घरफिचर्सप्रेम स्वरुप भाऊ !

प्रेम स्वरुप भाऊ !

Subscribe

संपूर्ण घर बिथरलं आहे. कोणीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. लहानपणापासूनच्या असंख्य आठवणी आहेत आणि त्या कायम माझ्याबरोबर राहतील. पण स्वरूप अभ्यासात हरवणं मला मान्य होतं, आयुष्याच्या शर्यतीत तू मला हरवणं मला कधीच मान्य होणार नाही. कोणत्याही बहिणीवर ही वेळ कधीच येऊ नये. रक्षाबंधनाच्या निमित्ताने मी अश्रू गाळत नाही बसणार, कारण तुलाही आवडणार नाही हे मला माहीत आहे.

प्रिय स्वरूप,

रक्षाबंधन हे भावाबहिणीचं अतूट नातं. वयात कितीही अंतर असो हा गोडवा कधीच कमी होत नसतो. गेले सहा – सात वर्षे आपल्यात कोणताही संवाद नव्हता. पण म्हणून माझ्याकडून हा बंध कधीच तोडला गेला नाही. १५ दिवसांपूर्वीच तू लोकांसाठी शरीरानं या जगातून निघून गेला आहेस. पण माझ्या मनात कायम तू तसाच राहणार आहेस. नकळत्या वयात पहिली राखी मी तुला बांधली होती. अर्थात राखी म्हणजे नक्की काय? भाऊ काय असतो? हे माहीत नसताना पहिली राखी तुला बांधली.

तुझ्या शेवटच्या क्षणी तुला मी पाहू पण शकत नव्हते रे. डोळ्यात इतकं पाणी भरून आलं होतं. पण तुला जाणवू नये म्हणून वेगळ्याच विषयावर बोलावं लागत होतं. नियतीच्या मनात काय आहे हे कुणालाच कळत नाही. पण तुझ्यासारख्या चांगल्या माणसाला इतक्या लवकर घेऊन जायचं कारणच काय? हेच मला देव असेल तर नक्की विचारायचं आहे. माझं आणि देवाचं तसं काही अगदी चांगलं आहे असं नाही. पण तुझं तर होतं ना? मग असं का झालं? बरेच जण होतात कॅन्सरमधून बरे. मग अगदी दोन महिन्यात होत्याचं नव्हतं तुझ्या बाबतीत का? शेवटच्या क्षणी हातात घट्ट हात धरून म्हणालास, ‘ताई तुला भेटायचंच होतं गं’, रोज रात्री तुझा तो चेहरा आणि शब्द कानात आणि डोळ्यात उतरतात. इतकं होतं तर मोठ्यांच्या भांडणामध्ये तू का दूर गेलास? हे सगळं तुझ्याशी मला बोलायचं होतं. मी किती प्रयत्न केला सांग बरं या सात वर्षात तुला कॉल करायचा. तू सगळ्यांशी चांगला होतास ना? मग एकदा बहीण म्हणून मी काय सांगत आहे हे तुला ऐकून घ्यावं का नाही वाटलं रे?

- Advertisement -

इतके सगळे प्रश्न आहेत आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तू तशीच तुझ्याबरोबर घेऊन गेला आहेस. अगदी चहा कॉफीचं व्यसन नसणाराही तू. काळानं इतका मोठा घाला का घालावा? मनापासून सांगत आहे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मी तुझ्या देवाला हेच सांगत होते की, काही चमत्कार कर पण तुला बरं कर. उद्या रक्षाबंधन आहे, तुला भेटले तेव्हा म्हणाले होते की, रक्षाबंधनपर्यंत घरी येशील नक्की. वाट पाहते आहे. पण असं काहीच घडलं नाही. आपल्या दोघांच्याही स्वभावात एकच समानता होती, ती म्हणजे कोणत्याही परिस्थितीत सगळ्यांना समजून घेणे आणि कधीही दुःख कोणालाही न दाखवणे. बाकी आपण दोन टोकं. तू अतिशय शांत आणि मी मोठी असूनही मस्तीखोर. तू प्रचंड हुशार अभ्यासात आणि मी शेवटच्या एक महिन्यात अभ्यास करून मार्क्स मिळवणार्‍यांपैकी एक. नेहमी घरात सगळ्यांकडून ऐकून घ्यावं लागायचं, ‘स्वरूपकडे बघ जरा. कसा हुशार आहे. अभ्यास बघ कसा छान करतो.’, एकदा मी लहान असताना तुला म्हटलं पण होतं, कशाला रे इतका अभ्यास करतोस, मला ऐकून घ्यावं लागतं. पण तरीही आपलं छान गुळपीठ होतं. हळूहळू मोठे होत गेलो आणि काही कारणानं दुरावा वाढत गेला. तो मिटवायचा माझा खूप प्रयत्न होता. पण तू साथ दिलीच नाहीस. हे मला कायम मनाला टोचून राहील. आपण दोघेही एकाच क्षेत्रात पण कधीच एकत्र काम करण्याचा योग आला नाही. वाटलं होतं कधीतरी समोर येऊच. पण आता तेसुद्धा शक्य नाही.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने मी अश्रू गाळत नाही बसणार, कारण तुलाही आवडणार नाही हे मला माहीत आहे, जेव्हा तू गेलास, तेव्हा मनसोक्त रडून घेतलं आहे मी. पण आता मला कॅन्सरग्रस्त लोकांसाठी काम करायचं आहे. मला माहीत आहे हे दुःख आणि ही पिडा काय असते. पण शेवटच्या क्षणीही तू माझ्या आशेला तडाच दिलास रे. सतत वाटत राहातं की, तू माझ्याशी सगळं बोलायला हवं होतंस, शेवटीही मला माहीत होतं, तुला खूप बोलायचं आहे, पण तो क्षण आणि ती वेळ नव्हतीच. तुझ्या स्पर्शातून आणि हातात घट्ट हात पकडलास, त्यावरूनच मला सगळं जाणवलं होतं. निघताना जेव्हा माझा थरथरणारा हात तुझ्या गालावरून फिरला तेव्हा तुलाही सगळं कळलं होतं. सात वर्षांपूर्वी जेव्हा बोलणं अचानक बंद झालं, तेव्हा खूप रागावले आणि रडले होते मी. कारण तू जे काही केलंस, ते मला पटलंच नव्हतं. त्यासाठी मी तुला जन्मभर माफ करणार नव्हते रे. पण जर मला माहीत असतं की, हे असं काहीतरी पुढे वाढून ठेवलं आहे, तर ताईच्या हक्कानं तुला फटके मारून बोलायला लावलं असतं मी माझ्याशी. आता फक्त जर आणि तर इतकंच म्हणू शकते.

- Advertisement -

संपूर्ण घर बिथरलं आहे. कोणीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. लहानपणापासूनच्या असंख्य आठवणी आहेत आणि त्या कायम माझ्याबरोबर राहतील. पण स्वरूप अभ्यासात हरवणं मला मान्य होतं, आयुष्याच्या शर्यतीत तू मला हरवणं मला कधीच मान्य होणार नाही. कोणत्याही बहिणीवर ही वेळ कधीच येऊ नये. दु:ख मागे सरण्यावर काळ हे औषध आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण त्यावर मात करणं आजपर्यंत कोणालाच जमलं नाही. तुझ्या आठवणीत दरवर्षीचा रक्षाबंधन आणि भाऊबीज हा सण जाईल, पण आता तू कधीच समोर येणार नाहीस, हे सत्य बदलू शकत नाही. तू देवाला मानत होतास खूप, त्यामुळे जर तू त्याच्याजवळ आहेस, तर त्याला नक्की सांग की, पुढचा जन्म अशी काही संकल्पना असेल, तर त्या जन्मात आमच्यात कधीही दुरावा येऊ देऊ नकोस. तू जिथे कुठे आहेस, नेहमीच सुखी राहा. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.

तुझीच ताई.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -