगू शकणार नाही. आजवर ज्यांनी हे पद सांभाळलं ते किमान या पदाला काळीमा फासणार नाही, पदाचं महत्त्व कमी होणार नाही याची खबरदारी घेत. कोश्यारींनी या सगळ्या मर्यादा पार केल्या आणि आपण किती हलके आहोत, हे दाखवून दिलं. आपल्या निर्णयाला कोणी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ नये इतकी खबरदारी आजवरच्या राज्यपालांनी घेतली. कोश्यारींनी तीही खबरदारी घेतली नाही. संख्याबळाच्या कारणास्तव विरोधी पक्षांना २४ तासांचा मर्यादित अवधी देताना कोश्यारींनी भाजपला मात्र १३ दिवसांची बक्कळ वेळ दिली आणि विरोधकांनी विनंती करूनही त्यांना वेळ वाढवून देण्यास नकार दिला. कोश्यारींची ही कृती भाजपला सत्तेत बसवण्यासाठीच होती, हे कोणी तज्ज्ञाने सांगायची आवश्यकता नाही. आपल्या लहरीपणामुळे आज, उद्या आपल्याला सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी जावं लागेल, याचंही कोश्यारींना काही वाटत नाही, यावरून इतक्या मोठ्या पदावरील व्यक्ती कशी निर्ढावते ते सार्‍यांनी पाहिलं. शुक्रवारच्या संध्याकाळी तीन पक्षांच्या प्रमुखांची बैठक काय पार पडते आणि तिथे उध्दव ठाकरे यांच्या नावावर एकमत काय होते, सारं अपेक्षेनुसार होत असताना पहाटे पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे राजभवनावर पद आणि गोपनीयतेची शपथ घेतात, हा म्हणजे राज्याच्या एकूणच संस्कृतीच्या बरोबर उलट प्रकार झाला. असा पळपुटेपणा आजवर महाराष्ट्रानेच काय देशानेही अनुभवला नाही. याआधी महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण झालं नाही, असं नाही; पण ते होताना कोणी चोरीछुपे रात्रीची पहाट केली नाही. जे काही असेल ते दिवसाढवळ्या आणि शेकडो लोकांच्या समक्ष व्हायचं. कालचा शपथविधी म्हणजे अवसानघातकी कृतीचा घातकी नमुना म्हणता येईल. मी पुन्हा येईन…असं सांगणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकूणच राजकारणाकडे आजवर विवेकाने पाहिलं जात होतं. काल त्यांनी हा विवेक बासनात बांधून ठेवला नव्हे, तर तो लाथाडून लावला, असेच म्हणता येईल. राजकारणात कधी काय होईल, ते कोणीही सांगू शकत नाही, हे जरी खरं असलं तरी ते इतकं रसातळाला जाईल, हे कोणाच्याच मनात नव्हतं. शेवटच्या क्षणाला प्रवाहातला प्रमुख नेता फुटतो आणि तो थेट विरोधकांना जाऊन मिळतो, हे ज्या गतीने घडलं ते सार्‍या व्यवस्थेला आव्हान देणारं होतं. ज्या सेनेच्या मदतीने गेल्या पाच वर्षांत भाजपने आपल्या हाती सत्ता ठेवली त्या सेनेला मुख्यमंत्रीपद द्यायला नकार देताना राजकारणात आपण किती कोते आहोत, हे फडणवीस यांनी या निमित्ताने सार्‍या देशाला दाखवून दिलं. त्याच सेनेकडे मुख्यमंत्रीपद जाणार म्हणून विरोधकांना फोडून आपल्याकडे घेण्याच्या या कृतीने भाजपची लाज गेलीच. पण भाजपच्या या कृतीने राज्यपालांचीही लाज गेली. ही म्हणजे राष्ट्रप्रमुखांची लाज होय. ती राखायची तर राज्यपालांना घरी पाठवणं, हा एकच पर्याय होय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -