घरफिचर्सरस्त्याचा शाश्वत वापर

रस्त्याचा शाश्वत वापर

Subscribe

सध्या जगातील निम्म्याहून अधिक लोक शहरात राहतात. भारतात आज १ लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणारी ४६८ शहरे व १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असणारी ५३ शहरे आहेत. ही संख्या वरचेवर वाढत जात आहे. शहरातील लोकांना अनेक संधी उपलब्ध असतात. शिक्षण, नोकरी, दळणवळण, आरोग्य इत्यादी सेवा सुविधा सहज आणि कमी वेळेच्या अंतरावर उपलब्ध असतात. यासाठी लोकांचा शहराकडे खूप मोठा ओघ कायम असतो. शहरात ही सर्व सेवासुविधा असतात, मात्र लोकसहभाग न घेता नियोजनाशिवाय विकसित केलेल्या, झालेल्या शहरात अनेक प्रश्नही निर्माण होतात.

बस शहराच्या मधोमध ट्राफिकमध्ये फसली. अर्धा तास होऊनही गाडी एक मीटरभरही पुढे सरकत नव्हती. सहज खिडकीतून रस्त्यावरील वाहनांवर नजर टाकली. रस्त्यावर वीस-पंचवीस कार, पाच-सहा ऑटोरिक्षा, साधारण पन्नासच्या जवळपास दुचाकी रस्त्यावर खोळंबली होती. प्रत्येक वाहनात नाना प्रकारचे लोक, त्यांच्या चेहर्‍यावरील ट्राफिकमध्ये अडकल्याच्या भावमुद्रा पाहत होतो. दुचाकीवर अवघडून बसलेले प्रवासी. लहान मुलं. स्त्रिया. ऑटोमधून डोकावून रस्ता कधी मोकळा होईल याचा अंदाज घेणारे काही लोकं. गर्दीतून वाट काढीत काढीत पुढे सरकणारे काही दुचाकीस्वार. एक टांग सायकलीवर तर एक टांग जमिनीवर टेकवून उभे असलेले दोन तीन सायकलस्वार, जीव मुठीत घेऊन चालणारी पादचारी. असे सर्व चित्र दिसत होते. विनाकारण हॉर्न वाजविणार्‍या काही तर त्यावर खेकसणारे इतर लोक असे एकूण एक सर्वांच्या चेहर्‍यावर ताण दिसत होते.

वेळ घालविण्यासाठी गाडीतून हे सर्व चित्र पाहत होतो. त्यातच मोठ्या कारमध्ये बसलेल्या लोकांकडे एक नजर गेली. खिडकीच्या अवाक्यातून जितके चारचाकी दिसले त्यामध्ये बहुदा सर्व गाड्यांमध्ये फक्त एक किंवा दोन प्रवासी होते. याउलट मी बसलेल्या बसमध्ये बसलेले व उभे प्रवासी मिळून शंभरीच्या आसपास लोकं होती. मग बसने व्यापलेली रस्त्यावरील जागा इतर वाहनांनी व्यापलेली जागा पाहिली. याचा एक अंदाज बांधला. त्यातून एक प्रश्न पडला की, रस्ता(रोड) हे कशासाठी असतात? या प्रश्नांची येणारी बहुतांश उत्तरे कशी असतील बरं? रोड हे गाड्यांसाठी असतात.

- Advertisement -

पण हे कितपत खरे आहे? रोड्स हे गाड्यासाठी असतात का? असे नाही. रस्ते हे लोकांच्या दळणवळणासाठी असतात. मात्र आज आपले रस्ते खरेच दळणवळण सुकर करण्याच्या दृष्टिने किती उपयुक्त आहेत? खरे तर दळणवळण सुकर होण्यासाठी रस्त्यावरून वाहणे कमी करणे गरजेचे आहे. अनेकांना असे वाटू शकते की वाहनेच तर आपले दळवळण शक्य करतात. मग वाहने रस्त्यावरून काढून ते कसे शक्य होईल. पण याबाबत सध्याच्या वाहतूक व्यवस्थेचा नीट विचार केला तर ही बाब कोणत्याही समजूतदार माणसाला समजणे अवघड नाही. आजची वाहने ही दळणवळण व्यवस्थेतील अडथळा बनत आहेत. ते कसे आणि त्यातून काय मार्ग काढता येईल ते तपशिलात पाहूया.

सध्या जगातील निम्म्याहून अधिक लोक शहरात राहतात. भारतात आज १ लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणारी ४६८ शहरे व १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असणारी ५३ शहरे आहेत. ही संख्या वरचेवर वाढत जात आहे. शहरातील लोकांना अनेक संधी उपलब्ध असतात. शिक्षण, नोकरी, दळणवळण, आरोग्य इत्यादी सेवासुविधा सहज आणि कमी वेळेच्या अंतरावर उपलब्ध असतात. यासाठी लोकांचे शहराकडे खूप मोठा ओघ कायम असतो. शहरात ही सर्व सेवासुविधा असतात, मात्र लोकसहभाग न घेता नियोजनाशिवाय विकसित केलेल्या, झालेल्या शहरात अनेक प्रश्नही निर्माण होतात. आपण येथे फक्त रस्त्यांचा विचार करूया.

- Advertisement -

आपल्या शहरातील रस्ते कसे आहेत? पायी चालणार्‍यांसाठी, सायकल चालविणार्‍यांसाठी किती पूरक आहेत? लहान मुलं, स्त्रिया, वयोवृद्ध लोकं यांना किती सोयीचे आहेत? अपंगांबाबत विचार केला तर आपल्या रस्त्याचे बांधकामात पूर्णतःच दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी माझा एक मित्र उत्तर कोरिया शहरात जाऊन आला. तो दोन्ही पायांनी अपंग आहे. त्याचा विदेशातील हा पहिलाच प्रवास होता. त्यांने हा प्रवास एकट्यानी केला होता. पुण्यात कुठे जायचे झाले तर एखाद्याच्या मदतीशिवाय त्याला बाहेर फिरणे शक्य नव्हते. तो उत्तर कोरियामधील त्याचे अनुभव सांगत होता. कोरियामध्ये गेल्यानंतर त्याला कुठल्याच ठिकाणी थोड्या वेळेसाठी सुद्धा परावलंबी असल्याची जाणीव झाली नाही. बस पकडणे, रस्ता ओलांडणे, शहरात व्हील चेअरने प्रवास करणे हे सर्व सुरक्षित व विनाअडथळा करता आले. मात्र परत भारतात आल्यानंतर परावलंबनाची भावना सुरु झाली. आपले रस्ते हे लोकांच्या दळणवळणासाठी, प्रवासासाठी नसून ते फक्त वाहनांसाठी असल्याची तीव्र जाणीव होते.

पुणे महानगरपालिकेच्या २०१७ च्या पर्यावरणीय सध्य स्थिती अहवालानुसार पुण्याच्या लोकसंख्येपेक्षा वाहनांची संख्या जास्त आहे. दर दिवशी नवीन ७०० वाहनांची भर पडत आहे. पुणे आरटीओमधील नोंदीनुसार, २०१६ मध्ये ३१ लाखाच्या वर वाहनांची नोंद झाली, २०१७ मधी ३३ लाख ३७ हजार, आणि २०१८ मध्ये ३६ लाख २७ हजार इतक्या वाहनांची नोंद झाली. मार्च २०१८ पर्यंत ३६ लाख, २७ हजार, २८० इतक्या वाहनांची नोंद झाली आहे. त्यामध्ये अनुक्रमे, चार चाकी, दोन चाकी व इतर वाहनांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. ६ लाख ४५ हजार ६८३; २७ लाख ३ हजार १४७; २ लाख, ७८ हजार ४५०. खाजगी वाहनांची संख्या झपाट्याने वाढते आहे.

आपण प्रवास कशासाठी करतोत बरे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, खरेदी, मनोरंजन, नातेवाईक व मित्रांशी भेटीगाठी, एखादे कार्यक्रमास उपस्थित राहणे इत्यादी कारणांसाठी आपण शहरात एखाद्या ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी प्रवास करतोत. पुणे शहराची सध्याची स्थिती पाहता प्रत्येकाला खाजगी वाहन असणे गरजेचे वाटते. माझ्या ओळखीतील अनेक लोकं दर दिवशी जवळपास ३०-४० किलोमीटर प्रवास करून नोकरीला जातात. दोन चाकीवर इतक्या लांबचे प्रवास करून खूप थकतात. अनेकदा ट्राफिकमध्ये अडकून त्यांचे मानसिक संतुलन बिघडते. चिडचिडेपणा वाढतो. नोकरीवरून इतका लांबचा प्रवास करून घरी आल्यानंतर दुसरे काहीच करण्याची इच्छा राहत नाही.

या सर्व गोष्टीमधून बाहेर पडण्यासाठी काय करता येऊ शकेल. २५ सप्टेंबर २०१५ रोजी, संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने शाश्वत विकासाचे १७ लक्ष्य स्वीकारले आहेत. त्यामध्ये ११ वे लक्ष्य हे, शहरे आणि मानवी वसाहती अधिक समावेशक, सुरक्षित, संवेदनशील आणि शाश्वत करण्याचे निश्चित केले आहे. या लक्ष्याच्या पूर्तीसाठी काही उद्दिष्ट्ये ठरविली आहेत. ११.२ क्रमांकाचे उद्दिष्ट हे शहरी वाहतूक व्यवस्थेवर आधारित आहे. २०३० सालापर्यंत, सर्वांसाठी सुरक्षित, परवडणारी आणि शाश्वत अशी वाहतूक व्यवस्था निर्माण करणे, रस्त्यावरील सुरक्षितता वाढविणे, सार्वजनिक वाहतुकीवर विशेष भर देणे आणि त्यामध्ये दुर्बल घटक, महिला, बालके, अपंग व वृद्ध यांच्या गरजा लक्षात घेऊन सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, हे आहे. शाश्वत विकास लक्ष्य सहमतीवर करारावर भारताने स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांना हे उद्दिष्ट पूर्ण करणे बंधनकारक आहे. याअंतर्गत रस्त्याचा वापर लोकांच्या दळणवळणासाठी व्हायचे असेल तर खाजगी वाहने रस्त्यावर येणार नाहीत यासाठीची व्यवस्था सुनिश्चित करावी लागेल.

खाजगी वाहने येऊ नयेत यासाठी त्यांना दंड आकारण्याची गरज नाही. त्यासाठी शहरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुदृढ करावे लागेल. वेळेवर शहरी बसेस उपलब्ध असतील तर तीस पस्तीस किलोमीटर गाडी चालवून जाणे कुणालाही हौसेची बाब नसेल. जवळच्या अंतरासाठी पायी चालणार्‍यासाठी व सायकल स्वारासाठी वापरायोग्य फुटपाथ व सायकल ट्रॅक बनविणे आवश्यक आहेत. एकंदरीत शाश्वत शहराचा विचार करून लोकवस्तीच्या जवळपास त्यांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे बाजारपेठा उभारणे. मनोरंजनासाठीची साधने उपलब्ध करून देणे. गार्डन, पार्क, छोट्या मुलांना खेळण्यासाठीची उद्याने उभारणे गरजेचे आहे. रस्ता/रोड सोडून इतर सार्वजनिक ठिकाणी लोकांना वापरता येतील असे विकसित करणे ह्या बाबी स्वस्थ शहरासाठी खूप गरजेच्या असतात. लोक त्यांचा किती वेळ घरात व किती वेळ सार्वजनिक ठिकाणी घालवतात यावरून एखादे शहर किती स्वस्थ आहे हे ठरवता येते.

बसवंत विठाबाई बाबाराव:

(लेखक पर्यावरण शिक्षण विषयाचे अभ्यासक आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -